Friday, January 5, 2024

कोण होतास तू काय झालास तू ?

खींचो न कमान को न तलवार निकालो जब तोप मुक़ाबिल हो तो अख़बार निकालो भारतावर इंग्रजांची राजवट होती त्या काळात अकबर इलाहाबादी यांनी लिहिलेला हा शेर खूप प्रेरणादायी ठरला होता .लोकमान्य टिळक, महात्मा गांधी ,पंडित जवाहरलाल नेहरू, गणेश शंकर विद्यार्थी , मौलाना आझाद, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह स्वातंत्र्यलढ्याच्या कालखंडात कार्यरत असलेल्या प्रत्येक नेत्याने इंग्रजांविरुद्ध लढा देण्यासाठी आपले स्वतःचे वर्तमानपत्र काढले होते. वृत्तपत्र हे इंग्रजांच्या विरुद्ध लढण्यासाठी एक महत्त्वाचे शस्त्र आहे याची जाणीव या नेत्यांना होती .भारतातील सर्व राज्यात सर्वच नेत्यांनी आपली वृतपत्रे सुरू केली . इंग्रज सरकार भारताचे आणि भारतीयांचे शोषण करत आहे हे या वृत्तपत्रांनी लोकांच्या निदर्शनास आणून दिले . या इंग्रज सरकारला देशातून घालवले पाहिजे हा संदेश दिला . वृत्तपत्रांनी केलेल्या जनजागृतीमुळे देशभरात इंग्रज सरकार विरुद्ध असंतोष निर्माण झाला आणि लोक मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळीत सामील झाले . महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्य लढ्याला यश मिळून भारत देश स्वतंत्र झाला .यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, त्या काळच्या वृत्तपत्रांमध्ये विश्वासार्हता होती ,समाज बदलण्याची ताकद होती .त्यामुळेच लोक संघटित झाले, स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले आणि इंग्रजांना भारत सोडून जाणे भाग पडले . स्वातंत्र्यानंतरच्या काळात आणीबाणीच्या कालखंडात पुन्हा एकदा वृत्तपत्रांच्या शक्तीचा प्रत्यय आला . आपल्या हातून सत्ता जाते आहे असे वाटत असल्यामुळे इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केली .या कालखंडामध्ये वृत्तपत्रांवर फार मोठी बंधने घालण्यात आली .अनेक पत्रकार आणि संपादकांना तुंरुंगात टाकण्यात आले . वृत्तपत्रांनी बातम्या किंवा लेख लिहिण्यापूर्वी महसूल अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी अशी सेन्सॉरशिप लादण्यात आली . वृतसंस्था बंद करण्यात आल्या .अनेक वृत्तपत्रांनी आणि पत्रकारांनी या आणीबाणीच्या विरुद्ध स खंबीरपणे लढा दिला .परिणामी इंदिरा गांधींना आणीबाणी पठाविणे भाग पडले .1977 मध्ये आणीबाणी उठल्यानंतर झालेल्या निवडणुकीमध्ये इंदिरा गांधींचे नेतृत्व असलेल्या काँग्रेस पक्षाचा देशभरात दारुण पराभव झाला आणि जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आले.. वृत्तपत्रात समाज बदलण्याची ताकद असते ही गोष्ट पुन्हा एकदा सिद्ध झाली . वृत्तपत्रांची ही शक्ती 1990 पर्यंत टिकून होती .त्यानंतरच्या कालखंडात मात्र पत्रकारांमध्ये ,संपादकांमध्ये आणि वृत्तपत्रांमध्ये ही शक्ती शिल्लक राहिले न .ली नाही. भारताने जागतिकीकरणाचा स्वीकार केला त्या कालखंडात वृत्तपत्र क्षेत्रामध्ये मोठे बदल झाले .वृत्तपत्र मालकांना प्रगत देशातून वृतपत्र छपाईसाठी महागडी यंत्रसामुग्री, वृत्तकागद, शाई इत्यादी साहित्य मागविण्याची संधी मिळाली. त्यामुळे वृत्तपत्र क्षेत्रामध्ये भांडवली स्पर्धा सुरू झाली .अधिक पानांचे रंगीत आणि कमीत कमी किमतीमध्ये वृत्तपत्र वाचकाला देणे यासाठीची किंमत स्पर्धा सुरू झाली . गुळगुळीत आणि शुभ्र कागदावर छापलेले सोळा पानी रंगीत वृत्तपत्र जर एक रुपयाला मिळत असेल तर कृष्णधवल रंगांमध्ये काळपट रंगाच्या कागदावर छापलेले स्थानिक आठपानी वृत्तपत्र विकत घेणे वाचकांना नकोसे वाटू लागले .