Saturday, April 13, 2013

परिवर्तनाचे सामर्थ्य लाभलेली डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता


               भारतीय पत्रकारितेचा इतिहास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारितेतील योगदानाचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही .1919 ते 1956 या जवळपास 37 वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतःच्या आणि इतरांच्या वृत्तपत्रात केलेले लेखन आणि संपादन ही कामगिरी अभूतपूर्व आहे.त्यांची पत्रकारिता समाज परिवर्तनाचे सामर्थ्य लाभलेली पत्रकारिता होती. लेखणीच्या सामर्थ्यातून क्रांती घडू शकते हे त्यांच्या पत्रकारितेने सिध्द केले.असे यश भारतात अपवादाने एखादयाच संपादकाला लाभले.
            डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारितेने सतत नवविचारांची पेरणी करण्याचे कार्य केले, समाजातील जातीभेदाचे तण नष्ट करुन परिवर्तनाची पहाट निर्माण करण्यासाठीच त्यांची लेखणी सतत संघर्ष करीत होती. पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांनी जाणीवपूर्वक व विचारपूर्वक उडी घेतली. 1918 साली   मॉंटेग्यू सुधारणा अमलात आणण्याबाबत पाहणी करण्यास साऊथबरो कमिशनची नेमणूक करण्यात आली होती.भारतीयांना काही राजकीय हक्क मिळतील अशी परिस्थिती निर्माण झाली होती. अशावेळी दलित समाजाच्या हक्कांसाठी संघर्ष करण्याची हीच वेळ आहे हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जाणले. वर्षानुवर्षे मूक राहिलेल्या समाजाने भीड सोडून आरोळी ठोकण्याची हीच वेळ  हे त्यांना समजले. त्यामुळे ‘ अर्धे देत नाही तर पूर्ण घेऊ’ अशी गर्जना करत  31 जानेवारी 1920 रोजी ‘ मूकनायक ‘ हे पहिले वृत्तपत्र डॉ. आंबेडकरांनी सुरु केले

 ‘’ काय करु आता धरुनीया भीड  

  निःशंक हे तोंड वाजविले 

  नव्हे जगी कोणी ,मुकियांचा जाण 

सार्थक लाजून नव्हे हित’

