Saturday, October 27, 2012

कठपुतळयांचा नवा खेळ


एखादया गरुडाच्या पायाला साखळदंड बांधायचा आणि म्ह्णायचे ‘‘काय हा गरुड? आकाशात भरारीच घेत नाही.’’ अशीच अवस्था आकाशवाणी आणि दूरदर्शन या दोन संस्थांची झाली आहे.या दोन्ही संस्थाचा कारभार हाती असलेली प्रसार भारती ही संस्था अशीचच विविध साखळदंडांनी जखडली गेली आहे.
आकाशवाणी आणि दूरदर्शन या दोन्ही संस्था पूर्वी भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारित काम करीत होत्या. या दोन संस्थांनी प्रारंभापासून सरकारच्या हातच्या कठपुतळया बनून काम केले. 1975 ते 1977 या आणीबाणीच्या कालखंडात तर कहर झाला होता.त्यामुळे या दोन्ही संस्थांना  स्वायत्तता देऊन स्वतंत्रपणे काम करु दयावे अशी मागणी पुढे आली.इंग्लंडमधील बीबीसीप्रमाणे स्वायत्त संस्था स्थापन करावी असा उद्देश होता. त्यानंतरच्या काळात अनेक सरकारे बदलली, पण या कठपुतळयांमध्ये प्राण ओतण्याची कोणाचीच इच्छा नव्ह्ती. त्यामुळे तब्बल वीस वर्षांनी म्ह्णजे 1997 साली प्रसार भारती नावाने नवी संस्था स्थापन करुन आकाशवाणी व दूरदर्शनची सूत्रे सोपविण्यात आली.फरक काहीच पडला नाही , फक्त नावापुरतीच स्वायत्त असलेली प्रसार भारती ही नवी कठपुतळी अस्तित्वात आली.
प्रसार भारतीची स्थापना झाली होती तेव्हा आस निर्माण झाली होती की काहीतरी चांगले घडेल, पण ती आस फोल ठरली. साध्या एखादया कार्यालयात कारकुनाचे पद निर्माण केले तरी ते पूर्णवेळ निर्माण केले जाते .पण प्रसारभारतीचे अध्यक्षपद अर्धवेळाचे ठेवण्यात आले, यावरुनच एकंदर प्रकाराची कल्पना येऊ शकेल. दूरदर्शन तसेच आकाशवाणीच्या संचालकांना प्रसार भारतीच्या स्थापनेपूर्वी वीस कोटी रुपयापर्यंत एकावेळी खर्च करण्याचा अधिकार होता, पण प्रसार भारती स्थापन झाल्यावर या संचालकांचे आर्थिक अधिकार एक कोटी रुपये एवढेच झाले.प्रसार भारती मंडळाला प्रत्येकवेळी आशाळभूतपणे सरकारकडे पाहावे लागते. सर्व आर्थिक अधिकार सरकारच्या हाती आहेत. प्रसार भारतीला र्थिक स्वायत्तता देण्याची केवळ आश्वासने दिली जातात, पण ते आश्वासन पाळले जात नाही.सध्या पत्रकार मृणाल पांडे प्रसार भारतीचे अध्यक्षपद भूषवित आहेत. त्यांच्या विव्दतेचा पूरेपूर होण्यासाठी अध्यक्षांना पुरेसे अधिकार दिले जाणे गरजेचे आहे
सरकारने नोकरभरतीस मंजुरी न दिल्याने आकाशवाणी व दूरदर्शनमध्ये प्रसार भारतीच्या स्थापनेनंतरच्या मागील पंधरा वर्षाच्या कालखंडात एकदाही नोकरभरती झालेली नाही.त्यामुळे ठिकठिकाणची आकाशवाणी, दूरदर्शनची कार्यालये मनुष्यबळाविना मरगळलेली आहेत.करार किंवा रोजंदारीवर काही माणसे नेमून हा गाडा हाकण्याचा प्रयत्न मागील पंधरा वर्षे सुरु आहे.सरकारनेच जाहीर केलेल्या  अधिकृत आकडेवारीनुसार 2012 मध्ये देशभरात आकाशवाणीची 8,469 तर दूरदर्शनमध्ये 5,753 पदे रिक्त आहेत.इतकी पदे रिक्त असल्यावर या संस्था नीटपणे चालतील अशी अपेक्षा करणे म्ह्णजे निव्वळ कल्पनारंजन ठरेल.जी अवस्था नोकरभरतीची आहे, तशीच अवस्था यंत्रसामुग्रीचीही आहे.नवी यंत्रसामग्री खरेदी करण्यास सरकार परवानगीच देत नाही.आकाशा॓णीचा विस्तार रखडला आहे.दूरदर्शनचीही स्थिती जेमतेम आहे. प्रसारण क्षमता, कार्यक्रमाचा दर्जा याबाबतीत सातत्याने घसरण होत आहे.
या सार्‍या प्रकारात आकाशवाणी व दूरदर्शनची देशभरातील यंत्रणा खिळखिळी झाली आहे.असलेल्या मनुष्यबळावर कोणाचे नियंत्रण उरलेले नाही.या यंत्रणांसाठी दरवर्षी 2000 कोटी रुपये लागतात. त्यातील 1600 कोटी उत्पन्न मिळते. थोडक्यात प्रसार भारतीला दरवर्षी 400 कोटी रुपये तोटा होतो. आजवरचा हा तोटा साठत साठत 12हजार 71 कोटी झाला होता. तो सरकारने अशातच माफ केला आहे. तोटा भरुन काढण्यास पैसे मिळविण्याचे आदेश मिळाल्याने ,समाजहिताच्या उपक्रमांकडे डोळेझाक करुन आकाशवाणी , दूरदर्शन या यंत्रणा प्रायोजकांसाठी पायघडया घालून सुमार आणि निकृष्ट कार्यक्रम श्रोते व प्रेक्षकांच्या माथी मारत आहेत  .त्यामुळे खाजगी रेडिओ, टीव्हीच्या तुलनेत धावताना या यंत्रणाची दमछाक होत आहे.
आता तब्बल पंधरा वर्षानंतर सरकारला प्रसार भारतीची थोडी दया आली आहे. मागील आठवडयातच सरकारने 1150 पदे भरण्यास परवानगी दिली आहे.त्यामुळे पंधरा वर्षानंतर प्रथमच आकाशवाणी, दूरदर्शनमध्ये मोठी नोकभरती होणार आहे.वर्ग दोन व वर्ग तीनमधील ही पदे आहेत. त्यात सहायक केंद्र संचालक, अभियांत्रिकी सहायक , कार्यक्रम अधिकारी ,प्रसारण अधिकारी,तंत्रज्ञ, कॅमेरामन, निर्मिती सहायक तसेच प्रशासकीय पदांचा समावेश आहे.
आकाशवाणी आणि दूरदर्शनसाठी ही महत्वपूर्ण बाब आहे. पण खरी गरज आहे ती प्रसार भारतीला संपूर्ण स्वायत्तता देण्याची, त्यात सरकारची लुडबुड कुठेही असता कामा नये. नभोवाणी आणि चित्रवाणी ही अत्यंत शक्तीशाली माध्यमे आहेत पण, त्या शक्तीचा वापरच करु दिला नाही तर, आकाशवाणी आणि दूरदर्शनकडून निराशाच पदरी पडणार.या कठपुतळ्यांमध्ये प्राण फुंकण्याची वेळ आली आहे.
प्रसारभारतीभोवती जखडलेले साखळदंड आता जीर्ण झाले आहेत. ते कायमचे तोडले तर प्रसारभारती मुक्तपणे श्वास घ्यायला आणि गरुडभरारी घ्यायला शिकू शकेल. प्रसार भारतीची आर्थिक स्वायत्तता आणि नोकरभरतीच्या दिशेने पुढे पडलेले हे पाऊल  एक प्रकारचे सीमोल्लंघनच आहे.आता पुन्हा मागे फिरण्याची वेळ येऊ नये हीच अपेक्षा आहे.Saturday, October 13, 2012

जाहिरातींचा भूलभुलैया" जाहिरातींच्या अजब दुनियेत 
इंद्रधनुष्यी रंग असतात
रंगीबेरंगी फुले असतात
मोहविणारी स्वप्ने असतात 
ती कधी कधी 
मनाला भावतात, भुलवितात
फुलवितात, झुलवितात 
आणि फसवितात सुध्दा ''                                                                                            

                                                                                  
              जाहिरातीचे जग म्ह्णजे एक प्रकारचा भूलभुलैयाच असतो. जाहिराती लहानांना,तरुण-तरुणींना,प्रौढांना,महिलांना,वृध्दांना आपलेसे करतात. जिथे जाऊ तिथे जाहिराती आपला पाठलाग करीत असतात. कधी वृत्तपत्रातून. कधी रेडिओवरुन, कधी टीव्हीवरुन,कधी सिनेमातून, कधी मोबाईलमधून,कधी रस्त्यावरच्या होर्डींगमधून जाहिराती आपणाला खुणावत असतात.2012 या वर्षात जाहिरातक्षेत्राची भारतातील उलाढाल तीस हजार कोटींपेक्षा अधिक होईल असा अंदाज आहे. यावरुन हे क्षेत्र किती विस्तारत आहे ते लक्षात येऊ शकेल.

