Saturday, July 16, 2011

रेडिओ माध्यमाला सापत्न वागणूक का?

                                     भारतात माध्यमांना स्वातंत्र्य दिले आहे असे नेहमीच अभिमानाने सांगितले जाते.पण हे स्वातंत्र्य रेडिओच्या वाट्याला कधी आलेच नाही.एकाच घरातील सावत्र मुलाला मिळते तशी वागणूक सातत्याने रेडिओच्या वाट्याला आली आहे.भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळाचा विचार केला तरी हेच जाणवते की, 1947 ते 1996 दरम्यान रेडिओचे स्वरुप 'आकाशवाणी 'ऐवजी 'सरकारवाणी' असेच राहिले.रेडिओ आणि दूरदर्शनला स्वायत्तता देण्याच्या उद्देशाने 1997 साली प्रसारभारतीची स्थापना झाली. पण प्रसारभारतीचे स्वरुप असे ठेवले आहे की सरकारी हस्तक्षेप कायमच राहील. .त्यामुळे सरकारला हवे ते वृत्त प्रसारित करणारे माध्यम ही आकाशवाणीची प्रतिमा बदलू शकली नाही.प्रसारभारतीच्या स्थापनेनंतरच्या काळात आकाशवाणीवरची बंधने  कमी झाली नाहीत.उलटपक्षी प्रसारभारती स्थापन झाल्यावर आकाशवाणीची उपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र दिसते.आकाशवाणी केंद्रांची अवस्था कुपोषित बालकांसारखी झाली आहे.आकाशवाणीत मागच्या वीस वर्षात नवीन नोकरभरती झाली नाही.दूरदर्शनच्या तुलनेत आकाशवाणीला विकासासाठी उपलब्ध होणारा निधी नगण्य आहे.
                                    एकंदरीतच प्रसारभारतीच्या स्थापनेनंतरच्या जमाखर्चाचा तपशील विचारात घेतला तर जाणवते की, प्रसारभारतीचा तोटा सातत्याने वाढतच गेला आहे.लोकसभेतील प्रश्नोत्तरात यासंबंधीचा तपशील देण्यात आला आहे. त्यात स्पष्ट केले आहे की, 2006-07 मध्ये प्रसारभारतीच्या जमाखर्चात 971.72 कोटी रुपयांची तफावत होती ती दरवर्षी वाढत जात 2009-10 मध्ये 1979.00 कोटी रुपये झाली आहे. या वर्षातली जमा केवळ 1119.00 कोटी रुपये असून खर्च 3098.00 कोटी रुपये झालेला आहे.( संदर्भःhttp://164.100.47.132/LssNew/psearch/QResult15.aspx?qref=83283 )सामाजिक, शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये कपात करुन उत्पन्नात वाढ करी शकणार्‍या प्रायोजित कार्यक्रमांवर आणि जाहिरातींवर भर द्या अशा स्पष्ट सूचना आकाशवाणी व दूरदर्शनला देण्यात आलेल्या आहेत, असे असूनही जमाखर्चातील तफावत वाढतेच आहे.या एकंदर प्रकारात सामाजिक, शैक्षणिक प्रसारणाचा टेंभा मिरवण्याचा हक्कही गमावला गेला आणि आर्थिक संकटाचेही पातक प्रसारभारतीच्या नशिबी आले आहे. या वास्तवामुळे नजिकच्या काळात आकाशवाणीची सध्याची दुरावस्था दूर होईल अशी कोणतीही चिन्हे दिसत नाहीत.
                              एका बाजूला सरकारी रेडिओची अशी बिकट परिस्थिती आहे तर दुसर्‍या बाजूला खाजगी एफ.एम.वाहिन्यांची स्थितीही समाधानकारक नाही.भारतात सर्वप्रथम इ.स.2000 मध्ये खाजगी एफ.एम.साठी फ्रिक्वेन्सींचा लिलाव करण्यात आला.या पहिल्या टप्प्यात भारतातील 12 शहरात एकंदर 22 एफ.एम.वाहिन्या सुरु झाल्या.मात्र केवळ मनोरंजनासाठी प्रसारण करण्याची परवानगी देण्यात आली.चित्रवाणी या दृकश्राव्य्‍ा माध्यमाला सर्वच बाबतीत खुली परवानगी दिलेली असल्याने खाजगी टीव्ही चॅनॅल्स वाटेल तसा धुमाकूळ घालू लागली , पण रेडिओ या केवळ श्राव्य्‍ा असलेल्या माध्यमावर मात्र कडक बंधने लादण्यात आली.सरकार रेडिओला अशी सावत्रपणाची वागणूक का देते ते अजूनही उलगडलेले नाही.
