Thursday, June 21, 2018

जागतिकीकरणाच्या तडाख्यात प्रसार माध्यमे

प्रसार माध्यमे आणि समाज यांचे नाते खूप जवळचे आहे. प्रसार माध्यमांचा समाजावर मोठा प्रभाव पडतो. त्यामुळे प्रसारमाध्यमांना वगळून देशाचा, विकासाचा विचार केला जाऊ शकत नाही.
स्वातंत्र्यपूर्व काळात भारतातील प्रसार माध्यमांनी विशेषतः वृत्तपत्रांनी स्वातंत्र्यलढा आणि सामाजिक सुधारणेच्या संदर्भात ऐतिहासिक कामगिरी केली. महात्मा गांधी, बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मौलाना अबुल कलाम आझाद, मुकुंदराव पाटील यांच्यासह अनेक प्रतिभावंत पत्रकारांनी भारतीय पत्रकारितेच्या क्षेत्रात आदर्श कामगिरी केली. पत्रकारिता कशी करावी याचा वस्तुपाठच त्यांनी घालून दिला.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पत्रकारितेचा नवा अध्याय सुरु झाला. मतपत्रांच्या भूमिकेतून बाहेर येऊन वृत्तपत्रे समाजाचे पहारेकरी या भूमिकेतून कार्य करु लागली. नभोवाणी व चित्रवाणी मात्र सरकारच्या नियंत्रणात होती. वृत्तपत्रांनी जोमदार कामगिरी करुन माध्यमांची उणीव भासू दिली नाही. पत्रकारिता विकसित होत गेली. महाराष्ट्रात ना.भि.परुळेकर, गोविंद तळवलकर, माधव गडकरी, अनंत भालेराव, रंगा वैदय, बाबा दळवी यांच्यासह अनेक दिग्गज संपादकांच्या कर्तृत्वाने मराठी वृत्तपत्रसृष्टी समृध्द होत गेली.
भारतीय प्रसार माध्यमांच्या संदर्भात दोन बाबी हानीकारक ठरल्या. त्यातील पहिली बाब म्हणजे आणीबाणी. भारतात 1975 ते 1977 या कालखंडात आणीबाणी लागू करण्यात आली होती. या कालखंडात माध्यम स्वातंत्र्याचा गळा घोटण्यात आला. अनेक पत्रकार, संपादकांना तुरुंगवासात टाकण्यात आले. वृत्तसंस्था आणि प्रसार माध्यमांशी निगडित सर्व संस्था सरकारने ताब्यात घेतल्या. भारतीय प्रसारमाध्यमांच्या इतिहासातील या काळया कालखंडात पत्रकारांनी आणि संपादकांनी प्रखर लढा दिला. आणीबाणी संपुष्टात आल्यानंतर माध्यम स्वातंत्र्याचे नवे पर्व पुन्हा सुरु झाले. नभोवाणी व चित्रवाणीला स्वायत्तता देण्याच्या दृष्टीनेही काही प्रयत्न झाले. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे इंटरनेटचे युग अवतरले. त्यामुळे समाजाला,या देशाला पुढे नेणारी पत्रकारिता पुन्हा बहरेल ही आशा पल्लवित झाली
मात्र 1990 च्या दशकात भारताने जागतिकीकरणाच्या धोरणाचा स्वीकार केल्याने प्रसारमाध्यमाच्या क्षेत्राला दुसरा मोठा धक्का बसला. या धक्क्यामुळे प्रसार माध्यमांच्या मूळ भूमिकेलाच सुरुंग लागला आहे.
आपल्या देशाची बाजारपेठ जागतिक स्पर्धेसाठी खुली होणे हा जागतिकीकरणाचा सरळ, साधा अर्थ आहे.प्रदीप गायकवाड यांनी म्हटले आहे की जागतिकीकरणामुळे संपन्न उत्पादक  देशांमधून सेवा आणि उत्पादने यांचा मुक्त, सुसाट प्रवेश होतो’’[1 ] भारतातील प्रसारमाध्यमांचे क्षेत्रही संपन्न देशातील बहुराष्ट्रीय कंपन्यांनी काबीज केले आहे.