                 आजच्या काळात मीठापासून मोटारीपर्यंत विविध उत्पादनांची विक्री करणारे उदयोग आणि मोबाईल रिचार्जपासून सॉफ्टवेअर विक्रीपर्यंत विविध सेवा पुरविणार्‍या कंपन्या यांच्यामुळे जाहिरातींचे प्रमाण अतोनात वाढले आहे. लक्षावधी जाहिरातींच्या गोतावळयात आपल्या जाहिरातीकडे ग्राहकाचे लक्ष वेधण्यासाठी काही वेगळे करण्याचा प्रयत्न जाहिरातदार व जाहिरातीचे निर्माते करतात. यात अनेक जाहिराती सार्‍या मर्यादा ओलांडून फसवेगिरी, बनवेगिरी आणि चहाटाळपणा करु लागल्या आहेत.आठ दिवसात खात्रीने दहा किलोने वजन कमी करण्याचा दावा करणार्‍या जाहिराती, डिओड्रंट,सौंदर्य प्रसाधने,अंतर्वस्त्रे, गर्भनिरोधकांच्या जाहिराती तर सर्रास आचारसंहिता पायदळी तुडवतात. अशा जाहिराती महिलांच्या देहाचा अनावश्यक व उत्तेजना निर्माण करण्यासाठी वापर करतात, खोटे दावे करतात , अश्लील व असभ्य शब्दांचा अवलंब करतात, नीतीनियमांचे उल्लंघन करतात. जाहिरातीतील शब्दांचे व दृश्यांचे अनुकरण  लहान मुले लगेच करतात, हे अनेकदा दिसून आले आहे. असे अनुकरण करताना काही बालकांचा जीवही गेला आहे. मुख्य म्ह्णजे लहान मुले जाहिराती तोंडपाठ करतात , त्यातील अश्लील, असभ्य शब्दांचा नकळत वापर करु लागतात , यातून होणारे नुकसान कल्पनेच्या पलिकडचे आहे.

                    एखादा सिनेमा प्रदर्शित करण्यापूर्वी त्याची सेन्सॉरकडून तपासणी करुन घ्यावी लागते,पण  तशी अट जाहिरातींना नाही .त्यामुळे जाहिराती प्रदर्शित झाल्यानंतरच त्यातील हे प्रकार लक्षात येतात.  अशा जाहिरातींवर कोणी व कशी कारवाई करायची ते निश्चित नसल्याने जाहिरातदारांचे फावते. ग्राहक संघटित नसल्याने अशा जाहिरातींबाबत लगेच ओरड होत नाही, एखादया जागरुक नागरिकाने तक्रार केल्यावर , त्याची दखल्‍ घेतली जाईपर्यंत जाहिरातदाराचा देशभर जाहिरात दाखविण्याचा उद्देश सफल झालेला असतो, त्यानंतर जाहिरात मागे घ्यावी लागली तरी त्याचे काही नुकसान होत नाही. उलट बंदीच्या निमित्ताने आणखी प्रसिद्धी मिळते.अमूल मचो किंवा अशाच इतर जाहिराती नुसत्या आठवून बघा.

                       जाहिरातींवर नियंत्रण ठेवण्यासाठी ऍडवरटायजिंग स्टँडर्डस कौन्सिल ऑफ  इंडिया( ए.एस.सी.आय.) ही संस्था 1985 पासून कार्यरत आहे. ही संस्था सरकारी नाही तर जाहिरातदार व जाहिरात संस्थांनीच एकत्रित येऊन निर्माण केली आहे. ही यंत्रणा चांगले काम करते आहे . मात्र या संस्थेच्या कार्याला मर्यादा खूप आहेत. ए.एस.सी.आय.कडे जाहिरातींबाबत येणार्‍या तक्रारींची संख्या अलिकडच्या काळात लक्षणीयरित्या वाढली आहे. 2010 सालात ए.एस.सी.आय.कडे 159 जाहिरातींच्या विरोधात 200 तक्रारी दाखल झाल्या होत्या. 2011 मध्ये त्यात मोठी वाढ होऊन 190 जाहिरातींच्या विरोधात 777 तक्रारी दाखल झाल्या.जानेवारी ते सप्टेंबर 2012 दरम्यानही मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल झाल्या आहेत. ए.एस.सी.आय. ची कन्झुमर कम्प्लेंटस कौन्सिल या तक्रारींबाबत दोन्ही  बाजूंचे म्ह्णणे विचारत घेऊन निर्णय घेत असते. 21 सदस्यीय मंडळ यात निर्णय देत असते. याशिवाय फास्ट ट्रॅक कम्प्लेंटस कौन्सिल ही एका आठवडयात तक्रारीचा निपटारा  करणारी नवी यंत्रणा  ए.एस.सी.आय. ने निर्माण केली आहे. अनेक प्रकरणात ए.एस.सी.आय. ने जाहिरातदारांना जाहिराती मागे घेण्याचे आदेशही दिले आहेत. हे कौतुकास्पद असले तरी पुरेसे मात्र नाही.

                      ए.एस.सी.आय. ही जाहिरातदारांनीच निर्माण केलेली स्वनियंत्रण यंत्रणा आहे. त्यामुळे प्रत्येक जाहिरातदाराने ए.एस.सी.आय.चे सदस्यत्व स्वीकारायलाच हवे असे बंधन नाही. शिवाय ए.एस.सी.आय. ने दिलेला निर्णय पाळायलाच हवे हे बंधन जाहिरातदारांवर नाही. दंडात्मक कारवाईचे अधिकार ए.एस.सी.आय.ला नसल्याने ही यंत्रणा अनेकदा हतबल ठरते. ए.एस.सी.आय. च्या नाकावर टिच्चून आक्षेपार्ह जाहिराती प्रदर्शित होत राहतात. त्यामुळे वाढत असलेल्या तक्रारींची दखल घेऊन केंद्र सरकारने जाहिरातींवर नियंत्रण ठेवण्यासाठी समांतर यंत्रणा उभी करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. केंद्र सरकारचा ग्राहक संरक्षण विभाग तसेच अन्न व नागरी पुरवठा विभागाने अशी यंत्रणा उभारावी अशा सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे उदयोजक बिथरले आहेत. कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज ( सी.आय.आय.) या उदयोजकांच्या शिखर संस्थेने याबाबत 1 ऑक्टोबर 2012 रोजी श्वेतपत्रिका काढून,आवाहन केले हे की, सरकारने समांतर यंत्रणा उभी करण्याच्या फंदात पडू नये.सरकारने ए.एस.सी.आय.ला सहकार्य करावे व जे जाहिरातदार ए.एस.सी.आय. च्या निर्णयानंतरही जाहिरात मागे घेणार नाहीत केवळ अशा जाहिरातीवरील कारवाई सरकारी यंत्रणेकडे सोपवावी.


                    सरकार व उदयोजकांमधील हा वाद लवकर संपणार नाही. मात्र सर्वसामान्य नागरिकांना फसव्या जाहिरातींपासून वाचविणे अत्यंत तातडीचे व गरजेचे आहे. यासाठी सेन्सॉरसारखी कायमस्वरुपी यंत्रणा हवीच.  पण त्याआधी हे गरजेचे आहे की किमान दहा नागरिकांनी एखादया जाहिरातीबाबत आक्षेप घेतल्यास त्या जाहिरातीचे प्रदर्शन, प्रसारण स्थगित केले जावे. हे जोवर घडत नाही तोवर आपणाला जाहिरातींचा हा नंगानाच निमूटपणे सहन करावा लागणार.