                                       2001 नंतर  एफ.एम.रेडिओच्या दुसर्‍या विस्ताराच्या टप्प्यात आणखी 74 शहरात प्रसारण सुरु झाले,त्यामुळे  भारतातील एकंदर 86 शहरात ही सेवा उपलब्ध झाली.विस्ताराच्या या दुसर्‍या टप्प्यातही प्रसारण धोरण तेच कायम राहिल्याने बातमीविरहित आशयाचे बंधन कायम राहिले.परिणामी एफ.एम. प्रसारणात 70 टक्के आशय सिनेमाची गाणी हाच असतो.
                        एफ.एम.रेडिओचा विस्ताराचा तिसरा टप्पा अपेक्षेपेक्षा खूप उशीरा जुलै 2011 नंतर साकारतो आहे. यात भारतातील 227 नवीन शहरात एफ.एम. रेडिओचे प्रसारण सुरु होणार आहे. एक लाखावर लोकसंख्या असलेल्या जवळपास प्रत्येक शहरात एफ.एम.ची सेवा उपलब्ध होईल.त्यामुळे एकंदर 294 शहरात 839 एफ.एम.वाहिन्या उपलब्ध होतील.
                               या तिसर्‍या टप्प्यात प्रसारणाबाबत पूर्वीच्या तुलनेत काही सवलतीही दिल्या आहेत, नवीन धोरणानुसार एफ.एम.रेडिओ वाहिन्या शहरातील सांस्कृतिक, क्रीडाविषयक, हवामान, परीक्षा निकाल, रोजगारविषयक, पाणी व वीजपुरवठा, आपत्तीविषयक माहिती देऊ शकतील.या माहितील वृत्तविरहित माहिती ठरविण्यात आले असून , अशी माहिती श्रोत्यांना देता येईल असे सरकारचे जाहीर केले आहे.एफ.एम.मधील विदेशी भांडवल गुंतवणुकीची मर्यादा 20 टक्क्यांवरुन वाढवून 26 टक्के करण्यात आली आहे.सध्या केवळ 'क 'आणि ' ड 'वर्ग शहरातील एफ.एम.रेडिओ वाहिन्यांना दिली जाणारी नेटवर्किंगची सवलत संबंधित एफ.एम.कंपन्यांना आता आपल्या देशभरातील सर्व केंद्रासाठी मिळणार आहे हे त्यातल्या त्यात दिलासादायक निर्णय आहेत. पण या सवलती  जुजबी आहेत.असे तुकड्या - तुकड्याने स्वातंत्र्य बहाल करण्यात कोणती मुत्सद्देगिरी आहे? या नवीन धोरणानुसार एफ.एम.केद्रांना बातम्या प्रसारित करता येणार आहेत, पण आकाशवाणीवर प्रसारित होणार्‍या .एफ.एम.केंद्रांना स्वतःच्या बातम्या तयार करता येणार नाहीत. मुळात आजच्या काळात शहरांमध्ये आकाशवाणीच्या बातम्या फारशा ऐकल्या जात नसताना एफ.एम.केन्द्रांना ही नको असलेली भीक सरकार का देत आहे? वृत्तपत्रे, टीव्ही, इंटरनेट, मोबाईल याद्वारे सारे काही छापले अथवा प्रसारित केले जात असताना रेडिओला अशा बंधनांमध्ये जखडून ठेवणे हा कोणता न्याय?. रेडिओच लोकांना बिघडवू शकतो असे सरकारला वाटते काय?                                                                                
                                                 सर्व माध्यमांना सारखेच स्वातंत्र्य, विदेशी गुंतवणुकीचे सारखेच नियम , सर्व माध्यमांसाठी एकच मिडिया कौन्सिल या बाबींकडे लक्ष पुरविण्याऐवजी सरकार तात्पुरती मलमपट्टी करण्याचे धोरण आणखी किती दिवस अवलंबिणार?


