Tuesday, April 11, 2017

माझ्या मराठीचा बोलू कौतुके – कासवही पैजा जिंके

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात तब्बल आठ पुरस्कारांवर मोहोर उमटविणा-या मराठी चित्रपटांचा डंका देशभर वाजतो आहे. ‘कासव’ सुवर्णकमळाच्या शर्यतीत जिंकले आहे. ‘व्हेंटीलेटर’, ‘दशक्रीया’ तसेच ‘सायकल’ या चित्रपटांनीही बाजी मारली आहे. 
दादासाहेब फाळके, सावेदादा, विष्णूपंत दामले, एस.फतेलाल, सी.रामचंद्र, बाबूराव पेंटर यासारख्या मराठी माणसांनी भारतीय सिनेमा रुजवला, वाढविला. मात्र मध्यंतरीच्या काळात मराठी सिनेमा रंजनाच्या गर्तेत हरवला होता. ‘श्वास’ चित्रपटाने मराठी सिनेमाच्या हरवलेल्या आत्मविश्वासाला नवसंजीवनी दिली. त्यानंतर मात्र मराठी सिनेमाने मागे वळून पाहिलेले नाही. आपण आता अभिमानाने म्हणू शकतो ‘माझ्या मराठीचा बोलू कौतुके – कासवही पैजा जिंके’. मराठी सिनेमा कथानक, अभिनय, दिग्दर्शन, गीत-संगीत या सर्वच बाबतीत हिंदी चित्रपटांच्या पुढे आहे.
‘शामची आई’ या प्रल्हाद केशव अत्रे दिग्दर्शित मराठी चित्रपटाला 1954 साली राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुवर्णकमळ मिळाले होते. त्यानंतर तब्बल 50 वर्षानंतर 2004 साली संदीप सावंत यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘श्वास’ चित्रपटाला सुवर्णकमळ मिळाले. त्यानंतरच्या एक तपाच्या कालखंडात जे दर्जेदार मराठी चित्रपट निघाले त्यांची यादी मोठी आहे. यात जोगवा, सिंधुताई सपकाळ, ता-यांचे बेट, बालगंधर्व, बाबू बँडबाजा, शाळा, जन गण मन, देऊळ, फँड्री, बालक – पालक, विहीर, डोंबीवली फास्ट, गाभ्रीचा पाऊस एक हजाराची नोट, रमा- माधव, लोकमान्य एक युगपुरुष, कोर्ट,  नागरिक ,किल्ला, ख्वाडा, एलिझाबेथ एकादशी, हाफ तिकीट , वेंटीलेटर, दशक्रीया, कासव, सायकल इत्यादी चित्रपटांचा समावेश होतो. या प्रत्येक चित्रपटाचे कथानक वेगळे आहे. आशयदृष्टया इतके दर्जेदार चित्रपट मागील बारा वर्षात हिंदी भाषेतही निघाले नाहीत. तमाशाप्रधान आणि  विनोदाच्या गर्तेत सापडलेल्या मराठी चित्रपटांनी आता कात टाकून उंबरठा ओलांडला आहे हेच यातून दिसून येते.
व्यावसायिकदृष्टया यशस्वी ठरलेल्या मराठी चित्रपटांची संख्याही अशात वाढते आहे. नटरंग, लय भारी, दुनियादारी, टाईमपास, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, कटयार काळजात घुसली, दगडी चाळ, टाईमपास 2, नटसम्राट इत्यादी सिनेमांचा यात समावेश करता येईल. नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेल्या सैराट या मराठी सिनेमाने तर उत्पन्नाचा शंभर कोटीचा टप्पा पार करुन मोठा विक्रम नोंदविला आहे.
चौंसष्टाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2017 या सोहळ्यात ज्या मराठी चित्रपटांना पुरस्कार मिळाले त्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने  7 एप्रिल 2017 या जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने ‘नैराश्य ( डिप्रेशन)’ विषयावर पुढील वर्षभरात ‘चला बोलू नैराश्यावर’ ही मध्यवर्ती संकल्पना घेऊन काम करण्याचे आवाहन केले आहे. नेमक्या याच विषयावरील ‘कासव’ या मराठी चित्रपटाला राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाल्याचा आनंद खूप मोठा आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी केले आहे. नैराश्यातून  बाहेर येणे कसे शक्य आहे ही कथा यात मांडण्यात आली आहे. मराठी चित्रपटाला केवळ पाच वेळा सुवर्णकमळ मिळाले. त्यात प्र.