Saturday, May 2, 2020

छायाचित्र पत्रकारिता (फोटो जर्नलिझम)


छायाचित्र पत्रकारिता (फोटो जर्नलिझम)  हा पत्रकारितेचा एक विशेष प्रकार आहे. छायाचित्राच्या मदतीने बातमी वाचकापर्यंत पोहोचविणे याला छायाचित्र पत्रकारिता म्हणतात . सामान्य पत्रकारितेमध्ये बातमी केवळ भाषा आणि शब्दांद्वारे संकलित केली आणि प्रकाशित केली जाते. मात्र छायाचित्रांच्या माध्यमातून आपल्या बातम्या किंवा बातम्यांची कथा वाचकांपर्यंत पोहोचविल्यास त्या अत्यंत प्रभावी ठरतात.छायाचित्राच्या माध्यमातून जो पत्रकारिता करतो त्याला छायाचित्र पत्रकार म्हणतात. प्रसिध्द छायाचित्र पत्रकार रघु राय यांच्या मते “एखादया प्रसंगाच्या पाठीमागे असणारे सत्य छायाचित्राच्या माध्यमातून जो प्रखरपणे पुढे आणतो तोच खरा छायाचित्र पत्रकार होय”.घटना सोपी करुन सांगणे हा संज्ञापनाचा मूळ हेतू असतो. शब्दांपेक्षा दृश्य माध्यमातून संज्ञापन अधिक प्रभावीपणे साधता येते. म्हणूनच वृत्तपत्रात बातम्यांबरोबर छायाचित्रांचा वापर केला जातो. छायाचित्रांप्रमाणेच व्यंगचित्र, नकाशा, आलेख, रेखाटन, कल्पनाचित्रे आदींचा वापर करुन संज्ञापन साधले जाते.
छायाचित्र पत्रकारितेसाठी पत्रकारितेची दृष्टी असलेला छायाचित्रकार आवश्यक असतो. कोणत्याही घटनेचा सर्वांत महत्त्वाचा, नेमका क्षण कॅमेऱ्याने टिपणे यातच त्याचे कौशल्य असते.वृत्तपत्रात छायाचित्र प्रसिद्ध करताना त्याच्या तांत्रिक गुणवत्तेपेक्षा त्यातील पत्रकारिता-मूल्यास अधिक महत्त्व दिले जाते. प्रसिद्धीसाठी निवड करताना छायाचित्र बातमीला पूरक आणि छापण्यायोग्य असावे, अशी अपेक्षा असते. त्याखेरीज ते बनावट, दिशाभूल करणारे, न्यायालयीन कारवाई ओढवून घेणारे, वाचकावर विपरीत परिणाम करणारे, हीन अभिरुचीचे असू नये, असे काही निकषही पत्रकारितेत मानले जातात.
एखादा छायाचित्र पत्रकार शब्दांऐवजी फोटोंच्या माध्यमातून आपली बातमी / दृष्टिकोन / कथा / माहिती देतो. म्हणूनच, छायाचित्र पत्रकार एक कुशल छायाचित्रकार असणे आवश्यक आहे, परंतु छायाचित्र पत्रकार केवळ छायाचित्रकार नसतो. फोटोंच्या माध्यमातून सांगायचं असलं म्हणून पत्रकाराची शोधक दृष्टी त्याच्याकडे असणंही महत्त्वाचं आहे.