Sunday, May 15, 2011

श्रमिक पत्रकारांना सुगीचे दिवस

                       मराठी पत्रसृष्टीत सध्या मोठी खळबळ उडाली आहे.भास्कर वृत्तपत्र समूहाच्या दिव्य मराठी वृत्तपत्राने मराठवाड्यावर स्वारी केली आहे.पुण्यनगरीत बेनेट आणि कोलमन कंपनीच्या महाराष्ट्र टाईम्सने धमाल उडविली आहे.या दोन बलाढ्य  वृत्तपत्र समूहांच्या   हालचालींमुळे बाकीची वृत्तपत्रेही खडबडून जागी झाली आहेत.कोणी लेआउट बदलले, कोणी इतरत्र गेलेल्या पत्रकारांच्या जागी नवी माणसे घेतली, कोणी वितरणाच्या नव्या योजना अमलात आणल्या तर कोणी वाचक मेळावे व लेखक मेळावे घेण्याचा सपाटा सुरु केला.नव्याने आगमन करणार्‍या वृत्तपत्रांनी वर्गणीदार मिळविण्यासाठी अफलातून फंडे अवलंबिले आहेत.यात वाचकांचे मात्र चांगभले होत आहे. वर्तमानपत्रासाठी लागणार्‍या खर्चापेक्षा त्याच्या रद्दीची किंमत अधिक मिळत असेल तर मराठी वृत्तपत्र वाचकांची संख्या झपाट्याने वाढणार हे शेंबडे पोरही सांगू शकेल.
                     आज कोण-कोण कोणत्या वृत्तपत्रात गेले आणि कोणाला किती लाखाचे पॅकेज मिळाले हा चविष्ट चर्चेचा विषय बनला आहे.मराठी वृत्तपत्रांच्या क्षेत्रात श्रमिक पत्रकारांसाठी कधी नव्हे ते सुगीचे दिवस आले आहेत.पत्रकार खरे तर  समाजातील सर्व प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करतात, पण पत्रकारांच्या प्रश्नांना कोणी वाली नसते.बर्‍याच वृत्तपत्रात अगदी कमी पगारावर पत्रकारांना राबवून घेतले जाते.या स्पर्धेच्या निमित्ताने निदान काही पत्रकारांना तुलनेने चांगले पॅकेज मिळाले याचा आनंद आहे.
                     पत्रकारितेच्या क्षेत्रात कामाचे तास निश्चित नसतात, अधिक तास कामाचा मोबदलाही मिळत नाही.तरीही पत्रकारितेची धुंदी अशी असते की, पत्रकार काम करतच राहतो.सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री दोन-तीन वाजेपर्यंत राबणारे अनेक पत्रकार आहेत.वैयक्तिक आयुष्य नावाचा प्रकारच यात शिल्लक उरत नाही,हवी तेव्हा रजाही मिळत नाही. अगदी घरातल्या कोणाचे लग्न असले तरी सांगितले जाते, तुझे लग्न नाही ना? तुझ्यावाचून तिथे काही अडणार नाही, मग कशाला हवी तीन दिवसांची रजा?पत्रकारांच्या कामाच्या तुलनेत पगार कमीच होते.आताही काहींचीच स्थिती सुधारली आहे, अजून खूप पत्रकारांची स्थिती तशीच कायम आहे.पण हेही दिवस जातील अशी आशा वाटू लागली आहे.
                     महाराष्ट्रात लवकरच आणखी काही मराठी वृत्तपत्रे सुरु होणार आहेत. यामुळे दोन चांगल्या गोष्टी घडतील अशी अपेक्षा आहे.एक म्हणजे पत्रकारांना अधिक व चांगल्या संधी मिळतील आणि दुसरे म्हणजे मराठी वृत्तपत्रांची गुणवत्ता सुधारेल.सध्या एकदोन अपवाद वगळता मराठी वृत्तपत्रे अशी निघतात की ती पाच मिनिटेही सलगपणे वाचावी वाटत नाहीत. स्थानिक भाषेचा सुगंध त्यातून दरवळत नाही. साहित्यापासून तर वृत्तपत्रे फटकूनच असतात. महाराष्ट्रात नाव असलेल्या दोन-तीन लेखकांच्या सदरांचा रतीब घातला की पुरवणी झाली दर्जेदार असाच त्यांचा समज आहे.मराठी वाचकाला नवे काही वाचायला मिळेल अशी अपेक्षा बाळगायलाही काही हरकत नाही. त्यामुळे नवे आक्रमण असले तरी त्याचे स्वागतच करायला हवे, नाही का?