वृत्तपत्रातील विचारापेक्षा वृत्तपत्राची मांडणी सजावट वृत्तपत्राच्या प्रश्नांची संख्या आणि वृत्तपत्राची किंमत या गोष्टींना महत्त्व प्राप्त झाले .याचा फायदा वृत्तपत्र क्षेत्रातील साखळी वृत्तपत्र चालविणाऱ्या भांडवलदारांनी घेतला . 'मोठा मासा लहान माशास गिळतो' या म्हणीप्रमाणे या भांडवलदारांनी छोटी छोटी स्थानिक वृत्तपत्रे हळूहळू बंद पडतील अशी परिस्थिती निर्माण केली .आजच्या कालखंडातील देशभरातील वृत्तपत्रांची परिस्थिती जर आपण पाहिली तर चांगल्या पद्धतीने चालणारी वृत्तपत्रे एक तर राजकारणी लोकांच्या किंवा भांडवलदारांच्या हातात आहेत असे चित्र आपल्याला दिसते .वृत्तपत्र हा व्यवसाय नसून ते समाजात बदलाचे एक साधन आहे असे मानणारी मराठवाडा वृतपत्रासारखी ध्येयवादी वृत्तपत्रे हळूहळू काळाच्या पडद्याआड गेली . पूर्वी वृत्तपत्रे ही संपादकाच्या नावाने ओळखली जात असत .माधव गडकरी यांचा लोकसत्ता, गोविंद तळवळकर यांचा महाराष्ट्र टाईम्स, अनंत भालेराव यांचा मराठवाडा ,रंगा अण्णा वैद्य यांचा संचार अशी वृत्तपत्रांची ओळख होती .त्या संपादकाचे विचार व अग्रलेख वाचण्यासाठी लोक वृत्तपत्र विकत घेत असत . वृतपत्राचे मालक कोण आहेत हे लोकांना ठाऊकही नसायचे . ज्या संपादकांना स्वतः ची विचारधारा होती ,ज्यांची जनतेशी बांधिलकी होती अशा संपादकांना मात्र वृतपत्र मालकांनी बाजूला सारले आणि वृत्तपत्राचे मालक हे स्वतःच संपादक म्हणून मिरवू लागले . या वृत्तपत्रांनी जाहिरातींसाठी मोठ्या प्रमाणात तडजोडी करण्यास सुरुवात केली .निवडणुकीच्या काळामध्ये तर काही अपवाद वगळता सर्वच वृत्तपत्रे पेड न्यूज देतात.या सर्व तडजोडींमध्ये वृत्तपत्रे आपली विश्वासार्हता पूर्णतः गमावून बसली आहेत .एका वृत्तपत्रात ज्या पद्धतीने एखादी बातमी दिलेली असते त्याच्या अगदी विरुद्ध पद्धतीने दुसऱ्या वृत्तपत्र बातमी दिलेली असते .एखाद्या नेत्याची सभा यशस्वी झाली किंवा नाही याविषयी प्रत्येक वृत्तपत्रातील विश्लेषण वेगवेगळ्या स्वरूपाचे असते .त्यामुळे कोणते वृत्तपत्र खरे आणि कोणते वृत्तपत्र खोटे हे ठरवणे वाचकाच्या दृष्टीने अवघड बनले आहे .वृत्तपत्रातील बातम्यांचा आणि लेखनाचा स्तर हा सवंग झाला आहे .वेगवेगळ्या सॉफ्टवेअर्सचा वापर करून वृत्तपत्रांमधील कोणत्या बातम्या जास्तीत जास्त वाचल्या जातात याचा आढावा आता वृत्तपत्रे घेतात आणि तशा प्रकारच्या बातम्या मोठ्या प्रमाणात दिल्या जातात .त्यामुळे सिनेमा, सेलिब्रिटी, क्रिकेट आणि गुन्हेगारी या चार क्षेत्रांशी निगडित बातम्यांना मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्धी दिली जाते. वैचारिक लेखन , प्रबोधनात्मक लेखन हद्दपार केले जात आहे. वृत्तपत्रांच्या अग्रलेखांची लांबी कमी कमी होत अग्रलेखच नाहीसे होण्याची वेळ आली आहे .लोकांच्या अभिरुची प्रमाणे आम्ही बातम्या देतो असे या वृत्तपत्रांचे म्हणणे आहे .आम्ही लोकसेवेसाठी वृत्तपत्र चालवत नाही तर हा आमचा व्यवसाय आहे आणि व्यवसायामध्ये नफा मिळवण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे अशा प्रकारचा युक्तिवाद वृत्तपत्र मालकांकडून केला जात आहे . जेव्हा मुले शाळेत शिकत असतात तेव्हा शिक्षकांनी मुलांना काय आवडते याचा शोध घेतला तर त्यांना खेळायला आणि दंगा करायला जास्त आवडते असा निष्कर्ष निघेल. अशा स्थितीत शिक्षकांनी मुलांना केवळ खेळायला आणि दंगा करायला परवानगी दिली आणि शिकवणे बंद केले तर काय होईल ?वृत्तपत्र चालविणे हा व्यवसाय असला तरी देखील डॉक्टरांवर, शिक्षकांवर ज्याप्रमाणे सेवेची जबाबदारी असते त्याप्रमाणे वृत्तपत्रांवर देखील समाजाला जागृत करण्याची, योग्य दिशा दाखवण्याची जबाबदारी असते .