‘In a shrinking world with information
literally at our fingertips, the media needs to play a vital role as a trusted
gatekeeper’
आजच्या या धकाधकीच्या काळात माध्यमांची भूमिका महत्वाची आहे असे सांगून, माध्यमांनी
जनतेचे रक्षक म्हणून कामगिरी केली पाहिजे हे आग्रहपूर्वक सांगणारा एक भला माणूस
मागच्या आठवडयात काळाच्या पडदयाआड गेला.
पत्रकार दिनाच्या
निमित्ताने या माणसाचे मोठेपण आठवणे आणि त्यांचा संदेश मनात जागा ठेवणे गरजेचे
आहे.
स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात भारतात ज्या प्रकारच्या पत्रकारितेची गरज होती ती ओळखून ज्या पत्रकारांनी लेखन केले त्यात सर्वप्रथम नाव घ्यावे लागेल ते पत्रकार बी.जी.वर्गीस यांचे.
निवृत्ती हा शब्दच ज्याच्या शब्दकोशात नव्हता त्या या अवलिया पत्रकाराची लेखणी
अखेरच्या श्वासापर्यंत 30 डिसेंबर 2014 पर्यंत जनतेच्या प्रबोधनासाठी आणि
विकासासाठी कार्यरत होती. वयाची 88 गाठली तरी या पत्रकाराच्या लेखनाची धार कायम
होती.
बी.जी. वर्गीस यांचे पूर्ण नाब बूबली जॉर्ज वर्गीस . ते मूळचे केरळचे पण त्यांचे बालपण परदेशात व्यतीत झाले शालेय शिक्षणासाठी ते जेव्हा डेहराडूनच्या डून स्कूलमध्ये दाखल झाले , तेव्हापासूनच त्यांच्यातील पत्रकारितेची झलक दिसू लागली. डून स्कूल
वीकली चे ते संपादक होते.केम्ब्रिज विदयापीठातून अर्थशास्त्राचे सिक्षण घेतल्यावर
त्यांनी टाईम्स ऑफ इंडियाचे पत्रकार म्ह्णून कार्यास सुरुवात केली. 1966 ते 1969
या काळात ते पंतप्रधान इंदिरा गांधींचे माहिती सल्लागार होते. 1969 ते 75 या काळात
ते हिदुस्तान टाईम्सचे संपादक होते.विकास विषयक प्रश्नांबाबत अभ्यासपूर्वक लेखन ,
मानवी हक्कांचा लढा, पर्यावरण संवर्धन, भारत- पाकिस्तान संबंध , आंतरराष्ट्रीय
संबंध हे त्यांचे आवडीचे विषय होते. त्यांच्या पत्रकारितेतील कार्याबद्द्ल ,1975
साली रेमन मॅगेसेसे पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले. यावरुन त्यांच्या
पत्रकारितेतील योगदानाचे मोल लक्षात येऊ शकेल.
हिंदुस्तान
टाईम्समध्ये असताना 1969 साली त्यांनी पत्रकारितेतील एक नवा प्रयोग केला.
हरियानातील चटेरा एक छोटे गाव दत्तक घेऊन तेथील प्रश्नाबाबत वृत्तपत्रात
सातत्यपूर्ण लेखन सुरु केले . या गावात पत्रकारांचे पथक पाठवून या लेखाचा ओघ वाहता
ठेवला, त्यातून प्रशासनाला जागे केले. विकासाच्या प्रक्रीयेत माध्यमे योगदान देऊ
शकतात, विकसनशील देशातील माध्यमांनी सामान्य माणसाशी नाळ जोडून , शहरांकडेच लक्ष
केंद्रित न करता , ग्रामीण भागात जाऊन जनतेचे खरे प्रश्न मांडायला हवेत हा संदेश
दिला. त्यांनी आधी केले आणि मग सांगितले. विकास पत्रकारिता हा शब्दही भारतात रुजला
नव्ह्ता , त्या काळात विकास पत्रकारितेचे प्रयोग करणारा हा पत्रकार होता.
