Friday, January 5, 2024

कोण होतास तू काय झालास तू ?

खींचो न कमान को न तलवार निकालो जब तोप मुक़ाबिल हो तो अख़बार निकालो भारतावर इंग्रजांची राजवट होती त्या काळात अकबर इलाहाबादी यांनी लिहिलेला हा शेर खूप प्रेरणादायी ठरला होता .लोकमान्य टिळक, महात्मा गांधी ,पंडित जवाहरलाल नेहरू, गणेश शंकर विद्यार्थी , मौलाना आझाद, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह स्वातंत्र्यलढ्याच्या कालखंडात कार्यरत असलेल्या प्रत्येक नेत्याने इंग्रजांविरुद्ध लढा देण्यासाठी आपले स्वतःचे वर्तमानपत्र काढले होते. वृत्तपत्र हे इंग्रजांच्या विरुद्ध लढण्यासाठी एक महत्त्वाचे शस्त्र आहे याची जाणीव या नेत्यांना होती .भारतातील सर्व राज्यात सर्वच नेत्यांनी आपली वृतपत्रे सुरू केली . इंग्रज सरकार भारताचे आणि भारतीयांचे शोषण करत आहे हे या वृत्तपत्रांनी लोकांच्या निदर्शनास आणून दिले . या इंग्रज सरकारला देशातून घालवले पाहिजे हा संदेश दिला . वृत्तपत्रांनी केलेल्या जनजागृतीमुळे देशभरात इंग्रज सरकार विरुद्ध असंतोष निर्माण झाला आणि लोक मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळीत सामील झाले . महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्य लढ्याला यश मिळून भारत देश स्वतंत्र झाला .यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, त्या काळच्या वृत्तपत्रांमध्ये विश्वासार्हता होती ,समाज बदलण्याची ताकद होती .त्यामुळेच लोक संघटित झाले, स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले आणि इंग्रजांना भारत सोडून जाणे भाग पडले . स्वातंत्र्यानंतरच्या काळात आणीबाणीच्या कालखंडात पुन्हा एकदा वृत्तपत्रांच्या शक्तीचा प्रत्यय आला . आपल्या हातून सत्ता जाते आहे असे वाटत असल्यामुळे इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केली .या कालखंडामध्ये वृत्तपत्रांवर फार मोठी बंधने घालण्यात आली .अनेक पत्रकार आणि संपादकांना तुंरुंगात टाकण्यात आले . वृत्तपत्रांनी बातम्या किंवा लेख लिहिण्यापूर्वी महसूल अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी अशी सेन्सॉरशिप लादण्यात आली . वृतसंस्था बंद करण्यात आल्या .अनेक वृत्तपत्रांनी आणि पत्रकारांनी या आणीबाणीच्या विरुद्ध स खंबीरपणे लढा दिला .परिणामी इंदिरा गांधींना आणीबाणी पठाविणे भाग पडले .1977 मध्ये आणीबाणी उठल्यानंतर झालेल्या निवडणुकीमध्ये इंदिरा गांधींचे नेतृत्व असलेल्या काँग्रेस पक्षाचा देशभरात दारुण पराभव झाला आणि जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आले.. वृत्तपत्रात समाज बदलण्याची ताकद असते ही गोष्ट पुन्हा एकदा सिद्ध झाली . वृत्तपत्रांची ही शक्ती 1990 पर्यंत टिकून होती .त्यानंतरच्या कालखंडात मात्र पत्रकारांमध्ये ,संपादकांमध्ये आणि वृत्तपत्रांमध्ये ही शक्ती शिल्लक राहिले न .ली नाही. भारताने जागतिकीकरणाचा स्वीकार केला त्या कालखंडात वृत्तपत्र क्षेत्रामध्ये मोठे बदल झाले .वृत्तपत्र मालकांना प्रगत देशातून वृतपत्र छपाईसाठी महागडी यंत्रसामुग्री, वृत्तकागद, शाई इत्यादी साहित्य मागविण्याची संधी मिळाली. त्यामुळे वृत्तपत्र क्षेत्रामध्ये भांडवली स्पर्धा सुरू झाली .अधिक पानांचे रंगीत आणि कमीत कमी किमतीमध्ये वृत्तपत्र वाचकाला देणे यासाठीची किंमत स्पर्धा सुरू झाली . गुळगुळीत आणि शुभ्र कागदावर छापलेले सोळा पानी रंगीत वृत्तपत्र जर एक रुपयाला मिळत असेल तर कृष्णधवल रंगांमध्ये काळपट रंगाच्या कागदावर छापलेले स्थानिक आठपानी वृत्तपत्र विकत घेणे वाचकांना नकोसे वाटू लागले .वृत्तपत्रातील विचारापेक्षा वृत्तपत्राची मांडणी सजावट वृत्तपत्राच्या प्रश्नांची संख्या आणि वृत्तपत्राची किंमत या गोष्टींना महत्त्व प्राप्त झाले .याचा फायदा वृत्तपत्र क्षेत्रातील साखळी वृत्तपत्र चालविणाऱ्या भांडवलदारांनी घेतला . 'मोठा मासा लहान माशास गिळतो' या म्हणीप्रमाणे या भांडवलदारांनी छोटी छोटी स्थानिक वृत्तपत्रे हळूहळू बंद पडतील अशी परिस्थिती निर्माण केली .आजच्या कालखंडातील देशभरातील वृत्तपत्रांची परिस्थिती जर आपण पाहिली तर चांगल्या पद्धतीने चालणारी वृत्तपत्रे एक तर राजकारणी लोकांच्या किंवा भांडवलदारांच्या हातात आहेत असे चित्र आपल्याला दिसते .वृत्तपत्र हा व्यवसाय नसून ते समाजात बदलाचे एक साधन आहे असे मानणारी मराठवाडा वृतपत्रासारखी ध्येयवादी वृत्तपत्रे हळूहळू काळाच्या पडद्याआड गेली . पूर्वी वृत्तपत्रे ही संपादकाच्या नावाने ओळखली जात असत .माधव गडकरी यांचा लोकसत्ता, गोविंद तळवळकर यांचा महाराष्ट्र टाईम्स, अनंत भालेराव यांचा मराठवाडा ,रंगा अण्णा वैद्य यांचा संचार अशी वृत्तपत्रांची ओळख होती .त्या संपादकाचे विचार व अग्रलेख वाचण्यासाठी लोक वृत्तपत्र विकत घेत असत . वृतपत्राचे मालक कोण आहेत हे लोकांना ठाऊकही नसायचे . ज्या संपादकांना स्वतः ची विचारधारा होती ,ज्यांची जनतेशी बांधिलकी होती अशा संपादकांना मात्र वृतपत्र मालकांनी बाजूला सारले आणि वृत्तपत्राचे मालक हे स्वतःच संपादक म्हणून मिरवू लागले . या वृत्तपत्रांनी जाहिरातींसाठी मोठ्या प्रमाणात तडजोडी करण्यास सुरुवात केली .निवडणुकीच्या काळामध्ये तर काही अपवाद वगळता सर्वच वृत्तपत्रे पेड न्यूज देतात.या सर्व तडजोडींमध्ये वृत्तपत्रे आपली विश्वासार्हता पूर्णतः गमावून बसली आहेत .