एकविसाव्या शतकाच्या आरंभाबरोबरच भारतात माहिती तंत्रज्ञानाचा प्रसार वाढू लागला होता. त्या काळात मला एका मित्राने म्हटले ‘अरे गूगलवर शोधल्यावर तुझी काहीच माहिती दिसत नाही’. त्यावेळीच मला धक्का बसला होता. आता तर फेसबुक, व्टिटर, इन्स्टाग्राम, लिंक्डइन, वॉटसअप यासारख्या समाज माध्यमांशिवाय आपल्या अस्तित्वाला काहीच अर्थ नाही असे प्रत्येक व्यक्तीला वाटू लागले आहे. मोबाईलचा वापर तर वेड म्हणावे इतका वाढला आहे.
भारतात 100 कोटीपेक्षा अधिक लोक मोबाईल वापरतात. शेतमजुरापासून उद्योगपतीपर्यंत प्रत्येकजण मोबाईलचा वापर करतो आहे. माणसाचे रुपांतर डाटामध्ये झाले आहे असे आता म्हटले जाते. अर्धा तास फेसबुक किंवा वॅाटसअप बंद पडले तर अनेकांच्या मनाची मोठी तगमग होते. माहिती तंत्रज्ञानाच्या झपाटयामुळे जग गतीने बदलले आहे, हेच खरे. याचा मोठा प्रभाव समाजजीवनावर पडला असून त्यामुळे नवनवीन क्षेत्रे विकसित झाली. त्यात समाज माध्यमे (सोशल मिडिया), डिजिटल माध्यमे, ऑनलाईन माध्यमे यांचा प्रामुख्याने समावेश करता येईल.या नव्या क्षेत्रात रोजगाराच्या नवीन संधीही वाढल्या आहेत. संदेशाचा सर्वत्र व झटपट प्रसार करण्याची शक्ती या माध्यमात आहे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचण्यासाठी ही माध्यमे उपयुक्त आहेत, त्यामुळे या माध्यमाकडील ओढा वाढतो आहे. या माध्यमांमध्ये ज्या करिअर संधी निर्माण झाल्या आहेत, त्यातील प्रमुख संधी खालीलप्रमाणे आहेत.
सोशल मिडिया मॅनेजर – आपल्या अथवा संस्थेच्या, कंपनीच्या प्रगतीसाठी सोशल मिडियाचा वापर केला तरच आपण टिकून राहू शकू याची जाणीव सर्वांना झाली आहे. त्यामुळे सोशल मिडियाव्दारे आपली चांगली प्रतिमा निर्माण करण्याचे, जोपासण्याचे काम व्यक्ती, संस्था, कंपनीला करावे लागते.फेसबुक, व्टिटर, इन्स्टाग्राम, वॉटसाप इत्यादी सोशल मिडियाव्दारे लोकांपर्यंत संस्तेची, कंपनीची माहिती पोहोचविण्यासाठी कुशल मनुष्यबळ लागते. राजकीय पक्ष, कार्पोरेट संस्था, सेलेब्रिटी यांना तर त्यांच्यासाठी हे काम करणा-यांची मोठी फौजच लागते.यासाठी सोशल मिडिया मॅनेजर व त्यांच्या हाताखाली अनेकजण कार्यरत असतात. तालुक्याच्या , जिल्हयाच्या ठिकाणी काम करणा-या व्यक्ती आणि संस्थांनादेखील याची गरज भासू लागली आहे.प्रसिध्द व्यक्तींच्या समाजमाद्यमांवरील मजकुराचे नियोजन करणे, त्यातील मजकूर अद्यावत करणे, विचारल्या जाणा-या प्रश्नांना उत्तरे देणे इत्यादी कामे यात करावी लागतात.
या पदावर काम करण्यासाठी पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण असणे, मराठी व इंग्रजी भाषेवर चांगले प्रभुत्व असणे, सोशल मिडियाच्या हाताळणीचे चांगले ज्ञान असणे, कमी शब्दात आशयघन लेखनाची सृजनशीलता असणे गरजेचे आहे.