 जगभरात गाजलेली काही छायाचित्रे

1)छायाचित्र कला हीसुद्धा विविध दृश्य आपल्या कॅमेऱ्यात पकडते आणि ती क्षणचित्रे छायाचित्रकार साकार करतो. छायाचित्रकला ही एक कला नव्हेच , असा एक युक्तिवाद पूर्वी केला जात असे. एखादे दृश्य निवडायचे, चौकटीत आणायचे आणि फोटो घ्यायचा, यात कला कुठे आहे? ते केवळ एक तंत्र आहे असेच म्हटले जात असे; परंतु जेव्हा आशय आणि दृष्टिकोन भरलेली छायाचित्रे छायाचित्रकार साकारू लागले तेव्हा जगाला यातील कलेचा साक्षात्कार होऊ लागला. याचे उत्तम उदाहरण प्रसिद्ध लेखक पत्रकार अनिल अवचट यांच्याफोटोग्राफीया लेखात वाचायला मिळते.
       महायुद्धातले अनेक फोटो पाहिले; पण एका फोटोने मन जसे चरचरले तसे दुसऱ्या कशाने नव्हते. मुख्य म्हणजे तो  फोटो  युद्धभूमीवरचा नव्हताच. युद्धकाळातलाही नव्हता. युद्धानंतर काही वर्षानी विशिष्ट बटालियनमधले लोक एकत्र आले, त्याचा एक ग्रुप फोटो होता. काहीजण खुर्चीत बसलेले, कोणी मागे उभे, असा तो टिपिकल ग्रुप फोटो.फोटोतल्या माणसांना कुणाला हात नाही, कुणाला पाय नाही, कुणाचा जबडा  फाटलेला, कुणाच्या गमावलेल्या डोळ्यावर कायमची काळी पट्टी चढलेली. माणसे जशी आपल्याला छत्र्या घेऊन फोटोला त्याकाळात बसायची, तसे इथे फक्त छत्र्याच्या जागी वेगवेगळ्या प्रकारच्या कुबड्या ठेवलेल्या. मागची इमारत छान चिरेबंदी, पुढे हिरवळ बाकी सगळे व्यवस्थित. फक्त हे असे आणि मुख्य म्हणजे फोटो काढताना ते हसत होते, युद्धाच्या परिणामाविषयी वेगळे भाष्य करण्याची गरजच नाही. तो फोटो युद्धावरच्या फोटोच्या संग्रहातला होता.तो फोटोग्राफरने परिस्थिती दाखवण्यासाठी, रूढ मार्गाने जाता अगदी वेगळ्या तऱ्हेने दाखवून आपली निवड केली होती.”
2) अफगाण –पाकिस्तान सीमेवर निर्वासितांच्या अनेक छावण्या होत्या. 1984 मध्ये छायाचित्र पत्रकार स्टीव्ह मॅककुरी यांना नॅशनल जिओग्राफिकने अफगाण-पाकिस्तान सीमेवरील निर्वासित छावण्यांचे फोटो काढण्यासाठी निमंत्रित केले. त्यांनी पेशावरच्या बाहेर छावण्या पाहिल्या .नासिर बागच्या छावणीत मॅककुरीला मुलींचा शाळा म्हणून उभारलेला तंबू सापडला ज्यामध्ये पंधरा मुली शिकत असत. त्यात हिरव्या डोळ्यांच्या एका मुलीला त्याने पाहिले.मॅककुरी यांनी ही आठवण सांगताना लिहिले आहे : “मी या तरूणीला शोधले. ती फक्त बारा वर्षांची होती. ती खूपच लाजाळू होती आणि मला वाटलं की मी इतर मुलांचे छायाचित्र प्रथम काढले तर ती सहमत होण्याची शक्यता जास्त आहे. मला वाटते की तिच्याविषयी मी जशी उत्सुक होती तशीच तिलाही होती, कारण तिचे कधीच छायाचित्र घेतले नव्हते आणि तिने कॅमेराही कधीच पाहिला नव्हता. काही क्षणांनंतर ती उठली आणि निघून जाऊ लागली. पण एका क्षणात तिने मागे वळून पाहिले तो क्षण मी टिपला - तिच्या डोळ्यातील प्रकाश, पार्श्वभूमी आणि अभिव्यक्ती. यामुळे छायाचित्र अजरामर झाले. ” विसाव्या शतकातील सर्वात गाजलेले छायाचित्र म्हणून ते ओळखले गेले.