                   
                      

Friday, March 4, 2011

जनसंपर्काचे सुवर्णयुग

                                    जनसंपर्काचे शास्त्र युरोप व अमेरिकेतून भारतात आले आहे. आय व्ही ली यांना जनसंपर्काचे जनक मानले जाते.विसाव्या शतकाच्या आरंभी त्यांनी जनसंपर्काचा पाया रचण्याचे महत्वपूर्व कार्य केले.भारताच्या इतिहासाचा विचार केला तर, सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज आणि बादशहा अकबर यांनी लोककल्याणकारी राज्यासाठी केलेले काही प्रयत्न जनसंपर्काच्या कार्याशी जुळणारे होते असे म्हणता येईल. मात्र त्या काळात जनसंपर्काची संकल्पना व शास्त्र विकसित झाले नसल्याने, या स्‍ांदर्भाने विशेष अभ्यास झालेला दिसत नाही.महात्मा गांधींनी स्वातंत्र्य लढयाच्या काळात जनतेला संघटित करण्यासाठी जनसंपर्क तंत्रांचा प्रभावी अवलंब केला. दुसर्‍या महायुध्दाच्या काळात भारतीय जनतेला आपल्या बाजूने लढण्यास प्रवृत्त करण्यासाठी इंग्रजांनीही काही जनसंपर्क तंत्रांचा वापर केला.
                                  भारतात स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडातच प्रामुख्याने जनसपर्काच्या प्रसारास सुरुवात झाली.1958 साली पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडियाची स्थापना झाली आणि जनसंपर्काच्या शास्त्रशुध्द अभ्यासाला चालना मिळाली जनसंपर्काचे क्षेत्र आता खूप विस्तारले आहे..सेवा, शिक्षण,सहकार, संरक्षण, बँकिंग, वैद्यकक्षेत्र, संरक्षणक्षेत्र,सेवाभावी संस्था, उद्योग, राजकारण, कार्पोरेट क्षेत्र यासह सर्वच क्षेत्रांना आजच्या काळात जनसंपर्काची गरज भासू लागली आहे. विविध विद्यापीठांमध्ये व महाविद्यालयात जनसंज्ञापन अभ्यासक्रमात किंवा स्वतंत्रपणे जनसंपर्क अभ्यासक्रम शिकविण्याची सुविधा आता उपलब्ध झाली आहे.
           1995 ते 2008 या जवळपास तेरा वर्षाच्या कालखंडात मी जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात जनसंपर्क अधिकारी होतो, त्यामुळे जनसंपर्क कार्याचा चांगला अनुभव घेण्याची संधी मला लाभली. पत्रकारितेत दहा वर्षे काम केले असल्याने जनसंपर्काचे काम अगदी सहज जमेल असे मला वाटत होते. मात्र माझ्‍या अनुभवाच्या आधारे मला सांगावे वाटते की, जनसंपर्काचे कार्य वरकरणी सोपे वाटत असले तरी ती प्रत्यक्षात अवघड जबाबदारी आहे.सर्कसमध्ये काम करणार्‍या व्यक्तीला ज्याप्रमाणे पदोपदी क्सरत करावी लागते, तशीच कसरत जनसंपर्क अधिकार्‍याला करावी लागते. पत्रकारांसाठी आवश्यक असणारे भाषाज्ञान, लेखनकौशल्य,चौकसवृत्ती, प्रामाणिकपणा, धैर्य, चिकाटी इत्यादी गुण त्याच्याकडे असायलाच हवेत. या व्यतिरिक्तही जनसंपर्क अधिकारी म्हणून त्याच्या अंगी काही गुण असायला हवेत ते खालीलप्रमाणे-