डिजिटल मार्केटिंग मॅनेजर – ऑनलाईन विपनणासाठी केल्या जाणा-या कार्याला एकत्रितपणे डिजिटल मार्केटिंग असे म्हटले जाते. वेबसाईट, सर्च इंजिन, इ मेल , मोबाईल ऍप इत्यादीव्दारे जाहिराती लक्ष्यित गटापर्यंत पोहोचविणे हे यात मह्त्वाचे असते. ‘कंटेंट इज द किंग’ हा आजच्या काळातील यशस्वितेचा मंत्र आहे. त्यामुळे आपल्या उत्पादन अथवा सेवांची माहिती प्रभावीपणे ग्राहकापर्यंत पोहोचविणे हे सर्वात महत्वाचे कार्य बनले आहे. विपणनाच्या क्षेत्रात सध्याच्या काळात फार मोठी स्पर्धा सुरु आहे. कंपन्यांची आणि उत्पादनांची संख्या मोठया प्रमाणात वाढल्यामुळे लक्ष्यित गटापर्यंत विपणनाचा संदेश कसा पोहोचवायचा हा अवघड प्रश्न आहे. याचे उत्तर डिजिटल मार्केटिंगमध्ये आहे. आता प्रत्येक कंपनी आपली उत्पादने, योजनांची माहिती देण्यासाठी डिजिटल मार्केटिंगचा उपयोग करतात. बाजारपेठ निश्चित करणे, जाहिरात धोरण ठरविणे यासाठी तसेच विपणन योजनेचे विश्लेषण करण्यासाठी डिजिटल मार्केटिंग उपयुक्त ठरते. ऍमेझॉन , फ्लिफकार्ट , ओ.एल.एक्स. यासारख्या ऑनलाईन विक्री करणा-या कंपन्या, मेक माय ट्रिप ,रेडबस तसेच ओला, उबरसारख्या वाहन सेवा पुरविणा-या कंपन्यांसह अनेक कंपन्यांमध्ये अशी पदे उपलब्ध होतात.
या पदावर काम करण्यासाठी पत्रकारिता/ मार्केटिंगचा अभ्यासक्रम पूर्ण असणे, मराठी व इंग्रजी भाषेवर चांगले प्रभुत्व असणे, प्रभावी जाहिरात लेखनाचे कौशल्य असणे आवश्यक आहे.
ऑनलाईन प्रॉडक्ट जर्नालिस्ट – ऑनलाईन माध्यमांव्दारे उत्पादनाची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे काम यात पत्रकाराला करावे लागते. कंपनीची उत्पादने ग्राहकासाटी कशी उपयुक्त आहेत, याचे फायदे कोणते आहेत, याचा वापर कसा करावा, ज्या ग्राहकांनी याचा वापर केला ते कसे समाधानी आहेत यावर आधारित वृतांत देण्याचे काम यात करावे लागते. ही माहिती फेसबुक, व्टिटर, यूटयुब यासारखी समाजमाध्यमे अथवा मोबाईल ऍपव्दारे ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे काम पत्रकाराला प्रभावीपणे करावे लागते. यात उत्पादनाला ब्रँड म्हणून प्रस्थापित करणे, ब्रँडची प्रतिष्ठा वाढविणे, ब्रँडबद्दल ग्राहकांचा दृष्टीकोण जाणून घेणे यासारखी कामे करणे अपेक्षित आहे.
या पदावर काम करण्यासाठी पत्रकारितेचा अभ्यासक्रम केलेला असण्याबरोबर, इंटरनेट वापराचे चांगले ज्ञान असणे गरजेचे आहे. समाजमाध्यमांव्दारे प्रभावीपणे लेखन करणे, ब्लॅागवर मजकूर लिहिणे, व्हिडिओ तयार करणे व संपादित करणे इत्यादी कामे करता येणे आवश्यक आहे.