Monday, September 24, 2012

छोटया पडदयावरचा सर्वात मोठा सूत्रसंचालक


तो आला, त्याने पाहिले आणि त्याने जिंकले ’ या शब्दात अमिताभ बच्चन यांच्या छोटया पडदयावरील  आगमनाचे वर्णन करता येईल. मोठा पडदा तर अमिताभ यांनी 1973 मध्ये जंजीर सिनेमापासून काबीज केला होता आणि तेव्हापासून तब्बल चाळीस वर्षे झाली तरी मोठ्या पडदयावरील अमिताभची जादू ओसरलेली नाही. सुपरस्टार हा शब्दही त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यात कमी पडू लागला, तेव्हा ‘ बिग बी ’ हे अनोखे नामाभिधान त्यांना लाभले.

 इ.स. 2000 साली बिग सिनर्जी या प्रॉडक्शन कंपनीतर्फे स्टार टीव्हीवर प्रथमच ‘कौन बनेगा करोडपती’ ( केबीसी) या गेम शो व्दारे अमिताभ यांचे छोटया पडदयावर आगमन झाले आणि छोटा पडदा मोठा झाल्यासारखे वाटू लागले. अमिताभ यांच्या सूत्रसंचालनाने टीव्हीवरील सूत्रसंचालनाला हिमालयाची उंची मिळवून दिली.खरे तर केबीसी काही फार वेगळा, असामान्य शो नाही. इंग्लंडमधील ‘ हू विल बिकेम अ मिलिनिअर ’ या गेम शो चे अनुकरण करुन हा कार्यक्रम सुरु झाला. पण या सर्वसामान्य कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना अमिताभ यांनी किमया केली. त्यामुळेच 7 सप्टेंबर 2012 पासून सुरु झालेल्या सहाव्या सीझनमध्येही केबीसीची लोकप्रियता अत्युच्च पातळीवर आहे. अमिताभ  सूत्रसंचालक नसते तर काही दिवस कसाबसा चालून हा गेम शो इतर गेम शो प्रमाणे वर्षभरातच बंद पडला असता. सूत्रसंचालक अमिताभ हीच या गेम शो ची खरी ताकद आहे. 2007 मध्ये सुपरस्टार शाहरुख यांना सूत्रसंचालक बनवून केबीसी चा चौथा सीझन पार पडला. पण त्यानंतर तीन वर्षे निर्माता शांत होता, यातच सारे आले. 2010 मध्ये पुन्हा अमिताभ यांना घेऊन स्टार ऐवजी सोनी टीव्हीवर केबीसीचा पाचवा सीझन सुरु झाला, तेव्हा पुन्हा या गेम शो ला पूर्वीची झळाळी प्राप्त झाली. 2012 मधील केबीसीच्या सहाव्या सीझनसाठी निर्मात्यांना अमिताभ यांच्या जागी दुसर्‍या सूत्रसंचालकाला घेण्याचा विचारही मनात आणता आला नाही.

सूत्रसंचालक म्हणून अमिताभ यांनी छोटया पडदयाला खूप काही दिले आहे.त्यांच्या भाषेची शुध्दता हे पहिले वैशिष्टय आहे.ते जेव्हा हिंदी बोलतात तेव्हा शुध्द हिंदी बोलतात , प्रसंगी काही इंग्रजी वाक्ये बोलतात तेव्हा शुध्द इंग्रजी बोलतात. ते कधीही भाषेची सरमिसळ करीत नाहीत. एक तपापूर्वी म्ह्णजे 2000 साली केबीसीची सुरुवात झाली तेव्हापासून  आर.डी. तेलंग अमिताभ यांच्यासाठी संवाद लिहितात, तेलंग केबीसीच्या प्रारंभीच्या काळातील आठवण सांगतात की ‘‘केबीसीची सुरुवात झाली त्या काळात, टेलिव्हीजनवरचा प्रत्येक सूत्रसंचालक हिंग्लिश भाषा वापरत असे,त्याच्या संवादाची सुरुवात  Hey guys’, Hi friends  अशी व्हायची. पण अमिताभ यांनी जाणीवपूर्वक शुध्द हिंदी भाषेचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आणि आता बारा वर्षानंतरही लोक त्यांबी शुध्द हिंदी ऐकायला आतुरलेले असतात. त्यांच्या संवादाची सुरुवात नमस्कार, आदाब, सत श्री अकाल या शब्दांनी होते.

 अमिताभ ज्या ताकदीने शब्दफेक करतात त्या ताकदीने इतर कोणालाही शब्दफेक करता आलेली नाही हे दुसरे वैशिष्टय. तेलंग याबाबत म्ह्णतात की ‘’अमिताभ यांच्यासाठी किरकोळ शब्द संवादात लिहिणे शक्यच नाही, त्यांच्यासाठी वजनदार शब्द योजावे लागतात.त्यामुळे हे संवाद लिहिणे आव्हानात्मक असते.अमिताभ यांच्या तोंडून  ‘ यूं गया और यूं आया ’ हे साधे वाक्य देखील ऐकताना मह्त्वाचे वाटायला लागते.’’

 सहभागी व्यक्तींशी अमिताभ ज्या अदबीने, आत्मीयतेने वागतात ते तिसरे वैशिष्टय. या गेम शो मध्ये हरुनही सहभागी स्पर्धकाला अभिमान वाटतो की,अमिताभ यांची भेट तर झाली. एकाने तर बोलूनही दाखविले ‘ आपसे मुलाकात यही सौ करोड के बराबर है. ’दुसरा स्पर्धक म्ह्णतो ‘आज मेरे भगवान से मेरी मुलाकात हो गई ’.यात बरीच अतिशयोक्ती असेलही पण भावना मात्र खरी आहे. अन्नू मलिक , फराह खान, सुनिधी चौहान,हिमेश रेशमिया त्यांचा सहभाग असलेल्या टेलिविजन शोमध्ये ज्या पध्दतीने स्पर्धकांचा अपमान करतात,त्यांची खिल्ली उडवतात, घाणेरडे शब्द वापरतात, सेटवर आपसात भांडणे करतात ते पाहिल्यावर तर अमिताभ यांचे वेगळेपण व मोठेपण अधिकच भावते. अमिताभ यांना त्यांच्या चाहत्यांनी तर देवत्वच बहाल केले आहे.केबीसीमध्ये ज्या स्पर्धकांना सहभागाची संधी मिळते ते स्वर्गप्राप्ती केल्याच्या आनंदात असतात. यातील अनेकजण अमिताभ यांना आनंदातिरेकाने मिठी मारतात. त्यावेळी त्या महिलेच्या पतीच्या, मुलीच्या पित्याच्या डोळ्यातही आनंदाश्रू तरळतात. आपली पत्नी,मुलगी एका सिनेमा नटाला मिठी मारते आहे अशी क्षुद्र भावना कोणाच्याही अगदी प्रेक्षकाच्याही मनाला स्पर्श करीत नाही, हे अमिताभ या व्यक्तीमत्वाविषयी प्रत्येकाच्या मनात असलेल्या आदराचे प्रतिबिंब आहे. सिनेमासारख्या बदनाम क्षेत्रात एवढी वर्षे राहूनही अमिताभ यांचे मोठेपण सातत्याने वाढतच गेले आहे.वयाची 69 वर्षे झाली तरी अमिताभ यांचा करिष्मा कायम आहे.केबीसीपेक्षा अमिताभ यांची उंची कितीतरी पट अधिक आहे, त्या उंचीनेच केबीसीला लोकप्रियता मिळवून दिली व टेलिव्हीजन शोमध्ये सतत सर्वाधिक टीआरपी मिळवून दिला आहे. अमिताभ यांच्याइतका कसदार , बहारदार, सभ्य, नम्र आणि तितकाच लोकपिय सूत्रसंचालक आजवर छोट्या पडदयाला लाभलेला नाही.म्ह्णून म्ह्णावेसे वाटते ‘ झाले बहू , होतील बहू, पण यासम हाच.’ छोटया पडदयावरच्या या सर्वात मोठया सूत्रसंचालकाला मानाचा मुजरा.