आजच्या काळात भारतातील वृत्तपत्रांची मालकी ज्यांच्या हाती आहे त्यांना ही जबाबदारी नकोशी झालेली आहे . 1990 नंतर सर्व क्षेत्रे जागतिक स्पर्धेसाठी खुली झाली त्याचा फायदा भारतातील वृत्तपत्र मालकांनी भरपूर करून घेतला .मात्र चतुराईने सरकारवर दबाव आणून वृत्तपत्र क्षेत्रामध्ये परदेशी व्यक्ती, अथवा संस्थां येऊ नयेत असे कायदे सरकारकडून करून घेतले. त्यामुळे आज ज्यांच्या हाती वृत्तपत्रे आहेत त्यांना वाट्टेल तशी वृतपत्रे चालविण्याची एकाधिकारशाही प्राप्त झाली आहे. भारतातील समाजाचे खरे प्रश्न मांडण्याची अथवा त्यावर परखड भाष्य करण्याची इच्छा या वृतपत्रांना नाही .सत्ताधार्‍यांचे लांगूलचालन करून परदेशी दौरे करणे, जाहिराती मिळविणे, वृत्तपत्रासाठी आणि आपल्या इतर उद्योगांसाठी सवलती मिळवणे याकडेच त्यांचे लक्ष लागलेले आहे .वृत्तपत्राचे मालक हे माध्यम सम्राट बनले आहेत . जनतेशी आणि जनतेच्या प्रश्नांशी त्यांना काही आस्था नाही. त्यामुळेच त्यांच्या हाती असलेल्या वृत्तपत्रांकडे आता समाज बदलण्याची कुठलीही शक्तीही राहिलेली नाही . या वृत्तपत्रांनी विश्वासार्हता तर केव्हाच गमावलेली आहे . मी शाळेत असताना शिक्षक असलेले माझे वडील मला सांगायचे की, जर चांगली भाषा, चांगले विचार हवे असतील तर वृत्तपत्राचे वाचन नियमित करत जा .आज माझ्या मुलांना मी असे ठामपणे हे सांगू शकत नाही . आजच्या वृत्तपत्रातील भाषा बिघडलेली आहेच आणि वृत्तपत्रातून विचार तर हद्दपारच झालेले आहेत, त्यामुळे वृत्तपत्र घ्यायचे तरी कशासाठी ? असा मूलभूत प्रश्न आता निर्माण झालेला आहे .टाईम्स समूहाची वृत्तपत्रे ज्या जैन कुटुंबामार्फत चालविली जातात त्यातले समीर जैन म्हणाले होते " आम्हाला मिळणारा 95 टक्के नफा बातमीच्या नव्हे तर जाहिरातीच्या माध्यमातून मिळतो . त्यामुळे आम्ही जाहिरातीच्या व्यवसायात आहोत असे म्हणणे अधिक संयुक्तिक ठरेल" . आजची बहुतांश वृत्तपत्रे जाहिराती आणि पैसा मिळविण्यासाठी निघतात हे वास्तव आहे . एक कालखंड असा होता की वृत्तपत्रात सरकार बाबत काय छापून येते याचा सरकारला धाक वाटत असे .वृत्तपत्र आणि विरोधी पक्षा प्रमाणे काम करावे असे म्हटले जात होते . जर वृत्तपत्रांनी एखादा मुद्दा लावून धरला तर केवळ मुख्यमंत्री अथवा पंतप्रधान नव्हे तर अख्खे सरकार देखील बदलले गेल्याची अनेक उदाहरणे आहेत . मात्र आजच्या काळात सरकारला वृतपत्रांचा कोणताही धाक उरलेला नाही .एखाद्या वृत्तपत्राने जनतेची बाजू घेऊन लिखाण केले तर सरकारची बाजू घेऊन दहा वृत्तपत्रे लिहितात . ज्या वृत्तपत्रात जनतेची बाजू मांडली गेली त्याला कारणीभूत असलेला पत्रकार अथवा संपादक शोधून त्याचा पद्धतशीरपणे काटा काढला जातो . कोरोनाच्या कालखंडामध्ये अनेकांच्या घरात वृत्तपत्रे पोहोचू शकली नाही .या कालखंडात लोकांच्याही लक्षात आले की वृत्तपत्र घरात असायलाच हवे असे काही त्यात नाही .ही बाब मुद्रित वृत्तपत्रांसाठी धोक्याची घंटा आहे .वाचक या वृत्तपत्रांपासून दिवसेंदिवस अधिक दूर जात आहेत. विश्वासार्हता नसलेल्या सवंग वृत्तपत्रांचा अट्टाहास धरून वृत्तपत्र मालकांनी याच प्रकारची कणाहीन, दर्जाहीन पत्रकारिता या पुढच्या काळातही सुरू ठेवली तर, काही काळानंतर अशी वृत्तपत्रे केवळ नामधारी राहतील किंवा नामशेष होतील यात शंका नाही . - रवींद्र चिंचोलकर, सोलापूर (9860091855)

No comments:

Post a Comment

कोण होतास तू काय झालास तू ?

खींचो न कमान को न तलवार निकालो जब तोप मुक़ाबिल हो तो अख़बार निकालो भारतावर इंग्रजांची राजवट होती त्या काळात अकबर इलाहाबादी यांनी लिहिलेला हा...