हे छायाचित्र युद्धग्रस्त देशांमधील मुलांचे दुःख आणि सामान्य लोकांवर अशा संघर्षाचे वास्तविक परिणाम दर्शवते. नॅशनल जिओग्राफिकच्या जून 1985 च्या अंकाच्या मुखपृष्ठावर हे छायाचित्र प्रसिध्द झाले. नंतर अनेक वर्षानंतर त्या मुलीचे नाव शरबत गुल असल्याचे समजले.  
                                                                                                                                                
4)सीरियातील यादवीला कंटाळून सप्टेंबर 2015 मध्ये जीव मुठीत धरुन अब्दुल्ला कुर्दी याचे कुटुंब कॅनडाला जाण्यासाठी साध्या बोटीतून निघाले होते. मात्र हा एजियन समुद्रातच बोट उलटून त्याचा आयलान या मुलाचा मृत्यू झाला. अगदी तीन वर्षाच्या आयलान कुर्दी या मुलाचा लाल टी शर्ट व निळ्या चड्डी घातलेला मृतदेह वाहून किनाऱ्याला आला. निलोफर डेमीर यांनी काढलेले आयलानचे छायाचित्र  जगभरात अनेकांचे काळीज पिळवटणारे ठरले. या अपघातात अब्दुल्ला यांनी आयलानसह, गालेब या चार वर्षांच्या मुलासह पत्नीला गमावले आहे.