Sunday, September 16, 2012

झारीतील शुक्राचार्य


 


 एक आदमी रोटी बेलता है


 दुसरा आदमी रोटी खाता है
 एक तिसरा आदमी भी है
 वो ना तो रोटी बेलता है
 ना तो रोटी खाता है
 वो तो सिर्फ रोटीसे खेलता है
 मै पॅूंछता हूं यह तिसरा आदमी कौन है
 और मेरे देश की संसद मौन है

कवी धूमिल यांच्या कवितेच्या या ओळी मनाला अस्वस्थ करतात. तीस वर्षांपूर्वी त्यांनी लिहिलेली ही कविता आजच्या परिस्थितीतही तंतोतंत लागू पडते. राज्यात आणि केंद्रात एकामागून एक आर्थिक घोटाळे समोर येत आहेत, त्याचे आकडे पाहिले तर डोळे पांढरे होतात आणि तो तिसरा माणूस कोण आहे याचे उत्तर मिळते.                                      
 प्रत्येक सरकार  सांगते की  की सर्वसामान्यांचा विकास हाच आमचा ध्यास आहे, त्यासाठी कोटयवधी रुपयांची तरतूद केल्याच्याही घोषणा होतात. पण गरीब माणूस अधिक गरीब होत आहे, दारिद्रयरेषेखालील लोकांची संख्या कमी होण्याऐवजी वाढते आहे.मुळात दारिद्रयरेषा निश्चित करतानाही चालाखी केली जाते. विकास झाला म्ह्णजे नेमके काय याबाबतही सरकार जी आकडेवारी जाहीर केली जाते, त्याबाबत अभ्यासकांचे अनेक आक्षेप आहेत. एकंदर राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) वाढ्ला म्ह्णजे विकास झाला असे सरकार म्ह्णते. पण हा आता जगभरात विकासाचा खरा मापदंड मानला जात नाही, तर मानव विकास निर्देशांकाच्या आधारे विकास मोजला जातो. संयुक्त राष्ट्रसंघातर्फे यु.एन.डी.पी. दरवर्षी जगभरातील विविध देशातील मानव विकास निर्देशांकाची मोजणी करुन आकडेवारी घोषित करते. त्यानुसार 2012 या वर्षाची 187 देशातील आकडेवारी जाहीर झाली आहे, त्यात भारत 134 व्या स्थानी आहे.श्रीलंका , चीन हे देश भारतापेक्षा कितीतरी आघाडीवर आहेत. या आकडेवारीवरुन आपल्या तथाकथित विकासाचे वास्तव लक्षात येते. प्रामुख्याने त्या त्या देशातील आरोग्य, शिक्षणाच्या सुविधा आणि नागरिकांचा जीवनस्तर या तीन घटकांच्या आधारे हे मोजमाप केले जाते.

सरकार सर्वसामान्य माणसांसाठी ज्या विकासाच्या योजना अमलात आणते , त्यासाठीच्या आर्थिक तरतुदीतील प्रत्येक 100 पैशांपैकी प्रत्यक्षात केवळ 16 पैसे जनतेपर्यंत पोहोचतात असे विधान राजीव गांधी यांनी पंतप्रधानपदी असताना केले होते. त्या विधानाच्या अनुषंगाने विचार केला तर आजच्या काळात प्रत्येक 100 पैशांपैकी 06 पैसे तरी झारीतील शुक्राचार्य जनतेपर्यंत पोहोचू देतात की नाही अशी शंका येते, इतकी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.

लोकशाहीच्या चार खांबांपैकी लोकप्रतिनिधी आणि शासनयंत्रणा हे दोन खांब आधीच आतून पार पोखरले गेले आहेत. आता मदार न्यायव्यवस्था आणि प्रसारमाध्यमे या दोन खांबावरच आहे. लोकप्रतिनिधी आणि शासनयंत्रणेकडून न्यायपालिकेलाही बंधनात जखडून ठेवण्याच प्रयत्न होत आहे. त्यासाठी वारंवार घटनादुरुस्ती करुन नवनवीन कायदे केले जात आहेत. राडिया टेपच्या प्रकरणात कार्पोरेटस,लोकप्रतिनिधी आणि माध्यमांच्या काही प्रतिनिधींची अभद्र युती उघड झाली. तसेच पेड न्यूजच्या मदतीने प्रसार माध्यमांना बटीक करुन ठेवण्याचा प्रयत्न होत आहे.सामान्य माणसाच्या बाजूने आज किती पत्रकार आपली लेखणी चालवतात हा प्रश्नच आहे.

सर्वसामान्य् माणसाने आता कोणत्या आशेवर जगावे असा प्रश्न पडावा , इतकी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.पण या स्थितीतही आशेला जागा आहे. इंटरनेट पत्रकारिता , सोशल नेटवर्किंग यासारख्या नवमाध्यमांनी सारी बंधने झुगारुन सामान्य माणसाचा आवाज बुलंद करीत, भ्रष्टाचार्‍यांच्या मनात धडकी भरवायला सुरुवात केली आहे.सामान्य माणसालाही खरी बातमी आणि पेड न्यूज यातला फरक कळू लागला आहे.

जी पत्रकारिता सर्वसामान्य माणसाला खर्‍या विकासाची दिशा दाखविते आणि या विकासाच्या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी त्याला प्रेरणा देते, त्याला विकास पत्रकारिता असे म्ह्णता येईल .अशी विकास पत्रकारिता करणार्‍यांची संख्या सध्या कमी असली तरी आजच्या विशेषीकरणाच्या युगात ही संख्या वाढत जाणार आहे.चांगले कार्य करणार्‍या स्वयंसेवी संस्था, नागरिक आणि विकास पत्रकारितेचा वसा घेतलेले पत्रकार या तीन घटकांच्या समन्वयातून सजगपणे कार्य करणारे  दबावगट देशस्तरावर आणि स्थानिक स्तरावर निर्माण झाले तरच ही परिस्थिती सुधारु शकेल.

 

Saturday, September 1, 2012

पत्रकारितेने जग हादरविणारा माणूस


अमेरिकेचा खरा चेहरा उघड करणारा आणि या बलाढय महाशक्तीला हादरविणारा शोधपत्रकार ज्युलिअन असांज सध्या मोठया अडचणीत सापडला आहे. ज्युलिअन असांज हा मूळचा ऑस्ट्रेलिअन नागरिक . वयाच्या 35 व्या वर्षी म्हणजे इ.स. 2006 मध्ये त्याने काही सहकार्‍यांच्या मदतीने विकिलिक्स या ऑनलाईन वृत्तपत्राची सुरुवात करुन, इंटरनेटवरील शोधपत्रकारितेच्या क्षेत्रातील कारकीर्दीला सुरुवात केली.  अमेरिकेची अनेक गुप्त कागदपत्रे व संदेश उघड करुन ज्युलिअन असांज यांनी अमेरिकेची झोप उडवली. अमेरिकेची गुप्त खलबते कशी चालतात ते त्यांनी उघड केले. आंतरराष्ट्रीय राजकारणातील अमेरिकेचा दुष्ट चेहरा त्यान्मुळे सर्वांना दिसला. विशेषतः अमेरिकेने अफगानिस्तान आणि इराकमध्ये केलेल्या लष्करी हस्तक्षेपाच्या वेळी केलेल्या अतिरेकाची सविस्तर माहिती विकिलिक्सने उघड केली. त्यामुळे अमेरिकेचा शांतता रक्षणाचा आव आणणारा मुखवटा गळून पडला. अमेरिका जगातील इतर अनेक देशांना कशी कस्पटासमान वागणूक देते व आपल्या स्वार्थासाठी प्रसंगी निरपराध नागरिकांचेही बळी घेण्यास कचरत नाही हे यातून जगाला दिसले. ज्युलिअन असांज यांनी इतर अनेक देशांचीही अनेक गुपिते उघडकीस आणली त्यामुळे अनेक देशांच्या प्रमुखांना असांज यांचा आवाज कायमचा बंद करण्याची इच्छा आहे. अमेरिकेने तर असांज यांचा आवाज दडण्यासाठी जंग-जंग पछाडले, ज्या कंपन्यांच्या तांत्रिक मदतीने विकिलिक्सची वेबसाईट उपलब्ध करुन दिली जाते त्या कंपन्यांवर दडपण आणून त्या वेबसाईट बंद पाडण्याचे अनेक प्रयत्न झाले , पण प्रत्येकवेळी नव्या ठिकाणाहून बातम्यांचे प्रसारण सुरु ठेऊन असांज यांनी विकिलिक्सला जिवंत ठेवले. या सार्‍या प्रक्रियेत जगभरातून अनेक लोक विकिलिक्सला सहकार्य करण्यासाठी पुढे आले. विकिलिक्स ही वेबसाईट साम्राज्यवादयांचे, भ्रष्टाचार्‍यांचे बुरखे फाडून सत्य जगासमोर मांडणारी संस्था आहे हे जाणवल्याने विकिलिक्स आणि असांज यांना बातम्या पुरविणारे व या कार्यात पाठिंबा देणारे लोक असंख्य आहेत. इंटरनेटच्या सामथ्र्याचा पुरेपूर वापर करीत असांज व सहकार्‍यांनी वेगवेगळ्या देशातून विकिलिक्सचे प्रसारण सुरुच ठेवले.