कंटेंट रायटर / एडिटर – माहिती प्रस्फोटाच्या युगात आपण आहोत. माहितीचा प्रवाह सर्व दिशांनी लक्षावधी माहिती स्रोतातून निरंतर वाहता असतो. आपल्या वाचकांना नेमक्या ज्या माहितीत स्वारस्य आहे अशीच माहिती तयार करणे आवश्यक झाले आहे. समाज माध्यमांवर असे लेखन करणा-यांची खूप गरज असते. असे लेखनाचे काम करण्या-यास कटेंट रायटर म्हटले जाते. वाचकांना हवी असणारी माहिती निवडून संपादित करणा-यास कंटेंट एडिटर म्हणतात. यात प्रामुख्याने बेबसाईट, ब्लॅाग, समाज माध्यमांसाठी मजकूर लेखन करणे, संपादित करणे ही कामे करावी लागतात. या पदावर नोकरीच्या अनेक संधी सोशल व डिजिटल माध्यम क्षेत्रात उपलब्ध आहेत. न्यूज हंट, वे टू एस.एम.एस. यासह विविध संस्थांमध्ये अशा नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.
या पदावर काम करण्यासाठी पत्रकारिता / इंग्रजी भाषा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे. भाषेवर प्रभुत्व असणे, लेखनाची आवड व क्षमता असणे, मराठीतील मजकूर इंग्रजीत, इंग्रजीतील मजकूर मराठीत भाषांतरित करता यायला हवा.
वेब जर्नालिस्ट – वृत्तपत्रांच्या ऑॅनलाईन आवृत्ती तसेच ऑनलाईन वृत्तपत्रे (वेबपोर्टल ) यांची त्याचबरोबर त्यांच्या वाचकांची संख्या मोठया प्रमाणात वाढते आहे. या माध्यमांसाठी उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक इत्यादी पदे गरजेची असतात. इनाडू , वेबदुनिया यासारख्या अनेक वेबपोर्टल्समध्ये, तसेच प्रमुख वृत्तपत्रांच्या ऑनलाईन आवृत्तीत या संधी उपलब्ध आहेत.स्वतःचे वेबपोर्टल सुरु करणे हा पर्यायही सहज उपलब्ध आहे. कारण वेबपोर्टल सुरु करणे फारसे खर्चिक नाही उस्मानाबाद लाईव, आज लातूर, बार्शी लाईव यासह जिल्हयाच्या ठिकाणी पत्रकारांनी सुरु केलेली वेब पोर्टल्स चांगली कार्यरत आहेत.
हे काम करण्यासाठी पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण असणे. संगणक हाताळणीचे चांगले ज्ञान असणे. ऑनलाईन वृतपत्रासाठी लेखन व संपादन करण्याची क्षमता असणे गरजेचे आहे.
ऍडवोकसी मॅनेजर- एखादया विचाराचे , कार्याचे समर्थन करण्यासाठी, समाजाचा पाठिंबा मिळविण्यासाठी केल्या जाणा-या कामगिरीला मिडिया ऍडवोकसी असे म्हटले जाते. या क्षेत्रात कार्य करणा-या संस्थांमध्येही नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.
या पदावर कार्य करण्यासाठी पत्रकारितेची पदवी, सामाजिक प्रश्नांची जाण, संगणकावर काम करण्याचे तांत्रिक कोशल्य, भाषेवर प्रभुत्व ही कौशल्ये असणे आवश्यक आहे.
याशिवाय मार्केटिंग ब्लॉगर, डिजिटल मिडिया एक्झिक्युटीव, डिजिटल मिडिया प्लॅनर, सोशल मिडिया एक्सपर्ट, सोशल मिडिया प्लॅनर, सोशल मिडिया मार्केटिंग हेड यासारखी समकक्ष पदेही उपलब्ध आहेत.स्वतःचे न्यूज ऍप सुरु करणे अथवा स्वतःचे यू ट्युब चॅनल सुरु करणे देखील सहज शक्य आहे. एकंदरित सोशल मिडिया, डिजिटल मिडिया हेच यापुढच्या काळातील वास्तव आहे. या क्षेत्रातील नोकरीच्या संधी मिळविण्यासाठी पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाशिवाय डाटा ऍनालिटिक्स, डिजिटल मार्केटिंग, सोशल मिडिया याच्याशी निगडित एखादा प्रमाणपत्र अभ्याक्रम पूर्ण करने आवश्यक आहे.
( लोकराज्य मासिकात फेब्रुवारी २०१८ च्या अंकात प्रसिध्द झालेला लेख )