1) श्रवणभक्ती - इतरांचे म्हणणे शांत चित्ताने ऐकून घेणे खूप महत्वाचे आहे. ऐकून घेणे या साध्या उपायामुळे अनेकदा पेचप्रसंग टळतात.  
2) विनम्रता व संयम नेहमी विनम्रपणे बोलण्याची वृत्ती जनसंपर्क अधिकार्‍याने जोपासायला हवी. संयम हाच जनसंपर्क अधिकार्‍याचा सर्वात महत्वाचा अलंकार असतो.
3) सह्कार्याची वृत्ती आपल्या संपर्कात येणार्‍या प्रत्येक व्यक्तीला सह्कार्य करण्याचीच  जनसंपर्क अधिकार्‍याची वृत्ती हवी.
4) प्रतिमा निर्मिती आपल्या संस्थेशी निगडित सर्व घटकांमध्ये संस्थेची चांगली प्रतिमा रुजविण्याचे व ती प्रतिमा टिकविण्याचे कार्य त्याला करता यायला हवे.
5) संस्थेविषयीचे ज्ञान - जनसंपर्क अधिकार्‍याला आपल्या संस्थेविषयी संपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. आपल्या संस्थेचे कार्य, विविध विभाग, संस्थेतील महत्वाच्या व्यक्ती, त्यांचे संपर्क क्रमांक इत्यादी माहिती त्याला असायलाच हवी.
6) माध्यम संपर्क  प्रसारमाध्यमे जनतेपर्यंत आपल्या संस्थेची माहिती व संदेश पोहोचविण्यावे कार्य करतात.त्यामुळे प्रसारमाध्यमांना आवश्यक असलेल्या स्वरुपात आपल्या संस्थेचे वृत्त देण्याचे कार्य जनसंपर्क अधिकार्‍याने तत्परतेने करायला हवे. बातमी कधी व कशी द्यावी, पत्रकार परिषद केव्हा आयोजित करावी इत्यादी बाबतीत तो तरबेज असायला हवा.
7) तांत्रिक ज्ञान संपर्क साधनांच्या क्षेत्रात नव्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे सातत्याने बदल घडत आहेत. हे बदल आत्मसात करुन जनसंपर्क अधिकार्‍याने वेबसाईट, ई- मेल यासारख्या नव्या तंत्रांचा अवलंब करुन संस्थेची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवावी. मुद्रण, छायाचित्रण,माहितीपट निर्मिती याविषयीही अद्यावत माहिती त्याला असायला हवी.
8) संवाद कौशल्य व सौहार्द - जनसंपर्क अधिकारी आपला स्नेही, हितचिंतक आहे हीच भावना संस्थेशी संबंधित घटकांच्या मनात निर्माण व्हावी, अशा प्रकारे संवाद साधण्याचे कौशल्य जनसंपर्क अधिकार्‍याकडे असायला हवे. त्याचे सर्वांशी सौहार्दाचे संबंध असावेत.
9) भूमिकेशी तादात्म्यता कामाची वेळ संपली तरी जनसंपर्क अधिकार्‍याला आपली भूमिका सोडता येत नाही. वेळी-अवेळी संपर्क साधणार्‍यांनाही आवश्यक ती माहिती देणे वा मदत करणे हे त्याचे कर्तव्य ठरते.        
10) आत्मविश्वास व निर्णयक्षमता -  जनसंपर्क अधिकार्‍याला आत्मविश्वास असायला हवा.संस्थेचे हित ही भावना नजरेसमोर ठेऊन त्याला त्वरेने आवश्यक ते निर्णय घेता यायला हवेत. मात्र हे सारे करताना माणुसकीचा विसर त्याने पडू देता कामा नये.
          स्वातंत्र्यानंतरच्या काळातही भारतात केवळ उद्योग क्षेत्रासाठीच जनसंपर्काची आवश्यकता आहे असे मानले जात होते.1990 नंतर भारतात नव्या आर्थिक धोरणामुळे व जागतिकीकरणामुळे मोठे बदल घडले, त्यामुळे सर्वच क्षेत्रात स्पर्धात्मक वातावरण निर्माण झाले. PRSI चे प्रयत्न तसेच विविध महाविद्यालये व विद्यापीठात जनसंपर्काचे शास्त्रशुद्ध शिक्षण दिले जाऊ लागले, त्यामुळे जनसंपर्काचे शास्त्र सर्वच क्षेत्रासाठी उपयुक्त आहे याची जाणीव रुजली.