अमेरिकेची लष्करी गुपिते विकिलिक्सला दिल्याच्या संशयावरुन अमेरिकेने ब्रॅडले मॅनिंग या सैनिकाला मे 2010 पासून तुरुंगात ठेवले आहे.दोन वर्षाहून अधिक काळ लोटला तरी त्याच्या चौकशीचे काम पूर्ण करण्यात आलेले नाही. त्याचा तुरुंगात अतोनात छळ केला जात आहे ,तो थांबवा व त्याच्यावरील आरोपाच्या सुनावणीच्या वेळी आमच्या प्रतिनिधीला उपस्थित राहू दया या  संयुक्त राष्ट्रसंघाच्या विनंतीलाही अमेरिकेने जुमानले नाही. अम्नेस्टी इंटरनॅशनलसह अनेक संस्था व व्यक्तींनीही याप्रकरणी अमेरिकेला विनंती केली पण, अमेरिकेने त्याकडे दुर्लक्ष केले.विकिलिक्सची बँकांमधील खाती ठप्प करण्यात आली आहेत .या पार्श्वभूमीवर असांज यांच्याबाबत जे घडते आहे त्याकडे पाहावे. कारण असांज यांच्याबाबतच्या घटना मे 2010 नंतर काही कालावधीतच घडल्या आहेत.

असांज यांच्या शोधपत्रकारितेचा गौरव अनेकांनी केला आहे. पण अमेरिका आणि त्यांच्या अंकित असणार्‍या देशातील सत्ताधार्‍यांच्या डोळ्यात ते सलत आहेत. असांज यांना कसे आणि कुठे अडकविता येईल याचा हे सारे शोध घेत होते. अखेरीस 2010 मध्ये असांज स्वीडनमध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने गेले असताना तेधे घडलेल्या एका घटनेमुळे असांज यांच्या विरोधात कारवाई करायला कारण मिळाले आहे. ऑगस्ट 2010 मध्ये दोन स्वीडनमधील दोन महिलांनी असांज यांच्याविरोधात पोलिसात तक्रार केली, त्यानुसार असांज यांनी यातील एका महिलेवर बलात्कार केल्याचा तर एका महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. पोलिसात तक्रार दाखल झाल्यावर एका अधिकार्‍याने या तक्रारीत फारसे तथ्य नाही असा निर्वाळा  देऊन असांज यांच्यावर कारवाईची गरज नसल्याचे सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी दुसर्‍या अधिकार्‍याने ही केस पुन्हा तपासासाठी हाती घेतली व असांज यांच्यावरचे आरोपपत्र ठेवावे असा निर्णय घेतला. दरम्यानच्या काळात असांज इंग्लंडमध्ये आले होते.त्यामुळे स्वीडनने असांज यांच्याविरुध्द आंतरराष्ट्रीय वॉरंट काढले. असांज यांना चोकशीसाठी आमच्या ताब्यात दयावे अशी मागणी स्वीडनने  इंग्लंडकडे केली.  असांज इंग्लंडमधील पोलिसांपुढे हजर झाले व त्यांनी तेथील न्यायालयात अपील केले. आपण निर्दोष असून मला या प्रकरणात गोवण्यात येत आहे, मला स्वीडनला नेल्यावर अमेरिकेच्या हवाली करण्यात येईल व  ठार मारले जाईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली. आपणास स्वीडनच्या हवाली करु नये , जी काही चौकशी करायची असेल ती स्वीडन पोलिसांनी इंग्लंडमध्ये येऊन करावी अशी विनंती असांज यांनी न्यायालयाकडे केली. मात्र प्रारंभी जिल्हा न्यायालयाने , नंतर उच्च तसेच सर्वोच्च न्यालयाने असांज यांची विनंती फेटाळत असांज यांना स्वीडन पोलिसांच्या हवाली करावे असा आदेश दिला. हा सारा घटनाक्रम लक्षात घेता असांज म्हणतात त्याप्रमाणे अमेरिकेच्या सांगण्यावरुन हे सारे घडत असावे ही शंका नाकारता येत नाही. कारण इंग्लंड, स्वीडन हे आंतरराष्ट्रीय राजकारणात अमेरिकाधार्जिने देश म्ह्णून ओळखले जातात.

सारे उपाय खुंटल्यावर असांज यांनी नवी युक्ती लढविली आणि 19 जून 2012 रोजी लंडन शहरात असलेल्या इक्वेडोर देशाच्या वकिलातीत आश्रय घेतला. मागील दोन महिन्यांपासून असांज या वकिलातीच्या एका खोलीत आहेत. वकिलातींबाबत आंतरराष्ट्रीय नियम असे आहेत की कोणत्याही देशाच्या पोलिसांना अथवा लष्कराला त्या वकिलातीत प्रवेश करता येत नाही. रशियाला हव्या असणार्‍या एका व्यक्तीने अमेरिकेच्या वकिलातीत तब्बल पंधरा वर्षे मुक्काम ठोकला होता व रशियाला काहीच करता आले नव्ह्ते .

इक्वेडोर हा लॅटिन अमेरिकन देश आहे. या देशाच्या अध्यक्षांनी असांज यांना राजकीय आश्रय देणार असल्याचे जाहीर करुन खळबळ उडवून दिली आहे.अमेरिका, इंग्लंडसह अनेक देशात असांज यांचे समर्थक असांज यांना इक्वेडोरमध्ये जाऊ दयावे अशी मागणी करीत निदशंने करीत आहेत. त्यामुळे इंग्लंडची तगमग होत आहे. आम्ही लंडनमधील इक्वेडोरच्या वकिलातीत घुसून असांज यांना अटक करु असे इंग्लंडने जाहीर केल्याने तणाव वाढला आहे. इक्वेडोरने इंग्लंडच्या या भूमिकेबद्दल आश्चर्य व्यक्त करुन आंतरराष्ट्रीय कायदयाचे उल्लंघन करु नका असा सल्ला इंग्लंडला दिला आहे. अनेक लॅटिन अमेरिकन देशांनी इक्वेडोरच्या यांच्या भूमिकेला पाठिंबा दिल्याने इंग्लंडलाही अशी कारवाई करता येणार नाही.

आपल्या पत्रकारितेने जग हादरविणारे असांज संकटात आहेत, पण ते हिंमत हरलेले नाहीत.19 ऑगस्ट 2012 रोजी लंडनमधील इक्वेडोरच्या वकिलातीच्या दरवाजामध्ये उभे राहून त्यांनी भाषण केले. त्यात ते म्ह्णाले व्यक्ती व माध्यम स्वातंत्र्यावर बंधने घालण्याचे प्रकार जगभर वाढत आहेत.मला पकडण्यास पोलिसांनी वकिलातीच्या इमारतीला वेढा घातला , पण अनेक नागरिक इमारतीबाहेर मला पाठिंबा देण्यास उभे असल्याने त्यांच्या माध्यमातून जगाला हे दिसले , त्यामुळे अजून तरी मला अटक झालेली नाही.