Sunday, February 23, 2020

व्हाटस ऍपचे तरुणाईवर गारुड

संदेशाची देवाण - घेवाण करण्यासाठी जगभरात आणि विशेषतः भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या व्हाटस ऍपचा प्रारंभ झाला त्या घटनेला दिनांक 24 फेब्रुवारी 2020 रोजी अकरा वर्षे पूर्ण होत आहेत. या अकरा वर्षाच्या वाटचालीमध्ये भारतीय तरुण पिढीवर गारुड घालण्याचे काम केले आहे व्हाटस ऍप ने जगभरात लोकप्रियता मिळविली त्याचबरोबर त्याला टीकेचे धनी देखील व्हावे लागले आहे. व्हाटस ऍपचा च्या या वाटचालीचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न येथे केला आहे
व्हाटस ऍपचा हे फेसबुक, व्टिटर सारखे समाज माध्यम Social Media) नाही. व्हाटस ऍप हे संदेशाची देवाण - घेवाण करणारे (Instant Messaging App) ॲप आहे. मात्र त्याला अनेकजण समज माध्यम असेच मानतात. गमती गमती मध्ये व्हाटस ऍप ची निर्मिती झाली,  त्याची कथा मोठी रंजक आहे. जॉन कॉम हा युक्रेनमधील एक तरुण गरिबीने गांजलेला होता, तो एका दुकानांमध्ये  काम करायचा. नंतर त्यांने अमेरिकेमध्ये जाऊन याहू या कंपनीमध्ये काळ काम केले. तेथे अमेरिकेतील ब्रायन अॅक्टन यांच्यासमवेत त्याची मैत्री झाली. त्या काळात जॉन कॉमने एक आयफोन विकत घेतला होता. जॉन कॉम  प्रत्येक आठवडयात आपल्या मित्रमंडळींना गप्पा-टप्पा, भोजनासाठी निमंत्रित करायचा. त्यावेळी त्याला सहज संदेश पाठवता येणारे एखादे ऑप असावे अशी गरज वाटू लागली. त्यावेळी जॉन कॉम, ब्रायन ऍक्टन आणि काही सहका-यांनी व्हाटस ऍपचा चा शोध लावलाइंग्रजीत बोलताना एकमेकांना काय चालले आहे हे विचारण्यासाठी ‘What’s up’ असे विचारले जाते. त्यारुनच या ऍपला त्यांनी व्हाटस ऍप नाव दिले.  पाहता पाहता व्हाटस ऍप जगभरात लोकप्रिय झाले, 2013 पर्यंत त्याचा वापर करणाऱ्या लोकांची संख्या वीस कोटी पेक्षा अधिक वाढली. त्यावेळेला जगभरातील अनेक मोठया कंपन्यांचे लक्ष त्याकडे वेधले गेले आणि त्यांनी व्हाटस ऍप खरेदी करण्याचा प्रयत्न केला.  मार्क झुकरबर्ग यांच्या फेसबुकने कंपनीने 14 फेब्रुवारी 2014 रोजी 1182 मिलियन डॉलर एवढी मोठी किंमत देऊन  व्हाटस ऍप विकत घेतले. व्हाटस ऍपला फेसबुक मध्ये विलीन न करता त्याचे स्वतंत्र अस्तित्व त्यांनी कायम ठेवले. आज घडीला जगभरात 180 देशांमध्ये व्हाटस ऍपचे दीड अब्ज पेक्षा अधिक वापरकर्ते आहेत. 50 कोटी लोक दररोज व्हाटस ऍप स्टेटस चा वापर करतात, तर सहा कोटी 50 लाख लोक व्हाटस ऍपचा व्दारे संदेश पाठवतातव्हाटस ऍपचा व्दारे 53 भाषांमध्ये संदेशाची देवाणघेवाण होऊ शकते. दररोज व्हाटस ऍपचा वापर करुन सरासरी 4300 कोटी संदेश एकमेकांना पाठविले जातात. एकटया भारतात 40 कोटींपेक्षा अधिक लोक व्हाटस ऍपचा वापर करतात, ही संख्या जगातील कोणत्याही देशातील सर्वाधिक आहे. भारतीय तरुणाईवर तर व्हाटस ऍपने अक्षरशः गारुड घातले आहे. भारतातील तरुण पिढी पिढीने आपापल्या भाषेत व्हाटस ऍप द्वारे संदेशाची देवाणघेवाण करण्याची एक नवी परिभाषा निर्माण केली आहे.
जगभरातील दीड अब्ज लोकांची पसंती असलेल्या व्हाटस ऍपचा कारभार हा फार अवाढव्य असेल व त्यासाठी फार मोठी यंत्रणा लागत असेल असे आपल्याला वाटू शकते. मात्र केवळ 50 अभियंते आणि 55 कर्मचारी व्हाटस ऍपने या कामासाठी नेमलेले आहेत.