ऍडमिरल विष्णू भागवत यांनी जागतिकीकरणामुळे नेमके काय घडले हे स्पष्ट करताना म्हटले आहे की, जागतिकीकरणाचा सर्वाधिक लाभ हा उत्तर आणि दक्षिण युरोपमधील आधीच संपन्न असलेल्या राष्ट्रांना झाला आहे. तर अविकसित आणि विकसनशील अशा देशांना या जागतिकीकरणाचा सर्वाधिक फटका बसला आहे. [2 ]
जागतिकीकरणामुळे भारतातील प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रात कोणती स्थित्यंतरे घडली याचा मागोवा घेतला तर जमा-खर्चाच्या बाजू खालीलप्रमाणे जाणवतात.
जमेच्या बाजू –
तंत्रज्ञानातील जागतिक स्तरावर झालेल्या प्रगतीचे खालील लाभ भारतीय प्रसारमाध्यमांना व नागरिकांना मिळाले.
·         वृत्तपत्रे - वृत्तपत्रात अत्याधुनिक मुद्रणयंत्रे आली,फॅसिमाईल तंत्रज्ञानामुळे वृत्तपत्राची पानेच्या पाने एका शहरातून दुस-या शहरात क्षणात पाठविणे शक्य झाले. नवीन सॉफ्टवेअरमुळे मांडणी आणि सजावटीत क्रांतीकारक बदल झाले. मुद्रणासाठी चांगल्या दर्जाचा कागद मुबलक प्रमाणात उपलब्ध झाला. वार्तांकन करण्यासाठी आधुनिक साधने उपलब्ध झाल्याने घटनास्थळाहून थेट कार्यालयात बातमी पाठविणे शक्य झाले. ग्रामीण भागातील वार्ताहरांनाही नवतंत्रज्ञानाचा लाभ झाला. इ वृत्तपत्रे तसेच ऑनलाईन आवृत्ती इंटनेटव्दारे उपलब्ध झाल्याने, जगभरातील वाचकाची सोय झाली.
·         नभोवाणी – नभोवाणीच्या क्षेत्रात एफ.एम.तंत्रज्ञानामुळे प्रसारणाचा दर्जा सुधारला. श्रोत्यांसाठी अनेक पर्याय उपलब्ध झाले.इंटरनेटमुळे जगभरातील नभोवाणी केंद्रांचे कार्यक्रम ऐकता येणे शक्य झाले. मोबाईलमध्ये नभोवाणीचे कार्यक्रम ऐकता येत असल्याने आपल्या आवडीनुसार हव्या त्या ठिकाणी, हवे ते कार्यक्रम ऐकणे शक्य झाले आहे.
·         चित्रवाणी – भारतात सध्या 800 पेक्षा अधिक टेलिव्हीजन चॅनल उपलब्ध आहेत.दर्शकाला हव्या त्या वेळी, हवे ते कार्यक्रम उपलब्ध झाले आहेत. जगभरातील बहुराष्ट्रीय कंपन्यांनी या क्षेत्रात शिरकाव केल्याने वैविध्यपूर्ण कार्यक्रम दर्शकासाठी उपलब्ध आहेत.
·         इंटरनेट – इंटरनेटमुळे तर सारे जग एक वैश्विक खेडे बनले आहे. देशांच्या सीमा ओलांडून संदेशांची क्षणार्धात देवाण - घेवाण होत आहे. फेसबुक, व्टिटर, वॉटस अप यासह उपलब्ध झालेल्या समाजमाध्यमांमुळे जगभरातील ज्ञानाची कवाडे खुली झाली आहेत. माध्यमे सर्वसामान्यांच्या हाती आल्याने प्रत्येकाला अभिव्यक्त होण्याची संधी उपलब्ध झाली आहे. ब्लॉग, इ-मेल यासह कितीतरी सुविधा इंटनेटमुळे उपलब्ध झाल्या आहेत.