एका वृत्तपत्रात ज्या पद्धतीने एखादी बातमी दिलेली असते त्याच्या अगदी विरुद्ध पद्धतीने दुसऱ्या वृत्तपत्र बातमी दिलेली असते .एखाद्या नेत्याची सभा यशस्वी झाली किंवा नाही याविषयी प्रत्येक वृत्तपत्रातील विश्लेषण वेगवेगळ्या स्वरूपाचे असते .त्यामुळे कोणते वृत्तपत्र खरे आणि कोणते वृत्तपत्र खोटे हे ठरवणे वाचकाच्या दृष्टीने अवघड बनले आहे .वृत्तपत्रातील बातम्यांचा आणि लेखनाचा स्तर हा सवंग झाला आहे .वेगवेगळ्या सॉफ्टवेअर्सचा वापर करून वृत्तपत्रांमधील कोणत्या बातम्या जास्तीत जास्त वाचल्या जातात याचा आढावा आता वृत्तपत्रे घेतात आणि तशा प्रकारच्या बातम्या मोठ्या प्रमाणात दिल्या जातात .त्यामुळे सिनेमा, सेलिब्रिटी, क्रिकेट आणि गुन्हेगारी या चार क्षेत्रांशी निगडित बातम्यांना मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्धी दिली जाते. वैचारिक लेखन , प्रबोधनात्मक लेखन हद्दपार केले जात आहे. वृत्तपत्रांच्या अग्रलेखांची लांबी कमी कमी होत अग्रलेखच नाहीसे होण्याची वेळ आली आहे .लोकांच्या अभिरुची प्रमाणे आम्ही बातम्या देतो असे या वृत्तपत्रांचे म्हणणे आहे .आम्ही लोकसेवेसाठी वृत्तपत्र चालवत नाही तर हा आमचा व्यवसाय आहे आणि व्यवसायामध्ये नफा मिळवण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे अशा प्रकारचा युक्तिवाद वृत्तपत्र मालकांकडून केला जात आहे . जेव्हा मुले शाळेत शिकत असतात तेव्हा शिक्षकांनी मुलांना काय आवडते याचा शोध घेतला तर त्यांना खेळायला आणि दंगा करायला जास्त आवडते असा निष्कर्ष निघेल. अशा स्थितीत शिक्षकांनी मुलांना केवळ खेळायला आणि दंगा करायला परवानगी दिली आणि शिकवणे बंद केले तर काय होईल ?वृत्तपत्र चालविणे हा व्यवसाय असला तरी देखील डॉक्टरांवर, शिक्षकांवर ज्याप्रमाणे सेवेची जबाबदारी असते त्याप्रमाणे वृत्तपत्रांवर देखील समाजाला जागृत करण्याची, योग्य दिशा दाखवण्याची जबाबदारी असते .आजच्या काळात भारतातील वृत्तपत्रांची मालकी ज्यांच्या हाती आहे त्यांना ही जबाबदारी नकोशी झालेली आहे . 1990 नंतर सर्व क्षेत्रे जागतिक स्पर्धेसाठी खुली झाली त्याचा फायदा भारतातील वृत्तपत्र मालकांनी भरपूर करून घेतला .मात्र चतुराईने सरकारवर दबाव आणून वृत्तपत्र क्षेत्रामध्ये परदेशी व्यक्ती, अथवा संस्थां येऊ नयेत असे कायदे सरकारकडून करून घेतले. त्यामुळे आज ज्यांच्या हाती वृत्तपत्रे आहेत त्यांना वाट्टेल तशी वृतपत्रे चालविण्याची एकाधिकारशाही प्राप्त झाली आहे. भारतातील समाजाचे खरे प्रश्न मांडण्याची अथवा त्यावर परखड भाष्य करण्याची इच्छा या वृतपत्रांना नाही .सत्ताधार्‍यांचे लांगूलचालन करून परदेशी दौरे करणे, जाहिराती मिळविणे, वृत्तपत्रासाठी आणि आपल्या इतर उद्योगांसाठी सवलती मिळवणे याकडेच त्यांचे लक्ष लागलेले आहे .वृत्तपत्राचे मालक हे माध्यम सम्राट बनले आहेत . जनतेशी आणि जनतेच्या प्रश्नांशी त्यांना काही आस्था नाही. त्यामुळेच त्यांच्या हाती असलेल्या वृत्तपत्रांकडे आता समाज बदलण्याची कुठलीही शक्तीही राहिलेली नाही . या वृत्तपत्रांनी विश्वासार्हता तर केव्हाच गमावलेली आहे . मी शाळेत असताना शिक्षक असलेले माझे वडील मला सांगायचे की, जर चांगली भाषा, चांगले विचार हवे असतील तर वृत्तपत्राचे वाचन नियमित करत जा .आज माझ्या मुलांना मी असे ठामपणे हे सांगू शकत नाही . आजच्या वृत्तपत्रातील भाषा बिघडलेली आहेच आणि वृत्तपत्रातून विचार तर हद्दपारच झालेले आहेत, त्यामुळे वृत्तपत्र घ्यायचे तरी कशासाठी ? असा मूलभूत प्रश्न आता निर्माण झालेला आहे .टाईम्स समूहाची वृत्तपत्रे ज्या जैन कुटुंबामार्फत चालविली जातात त्यातले समीर जैन म्हणाले होते " आम्हाला मिळणारा 95 टक्के नफा बातमीच्या नव्हे तर जाहिरातीच्या माध्यमातून मिळतो . त्यामुळे आम्ही जाहिरातीच्या व्यवसायात आहोत असे म्हणणे अधिक संयुक्तिक ठरेल" . आजची बहुतांश वृत्तपत्रे जाहिराती आणि पैसा मिळविण्यासाठी निघतात हे वास्तव आहे . एक कालखंड असा होता की वृत्तपत्रात सरकार बाबत काय छापून येते याचा सरकारला धाक वाटत असे .वृत्तपत्र आणि विरोधी पक्षा प्रमाणे काम करावे असे म्हटले जात होते . जर वृत्तपत्रांनी एखादा मुद्दा लावून धरला तर केवळ मुख्यमंत्री अथवा पंतप्रधान नव्हे तर अख्खे सरकार देखील बदलले गेल्याची अनेक उदाहरणे आहेत . मात्र आजच्या काळात सरकारला वृतपत्रांचा कोणताही धाक उरलेला नाही .एखाद्या वृत्तपत्राने जनतेची बाजू घेऊन लिखाण केले तर सरकारची बाजू घेऊन दहा वृत्तपत्रे लिहितात . ज्या वृत्तपत्रात जनतेची बाजू मांडली गेली त्याला कारणीभूत असलेला पत्रकार अथवा संपादक शोधून त्याचा पद्धतशीरपणे काटा काढला जातो . कोरोनाच्या कालखंडामध्ये अनेकांच्या घरात वृत्तपत्रे पोहोचू शकली नाही .या कालखंडात लोकांच्याही लक्षात आले की वृत्तपत्र घरात असायलाच हवे असे काही त्यात नाही .ही बाब मुद्रित वृत्तपत्रांसाठी धोक्याची घंटा आहे .वाचक या वृत्तपत्रांपासून दिवसेंदिवस अधिक दूर जात आहेत. विश्वासार्हता नसलेल्या सवंग वृत्तपत्रांचा अट्टाहास धरून वृत्तपत्र मालकांनी याच प्रकारची कणाहीन, दर्जाहीन पत्रकारिता या पुढच्या काळातही सुरू ठेवली तर, काही काळानंतर अशी वृत्तपत्रे केवळ नामधारी राहतील किंवा नामशेष होतील यात शंका नाही . - रवींद्र चिंचोलकर, सोलापूर (9860091855)