 असांज इक्वेडोरमध्ये पोहोचू शकतील का? की इंग्लंडचे पोलिस त्यांना अटक करुन स्वीडनच्या हवाली करतील हे लवकरच स्पष्ट होईल. पण वातावरण खूप तापले आहे हे नक्की. एका बाजूला उघडपणे इंग्लंड, स्वीडन , अमेरिका व ऑस्ट्रेलिया तर दुसर्‍या बाजूला इक्वेडोर व इतर लॅटीन अमेरिकन देश असा हा संघर्ष आहे.

आपल्या नीडर पत्रकारितेने जगाला हादरविणार्‍या असांज यांचे भवितव्य अधांतरी आहे . पुढे काय घडते ते पाहण्याची सार्‍या जगाला उत्सुकता आहे. असांज यांच्यासारख्या पत्रकाराचा यात बळी जाऊ नये असे प्रत्येक सुबुध्द नागरिकाला वाटणार हे मात्र नक्की.

Sunday, August 5, 2012

टीआरपी म्ह्णजे काय रे भाऊ?


मरण पावलेला माणूस कधी पुन्हा जिवंत होतो का?पासपोर्टशिवाय परदेशात जाता येते काय? अशा चक्रावून टाकणार्‍या प्रश्नांचे उत्तर एकच आहे होय.जर ती भारतीय टीव्हीवरची मालिका असेल तर हे सारे शक्य आहे. भारतीय जनतेला टीव्ही मालिकांनी वेड लावले आहे आणि टीव्ही कार्यक्रम निर्मात्यांना टीआरपीने वेड लावले आहे. या टीआरपीसाठी असे वाट्टेल ते केले जाते.एखादया मालिकेचा टीआरपी कमी होऊ लागला की त्यात अशा चक्रावून टाकणार्‍या घटना घुसडल्या जातात.शेअरबाजारात ज्याप्रमाणे शेअरचा दर घसरला की उदयोजकाचे कोटयवधीचे नुकसान होते तसेच टीआरपी कमी झाला की मालिकेच्या निर्मात्याचे , टीव्ही वाहिनीचे कोटयवधीचे नुकसान होते.  

एवढी किमया करणारा हा टीआरपी म्ह्णजे आहे तरी काय? असा प्रश्न आपणाला पडू शकेल. टीआरपी हे टीव्ही कार्यक्रमाची लोकप्रियता मोजण्याचे एकक आहे. टीआरपी मोजणारी एकमेव यंत्रणा भारतात आहे, ती म्ह्णजे टेलिव्हीजन ऑडियन्स मेजरमेंट ( टॅम ) ही संस्था. अमेरिकेतली प्रख्यात संस्था नील्सन आणि कंटार मिडिया या दोन संस्थांनी मिळून टॅमची स्थापना केली आहे. टीव्ही वाहिन्यांवरील मालिका, न्यूज चॅनल यांच्या लोकप्रियतेचे मोजमाप टॅम करते. थोडक्यात टीआरपी मोजण्याच्या क्षेत्रात टॅमची दादागिरी आहे. त्यामुळे टॅमने जाहीर केलेली आकडेवारी खरी मानने हाच पर्याय सर्वांना स्वीकारावा लागतो. टॅमच्या या दादागिरीला प्रथमच एनडीटीव्ही या न्यूज चॅनलकडून मोठे आव्हान दिले गेले आहे. टॅममार्फत जाहीर केल्या जाणार्‍या टीआरपीच्या आकेवारीत हेराफेरी केली जाते असा आक्षेप एनडीटीव्हीने घेतला आहे आणि यासंदर्भात थेट अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील सर्वोच्च्‍ा न्यायालयात दावा ठोकून नुकसानभरपाईची मागणी केली आहे. हा दावा तब्बल आठ हजार कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईसाठी केला गेला आहे. टॅमव्दारा टीआरपीच्या आकडेवारीत फेरफार केले जात असल्याचा पुरावा आमच्याकडे आहे असे एनडीटीव्हीचे म्ह्णणे आहे.

टॅमच्या आकडेवारीबाबत यापूर्वीही अनेकदा आक्षेप घेण्यात आले होते, पण टीआरपी मोजण्यासाठी आपल्याशिवाय दुसरा पर्यायच कोणाला उपलब्ध नसल्याची खात्री असल्याने टॅमने या आक्षेपांची दखल घेतली नाही.टॅमच्या कार्यपध्दतीबाबत प्रमुख आक्षेप आहे पीपलमीटरबाबतचा. भारतातील काही मोजक्या घरात टॅम पीपलमीटर हे यंत्र बसवते, ते यंत्र टीव्हीला जोडलेले असते, त्या घरातील टीव्हीवर कोणत्या वेळी , कोणते कार्यक्रम पाहिले गेले याची नोंद पीपलमीटर करते. हे पीपलमीटर कोणत्या शहरात, कोणत्या गावात, कोणाच्या घरात लावले जातातते टॅम कधीच उघड करीत नाही.एकशेवीस कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात फक्त दहा हजार घरात पीपलमीटर लावले जातात. तेही प्रामुख्याने मुंबई , दिल्ली, कोलकाता, चेन्नई , पुणे अशा महानगरात. पूर्ण सोलापूर जिल्हयात एकतरी पीपलमीटर असेल का ते खात्रीपूर्वक सांगता येणार नाही.

पीपलमीटरच्या आकडेवारीत हेराफेरी होण्यास अनेक टिकाणी वाव आहे.ज्यांच्या घरात पीपल मीटर लावले जाते त्यांना अमुकच चॅनल लावा असे सांगितले जाऊ शकते.ही आकगेवारी गोळा करुन टॅमच्या कार्यालयात नेली जाते , तेव्हाही त्यात फेरबदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुळात टॅमने टीआरपीची आकडेवारी जाहीर करायची आणि सर्वांनी ती मान्य करायची याशिवाय सध्यातरी दुसरा मार्ग नाही.या सार्‍या प्रक्रियेत पारदर्शकतेला वाव नाही.मग अशा स्थितीत टॅमवर आकडेवारीत फेरफार केल्याचे आरोप होणे साहजिकच आहे. चीनमध्ये 50 हजार पीपलमीटर बसवले जातात. भारतात मात्र दहा हजारापेक्षा कमी पीपलमीटर आहेत. पीपलमीटर बसविणे महाग पडते म्हणून टॅम त्यांची संख्या वाढविण्यास तयार नाही.दहा हजार पीपल मीटर्ची आकडेवारी एकशेवीस कोटी भारतीयांच्या मनाचा कौल देऊ शकते हे मान्य्‍ करणे कठीण आहे

कोणत्याही क्षेत्रात काम करणारी एकच संस्था असली की एकाधिकारशाही बळावते.यासाठी टीआरपीचे मोजमाप करणारी आणखी एखादी संस्था असायला हवी. भारत सरकारचेही  माध्यम धोरण निश्चित नसल्याने अशा प्रकरणी काय करावे त्याबाबत सरकार गोंधळलेले आहे. आम्ही चौकशी करु असे आता सरकारने जाहीर केले आहे.

टॅमच्या विरोधात न्यायालयीन लढाई लढण्यासाठी एनडीटीव्हीने दाखविलेले धैर्य कौतुकास्पद आहे. या घटनेचा फार मोठा परिणाम टीआरपी मोजण्याच्या पध्दतीवर होईल व त्यातून पारदर्शकतेकडे वाटचाल सुरु होईल अशी अपेक्षा आहे