·         स्मार्टफोन – सर्वांच्या हाती आलेला स्मार्ट फोन हा तर एकविसाव्या शतकातील सर्वात क्रांतीकारक बदल मानावा लागेल.यात घडयाळ, कॅलक्युलेटर, टीव्ही, रेडिओ, इंटरनेट, समाजमाध्यमे, फोटो कॅमेरा,व्हीडिओ कॅमेरा यासह शेकडो सुविधा आहेत.
वजा बाजू –
जागतिकीकरणामुळे भारतातील प्रसारमाध्यमावर जे विपरित परिणाम झाले ते खालीलप्रमाणे.
·        वृत्तपत्रे – वृत्तपत्र क्षेत्रात स्पर्धा वाढून उत्पादन खर्च आवाक्याबाहेर गेला आहे, त्यामुळे लहान व मध्यम वृत्तपत्रे नामशेष होत आहेता. वृत्तपत्राच्या क्षेत्रात बडया कार्पोरेट उदयोगांची एकाधिकारशाही वाढते आहे. एकाच साच्यात तयार झाल्यासारख्या रंगीत – चकचकीत वृत्तपत्रांनी त्या-त्या प्रदेशातील भाषा वैशिष्टये पुसली आहेत. वृत्तपत्रातील संपादकाचे महत्व् कमी झाले आहे. सामाजिक बांधिलकी, नीतीमूल्ये यापासून वृत्तपत्रे दूर जात आहेत. सांस्कृतिक क्षेत्रातही वृत्तपत्रे ‘पेज थ्री’ संस्कृतीच्या आहारी गेलेली दिसत आहेत. डॉ.चंद्रकांत केळकर यांनी म्हटले आहे की ‘‘सांस्कृतिक क्षेत्रात जगभरच्या समाजातील सांस्कृतिक वैविध्य अधिकाधिक पुसट करुन बाजारपेठेमार्फत त्यामध्ये एकजिनसीपणा कसा आणता येईल;यासाठी वेगवेगळ्या सांस्कृतिक माध्यमातून प्रयत्न होत आहेत. [3 ] वृत्तपत्रे लोकांच्या ख-या प्रश्नांकडे दुर्लक्ष करुन राजकारणी आणि कार्पोरेट क्षेत्राला हव्या असलेल्या बातम्यांकडेच लक्ष देत आहेत. मुख्य म्हणजे आपले सेवेचे व्रत झुगारुन वृत्तपत्रे नफ्याच्या मागे लागली आहेत. त्यामुळे वृत्तपत्रांची विश्वासार्हता हरवत चालली असून ,वृत्तपत्रातून खरी बातमी मिळेलच याबाबतची खात्री आता राहिलेली नाही.
·         नभोवाणी – नभोवाणी क्षेत्रावर भारत सरकारने अजूनही काही बंधने लादली आहेत. एफ.एम. चॅनलना फक्त गाणी वाजविण्याची परवानगी आहे. बातम्या व इतर वैचारिक कार्यक्रमाची परवानगी नाही. लोकांचे फक्त रंजन करा एवढाच जागतिकीकरणाचा लाभ सरकारने नभोवाणीच्या पदरी पडू दिला आहे.