Tuesday, December 19, 2023

माध्यमे आणि वास्तव

छप के बिकते थे जो कल तक अखबार सुना है इन दिनो वो बिक के छपा करते है या चार ओळी भारतातील वृतपत्रांची आणि एकंदरच माध्यमांची सद्यस्थिती स्पष्ट करण्यास पुरेशा आहेत . ही स्थिती का निर्माण झाली याची अनेक कारणे आहेत. दोन प्रमुख कारण आहेत जागतिकीकरण आणि माध्यमांचे परावलंबित्व . जागतिकीकरणामुळे जगाची बाजारपेठ खुली झाली. या कालखंडात भारतात माध्यम क्षेत्रामध्ये मोठे बदल झाले . बहुराष्ट्रीय टी.व्ही . चॅनल्सची संख्या झपाट्याने वाढत गेली. वृतपत्रांची आपसात आणि टीव्हीशी स्पर्धा सुरु झाली .वृत्तपत्र मालकांनी प्रगत देशातून महागडी यंत्रसामुग्री, वृत्तकागद, शाई इत्यादी साहित्य मागविण्यास सुरुवात केली.अधिक पानांचे आणि रंगीत वृतपत्र कमीत कमी किमतीमध्ये वाचकाला देण्याची स्पर्धा सुरू झाली . एखादे वृतपत्र अथवा टीव्ही चॅनल काढायचे तर किमान 200 कोटी जवळ हवेत . पंधरा रुपयाचे वृतपत्र अवघ्या एक ते पाच रुपयाला विकले जाते तसेच बातम्यांसाठी दर्शकांकडून नाममात्र रक्कम घेऊन चालणारी टीव्ही चॅनल्स प्रचंड तोट्यात असतात .जाहिरातीतून हा तोटा भरून काढावा लागतो. या जाहिरातींसाठी सत्ताधारी आणि बडया भांडवलदारांवर माध्यमांचे अवलंबित्व आहे . त्यामुळे वाट्टेल त्या तडजोडी ही माध्यमे स्वीकारतात . वृतपत्र क्षेत्रात काही भांडवलदारांची एकाधिकारशाही सुरु झाली . टीव्ही चॅनल्सही त्यांनीच ताब्यात घेतली आणि ते माध्यम सम्राट बनले .ज्या संपादक आणि पत्रकारांना स्वतः चे ठाम विचार आहेत आणि ज्यांची जनतेशी बांधिलकी आहे, त्यांना या माध्यम सम्राटांनी घरचा रस्ता दाखविला .माध्यम सम्राटांनी केलेल्या कोंडीमुळे स्थानिक भाषा आणि संस्कृती जपणारी छोटी आणि मध्यम वृत्तपत्रे आर्थिक अडचणीत येऊन बंद पडली .आम्ही वृतपत्र , टीव्ही चॅनल समाजसेवेसाठी अथवा सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यास चालवित नाही, तर नफा मिळविल्यास चालवितो अशी भूमिका माध्यम सम्राटांनी घेतली. कणाहीन पत्रकार आणि संपादक या माध्यम सम्राटांनी नोकरीस ठेवले.जनतेचे प्रबोधन आणि लोकशिक्षण ही भूमिका सर्वस्वी सोडून देण्यात आली. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे एकविसाव्या शतकाच्या प्रारंभापासून समाज माध्यमे सर्वांच्या हाती आली. ही समाज माध्यमे सर्वसामान्यांचा आवाज बनतील असे वाटत होते . कारण या समाज माध्यमांची गती आणि पोहोच खूप आहे. कुठलेही प्रशिक्षण नसताना सर्वसामान्य माणसाच्या हाती फेसबुक, युट्यूब, इन्स्टाग्राम, व्टिटर इत्यादी समाजमाध्यमे आली. ही सर्व लोकप्रिय समाज माध्यमे अमेरिकेतील माध्यम सम्राटांच्या मालकीची आहेत. त्यांना केवळ पैसा हवा आहे. स्मार्ट फोनच्या मदतीने भारतीयांच्या हाती आलेल्या या समाज माध्यमांनी सध्या धुमाकूळ घातला आहे. आपले फोटो आणि रिल्स समाज माध्यमांवर टाकून धन्यता मानन्यात लोक गुंग आहेत. ही न उतरणारी नशा आहे . त्यामुळे सर्वसामान्यांना ही समाज माध्यमे जीव की प्राण वाटत असली तरी या समाज माध्यमांनी भारतीयांची गोपनीय माहिती वेळोवेळी इतरांना विकून त्यांना फसविले आहे. या समाज माध्यमांद्वारे पसरविल्या जाणाऱ्या द्वेषमूलक व खोट्या बातम्या ही मोठी डोकेदुखी बनली आहे. समाज माध्यमांमुळे सायबर गुन्हेगारी खूपच वाढली आहे , त्यात सर्वसामान्य माणूस भरडला जातो आहे. या समाज माध्यमांचे मालक परदेशात असल्याने त्या द्वारे होणाऱ्या फसवणुकीस संरक्षण देण्यास आपले कायदे अपुरे आहे. अनेकांना समाज माध्यमांचे व्यसन जडले आहे. परिणामी सामान्य भारतीय माणूस पदोपदी बळी पडतो आहे . एकंदरीत वृतपत्रे, टीव्ही आणि समाज माध्यमे जनतेला योग्य दिशा दाखविणे सोडून केवळ रंजन, रंजन आणि रंजनाचा भडीमार करीत आहेत. त्यामुळे सामान्य माणूस वृत्तीने चंचल बनला आहे . कोणत्याही गंभीर विषयासंबंधीचे, समाज प्रबोधनाविषयीचे लेखन अथवा चर्चा त्याला आता नकोशी झाली आहे. लोक स्वतंत्र विचार न करता माध्यमांवर विसंबून राहतात याचा फायदा घेऊन माध्यम सम्राट लोकांच्या मनावरही अधिराज्य गाजविण्याचा प्रयत्न करीत आहेत . लोकांच्या नकळत त्यांना महागड्या, गरज नसलेल्या वस्तू अत्यावश्यक असल्याचे लोकांच्या मनावर बिंबवले जात आहे. लोकांच्या नकळत त्यांचे राजकीय, सामाजिक विचार ठराविक दिशेला वळविले जात आहेत . यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर माध्यम सम्राट करीत आहेत.माध्यमांनी खरे तर विरोधी पक्षाची भूमिका घेऊन सर्वसामान्यांचे प्रश्न मांडायला हवेत, मात्र सत्ताधारी पक्षाशी हातमिळवणी करून देशी आणि विदेशी माध्यम सम्राट निश्चिंत झाले आहेत . आम्ही सांगू तेच खरे अशी भूमिका घेऊन हे माध्यम सम्राट सर्वसामान्य माणसाला माहितीरंजनाच्या मायाजालात गुंगवून टाकत आहेत. खरे काय ते सामान्य माणसाला शेवटपर्यंत कळू नये आणि त्याने खरे जाणून घेण्याचा प्रयत्नही करू नये अशी व्यवस्था या माध्यम सम्राटांनी निर्माण केली आहे. जी माध्यमे खोट्या बातम्या पसरविण्यास कारणीभूत आहेत तीच माध्यमे फेक न्यूज कशा ओळखाव्या याचे प्रशिक्षण देतात हा मोठा विरोधाभास त्यामुळे अनुभवाला येतो आहे . भारत हा जगातील मोठा लोकशाही देश आहे. ही लोकशाही प्रगल्भ आणि सदृढ होण्यासाठी माध्यमांची भूमिका महत्वाची असते. मात्र ही माध्यमेच आपले स्वत्व गमावून बसलेली असतील तर लोकशाहीलाही धोका निर्माण होतो . दारिद्रय, बेरोजगारी, आरोग्य, शेतमालाचे भाव, दुष्काळ यासारखे लोकांचे खरे प्रश्न बाजूला ठेवून खोट्या भावनिक प्रश्नात लोकांना गुंतवून ठेवण्याचे काम सत्ताधारी आणि माध्यमे करीत आहेत . अशातच भारतातील 28 विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी बनवली आहे. या इंडिया आघाडीने भारतातील 14 टीव्ही अँकरवर बहिष्कार घातला आहे. हे टीव्ही अँकर सत्य न सांगता द्वेषाचा बाजार भरवतात असा आरोप त्यांनी केला आहे . ज्यांच्यावर बहिष्कार घातला त्यात रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी ,भारत 24 च्या अँकर रुबिका लियाकत,; इंडिया टुडे-आज तक नेटवर्कचे सुधीर चौधरी, चित्रा त्रिपाठी, गौरव सावंत आणि शिव आरूर, टाइम्स नेटवर्कच्या समूह संपादक नाविका कुमार, टाइम्स नाऊ चे अँकर सुशांत सिन्हा; अमन चोप्रा, अमिश देवगण आणि सीएनएन न्यूज 18 चे आनंद नरसिंहन, इंडिया टीव्हीच्या प्राची पाराशर; भारत एक्सप्रेसच्या अदिती त्यागी; आणि डीडी न्यूजचे अँकर अशोक श्रीवास्तव यांचा समावेश आहे. स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात प्रथमच असे घडताना दिसत आहे .पत्रकारांनी केवळ सत्ताधारी पक्षाचे लांगूलचालन करणे जेवढे निषेधार्ह आहे तेवढेच विरोधी पक्षांनीही काही अँकर्सवर बहिष्कार टाकणे निषेधार्ह आहे. याच देशात राजा राम मोहन रॉय,महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या बाणेदार पत्रकारांनी निर्माण केलेली परंपरा कोठे गेली असा प्रश्न पडतो. अजूनही माध्यमे आपणाला वर्ष, तारीख आणि दिवस बरोबर सांगतात हेच उपकार आहेत असे वाटावे असा हा काळ आहे. (सुवर्णधन दिवाळी अंकाच्या सौजन्याने ) डॉ. रविंद्र चिंचोलकर ( मो . 9860091855 )