Saturday, July 21, 2012

दुर्योधन, दुःशासन आणि शकुनीमामामानवतेला काळीमा फासणारी एक घटना आसामची राजधानी गोहाती येथे अशातच घडली आणि संपूर्ण देशभर त्याबाबत संतापाची प्रतिक्रिया उमटली. आधुनिक दुर्योधन, दुःशासन आणि शकुनीमामा यांच्यमुळे घडलेल्या घटनेमुळे आजचे पत्रकार व आजची पत्रकारिता याबाबत नव्याने चर्चेला प्रारंभ झाला आहे.
ही घटना आहे 9 जुलै 2012 रोजी रात्री नऊच्या सुमारासची.गोहातीच्या गजबजलेल्या रस्त्यावरील एका पबमध्ये एक 17 वर्षाची मुलगी आपल्या मित्राच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गेली होती.चार मुली व दोन मुले असे एकंदर सहाजण एकत्र जमले होते.त्यांच्यात काही कारणावरुन भांडण झाले आणि पबच्या व्यवस्थापनाने त्यांना पबबाहेर काढले. हे सारे घडत असताना एक व्यक्ती मोबाईलव्दारे शूटींग करु लागला, त्याला या तरुणीने आक्षेप घेतला असता त्या व्यक्तीने आपण पत्रकार असल्याचे सांगितले. त्यानंतर जे घडले ते अतर्क्य आणि माणुसकीला काळीमा फासणारे होते. त्या पत्रकाराने काही लोकांना बोलावून त्या मुलीला येथून हलू देऊ नका असे सांगितले आणि आपल्या टेलिव्हिजन चॅनलला फोन करुन मोठा टीव्ही कॅमेरा मागवला. जवळपास वीस जणांच्या जमावाने त्या मुलीला घेरले आणि या आधुनिक दुर्योधन, दुःशासनांचा हैदोस सुरु झाला.त्या मुलीची धिंड , छेड काढण्यात आली आणि भररस्त्यावर तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न झाला. गौरव ज्योती निऑग नावाचा तो पत्रकार हे सारे चित्रित करण्यात मग्न होता. ती मुलगी असहाय्यपणे जीव तोडून ओरडत होती , मदतीसाठी टाहो फोडत होती पण बेफाम जमावाच्या भीतीने तिचे सहकारी पळून गेले आणि हे सर्व पाहणार्‍या नागरिकांपैकीही कोणी त्या मुलीच्या मदतीला जाण्याचे धैर्य दाखविले नाही.अखेर मुकुल कालिता नावाच्या जेष्ठ पत्रकाराने हा प्रकार पाहिला ,तेव्हा त्यांनी पोलिसांना बोलावून त्या मुलीची सुटका केली. हा सारा जमाव एका असहाय्य मुलीशी इतक्या अमानुष व अनैतिकपणे कसा वागला? चॅनलसाठी चित्रीकरण होत आहे हे ठाऊक असूनही त्यांना लाजलज्जा वाटलीच नाही, उलट त्यांचा उन्माद आणखी वाढला. सारा जमावही एका असहाय्य मुलीशी इतक्या अमानुष व अनैतिकपणे कसा वागला, चित्रीकरण होत हे हे ठाऊक असूनही त्यांना लाजलज्जा वाटलीच नाही उलट त्यांचा उन्माद आणखी वाढला.
हा सारा घटनाक्रम चक्रावून टाकणारा आहे. गौरव नावाचा हा पत्रकार न्यूज लाईव नावाच्या ज्या चॅनलसाठी काम करतो त्याची मालकी आसामचे आरोग्य व शिक्षणमंत्री हिंमत विश्वसर्मा यांच्या पत्नी रिंकी भुयन यांच्याकडे आहे.गौरवने केलेले चित्रीकरण न्यूज लाईव चॅनलवर दाखविण्यात आले. याप्रकरणी सर्वत्र संताप व्यक्त  झाल्यावर हे प्रकरण दडपण्याचे प्रयत्न झाले. गौरव हा पत्रकार आहे , जे घडेल ते दाखविणे हे त्याचे पत्रकारितेचे आदय कर्तव्य होते, त्याने काही चुकीचे केले नाही असे सांगून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला. पण यासंदर्भात संपूर्ण देशभरात निर्माण झालेल्या संतापाची दखल आसामचे मुख्यमंत्री, भारताचे पंतप्रधान यांच्यासह राष्ट्रीय महिला आयोगालाही घ्यावी लागली, त्यानंतर चौकशीची सूत्रे फिरु लागली.आता राष्ट्रीय महिला आयोगाची चौकशी, नॅशनल ब्रॉडकास्टर्स असोसिएशनची चौकशी, पोलिसांची चौकशी अशा अनेक स्तरावर चौकशी सुरु आहेत.महाभारतातील द्रोपदी वस्त्रहरणाच्या प्रसंगी दुर्योधन, दुःशासनाने जे केली त्यांनाही लाजविल असा प्रकार या आधुनिक दुर्योधन , दुःशासनांना केला आहे त्यांना जबर शिक्षा व्हायलाच हवी. यातील काही आरोपींना पोलिसांनी अटक केली असली तरी मुख्य आरोपी अमरज्योती कालिता मोकाटच आहे.

या घटनेत गौरव ज्योती निऑग या पत्रकारानेशकुनीमाची भूमिका बजावली आहे. त्या मुलीच्या छेडखानीला एकप्रकारे मदत करण्याचे काम केले आहे.तसेच या प्रसंगाबाबत पोलिसांना कळविण्याऐवजी चित्रीकरण चॅनलवरुन लगेचच प्रसारित करण्याल प्राधान्य दिले. त्याउलट  मुकुल कालिता या ज्येष्ठ पत्रकाराने बातमीची घाई न करता , त्या मुलीला पोलिसांच्या मदतीने जमावाच्या तावडीतून सोडविण्याचे व मानवतेची मूल्ये जोपासण्याचे कार्य केले आहे.
यानिमित्ताने एका घटनेची आठवण झाली.1993 साली सुदानमध्ये मोठा दुष्काळ पडला होता.त्यावेळी दक्षिण आफ्रिकेतल्या केविन कार्टर या पत्रकाराने सुदानचा दौरा केला. सुदानमधील स्थिती भयंकर होती, अनेकजण भुकेमुळे मृत्यूमुखी पडत होते. केविनला एका ठिकाणी एक लहान्‍ मुलगी अन्न व पाणी न मिळाल्याने मरणासन्न स्थितीत पडलेली दिसली, त्या मुलीच्या शरीराचे लचके तोडण्यासाठी एक गिधाड घिरटया घालत होते. ते छायाचित्र केविनने टिपले.त्या छायाचित्राला जगभरात प्रतिष्ठेचा मानला जाणारा पुलित्झर पुरस्कार मिळाला.केविनचे काही दिवस आनंदात गेले, पण नंतर त्याला लोकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली की, त्या मुलीचे पुढे काय झाले? केविन म्हणाला मला ठाऊक नाही. त्यानंतर केविनवर जगभरातून टीकेचा भडिमार झाला . एका मरणासन्न मुलीला मदत करुन तिचा जीव केविन वाचवू शकला असता , पण त्याने माणूसधर्म पाळला नाही ही टीका झाली. त्यामुळे केविनला अपराधीपणाची जाणीव झाली व त्याने अखेर आत्महत्या केली.

प्रत्येक पत्रकार हा पत्रकार होण्याआधी माणूस असतो , त्यामुळे त्याने माणूसधर्म विसरता कामा नये हे केविन विसरला होता . तीच चूक गोहातीच्या गौरवनेही केली आहे.चोविस तास काहीतरी सनसनाटी दाखविण्याच्या चॅनल्सच्या स्पर्धेतून काही पत्रकार असे नीतीभ्रष्ट होताना दिसत आहेत , समाजाला पुढे नेण्याऐवजी अधोगतीकडे नेत आहेत.अशा प्रकारांबाबत कारवाई करणारी यंत्रणा जाणीवपर्वक निर्माण होऊ दिली जात नाही. गोहातीच्या तरुणीवर बेतलेला हा प्रसंगास माध्यमांच्या आततायीपणाचा कारणीभूत ठरला आहे यात शंका नाही. या माध्यमांच्या आततायीपणाला आवर घालणारी सक्षम यंत्रणा निर्माण झालीच नाही तर याहीपेक्षा भयंकर घटना घडत राह्तील.****************************************************************************

Sunday, July 1, 2012

अनुभवायलाच हवा असा खराखुरा रियालिटी शो

 आजपर्यंत छोटया पडदयाने कौन बनेगा करोडपती पासून बिग बॉस पर्यंत मनोरंजन करणारे अनेक रियालिटी शो अनुभवले , पण ते सारे नावालाच रियालिटी शो होते .त्यातील सारे दिखाऊ, आभासी होते. त्यातून देशाच्या, समाजाच्या हिताचा विचार कधी मांडला गेलाच नाही. पण, ही परिस्थिती आता बदलली आहे, कारण भारतीय टेलिविजन इतिहासातला पहिलावहिला खराखुरा रियालिटी शो ‘ सत्यमेव जयते ’ अवतरला आहे. सरकारला आणि समाजाला बदलायला भाग पाडण्याची ताकत टेलिविजन माध्यमात आहे हे प्रथमच भारतीय टेलिविजन दर्शकांनी पाहिले, अनुभवले.