व्हाटस ऍपच्या लोकप्रियतेच्या कारणांचा शोध घेतला असता जाणवते की,  संदेशाची देवाण-घेवाण ही सहज व मोफत होते, ती जगभरात व क्षणार्धात होते. व्हाटस ऍपचा वापर परस्पर संवादासाठी, संदेश, छायाचित्रे, ध्वनिफीत, व्हिडिओ पाठवण्यासाठी करता येतो. व्हाटस ऍप वर कोणत्याही प्रकारच्या जाहिराती नसतात. लोकप्रियता मिळविण्यासाठी व्हाटस ऍप ने स्थापनेपासून कधीही एक रुपयाची देखील जाहिरात केली नाही अथवा जनसंपर्क साधण्याचा देखील प्रयत्न केलेला नाही. व्हाटस ऍप ने आपल्या वाटचालीमध्ये वापरकर्त्यांना अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे. ऑडिओ-व्हिडिओ पाठविणे,  संदेश जर चुकलेला असेल तर तो डिलीट करणे, व्हाटस ऍपचा बिजनेस, अगदी अलीकडच्या काळामध्ये भारतात व्हाटस ऍपचा वापर पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी देखील करता येईल अशी सुविधा निर्माण करण्यात आलेली आहे.
भारतीय समाजातील विविध समाजघटकांसाठी व्हाटस ऍपचे अनेक फायदे दिसून आलेले आहेत. शेतकऱ्यांना हवामानाचीबाजार भावाची, नवीन उपकरणांची माहिती उपलब्ध होते. उदयोजकांना शेअरबजार, नवे नियम यांची माहिती मिळते. सेवाभावी संस्था ग्रामस्थांना व्हाटस ऍप द्वारे संदेश पाठवून विधायक कार्यामध्ये सहभागी करून घेतात, काही रुग्णांना परदेशातून डॉक्टरांचा सल्ला मिळतो, पुराच्या परिस्थितीत अथवा दुष्काळाच्या परिस्थितीत अनेक नागरिक पुढे येऊन मदत करतात अशी अनेक उदाहरणे आहेत.
कोणतेही तंत्रज्ञान मुळामध्ये वाईट नसते त्यामुळे व्हाटस ऍप हे वाईट आहे असे म्हणता येणार नाही. मात्र वापर करणाऱ्यांना जर ते वाईट उद्देशाने वापरले तर त्याचे दुष्परिणाम सर्वांना भोगावे लागतात. इस्त्राईल  मधील एन.एस.ओ. गटाने हल्ला करून जगातील चौदाशे मानवाधिकार कार्यकर्ते, पत्रकार, नागरिक यांची माहिती चोरली होती अशी गंभीर घटना 2019 मध्ये घडलेली आहे. व्हाटस ऍपच्या माध्यमातून भारतात खोटया बातम्या पसरवण्याचे अनेक प्रकार मागील काही वर्षांत झाले आहेत. अशा खोटया संदेशामुळे जमावाकडून लोकांना जीवे मारण्यात आल्याच्या घटनाही घडल्या आहेत. अशाच एका घटनेमध्ये सोलापूरच्या मंगळवेढा परिसरातील पाच नागरिकांना धुळे जिल्ह्यातील साक्री येथे जमावाने ठार केले. भारतातही इतर ठिकाणीही अशा घटना घडलेल्या आहेत. एखादया व्यक्तीला बदनाम करण्यासाठी देखील व्हाटस ऍपचा वापर होतो. अलीकडच्या काळामध्ये सोलापूर- पुणे रस्त्यावर असलेल्या कुरकुंभ एमआयडीसी मध्ये मोठी आग लागलेली आहे अशी खोटी बातमी व्हाटस ऍप द्वारे फिरत होती, त्यामध्ये तसा व्हिडिओदेखील जोडलेला होता. अशा अनेक गोष्टी सातत्याने घडत आहेत.
व्हाटस ऍप ने देखील आपल्या परीने आपल्या सेवेमध्ये सुधारणा करण्याचे काही प्रयत्न केले आहेत, मात्र ते तोकडे आहेत. व्हाटस ऍप भारतीय तरुण पिढीवर एक गारुड निर्माण केले असले तरी या गारुडाच्या संमोहनात  किती काळ अडकून राहायचे याचा विचार तरुण पिढीने करण्याची गरज निर्माण झाली आहे. व्हाटस ऍप वरून दिली जाणारी माहिती किती उथळ स्वरुपाची असते याची अनेक उदाहरणे आहेत. व्हाटस ऍप व्दारे आलेल्या कोणत्याही माहितीवर अगदी पूर्ण विश्वास ठेवता येईल असे चित्र सध्या तरी नाही. तशी विश्वासार्हता निर्माण करण्या तसेच खोटया बातम्या आणि संदेश पसरविण्याच्या प्रकाराला आळा घालण्यात व्हाटस ऍपची यंत्रणा कितपत यशस्वी ठरते यावर व्हाटस ऍपचे भवितव्य अवलंबून आहे.

कोण होतास तू काय झालास तू ?

खींचो न कमान को न तलवार निकालो जब तोप मुक़ाबिल हो तो अख़बार निकालो भारतावर इंग्रजांची राजवट होती त्या काळात अकबर इलाहाबादी यांनी लिहिलेला हा...