Saturday, November 11, 2023

अशीही पत्रकार - परिषद

पत्रकार परिषद हा एक मजेशीर प्रकार असतो. पत्रकार परिषद आयोजित करणारी व्यक्ती पत्रकारांना निमंत्रण देऊन बोलावते, पत्रकारांचे आगत-स्वागत करते . कधी-कधी काही भेटवस्तू देऊन पत्रकारांना खूष करण्याचा प्रयत्न करते . पण हे सारे असले तरी पत्रकार खाल्ल्या मीठाला जागायचे नाही हा पत्रकारिता धर्म असतो. पत्रकार परिषदेच्या आयोजकाला आडवे -तिडवे प्रश्न विचारून भंडावून सोडण्याचा पत्रकारिता धर्म पत्रकार निभावत असतात. पत्रकार परिषदेत संपल्यावर आयोजकाची कशी जिरवली याची चर्चा करीत पत्रकार आपल्या कार्यालयाकडे जात असतात. आमच्या पत्रकार मित्रांनी एका नवशिक्या पत्रकाराला एक प्रश्न विचारण्यास पढवून ठेवले होते . संपूर्ण पत्रकार परिषद संपल्यावर आभार प्रदर्शन सुरु होण्याआधी आयोजकाला तो विचारायचा की "तुम्ही हे सारे सांगितले पण याचा उपयोग काय?" रामायण सांगून झाल्यावर रामाची सीता कोण असे विचारावे अशा या प्रश्नाने आयोजक गोंधळून जायचा . पण कधी-कधी पत्रकारांनी भारी पडणारी काही माणसे भेटतात. औरंगाबादला मी पत्रकारितेत असताना त्या काळातले निवडणूक आयुक्त टी.एन.शेषन,पंतप्रधान चंद्रशेखर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री शरद पवार, मनोहर जोशी यांच्यासह अनेक मान्यवरांच्या पत्रकार परिषदेला उपस्थित राहण्याची संधी मला लाभली. एकदा निवडणूक टी.एन.शेषन यांची पत्रकार परिषद होती . स्वतःला खूप विद्वान समजणाऱ्या इंग्रजी वृत्तवाहिनीच्या एका पत्रकाराने नेहमीच्या शैलीत प्रश्न विचारला. आपण विचारलेल्या प्रश्नावर शेषन बोलू शकणार नाहीत असे वाटून तो पत्रकार छद्मीपणाने हसू लागला . ते पाहून निवडणूक आयुक्त शेषन म्हणाले "तुम खुदको बहोत होशियार समझते हो । सवाल पूछने के बजाय भाषण दे रहे हो । और ये बत्तीसी किसे दिखा रहे हो , अपना मुँह बंद करो ।" शेषन यांनी असे फटकारल्यावर त्याा पत्रकाराचा चेहरा पडला आणि नंतर पत्रकार परिषद संपेपर्यंत त्याने मान वर उचलूनही पाहिले नाही . दुसरी पत्रकार परिषद शिवसेनाप्रमुख बा .ळासाहेब ठाकरे यांची आठवते . डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार होण्याआधीच्या काळातील हा प्रसंग आहे. विद्यापीठाचा नामविस्तार करावा असा निर्णय त्यावेळचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी घेतला होता त्यामुळे संपूर्ण मराठवाड्यात वातावरण तापलेले होते. नामविस्तार विरोधकांतर्फे औरंगाबादला सरस्वती भुवन महाविद्यालयाजवळील मैदानात मोठ्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत बोलण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे येणार होते . लोक मोठ्या संख्येने सभेसाठी आले होते,परिस्थिती स्फोटक बनली होती . या सभेसाठी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मुंबईहून कारने निघाले होते . मात्र परिस्थिती स्फोटक असल्याने पोलिसांनी अहमदनगर येथून विनंती करून त्यांना परत पाठविले. त्यावर औरंगाबादच्या एका हिंदी दैनिकाने शेपूट खाली केलेल्या एका वाघाचे व्यंगचित्र छापून ' ठाकरे दुम दबाके भाग गये'असे खोचक वाक्य त्याखाली लिहिले. या घटनेनंतर काही दिवसांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे पुन्हा औरंगाबाद येथे आले .एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेला सर्व वृत्तपत्रांच्या पत्रकारांना आमंत्रण देण्यात आले होते .सर्व पत्रकार आले आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे खुर्चीवर विराजमान झाले .पत्रकार परिषदेला सुरुवात होणार होती .तेवढ्यात शिवसेनाप्रमुखांना आठवले की एका हिंदी वृत्तपत्राने व्यंगचित्र छापून त्यांची खिल्ली उडवली आहे .तेव्हा त्यांनी पत्रकारांना विचारले की त्या वृत्तपत्राचे प्रतिनिधी या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत काय .मी होय असे उत्तर दिले .त्यावर शिवसेनाप्रमुख म्हणाले त्या पत्रकारांनी येथून चालते व्हावे मगच ,पत्रकार परिषद होईल .आम्ही या गोष्टीला विरोध केला आणि सांगितले की तुमच्या पक्षाच्या निमंत्रणानुसार सर्व पत्रकार या ठिकाणी हजर झालेले आहेत ,आता ऐनवेळी एखाद्या पत्रकाराला पत्रकार परिषदेतून हाकलून देणे हा एकंदरीत सर्वच पत्रकारांचा अपमान आहे असे आम्ही मानतो . त्यामुळे कोणालाही या पत्रकार परिषदेतून बाहेर जाणे सांगू नये .शिवसेनाप्रमुखांनी हे मान्य केले आणि पत्रकार परिषदेला सुरुवात करायची असे ठरले .मात्र त्यादरम्यान पुन्हा शिवसेनाप्रमुखांना शंका आली आणि ते म्हणाले उद्या तुम्ही असे छापाल की शिवसेनाप्रमुखांनी माघार घेतली तर ते चालणार नाही .आम्ही त्यावर सांगितले की उद्या कोण काय छापेल याची खात्री कोणी देऊ शकणार नाही .उत्तर ऐकताच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी "मला पत्रकार परिषदेची काही गरज नाही तुम्ही निघा" असे सांगितले .त्यामुळे ती पत्रकार परिषद सोडून आम्ही त्या पंचतारांकित हॉटेलच्या बाहेर पडू लागलो . हा सारा प्रकार पाहत असलेल्या शिवसैनिकांना याचा खूप संताप आला त्यामुळे त्यांनी फक्त पुढचा विचार न करता बाहेर येणाऱ्या प्रत्येक पत्रकाराला चोप देण्यास सुरुवात केली .त्यामुळे पत्रकारांमध्ये भेटीच्या वातावरण पसरले आणि वाटेल त्या दिशेने पत्रकार पडू लागले .हॉटेल बाहेरील झाडावर चढून बसले तर कोणी हॉटेलमधील खोल्यांमध्ये लपून बसण्याचा प्रयत्न केला तर काहींनी बाहेर रस्त्यावर पळून जाण्याचा प्रयत्न केला . त्यात कहर म्हणजे त्या पंचतारांकित हॉटेलमध्ये शिवसेनेची कर्मचारी युनियन होती .त्यामुळे हॉटेल कर्मचाऱ्यांनीही शिवसैनिकांना साथ दिली . काही पत्रकारांना खूप मार बसला झाडावर चढलेल्या पत्रकारांना पकडून शिवसैनिकांनी हॉटेलमध्ये खुर्चीला बांधून ठेवले. नंतर शिवसेना किंवा शिवसेनाप्रमुखांबद्दल काहीही वावगे लिहिणार नाही हे कबूल केल्यावर त्यांची सुटका झाली .आम्ही तीन -चार पत्रकार मात्र सहीसलामत बाहेर पडलो . अशा काही पत्रकार परिषदा सदैव लक्षात राहतीत अशा आहेत . (पूर्वप्रसिद्धी -एबी मराठी दिवाळी अंक )

Sunday, April 23, 2023

महाराष्ट्रातील तरुण पिढीचे भवितव्य कंत्राटदारांच्या कचाटयात

 एक आदमी रोटी बेलता है

एक आदमी रोटी खाता है

एक तीसरा आदमी भी है

जो न रोटी बेलता है, न रोटी खाता है

वह सिर्फ़ रोटी से खेलता है

मैं पूछता हूँ--

'यह तीसरा आदमी कौन है ?'