          सध्या कार्पोरेट क्षेत्रात तसेच सार्वजनिक उध्योग क्षेत्रात जनसंपर्क तंत्रांचा सर्वाधिक अवलंब केला जातो.प्रत्येक कार्पोरेट उद्योगाच्या कार्यालयात मोठा व स्वतंत्र जनसंपर्क विभाग असतो. या विभागाच्या कार्यासाठी मनुष्यबळ व आर्थिक तरतूद मुबलक प्रमाणात उपलब्ध असते.या विभागाची जबाबदारीही तेवढीच महत्वाची असते. माध्यमसंपर्क म्हणजेच जनसंपर्क असे बर्‍याच क्षेत्रात मानले जाते. कार्पोरेट जनसंपर्कात मात्र माध्यमसंपर्काबरोबरच भागधारक, वितरक व विक्रेते, ग्राहक, शासन, समुदाय या सर्व घटकांसमवेत प्रभावी जनसंपर्क तंत्रांचा अवलंब करुन सतत संवाद करावा लागतो. कार्पोरेट क्षेत्रातील प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या तुलनेत जनसंपर्काची सरस कामगिरी करणे हे या क्षेत्रातील जनसंपर्क अधिकार्‍यासमोरील आव्हान असते.या क्षेत्रात नोकरीच्या संधी खूप आहेत, मात्र इंग्रजी भाषेतून प्रभावीपणे संभाषण व लेखण करता येणे तसेच संगणकाचे चांगले  ज्ञान ही यासाठीची पूर्वअट असते.
          शासकीय जनसंपर्काचे क्षेत्रही मोठे आहे.केन्द्र सरकारची मोठी जनसंपर्क यंत्रणा आहे.माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अधिपत्याखाली ही यंत्रणा कार्य करते.पत्र सूचना कार्यालय (PIB), वृत्तपत्र प्रबंधक कार्यालय(RNI), जाहिरात आणि दृकप्रसिद्धी संचालनालय(DAVP), छायाचित्र विभाग(Photo Division),प्रकाशन विभाग (Publication Division), चित्रपट विभाग(Films Division), संशोधन व संदर्भ विभाग(RR Section), वृत्तपत्र परिषद(PCI),क्षेत्रीय प्रचार कार्यालय, गीत व नाटय विभाग, प्रसारभारतीच्या अधिपत्याखालील आकाशवाणी, दूरदर्शन इत्यादी कार्यालयांचा यात समावेश होतो. प्रत्येक राज्याचीही स्वतंत्र जनसंपर्कयंत्रणा असते.महाराष्ट्रात माहिती व जनसंपर्क महासंचालनालय हे कार्य करते.यात वृत्त विभाग, प्रकाशन विभाग, प्रदर्शन विभाग इत्यादी विभाग आहेत.सह विभागीय कार्यालये, प्रत्येक जिल्हात जिल्हा माहिती कार्यालये, गोवा व दिल्ली येथे महराष्ट्र परिचय केन्द्र अशी यंत्रणा आहे.या व्यतिरिक्त विविध शासकीय विभागात आता जनसंपर्क अधिकारी नियुक्त केले जात आहेत.या सर्व बाबी विचारात घेता, शासकीय
जनसंपर्क क्षेत्रातही नोकरीच्या संधी मोठया प्रमाणात उपलब्ध आहेत हे स्पष्ट होते.
                           राजकीय क्षेत्रातही आता जनसंपर्काचे महत्व वाढले आहे.राजकीय पक्ष प्रसारमाध्यमांद्वारे प्रचार करण्याची संपूर्ण जबाबदारी जनसंपर्क संस्थांवर सोपवत आहेत.राजकीय व्यक्तीही प्रतिमा निर्मितीसाठी जनसंपर्क आधिकार्‍यावर विसंबताना दिसत आहेत. सेवाभावी संस्थादेखील आपले कार्य सर्वांना ठाऊक व्हावे यासाठी जनसंपर्क तंत्रांचा अवलंब करीत आहेत. शिक्षण, बँकिंग, वैद्यक, संरक्षण, सहकार इत्यादी क्षेत्रातही जनसंपर्काचे महत्व वाढ्ले आहे. एकंद्रा, भारतात जनसंपर्काचे सुवर्णयुग अवतरले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.