के.अत्रे दिग्दर्शित श्यामची आई (1954), संदीप सावंत दिग्दर्शित श्वास (2004), उमेश कुलकर्णी दिग्दर्शित देऊळ (2012), संदीप ताम्हाणे दिग्दर्शित कोर्ट ( 2015) आणि आता सुमित्रा भावे – संजय सुकथनकर दिग्दर्शित कासव ( 2017) या चित्रपटांना हा बहुमान लाभला आहे.
दशक्रीया हा चित्रपट बाबा भांड यांच्या कादंबरीवर आधारलेला आहे. एखादया कादंबरीवर आधारलेला चित्रपट करताना खूप अडचणी येतात. दशक्रीया चित्रपटाची पटकथा संजय कृष्णाजी पाटील यांना आठ वेळा लिहावी लागली, तेव्हा हवी तशी प्रभावी पटकथा तयार झाली. या पटकथा लेखनासाठी त्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळेच त्यांना सर्वोत्कृष्ट पटकथा लेखनाचा पुरस्कार जाहीर झाला. ‘‘मी 1995 साली लिहिलेल्या दशक्रीया कादंबरीवरुन हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. या चित्रपटात दाखविण्यात आलेला शेवट माझ्या कादंबरीतील शेवटापेक्षाही प्रभावी आहे’’ अशी आठवण बाबा भांड यांनी यासंदर्भाने सांगितली आहे. दशक्रीया विधीच्या वेळी कर्मकांडाचे स्तोम माजवून सर्वसामान्य माणसाला कसे लुबाडले जाते याची कथा या चित्रपटात आहे.
अभिनेत्री प्रियंका चोप्रा यांनी ‘व्हेंटीलेटर’ ची निर्मिती केली आहे. या चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले तेव्हा त्या म्हणाल्या ‘‘या चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचे समजले तेव्हा खूप आनंद झाला. हा चित्रपट चित्रित करणे खूप अवघड कार्य होते.दिग्दर्शक राजेश मापुस्कर आणि सहका-यांनी केलेल्या एकत्रित प्रयत्नामुळे हे शक्य झाले. मी या चित्रपटाची कथा प्रथम ऐकली तेव्हा मला माझ्या बाबांची आठवण आली. माझ्या बाबांना काही काळ व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते’’. या चित्रपटात प्रियंका चोप्रा यांनी ‘थांब ना रे तू बाबा, जाऊ नको दूर तू बाबा’ हे एक हृदयस्पर्शी गाणेही म्हटले आहे.
 प्रकाश कुंटे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘सायकल’ या चित्रपटात सामाजिक स्थितीवर रंजक पध्दतीने भाष्य करण्यात आले आहे. या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट वेशभूषा सन्मान लाभलेले सचिन लोवलेकर यांनी सांगितले की ‘‘या चित्रपटासाठी वेशभूषा निश्चित करताना लहान मुलांच्या गोष्टीच्या पुस्तकातील रंगसंगती विचारात घेऊन काम केले’’.

मराठी सिनेमाला उंचीवर नेण्याचे काम आपल्या चित्रपट दिग्दर्शक, कलाकारांनी केले आहे. आता मराठी रसिकांनीही या दर्जेदार कलाकृतींना चित्रपटगृहात सिनेमा पाहून तितकीच मनस्वी दाद देणे गरजेचे आहे.

व्यक्तिपूजा हूकूमशाहीकडे नेते

भारतीय समाजाचा, सामाजिक रचनेचा , भारतीयांच्या मानसिकतेचा संपूर्ण अभ्यास असणारी आणि त्यावर अचूक भाष्य करणारी एकमेव व्यक्ती म्हणजे भारतरत...