कवी धूमिल यांनी एका कवितेतून संसदेला विचारलेला हा प्रश्न आता महाराष्ट्र सरकारला विचारण्याची वेळ आली आहे. कारण आता महाराष्ट्रातही  या तिस-या व्यक्तीचा प्रवेश होतो आहे. शासनाने विविध खात्यात नोकरभरती जाहीर करावी आणि तरुण पिढीने त्या नोक-या मिळवाव्या हे अपेक्षित असते, मात्र आता कंत्राटदार या तिस-या पात्राच्या हाती  सारी सूत्रे सोपविली जात आहेत. सरकारी नोक-यांचे खाजगीकरण केले जात असल्याने , त्याचे भयंकर चटके तरुण पिढीला सोसावे लागणार आहेत. केंद्रीय कामगार मंत्राालयाच्या शासकीय अहवालानुसार सध्या महाराष्ट्रात बेरोजगारांची संख्या 38 लाखांपेक्षा अधिक आहे.त्यात पुरुष बेरोजगार 28 लाख 56 हजार , महिला बेरोजगार 9 लाख 44 हजार आणि ट्रान्सजेंडर बेरोजगार 230 आहेत. बेरोजगारांची आकडेवारी मोजण्याची पध्द्तीही सदोष आहे, अनेक बेरोजगार नोंदही करीत नाहीत. हे  विचारात घेतल्यास एकट्या महाराष्ट्रात एक कोटीपेक्षा अधिक बेरोजगार असू शकतात. 20 ते 30 वयोगटातील आजूबाजूच्या तरुण पिढीकडे पाहिल्यास 10पैकी केवळ 3 जण कंपन्या किंवा इतरत्र नोकरीस असलेले दिसतात.

 सरकारी नोकरभरती बारा वर्षांंपासून बंदच असल्याने सरकारी कार्यालयात आधीपासूनच कंत्राटी पध्द्तीने कर्मचारी नेमून कामे करुन घेतली जात आहेत. 12 ते 25 हजाराच्या तुटपुंज्या पगारावर दहा -बारा वर्षापासून काम करणारे असे कंत्राटी कर्मचारी, यावर्षी कामावर घेतात की नाही या भीतीसह दरवर्षी मुलाखतीला सामोरे जातात.. त्यांना आजवर निदान सरकारर्तर्फे कंत्राटी  म्हणून नेमले जात होते, आम्ही सरकारी नोकरीत आहोत असे ते म्हणू शकत होते. मात्र आता त्यांना सरकार नव्हे तर कंत्राटदार नेमणूकपत्र देणार आहे. म्हणजे त्या कंत्राटी कर्मचा-यासाठी आयुक्तापेक्षाही कंत्राटदार हा मोठा आणि मालक असणार आहे. 

.सरकारी नोकरांचा पगार आणि पेन्शन याचा अर्थव्यवस्थेवर मोठा भार अहे, त्यामुळे विकासकामांसाठी पैसा पुरत नाही हे कारण पुढे करुन सरकारी नोक-यांच्या खाजगीकरणाचा मार्ग सरकारने स्वीकारला आहे.कंत्राटदारामार्फत नोकरदार नेमल्याने राज्य शासनाच्या खर्चात 20 ते 30 टक्के बचत होईल असा दावा  सरकारतर्फे  केला जात आहे. विविध खात्यातील 75 हजार जागा या कंत्राटदारांमार्फत भरल्या जाणार असल्याचे राज्य शासनाने जाहीर केले आहे. 


महाराष्ट्र राज्यात शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये यापुढे पाच वर्षात भरली जाणारी 136 प्रकारची पदे नऊ खाजगी संस्थाव्दारे कंत्राटी पध्द्तीने भरण्यात येणार आहेत. हा शासन निर्णय 14 फेब्रुवारी 2023 रोजी  जाहीर करण्यात आलाआहे. त्यामुळे कोणत्याही शासकीय आणि निमशासकीय कार्यालयाला आता या कंत्राटदार संस्थाच्या मार्फत कंत्राटी नोकरभरती करावी लागणार आहे. आधीच बेकार्रीने गांजलेल्या महाराष्ट्रातील  तरुण पिढीचे भवितव्य कंत्राटदारांच्या हवाली करण्याचा हा निर्णय आहे. देशात आणि महाराष्ट्रात आजवर  जिथे -जिथे कंत्राटी पध्द्तीने नोक-या दिल्या गेल्या , तिथे-तिथे कंत्राटी कर्मचा-यांची पिळवणूकच झाली आहे. यात सर्व फायदा कंत्राटदारांनी लाटला आहे. महाराष्ट्रात महामार्ग तयार करण्याचे काम कंत्राटदारांना देण्यात आले, त्याथून काही रस्ते चांगले झाले, मात्र कंत्रटदारांनी दहापट वसुली करुनही टोल बंद होण्याऐवजी टोलचे दर वाढत आहेत. सर्वसामान्य माणूस त्यात भरडला जात आहे.  कंत्राटी नोकरभरतीत  यापेक्षा काही वेगळे घडेल अशी अपेक्षा करुन उपयोग नाही. विविध खात्यातील 75 हजार जागा या कंत्राटदारांमार्फत भरल्या जाणार असल्याचे राज्य शासनाने जाहीर केले आहे. 
महाराष्ट्र शासनाने चार संवर्गात या कंत्राटी पदांची वर्गवारी केली आहे ती खालीलप्रमाणे. 


कामाचे स्वरुप

पदाचा प्रकार 

पात्रता

अनुभव 

पगार 

अकुशल 

शिपाई , हेल्पर, स्वीपर इ. 

अट नाही  

एक ते दोन  वर्षे

25,000/- ते 28,800/- 

अर्धकुशल 

सुतार , माळी , स्टोअर असिस्टंट इ. 

बारावी

किमान दोन वर्षे 

25, 000/- ते 32 ,800/-

कुशल 

ग्रंथपाल , जनसंपर्क अधिकारी , निरीक्षक इत्यादी 

पदवी व तत्सम 

किमान 1 ते पाच वर्षे 

27.500/- ते 71 , 000/-

अतिकुशल 

शिक्षक, अधीक्षक, अभियंता,  लेखापाल, मिडिया एक्सपर्ट इत्यादी 

पदवी, बीई

पाच ते वीस वर्षे

27500 ते 2,92,000/- ही एकंदर 75, 000 पदे भरण्यासाठी निवडण्यात आलेल्या कंत्राटदार संस्थांची नावे खालीलप्रमाणे आहेत.  

  1.  ॲक्सेस टेक सर्व्हिसेस लि.

  2. सीएमएस आयटी सर्व्हिसेस प्रा. लि., 

  3. सीएससी ई गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लि

  4. इनोवेव आयटी इन्फ्रास्ट्रक्चर लि.

  5. क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रा. लि., 

  6. एस-२ इन्फोटेक इंटरनॅशनल प्रा. लि.

  7. सैनिक इंटेलिजन्स सिक्युरिटी प्रा. लि.,

  8. सिंग इंटेलिजन्स सिक्युरिटी सर्व्हिसेस प्रा. लि., 

  9. उर्मिला इंटरनॅशनल सर्व्हिसेस प्रा. लि.