·         चित्रवाणी – चित्रवाणीवर मात्र कुठली बंधने नाहीत. त्यामुळे या क्षेत्रात परदेशी बहुराष्ट्रीय कंपन्यांनी धुमाकूळ घातला आहे. भारतात 800 पेक्षा अधिक टीव्ही चॅनल दिवसभरातील 24 तास माहिती – रंजनाचा मारा करीत आहेत. स्पर्धा आणि अवाढव्य उत्पादन खर्च यामुळे बहुतांश चॅनल कार्पोरेटसच्या हाती आहेत. येथेही एकाधिकारशाही आहेच, त्यामुळे चॅनल मालकांच्या मर्जीनुसार कार्यक्रम, बातम्या प्रसारित करण्याची बंधने आहेत. परदेशातील कार्यक्रमांचे अनुकरण करुन भारतीय प्रेक्षकाला पाश्चात्य संस्कृतीचे धडे दिले जात आहेत. डॉ.भालचंद्र नेमाडे यांनी नेमक्या शब्दात हे वास्तव मांडताना म्हटले आहे,‘‘आपल्याच जवळच्या गोष्टीबद्दल आपले संवेदन नष्ट होणे, पण जास्तीतजास्त दूर जे काही चालले आहे त्याचे संवेदन वाढविणे हे लोंढामाध्यमांव्दारे जागतिकीकरणाच्या या हेतूशून्य गदारोळात होत चालले आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनिक  माध्यमाचा जो घोटाळा आहे, त्याने कारण नसताना जग तुमच्या जवळ आणून ठेवले, पण शेजारी तेवढा जवळ आणलेला नाही आणि त्यामुळे तुमच्या गावात काय चाललेय हे कळायची गरज तुम्हाला वाटत नाही. [4 ] जागतिकीकरणामुळे माणूस संवेदनाशून्य बनत चालला आहे, आभासी जगात ढकलला जात आहे; हाच चित्रवाहिन्यांमुळे निर्माण झालेला सर्वात मोठा धोका आहे. डॉ. अनंत तेलतुंबडे म्हणतात जागतिकीकरणाचा सांस्कृतिक प्रहारसुध्दा सामाजिक न्यायाच्या संदर्भात चिंताजनक आहे. शक्तीशाली प्रसारमाध्यमातून त्याच्या थिल्लर भोगवादी संस्कृतिच्या फैलावामुळे गरिबांच्या प्रश्नांचे अधिकाधिक सीमांतीकरण होत आहे [5 ]
 चित्रवाहिन्या नेमके काय दाखवितात याचा सखोल अभ्यास केला तर हे    वास्तव नजरेस पडते.लोकांच्या ख-या प्रश्नापासून चित्रवाहिन्या दूर असल्याचेच चित्र आपणास दिसते.
·        इंटरनेट – इंटरनेटमुळे जग जवळ आले हे खरे आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक माणसाला अभिव्यक्त होण्याची संधी मिळाली हे देखील सत्य आहे. मात्र नवमाध्यमाच्या साक्षेपी वापराच कुठलेच ज्ञान, प्रशिक्षण न मिळता ही समाजमाध्यमे लोकांच्या हाती आली आहेत. या माध्यमाचा गैरवापर करुन जातीधर्मातील भांडणे, व्देष वाढविण्याचे कार्य समाजकंटक करीत आहेत. या जागतिक माध्यमावर सरकारचे नियंत्रण राहू शकत नाही, कायदेही अपुरे पडतात. त्याचा फायदा घेऊन समाजकंटक, अतिरेकी या माध्यमाचा गैरवापर करीत आहेत. काही महिन्यापूर्वी नाशिक जिल्हयात एक आठवडा इंटरनेटवर बंदी घालावी लागली होती. हे यासंदर्भातील दुष्परिणामाचे ताजे उदाहरण आहे. किशोरवयीन व तरुण पिढीला गुंगवून वाममार्गाला लावण्यासाठी या माध्यमाचा वापर करुन घेतला जातो आहे.
·        स्मार्ट फोन – स्मार्ट फोन हे खरे तर ज्ञान सपादनाचे एक महत्वपूर्ण साधन आहे. मात्र या साधनाचा सवंग रंजनासाठीच सर्वाधिक वापर होतो. युवापिढी वॉटस अप आणि चॅटिंगच्या आहारी जाताना दिसत आहे. कार्पोरेट क्षेत्रातील लोक आकर्षक जाहिरातीचा मारा करुन ही गुंगी उतरुच नये असा प्रयत्न करीत आहेत. रंगनाथ पठारे यांनी हे वास्तव अधोरेखित करताना म्हटले आहे संगणक क्रांती आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे, प्रसारमाध्यमे यांनी बडयांची ताकत अवाढव्यपणे वाढविली आहे.या सगळयांवर बव्हंशी मोठया सत्तांचा ताबा आहे. आपण, काय, कसे, किती बघायचे, वाचायचे वा शोधायचे याचा विचार करण्याची आवश्यकताच संपेल अशी भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे. संभ्रमावस्था , कुंठितावस्था अशा शब्दांचे अर्थच बदलत चालले आहेत. सामान्य माणसाने काहीही विचार करायचा नाही, ती जबाबदारी पार पाडणारे वेगळे लोक आहेत.ते देतील ते घ्यायचे, त्यांनी निर्माण केलेल्या भ्रामक वास्तवात खेळायचे, हे भ्रामक वास्तव स्वतःवर लादून तुकडे तुकडे व्हायचे. त्याला इलाज नाही”. [6 ]
आपण स्मार्टफोनच्या माध्यमातून जे जे संज्ञापन करतो , ते आपल्या मते खाजगी असते. पण या संज्ञापनावर अनेक जागतिक यंत्रांची नजर असते.’बिग ब्रदर इज वॉचिंग यू’ याचा प्रत्यय पदोपदी येतो.त्यामुळे या संज्ञापनात आपण सावधगिरी बाळगणे गरजेचे असते. जगभरातले लुटारु इंटरनेटच्या महाजालातून आपणाला अडकविण्यासाठी, आपली आर्थिक, वैचारिक, सांस्कृतिक लूट करण्यासाठी टपून बसलेले आहेत. त्यांच्या आहारी जायचे का ? याचा निर्णय आपणाला घ्यावा लागणार आहे.