-   
                                      

Sunday, February 6, 2011

शिकले आता बाई म्हणूनी सारं बदललं........

                                "शिकले आता बाई म्हणूनी सारं बदललं" या समूहगीताचे स्वर गुंजत असतात आणि ते स्वर ऐकत आपण कधी एका वेगळ्या विश्वात जातो ते लक्षातही येत नाही.गावगुंफण हा माहितीपट पाहताना मला हा अनुभव आला. डॉ. शशीकांत अहंकारी व डॉ. शुभांगी अहंकारी या सेवाव्रती दाम्पत्याच्या ध्येयासक्त वाटचालीची माहिती यातून उलगडत जाते. या दाम्पत्याने ग्रामीण आरोग्यसेवेचे व्रत स्वीकारुन , उस्मानाबाद जिल्हयातील अणदूर या लहानशा गावात गेली पंचवीस वर्षे खडतर कार्य केले आहे.हॅलो मेडिकल फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या या कार्याची मांडणी प्रख्यात दिग्दर्शक अतुल पेठे यांनी गावगुंफण या माहितीपटाद्वारे केली आहे.
                             हा माहितीपट पाहिल्यावर आपले डोळे लख्खपणे उघडतात. विकासातला कोणताही अडसर एकांगी प्रयत्न करुन दूर करता येत नाही.कारण प्रत्येक अडसर हा विविध प्रश्नांच्या अभेद्य तटबंदीतला एक-एक दगड असतो. त्यामुळे एखादा प्रश्न सुटा करुन सोडविता येत नाही, सारी तटबंदीच खिळखिळी करावी लागते.त्यानंतरच ज्ञानाचा प्रकाश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू शकतो हे पूर्णसत्य ' गावगुंफण ' च्या माध्यमातून आपणाला उमगते.
                            मराठवाडा विकास आंदोलनाच्या पार्श्वभूमीमुळे 1980 च्या कालखंडातील मराठवाडयातील तरुण पिढी भारावलेली होती. त्यामुळे  उच्चशिक्षण घेतल्यानंतर काय करणार? असा प्रश्न  कोणाला विचारला तर  ' समाजाची सेवा ' असे उत्तर  मराठवाडयातील अनेकजण त्या काळी देत असत. असे असूनही शिक्षण पूर्ण झाल्यावर मात्र समाजसेवेचा सोयीस्कर विसर सार्‍यांना पडत असतो. पण लाखातील एखादी व्यक्ती सार्‍या सुखसोयींचा, तथाकथित करिअरचा त्याग करुन इतरांच्या जीवनात प्रकाश आणण्याचे व्रत स्वीकारते.अहंकारी दाम्पत्य या दुसर्‍या प्रकारात मोडणारे आहे. हॅलो मेडीकल फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या या
कार्यात डॉ. अशोक बेलखोडे, डॉ. संजय गायकवाड, डॉ. मनीषा निंबाळकर आदींची चांगली साथ लाभली हे माहितीपटातून उलगडत जाते.
                                             औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेतले तेव्हाच 1978-80 या कालखंडात डॉ. अहंकारी यांनी Health and Auto Learning Organization ( हॅलो ) ही संघटना स्थापन केली.1983 ला अणदूर येथे जानकी रुग्णालय सुरु करुन ग्राम आरोग्याच्या क्षेत्रातील सेवाकार्य  सुरु केले.हे कार्य करताना  त्यांना लक्षात आले की,शासकीय आरोग्यासेवा आणि लोकांच्या गरजा यात मोठी तफावत आहे.त्याचबरोबर हे देखील जाणवले की,सार्वजनिक आरोग्याचे प्रश्न सामाजिक, राजकीय तसेच विकासाच्या प्रश्नाशी निगडित आहेत.त्यातून बहुपेडी कार्याची प्रेरणा मिळाली.
                                    महितीपटातून समजते की, हॅलो मेडीकल फाउंडेशनच्या कार्याला आता चांगले यश लाभते आहे पण प्रारंभी खूप खडतर प्रसंगांना सामोरे जावे लागले.30 सप्टेंबर 1993 च्या महाभयंकर भूकंपानंतरच्या काळात 40 गावात आरोग्ययात्रा काढून केलेली सेवा, या परिसरातील जनतेशी सातत्याने सुरु असलेला आरोग्यसंवाद, बैलपोळ्याच्या माध्यमातून   आरोग्यसंदेश देण्यासारखे अफलातून प्रयोग, भारतवैद्य प्रशिक्षणातून महिलांना स्वावलंबी करण्याबरोबरच ग्रांमीण व दुर्गम भागात आरोग्यसुविधा पोहोचवण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम, जातीधर्माच्या भिंती दूर करुन समानतेचे तत्व्‍ा समाजात रुजविण्यासाठी केलेले प्रयत्न याद्वारेच हॅलो मेडिकल फाउंडेशनला जनतेचा विश्वास संपादन करता आला.या विश्वासाच्या बळावर संस्थेने कार्यकर्त्यांचे व्यापक जाळे उभारले आहे.