या कंपन्या कोणाच्या मालकीच्या आहेत  , त्यांची कार्यपध्द्ती कशी आहे हे प्रश्न तूर्त बाजूला ठेवले तरीही या कंत्राटदारांच्या हाती सोपविल्या जाणा-या तरुण पिढीचे भवितव्य धोक्यात आहे हे उघड सत्य आहे . सरकारी नोकरी आता विसरा हाच एकमेव अर्थ  यातून निघतो.

कंत्राटदारामार्फत का होईना आम्ही नोक-या देतोय असा दावा यासंदर्भात केला जात आहे..मात्र मागील बारा वर्षात सरकारी नोकरभरती न झाल्याने बेकारांची संख्या खूप वाढली आहे. वयोमर्यादा संपून अनेकांचे सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्णत्वास जाणे अशक्य झाले आहे. एक-दोन वर्षांनी नोकरीची वयोमर्यादा वाढविणे हा यावरचा उपाय नाही. कंत्राटीकरणामुळे  नोकरदारास कायम नोकरीची कुठ्लीही हमी राहणार नाही, त्याची नोकरी कायम कंत्राटी राहील, तो अनुभव इतर नोकरीस पात्र धरला जाणार नाही. कंत्राटदार नोकरदारास कधीही नोकरीवरुन काढू शकेल, त्याबाबत कोठे दादही मागता येणार नाही.  सरकारी नोकर जे काम करतात त्यापेक्षा अधिक काम कंत्राटी कर्मचा-यांना जवळपास  निम्म्या वेतनावर करावे लागणार आहे. जेवढे दिवस काम केले तेवढ्याचाच पगार मिळैल. हक्काच्या सुट्या , रजा, भत्ते, पदेान्नती यासारख्या सवलती हद्द्पार होणार आहेत. कंत्राटदार या कर्मचा-यांचे मालक होतील, त्यांनी कमी पगार दिला, पिळवणूक केली तरी साधी तक्रारही करता येणार नाही. पगारवाढ हा शब्दच विसरावा लागेल. पेन्शन, ग्रॅच्युइटी याचे तर नावही काढता येणार नाही.  कंत्राटदार आरक्षण आणि गुणवत्ता यासारख्या नियमांचे पालन करतील असे म्हणणे धाडसाचे ठरेल. याशिवाय कायम नोकरी नसल्याने कंत्रटी कर्मचा-यांचे  लग्न होऊ शकणार नाही, नैराश्याच्या गर्तेत तरुण पिढी सापडेल यासारख्या सामाजिक समस्याही निर्माण होतील. वर्षभर कुठलीही सुटी न घेता शेतात राबणारा शेतकरी शेतीमालास भाव न मिळाल्याने जसा हवालदिल होतो आणि व्यापारी काही तासात फार्से श्रम न करता मालामाल होतो.,  तसे यात कंत्राटी कर्मचारी  वेठबिगारांसारखे राबतील पण, कंत्राटदार मात्र मालामाल होतील. 

महाराष्ठ्रतील बेरोजगारांची संख्या लक्षात घेता 75 हजार नोक-या नगण्य आहेत.  या सरकारी नोक-यात आरक्षण मिळावे यासाठी  विविध जाती संघटना आरक्षणाची मागणी करीत लाखोंचे मोर्चे काढीत आहेत आणि आपसात भांडत आहेत.  आता सरकारी नोक-याच नाहीत , हे वास्तव कोणी लक्षात घेत नाही. 


विशेष म्हणजे जेव्हा हा शासन निर्णय जाहीर  झाला तेव्हा विरोधी पक्षाच्या काही नेत्यांनी त्यास वरवरचा विरोध दर्शविला. मात्र तुम्ही सत्तेत असताना घेतलेला निर्णय आम्ही अमलात आणीत आहोत असे सरकारतर्फे सांगताच सारे चिडीचूप झाले.सरकार कोणत्याही पक्षाचे असो,  धोरणे तीच असणार हाच याचा अर्थ आहे.  एरवी साध्या - साध्या  प्रश्नावर आंदोलने करणा-या एकाही  विद्यार्थी संघटनेने याबाबत साधी प्रतिक्रीयाही नोंदविलेली नाही हे विसेष आहे. सरकारी नोकरांच्या कर्मचारी संघटना कायम पेन्शनच्या आश्वासनात दंग आहेत, आपलीच लेकरे असणा-या तरुण पीढीचे भवितव्य आपण नासवतोय याचे भान कोणालाच नाही. एकंदर तरुण पिढीसमोर असलेल्या खाजगीकरणाच्या आणि कंत्राटी नोकरीच्या संकटाला कोणीही वाली नाही. तरुण पिढीने आता स्वप्ने तरी कशी पाहायची , एक भयाण वास्तव त्यांना गिळंकृत करण्यासाठी वाट पाहते आहे. 

( यातील काही भाग दिव्य मराठीच्या दिनांक 23 एप्रिल 2023 च्या अंकात प्रकाशित झाला आहे. )Saturday, May 2, 2020

छायाचित्र पत्रकारिता (फोटो जर्नलिझम)


छायाचित्र पत्रकारिता (फोटो जर्नलिझम)  हा पत्रकारितेचा एक विशेष प्रकार आहे. छायाचित्राच्या मदतीने बातमी वाचकापर्यंत पोहोचविणे याला छायाचित्र पत्रकारिता म्हणतात . सामान्य पत्रकारितेमध्ये बातमी केवळ भाषा आणि शब्दांद्वारे संकलित केली आणि प्रकाशित केली जाते. मात्र छायाचित्रांच्या माध्यमातून आपल्या बातम्या किंवा बातम्यांची कथा वाचकांपर्यंत पोहोचविल्यास त्या अत्यंत प्रभावी ठरतात.छायाचित्राच्या माध्यमातून जो पत्रकारिता करतो त्याला छायाचित्र पत्रकार म्हणतात. प्रसिध्द छायाचित्र पत्रकार रघु राय यांच्या मते “एखादया प्रसंगाच्या पाठीमागे असणारे सत्य छायाचित्राच्या माध्यमातून जो प्रखरपणे पुढे आणतो तोच खरा छायाचित्र पत्रकार होय”.घटना सोपी करुन सांगणे हा संज्ञापनाचा मूळ हेतू असतो. शब्दांपेक्षा दृश्य माध्यमातून संज्ञापन अधिक प्रभावीपणे साधता येते. म्हणूनच वृत्तपत्रात बातम्यांबरोबर छायाचित्रांचा वापर केला जातो. छायाचित्रांप्रमाणेच व्यंगचित्र, नकाशा, आलेख, रेखाटन, कल्पनाचित्रे आदींचा वापर करुन संज्ञापन साधले जाते.
छायाचित्र पत्रकारितेसाठी पत्रकारितेची दृष्टी असलेला छायाचित्रकार आवश्यक असतो. कोणत्याही घटनेचा सर्वांत महत्त्वाचा, नेमका क्षण कॅमेऱ्याने टिपणे यातच त्याचे कौशल्य असते.वृत्तपत्रात छायाचित्र प्रसिद्ध करताना त्याच्या तांत्रिक गुणवत्तेपेक्षा त्यातील पत्रकारिता-मूल्यास अधिक महत्त्व दिले जाते. प्रसिद्धीसाठी निवड करताना छायाचित्र बातमीला पूरक आणि छापण्यायोग्य असावे, अशी अपेक्षा असते. त्याखेरीज ते बनावट, दिशाभूल करणारे, न्यायालयीन कारवाई ओढवून घेणारे, वाचकावर विपरीत परिणाम करणारे, हीन अभिरुचीचे असू नये, असे काही निकषही पत्रकारितेत मानले जातात.
एखादा छायाचित्र पत्रकार शब्दांऐवजी फोटोंच्या माध्यमातून आपली बातमी / दृष्टिकोन / कथा / माहिती देतो. म्हणूनच, छायाचित्र पत्रकार एक कुशल छायाचित्रकार असणे आवश्यक आहे, परंतु छायाचित्र पत्रकार केवळ छायाचित्रकार नसतो. फोटोंच्या माध्यमातून सांगायचं असलं म्हणून पत्रकाराची शोधक दृष्टी त्याच्याकडे असणंही महत्त्वाचं आहे.