जागतिकीकरणामुळे माणसाला गुंगी आणली आहे. माणसाची विचार करण्याची शक्तीच या व्यवस्थेने हिरावून घेतली आहे. जागतिकीकरणामुळे प्रसार माध्यमांचा झगमगाट वाढला, खप वाढला, वाचक आणि दर्शकांची संख्या वाढली. मात्र, माणसाला विचारशून्य, संवेदनाशून्य बनविणारी व्यवस्था यातून फोफावली . हा धोका ओळखून पर्यायी लोकमाध्यमे निर्माण करण्याचा मार्ग आपल्या हाती आहे. विधायक विचार करणा-या समाजगटांनी यासाठी एकत्र येऊन कृती करण्याची गरज निर्माण झाली आहे.
संदर्भः
1)    ऐडमिरल भागवत विष्णू, ‘जागतिकीकरण नवी गुलामगिरी’ ग्रंथातील प्रदीप गायकवाड यांची प्रस्तावना, समता प्रकाशन, नागपूर, तृतीय आवृत्ती, जानेवारी 2006, पृष्ठ क्रमांक 4
2)    ऐडमिरल भागवत विष्णू, ‘जागतिकीकरण नवी गुलामगिरी’ ग्रंथाची प्रस्तावना, समता प्रकाशन, नागपूर, तृतीय आवृत्ती, जानेवारी 2006, पृष्ठ क्रमांक 18
3)    डॉ.केळकर चंद्रकांत, ‘दुसरे जग शक्य आहेः पर्यायी लोकवादी व्यवस्था’, सायन पब्लिकेशन्स, पुणे, पहिली आवृत्ती, 2010, पृष्ठ क्रमांक 23
4)    डॉ. नेमाडे भालचंद्र, ‘साहित्य, संस्कृती आणि जागतिकीकरण’ लोकवाड्ग्मय गृह प्रकाशन, मुंबई , आठवी आवृत्ती, 2015, पृष्ठ क्रमांक 10
5)    डॉ. तेलतुंबडे अनंत, ‘सामाजिक न्याय आणि जागतिकीकरण’,लोकवाड्ग्मयगृह प्रकाशन,मुंबई, दुसरी आवृत्ती, 2010, पृष्ठ क्रमांक 28
6)    पठारे रंगनाथ, ‘जागतिकीकरण आणि देशीवाद’,लोकवाड्ग्मयगृह प्रकाशन,मुंबई, चौथी आवृत्ती, 2006, पृष्ठ क्रमांक 9
 ( बदलते विश्व आणि साहित्यापुढील आव्हाने या ग्रंथात प्रकाशित झालेला लेख )
******************************************************************************

अशीही पत्रकार - परिषद

पत्रकार परिषद हा एक मजेशीर प्रकार असतो. पत्रकार परिषद आयोजित करणारी व्यक्ती पत्रकारांना निमंत्रण देऊन बोलावते, पत्रकारांचे आगत-स्वागत करते ....