                                                                                              
ही संत तुकारामांच्या अभंगातील ओवी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘मूकनायक’ या पहिल्या वृत्तपत्राच्या प्रत्येक अंकात अग्रभागी ठळकपणाने छापलेली असे.त्यातूनही हीच भावना व्यक्त होते. मूकनायक वृत्तपत्र सुरु करताना त्याची जाहिरात त्यांनी केसरी या वृत्तपत्राकडे पाठविली , पण जागा नाही असे कारण सांगून ती जाहीरात केसरीने परत पाठविली.यावरुन केसरीकारांची मनोवृत्ती दिसून येते.मूकनायक सारख्या वृत्तपत्रांची वाट किती बिकट होती हे देखील यातून जाणवते.
मूकनायक फार काळ टिकाव धरु शकले नाही मात्र परिवर्तनाची बीजे पेरण्याचे काम या वृत्तपत्राने चोख बजावले.या वृत्तपत्राने डॉ. आंबेडरांच्या विचारांना आणि चळवळीला पुढे नेण्याचे कार्य केले.त्यानंतरच्या कालखंडात चलवळ जोर धरु लागली. जातीच्या नावाखाली  मंदीरात नाकारल्या जाणार्‍या प्रवेशाविरोधात तसेच सार्वजनिक पाणवठयावर केल्या जाणार्‍या मज्जावा विरोधात आंदोलनाने जोर धरला. याच कालखंडात 3 एप्रिल 1927 ‘बहिष्कृत भारत’ वृत्तपत्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरु केले.जातीच्या नावाखाली सवर्णांनी बहिष्कृत केलेल्या समाजाच्या वेदना डॉ. आंबेडक्रांनी या वृत्तपत्रातून व्यक्त केल्या.या वृत्तपत्राला जवळपास तीन वर्षाचे आयुष्य लाभले. आर्थिक अडचणींमुळे अखेरीस हे वृत्तपत्र बंद करावे लागले.मात्र या वृत्तपत्राने या कालावधीत केलेली कामगिरी इतिहासात स्वतंत्र नोंद करुन ठेवण्याइतकी महत्वपूर्ण होती.
                 समाजातील जातीभेद नष्ट होऊन समता प्रस्थापित व्हावी यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी कसोशीने प्रयत्न केले. त्यासाठी  24 नोव्हंबर 1930 रोजी ‘जनता’ हे वृत्तपत्र त्यांनी सुरु केले. हे वृत्तपत्र केवळ दलित जनतेनेच नव्हे तर दलितेतर जनतेनेही वाचावे अशी त्यांची अपेक्षा होती..यात त्यांनी सर्वसमावेशक विषयांवर लेखन केले.हे वृत्तपत्र 25 वर्षे सुरु होते.विचारांचा पराभव विचारांनीच केला पाहिजे हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनाचे सूत्र होते.याच भावनेतून त्यांनी सतत विचारांची लढाई केली. त्यांच्या लेखन सामर्थ्याविषयी ‘ निजाम विजय’ या वृत्तपत्राने म्ह्टले होते की ‘’ लेखकाची भाषा अत्यंत जोरदार सडेतोड व केवळ निर्भेळ सत्याशिवाय कशाचीही दरकार न करणारी अशी आहे व हेच धोरण पत्रकर्ते जोवर कायम ठेवतील तोवर ते आपले उद्दीष्ट सिध्दीस नेण्याचे यश कायम मिळवतील’’.त्याप्रमाणे खरोखरीच डॉ. आंबेडकरांच्या पत्रकारितेने भारतात नवा इतिहास रचण्याचे कार्य केले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांसह धर्मांतर करुन बुध्द धम्माचा स्वीकार केला तेव्हा जनता या वृत्तपत्राचे नाव बदलून प्रबुध्द भारत असे करण्यात आले.
                डॉ. गंगाधर पानतावणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारितेचे वेगळे वैशिष्टय सांगताना लिहितात ‘’त्या काळातल्या कोणत्याही एक मराठी वृत्तपत्रांना जी बाब करता आली नव्ह्ती ती डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घडविली ती म्हणजे ती म्ह्णजे अस्पृश्य समाजाला त्यांनी आपल्या लेखनीने विचार प्रवृत्त, कर्तव्यसन्मुख व अंतर्मुख बनविले.एवढेच नाही तर स्वतःच्या समाजापलिकडे पाहण्याच्या दृष्टीचा परीचयही त्यांनी आपल्या लेखणीने घडविला’’.
       डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लेखणीव्दारे भारतातील राजकीय,सामाजिक ,आर्थिक, शेती, शिक्षण, सहकार, परराष्ट्र व्यवहार  यासह विविध विषयांवर व्‍तापत्रातून लेखन केले.दलित समाजाला जागे करण्याचे आणि त्यांना आपल्या हक्कांची जाण३व करुन देण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांच्या पत्रकारितेने केले .डॉ. आंबेडकरांच्या प्रत्येक वृत्तपत्राची वेगळी भूमिका होती. त्यांच्या प्रत्येक वृत्तपत्राचे नावही वैशिष्टयपूर्ण होते. त्यांच्या वृतापत्रात काधीही च्छोर, उथळ लेखनाला थारा देण्यात आला नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारितेने हजारो व्यक्तींच्या जीवनात नवविचारांचे स्फुल्लिंग निर्माण करण्याचे कार्य केले.
                        ज्या समर्थ व जातीविरहित भारताचे चित्र डॉ. आंबेडकरांनी आपल्या पत्रकारितेतून रेखाटले ते मात्र पूर्णत्वास जाऊ शकलेले नाही हे मान्य करावे लागेल.आजच्या काळात राजकीय स्वार्थासाठी जातीपातींच्या अस्मितांना अधिक चेतविण्याचे काम घडत आहे. त्यामुळे जातीयवाद कमी होण्याऐवजी वाढतो आहे.वेगवेगळी रुपे देऊन जातीपातीचे बंध आणखी घट्ट केले जात आहेत. त्यामुळे जातीअंताचा लढा कायमच आहे.निःस्वार्थपणे कार्य करणारे राजकीय व सामाजिक नेते आता कोणत्याच पक्षाकडे उरले नाहीत. केवळ समाजहितासाठी पत्रकारिता करणारे संपादकही आता नाहीत नि त्यांच्या लेखणीत समाज बदलविण्याचे सामर्थ्यही नाही . एकंदरीत डॉ. आंबेडकरांना अभिप्रेत असलेले समताधिष्ठित भारताचे स्वप्न अदयाप अपूर्णच आहे.

कोण होतास तू काय झालास तू ?

खींचो न कमान को न तलवार निकालो जब तोप मुक़ाबिल हो तो अख़बार निकालो भारतावर इंग्रजांची राजवट होती त्या काळात अकबर इलाहाबादी यांनी लिहिलेला हा...