 जगभरात गाजलेली काही छायाचित्रे

1)छायाचित्र कला हीसुद्धा विविध दृश्य आपल्या कॅमेऱ्यात पकडते आणि ती क्षणचित्रे छायाचित्रकार साकार करतो. छायाचित्रकला ही एक कला नव्हेच , असा एक युक्तिवाद पूर्वी केला जात असे. एखादे दृश्य निवडायचे, चौकटीत आणायचे आणि फोटो घ्यायचा, यात कला कुठे आहे? ते केवळ एक तंत्र आहे असेच म्हटले जात असे; परंतु जेव्हा आशय आणि दृष्टिकोन भरलेली छायाचित्रे छायाचित्रकार साकारू लागले तेव्हा जगाला यातील कलेचा साक्षात्कार होऊ लागला. याचे उत्तम उदाहरण प्रसिद्ध लेखक पत्रकार अनिल अवचट यांच्याफोटोग्राफीया लेखात वाचायला मिळते.
       महायुद्धातले अनेक फोटो पाहिले; पण एका फोटोने मन जसे चरचरले तसे दुसऱ्या कशाने नव्हते. मुख्य म्हणजे तो  फोटो  युद्धभूमीवरचा नव्हताच. युद्धकाळातलाही नव्हता. युद्धानंतर काही वर्षानी विशिष्ट बटालियनमधले लोक एकत्र आले, त्याचा एक ग्रुप फोटो होता. काहीजण खुर्चीत बसलेले, कोणी मागे उभे, असा तो टिपिकल ग्रुप फोटो.फोटोतल्या माणसांना कुणाला हात नाही, कुणाला पाय नाही, कुणाचा जबडा  फाटलेला, कुणाच्या गमावलेल्या डोळ्यावर कायमची काळी पट्टी चढलेली. माणसे जशी आपल्याला छत्र्या घेऊन फोटोला त्याकाळात बसायची, तसे इथे फक्त छत्र्याच्या जागी वेगवेगळ्या प्रकारच्या कुबड्या ठेवलेल्या. मागची इमारत छान चिरेबंदी, पुढे हिरवळ बाकी सगळे व्यवस्थित. फक्त हे असे आणि मुख्य म्हणजे फोटो काढताना ते हसत होते, युद्धाच्या परिणामाविषयी वेगळे भाष्य करण्याची गरजच नाही. तो फोटो युद्धावरच्या फोटोच्या संग्रहातला होता.तो फोटोग्राफरने परिस्थिती दाखवण्यासाठी, रूढ मार्गाने जाता अगदी वेगळ्या तऱ्हेने दाखवून आपली निवड केली होती.”
2) अफगाण –पाकिस्तान सीमेवर निर्वासितांच्या अनेक छावण्या होत्या. 1984 मध्ये छायाचित्र पत्रकार स्टीव्ह मॅककुरी यांना नॅशनल जिओग्राफिकने अफगाण-पाकिस्तान सीमेवरील निर्वासित छावण्यांचे फोटो काढण्यासाठी निमंत्रित केले. त्यांनी पेशावरच्या बाहेर छावण्या पाहिल्या .नासिर बागच्या छावणीत मॅककुरीला मुलींचा शाळा म्हणून उभारलेला तंबू सापडला ज्यामध्ये पंधरा मुली शिकत असत. त्यात हिरव्या डोळ्यांच्या एका मुलीला त्याने पाहिले.मॅककुरी यांनी ही आठवण सांगताना लिहिले आहे : “मी या तरूणीला शोधले. ती फक्त बारा वर्षांची होती. ती खूपच लाजाळू होती आणि मला वाटलं की मी इतर मुलांचे छायाचित्र प्रथम काढले तर ती सहमत होण्याची शक्यता जास्त आहे. मला वाटते की तिच्याविषयी मी जशी उत्सुक होती तशीच तिलाही होती, कारण तिचे कधीच छायाचित्र घेतले नव्हते आणि तिने कॅमेराही कधीच पाहिला नव्हता. काही क्षणांनंतर ती उठली आणि निघून जाऊ लागली. पण एका क्षणात तिने मागे वळून पाहिले तो क्षण मी टिपला - तिच्या डोळ्यातील प्रकाश, पार्श्वभूमी आणि अभिव्यक्ती. यामुळे छायाचित्र अजरामर झाले. ” विसाव्या शतकातील सर्वात गाजलेले छायाचित्र म्हणून ते ओळखले गेले.

हे छायाचित्र युद्धग्रस्त देशांमधील मुलांचे दुःख आणि सामान्य लोकांवर अशा संघर्षाचे वास्तविक परिणाम दर्शवते. नॅशनल जिओग्राफिकच्या जून 1985 च्या अंकाच्या मुखपृष्ठावर हे छायाचित्र प्रसिध्द झाले. नंतर अनेक वर्षानंतर त्या मुलीचे नाव शरबत गुल असल्याचे समजले.  
                                                                                                                                                
4)सीरियातील यादवीला कंटाळून सप्टेंबर 2015 मध्ये जीव मुठीत धरुन अब्दुल्ला कुर्दी याचे कुटुंब कॅनडाला जाण्यासाठी साध्या बोटीतून निघाले होते. मात्र हा एजियन समुद्रातच बोट उलटून त्याचा आयलान या मुलाचा मृत्यू झाला. अगदी तीन वर्षाच्या आयलान कुर्दी या मुलाचा लाल टी शर्ट व निळ्या चड्डी घातलेला मृतदेह वाहून किनाऱ्याला आला. निलोफर डेमीर यांनी काढलेले आयलानचे छायाचित्र  जगभरात अनेकांचे काळीज पिळवटणारे ठरले. या अपघातात अब्दुल्ला यांनी आयलानसह, गालेब या चार वर्षांच्या मुलासह पत्नीला गमावले आहे.
Sunday, February 23, 2020