विकास
पत्रकारितेबद्दल त्यांचे म्ह्णणे होते की, ‘ सरकारी योजना सांगणे, आणि त्याचे ढोल
वाजविणे ही विकास पत्रकारिता नाही. तर जनतेचे खरे प्रश्न मांडून त्याबाबत सरकार
काय करीत आहे व सरकारने काय करायला हवे हे सांगणे म्ह्णजे विकास पत्रकारिता.’
1977
मध्ये वर्गीस यांनी केरळमधून लोकसभेची निवडणूक लढविली . जवळ फारसे पैसे नव्ह्तेच,
लोकवर्गणीतून निवडणूक लढविली. ते पराभूत झाले , पण त्यांचे मोठेपण यात होते की,
लोकवर्गणीतील उरलेली रक्कम त्यांनी समप्रमाणात ज्याची त्याला परत केली.
आणीबाणीच्या
विरोधात लेखन केल्यामुळे , त्यांना हिंदुस्तान टाईम्स संपादक पदावरुन दूर करण्यात
आले. मात्र त्यांची लेखणी कधी कोणाची बटिक झाली नाही. 1982 ते 86 या काळात ते
इंडियन एक्सप्रेसचे संपादक होते. त्यांनी हिमालयातील पर्यावरणाचे प्रश्न मांडणारे
‘वॉटर्स आफ होप’ , पाणी प्रश्न , पत्रकारिता या विषयावर मह्त्वपूर्ण ग्रंथ लिहिले.
फर्स्ट ड्रफ्टः मेकिंग ऑफ मॉडर्न इंडिया हा त्यांचा ग्रंथही लक्षवेधी ठरला.
त्यांना अनेक पुरस्कारही लाभले. त्यात आसामचा शंकरदेव पुरस्कार,मानवी हक्काच्या
लढ्यासाठीचा उपेंद्रनाथ ब्रम्हा पुरस्कार यासह अनेक पुरस्कार लाभले.
पाण्यासाठी,
विकासासाठी सर्व देशांनी एकत्र काम करावी यासाठी त्यांची लेखणी झिजत राहिली.
जेव्हा मलाला आणि कैलाश सत्यार्थी यांना नोबेल पुरस्कार जाहीर झाला तेव्हा त्यांनी
लिहिले ‘’ भारत आणि पाकिस्तान आपसात वैराच्या भूमिकेतून वागत आहेत.अशा काळात
पाकिस्तानातील एका मुस्लिम व्यक्तीला आणि भारतातील एका हिंदू व्यक्तीला शांततेचा
नोबेल पुरस्कार लाभतो आहे. यातील संदेश हाच आहे की, बालकांच्या भल्यासाठी, पुढच्या
पिढ्यांच्या भविष्यासाठी दोन्ही देशात शांतता नांदणे आवश्यक आहे.वर्गीस यांच्या लेखणीतील माणूसपण यातून जाणवते.
वर्गीस निर्भिडपणे मते मांडणारे पत्रकार होते सध्या सर्वत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक होत आहे, अशा काळात वर्गीस मात्र मोदींच्या अमेरिका दौ-यात झालेल्या प्रकाराबाबत कडाडून टीका केली.
वर्गीस निर्भिडपणे मते मांडणारे पत्रकार होते सध्या सर्वत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक होत आहे, अशा काळात वर्गीस मात्र मोदींच्या अमेरिका दौ-यात झालेल्या प्रकाराबाबत कडाडून टीका केली.
नव्या
काळातील पत्रकारांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन 2001 साली ‘ द
हूट’ नावाचे वेबपोर्टल सुरु केले. पत्रकारितेतील मूल्ये कोणती आहेत, ती कशी जपावित
याचे धडे यातून पत्रकारांना दिले जातात मूल्याधिष्ठित पत्रकारितेसाठी आयुष्य
वेचणारा हा आगळावेगळा पत्रकार कायम स्मरणात राहील.
( पूर्व प्रसिध्दी दैनिक सकाळ दिनांक ५ जानेवारी २०१५ )