                                                          प्रारंभी.जनतेशी संवाद साधण्यासाठी बचतगटाच्या व्यास्पीठाचा आधार घ्यावा लागला. व्यवसायकर्ज घेउन महिलांनी विविध व्यवसाय सुरु केले, याद्वारे महिलाशक्तीचे मोठे पाठबळ लाभले.यापाठोपाठ आरोग्य्‍ा विमा योजना,मुलींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी जानकी रुग्णालयाच्या माध्यमातून उभारलेले नर्सिंग स्कूल, तरुणींच्या प्रश्नांसाठीकिशोरी प्रशिक्षण कार्यक्रमयासारख्या योजना अमलात आणल्या.मुलांसाठी शब्दयात्रा वाचनालय,विज्ञानवाहिनीच्या सहकार्याने ग्रामीण विज्ञान केंद्र हे उपक्रम हाती घेतले.सावधान कलापथकाद्वारे युवकांना संस्थेच्या कार्यात सहभागी करुन घेतले व या कलापथकांमार्फत जनजागृतीचा संदेश गावागावात पोहोचविल जात आहे.वैद्यक सहाय्य समितीच्या कार्याद्वारे पुरुषमंडळीही विधायक कार्यात सहभाग नोंदवत आहे.समता, सामंजस्य आणि संयम या त्रिसूत्रीच्या आधारे सर्वांगिण विकास तसेच सर्वांसाठी आरोग्य या ध्येयाकडे निरंतर वाटचाल सुरु आहे.अणदूर परिसरात 17 वर्षात दोन लाखाहून अधिक ग्रामस्थांना आरोग्यसेवा पुरविण्याची कामगिरी निश्चितच अलौकिक आहे संस्थेच्या कार्याची व्याप्ती सातत्याने वाढते आहे.सोलापूर शहरात झोपडपट्टीतील महिलांच्या आरोग्यसमस्या सोडविण्यासाठीही व्यापक कार्य केले जात आहे..या सार्‍यामागे असलेल्या अथक परिश्रमांची योग्य दखल या माहितीपटाने घेतली आहे. डॉ. शशीकांत अहंकारी व डॉ. शुभांगी अहंकारी या सेवाव्रती दाम्पत्याच्या व त्यांच्या सहकार्‍यांच्या ध्येयासक्तीला सलाम करावा अशीच भावना हा माहितीपट पाहिल्यावर मनात निर्माण होते.      
                        या माहितीपटाचे निवेदन व दिग्दर्शन अतुल्‍ा पेठे यांनी वेधकपणे केले आहे.हा माहितीपट कुठेही कंटाळवाणा होत नाही, त्याचबरोबर वास्तवाचे भान सोडून उदात्तीकरण अथवा रंजकतेच्या वाटेला जात नाही , ही या माहितीपटाची बलस्थाने आहेत.आवश्यक तेथे कार्यकर्तांच्या मुलाखती देउन वलयांकिततेला फारकत दिली आहे. माहितीपटाच्या निर्मितीसाठी अतुल पेठे व मिलिंद जोग यांनी जवळपास चाळीस तास शूटींग केले, त्यातून हा तीस मिनिटांचा माहितीपट साकारला आहे.हा सामाजिक विषय मांडण्यासाठी त्यानी घेतलेले परिश्रम्‍ा यातून प्रतिबिंबित होतात. संहिता लिहिताना अतुल पेठे व अनुपमा पाठक यांनी काटेकोर नियोजन केले आहे. श्रीरंग उमराणी यांचे संगीत माहितीपटाच्या उद्देशाला पोषक आहे.चाळीस तासाच्या शूटींगमधून तीस मिनिटाचा माहितीपट संकलित करताना समीर शिरपूरकर यांनी किती कसरत केली असेल याची आपण केवळ कल्पना करु शकतो. हा माहितीपट केवळ या संस्थेपुरता मर्यादित न राहता सामाजिक कार्याविषयी आस्था असणार्‍या सर्वांनीच आवर्जून पाहायला हवा. संवादाच्या अभ्यासकंनीही माहितीपट कसा असावा यासाठी चांगला वस्तुपाठ म्हणून या माहितीपटाकडे पाहायला हवे. ग्रामीण भागातला कोणताही प्रश्न सोडवायचा असेल तर ग्रामव्यवस्थेतील सर्व घटकांचा सहभाग मिळवून आर्थिक विकासासह सामाजिक प्रश्न  सोडविण्यासाठी गावगुंफण करावी लागते हा संदेश मनावर ठसविण्यात माहितीपट यशस्वी झाला आहे.


                                                                                   -रवींद्र चिंचोलकरअशीही पत्रकार - परिषद

पत्रकार परिषद हा एक मजेशीर प्रकार असतो. पत्रकार परिषद आयोजित करणारी व्यक्ती पत्रकारांना निमंत्रण देऊन बोलावते, पत्रकारांचे आगत-स्वागत करते ....