व्हाटस ऍपचे तरुणाईवर गारुड

संदेशाची देवाण - घेवाण करण्यासाठी जगभरात आणि विशेषतः भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या व्हाटस ऍपचा प्रारंभ झाला त्या घटनेला दिनांक 24 फेब्रुवारी 2020 रोजी अकरा वर्षे पूर्ण होत आहेत. या अकरा वर्षाच्या वाटचालीमध्ये भारतीय तरुण पिढीवर गारुड घालण्याचे काम केले आहे व्हाटस ऍप ने जगभरात लोकप्रियता मिळविली त्याचबरोबर त्याला टीकेचे धनी देखील व्हावे लागले आहे. व्हाटस ऍपचा च्या या वाटचालीचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न येथे केला आहे
व्हाटस ऍपचा हे फेसबुक, व्टिटर सारखे समाज माध्यम Social Media) नाही. व्हाटस ऍप हे संदेशाची देवाण - घेवाण करणारे (Instant Messaging App) ॲप आहे. मात्र त्याला अनेकजण समज माध्यम असेच मानतात. गमती गमती मध्ये व्हाटस ऍप ची निर्मिती झाली,  त्याची कथा मोठी रंजक आहे. जॉन कॉम हा युक्रेनमधील एक तरुण गरिबीने गांजलेला होता, तो एका दुकानांमध्ये  काम करायचा. नंतर त्यांने अमेरिकेमध्ये जाऊन याहू या कंपनीमध्ये काळ काम केले. तेथे अमेरिकेतील ब्रायन अॅक्टन यांच्यासमवेत त्याची मैत्री झाली. त्या काळात जॉन कॉमने एक आयफोन विकत घेतला होता. जॉन कॉम  प्रत्येक आठवडयात आपल्या मित्रमंडळींना गप्पा-टप्पा, भोजनासाठी निमंत्रित करायचा. त्यावेळी त्याला सहज संदेश पाठवता येणारे एखादे ऑप असावे अशी गरज वाटू लागली. त्यावेळी जॉन कॉम, ब्रायन ऍक्टन आणि काही सहका-यांनी व्हाटस ऍपचा चा शोध लावलाइंग्रजीत बोलताना एकमेकांना काय चालले आहे हे विचारण्यासाठी ‘What’s up’ असे विचारले जाते. त्यारुनच या ऍपला त्यांनी व्हाटस ऍप नाव दिले.  पाहता पाहता व्हाटस ऍप जगभरात लोकप्रिय झाले, 2013 पर्यंत त्याचा वापर करणाऱ्या लोकांची संख्या वीस कोटी पेक्षा अधिक वाढली. त्यावेळेला जगभरातील अनेक मोठया कंपन्यांचे लक्ष त्याकडे वेधले गेले आणि त्यांनी व्हाटस ऍप खरेदी करण्याचा प्रयत्न केला.  मार्क झुकरबर्ग यांच्या फेसबुकने कंपनीने 14 फेब्रुवारी 2014 रोजी 1182 मिलियन डॉलर एवढी मोठी किंमत देऊन  व्हाटस ऍप विकत घेतले. व्हाटस ऍपला फेसबुक मध्ये विलीन न करता त्याचे स्वतंत्र अस्तित्व त्यांनी कायम ठेवले. आज घडीला जगभरात 180 देशांमध्ये व्हाटस ऍपचे दीड अब्ज पेक्षा अधिक वापरकर्ते आहेत. 50 कोटी लोक दररोज व्हाटस ऍप स्टेटस चा वापर करतात, तर सहा कोटी 50 लाख लोक व्हाटस ऍपचा व्दारे संदेश पाठवतातव्हाटस ऍपचा व्दारे 53 भाषांमध्ये संदेशाची देवाणघेवाण होऊ शकते. दररोज व्हाटस ऍपचा वापर करुन सरासरी 4300 कोटी संदेश एकमेकांना पाठविले जातात. एकटया भारतात 40 कोटींपेक्षा अधिक लोक व्हाटस ऍपचा वापर करतात, ही संख्या जगातील कोणत्याही देशातील सर्वाधिक आहे. भारतीय तरुणाईवर तर व्हाटस ऍपने अक्षरशः गारुड घातले आहे. भारतातील तरुण पिढी पिढीने आपापल्या भाषेत व्हाटस ऍप द्वारे संदेशाची देवाणघेवाण करण्याची एक नवी परिभाषा निर्माण केली आहे.
जगभरातील दीड अब्ज लोकांची पसंती असलेल्या व्हाटस ऍपचा कारभार हा फार अवाढव्य असेल व त्यासाठी फार मोठी यंत्रणा लागत असेल असे आपल्याला वाटू शकते. मात्र केवळ 50 अभियंते आणि 55 कर्मचारी व्हाटस ऍपने या कामासाठी नेमलेले आहेत.
व्हाटस ऍपच्या लोकप्रियतेच्या कारणांचा शोध घेतला असता जाणवते की,  संदेशाची देवाण-घेवाण ही सहज व मोफत होते, ती जगभरात व क्षणार्धात होते. व्हाटस ऍपचा वापर परस्पर संवादासाठी, संदेश, छायाचित्रे, ध्वनिफीत, व्हिडिओ पाठवण्यासाठी करता येतो. व्हाटस ऍप वर कोणत्याही प्रकारच्या जाहिराती नसतात. लोकप्रियता मिळविण्यासाठी व्हाटस ऍप ने स्थापनेपासून कधीही एक रुपयाची देखील जाहिरात केली नाही अथवा जनसंपर्क साधण्याचा देखील प्रयत्न केलेला नाही. व्हाटस ऍप ने आपल्या वाटचालीमध्ये वापरकर्त्यांना अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे. ऑडिओ-व्हिडिओ पाठविणे,  संदेश जर चुकलेला असेल तर तो डिलीट करणे, व्हाटस ऍपचा बिजनेस, अगदी अलीकडच्या काळामध्ये भारतात व्हाटस ऍपचा वापर पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी देखील करता येईल अशी सुविधा निर्माण करण्यात आलेली आहे.
भारतीय समाजातील विविध समाजघटकांसाठी व्हाटस ऍपचे अनेक फायदे दिसून आलेले आहेत. शेतकऱ्यांना हवामानाचीबाजार भावाची, नवीन उपकरणांची माहिती उपलब्ध होते. उदयोजकांना शेअरबजार, नवे नियम यांची माहिती मिळते. सेवाभावी संस्था ग्रामस्थांना व्हाटस ऍप द्वारे संदेश पाठवून विधायक कार्यामध्ये सहभागी करून घेतात, काही रुग्णांना परदेशातून डॉक्टरांचा सल्ला मिळतो, पुराच्या परिस्थितीत अथवा दुष्काळाच्या परिस्थितीत अनेक नागरिक पुढे येऊन मदत करतात अशी अनेक उदाहरणे आहेत.
कोणतेही तंत्रज्ञान मुळामध्ये वाईट नसते त्यामुळे व्हाटस ऍप हे वाईट आहे असे म्हणता येणार नाही. मात्र वापर करणाऱ्यांना जर ते वाईट उद्देशाने वापरले तर त्याचे दुष्परिणाम सर्वांना भोगावे लागतात. इस्त्राईल  मधील एन.एस.ओ. गटाने हल्ला करून जगातील चौदाशे मानवाधिकार कार्यकर्ते, पत्रकार, नागरिक यांची माहिती चोरली होती अशी गंभीर घटना 2019 मध्ये घडलेली आहे. व्हाटस ऍपच्या माध्यमातून भारतात खोटया बातम्या पसरवण्याचे अनेक प्रकार मागील काही वर्षांत झाले आहेत. अशा खोटया संदेशामुळे जमावाकडून लोकांना जीवे मारण्यात आल्याच्या घटनाही घडल्या आहेत. अशाच एका घटनेमध्ये सोलापूरच्या मंगळवेढा परिसरातील पाच नागरिकांना धुळे जिल्ह्यातील साक्री येथे जमावाने ठार केले. भारतातही इतर ठिकाणीही अशा घटना घडलेल्या आहेत. एखादया व्यक्तीला बदनाम करण्यासाठी देखील व्हाटस ऍपचा वापर होतो. अलीकडच्या काळामध्ये सोलापूर- पुणे रस्त्यावर असलेल्या कुरकुंभ एमआयडीसी मध्ये मोठी आग लागलेली आहे अशी खोटी बातमी व्हाटस ऍप द्वारे फिरत होती, त्यामध्ये तसा व्हिडिओदेखील जोडलेला होता. अशा अनेक गोष्टी सातत्याने घडत आहेत.
व्हाटस ऍप ने देखील आपल्या परीने आपल्या सेवेमध्ये सुधारणा करण्याचे काही प्रयत्न केले आहेत, मात्र ते तोकडे आहेत. व्हाटस ऍप भारतीय तरुण पिढीवर एक गारुड निर्माण केले असले तरी या गारुडाच्या संमोहनात  किती काळ अडकून राहायचे याचा विचार तरुण पिढीने करण्याची गरज निर्माण झाली आहे. व्हाटस ऍप वरून दिली जाणारी माहिती किती उथळ स्वरुपाची असते याची अनेक उदाहरणे आहेत. व्हाटस ऍप व्दारे आलेल्या कोणत्याही माहितीवर अगदी पूर्ण विश्वास ठेवता येईल असे चित्र सध्या तरी नाही. तशी विश्वासार्हता निर्माण करण्या तसेच खोटया बातम्या आणि संदेश पसरविण्याच्या प्रकाराला आळा घालण्यात व्हाटस ऍपची यंत्रणा कितपत यशस्वी ठरते यावर व्हाटस ऍपचे भवितव्य अवलंबून आहे.

कोण होतास तू काय झालास तू ?

खींचो न कमान को न तलवार निकालो जब तोप मुक़ाबिल हो तो अख़बार निकालो भारतावर इंग्रजांची राजवट होती त्या काळात अकबर इलाहाबादी यांनी लिहिलेला हा...