भारतातील छोटया पडदयाचा प्रेक्षक गंभीर विषय पाहायला तयार नाही, छोटा पडदा सामाजिक प्रश्न मांडण्यास उपयोगी नाही, छोट्या पडदयावर सकाळी  रियालिटी शो प्रसारित करणे म्ह्णजे पायावर दगड मारुन घेणे , एकच रियालिटी शो एकाच वेळी अनेक वाहिन्यांवर दाखविणे शक्य नाही, सामाजिक व गंभीर विषयावरील टेलिविजन कार्यक्रमाला प्रायोजक व जाहिराती मिळत नाहीत अशा भारतातील टेलिविजन प्रसारणाबाबतच्या आजवरच्या अनेक तथाकथित संकल्पना ‘सत्यमेव जयते’ ‘ने मोडित काढल्या आहेत. यातून एसएमएस व्दारे मिळणारी रक्कम सामाजिक प्रश्न सोडवियासाठी चांगले कार्य करणार्‍या एखादया संस्थेला दिले जाते हे देखील वेगळेपण आहे.

‘सत्यमेव जयते’ या टेलिविजन मालिकेची सुरुवात 6 मे 2012 पासून झाली . आजपर्यंत या मालिकेचे आठ भाग प्रसारित झाले आहेत. स्टार समूहाच्या स्टार प्लस  व इतर सात वाहिन्यांसह दूरदर्शनवरुनही सकाळी 11 वाजता या कार्यक्रमाचे प्रसारण केले जाते. मुख्य म्ह्णजे केवळ हिंदीच नव्हे, तर तमिळ ,तेलुगु, मल्याळम, बंगाली  या प्रादेशिक भाषांमध्ये हा कार्यक्रम प्रसारित होतो. मराठी भाषेत स्टार प्रवाह वाहिनीवर सबटायटल्स दिसतात. सामाजिक व गंभीर विषय यात दाखविले जातात हे ठाऊक असूनही ,या कार्यक्रमाला प्रायोजकही चांगले मिळाले अशून जाहिरातीही मोठया प्रमाणात मिळाल्या आहेत. सर्वात विशेष म्ह्णजे सकाळच्या वेळी प्रसारण होत असतानाही दर्शकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. प्रत्येक भाग किमान 80 लाख दर्शक पाहतात अशी टॅम या दर्शक पाहणी करणार्‍या संस्थेची आकडेवारी आहे. या कार्यक्रमाने केंद्र आणि राज्य सरकारांना जनहिताचे काही निर्णय तातडीने घेण्यास भाग पाडले आहे, दर्शकांनाही अंतर्मुख होऊन विचार करण्यास प्रवृत्त करण्यात हा कार्यक्रम यशस्वी ठरला आहे.

'सत्यमेव जयते’ हा आमिर खानचा कार्यक्रम म्ह्णूनच ओळखला जातो, तो आहेच कारण आमिर खान यांनी या कार्यक्रमाला एका उंचीवर नेण्याचे काम केले आहे.अभिनेता व निर्माता म्ह्णून त्याने यात केलेल्या कार्याचे कोतुक व्हायला हवे व ते सर्वांकडून होतच आहे. पण आमीर खानपेक्षाही अधिक मेहनत दिग्दर्शक  सत्यजित भटकळ , छायाचित्रकार बाबा आजमी, क्रियेटीव टीममधील  इतर सहकारी स्वाती चक्रवर्ती,मोनिका शेरगिल, लॅन्सी फर्नांडिस, शुभज्योती गुहा, सूरेश भाटिया आदिंचे आहे.या कार्यकमाचे टायटल सॉंग, प्रत्येक कार्यक्रमाच्या शेवटी सादर होणारी अर्थपूर्ण गाणी या देखील या कार्यक्रमाच्या यशातील महत्वाच्या बाबी आहेत, हे दुर्लक्षून चालणार नाही. त्यामुळे केवळ आमिर खानचा शो म्ह्णून ‘सत्यमेव जयते’ वर स्तुतीसुमनांचा वर्षाव करणे  किंवा त्यावर टीका करणे चुकीचे ठरेल. या कार्यक्रमाछ्या निर्मितीत ज्यांनी काही ना काही योगदान दिले त्या सर्वांच्या कामगिरीला सॅल्युट करायलाच हवा.कारण तेवढेच महत्वाचे आहे. या कार्यक्रमाने भारतीय टेलिविजन इतिहासात नवे पर्व सुरु केले आहे. ज्या उद्देशाने भारतात चित्रवाणीची सुरुवात झाली , तो विकास संदेश जनतेत पोहोचविण्याचे काम भारतीय टेलिविजनकडून व त्यातही व्यावसायिक टेलिविजन वाहिनीकडून प्रथमच होत आहे.

'सत्यमेव जयते’ च्या प्रत्येक भागाच्या शेवटी सादर केली जाणारी गीते त्या भागातील विषयाला अनुसरुन आणि मनाला भावणारी आहेत. ‘नन्ही सी  चिडिया अंगना मे फिर से जा रे’ हे पहिल्या भागातील गीत जन्माला येणार्‍या मुलीचे स्वागत करण्याचा संसेश देते. दुसर्‍या भागातील ‘बिखरे टुकडे तुकडे सारे जुड रहे है धीरे धीरे हौले हौले ‘ हे गीत बाल वयात यौनशौषण झालेल्याना जीवनात आशेला अजून जागा आहे असा धीर देते. ‘पतवार बनुंगी, लहरो से लडूंगी,मुझे क्या बेचेगा रुपय्या’ हे तिसर्‍या भागातील गीत लग्नाच्या बाजारात माझा सौदा मांडू देणार नाही हा संदेश देते. ‘एक मासूम सी नाव है जिंदगी,तुफां मे डोल रही है जिंदगी’ या गीतातून डॉक्टरांच्या हाती रुग्णांचे जीवन कसे अवलंबून आहे हे चवथ्या भागात सुरेखपणे मांडले आहे. ‘घर याद आता है मुझे ‘ हे पाचव्या भागातील गीत प्रेमविवाहामुळे घरच्यांपासंन दुरावलेल्या मुलमुलींचे दुःख व्यक्त करते. ‘ऐसे ना देख ऐसे ना झांक ए दुनिया’ हे गीत अपंगत्वावर विजय मिळविणार्‍या व्यक्तींच्या आत्मविश्वासाची प्रचिती देते. तर सतव्या भागातील ‘घुट- घुट के कबतक जिउंगी सखी,अब ना मै गुमसुम रहूंगी सखी.सहने से बेहतर कहूंगी सखी’ हे गीत यापुढे नवर्‍याची मारहाण सहन करणार नाही ही स्त्रीच्या स्वत्वाची जाणीव दर्शविते. राम संपत यांचे संगीत कथाबीजाला साजेसे हे. त्यांना स्वाती चक्रवर्ती, सुरेश भाटिया , मुन्ना धीमन, स्वानंद किरकिरे , प्रसून जोशी आदींच्या सकस गीतलेखनाची तसेच –शदाब फरिदी , सोना महापात्रा यांची गायनसाथ लाभली आहे.

'सत्यमेव जयते’ च्या 6 मे 2012 रोजी प्रसारित झालेल्या पहिल्या भागात ‘स्त्री भ्रूण हत्या’ हा विषय हाताळण्यात आला.त्यानंतर राजस्थान सरकारने याबाबतचे सर्व खटले जलदगती न्यायालयात चालवू असे जाहीर केले.राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र यासह विविध राज्यात सोनोग्राफी केंद्रांव्रा धाडी टाकण्यात आल्या, अनेक दोषी डॉक्टरांचे परवाने रद्द करण्यात आले. दुसर्‍या भागात बाल यौन शोषण हा विषय हाताळण्यात आला. याच्या परिणामी केंद्र सरकारला याबाबत संसदेत मंजुरीसाठी थांबलेले बिल तात्काळ मंजूर करावे लागले.

'सत्यमेव जयते’ च्या तिसर्‍या भागात लग्न संस्था व हुंडा याबाबत काही महिलांचे अनुभव मांड्ण्यात आले आहेत.चवथ्या भागात रुग्णसेवेच्या क्षेत्रात होत असलेल्या गैरव्यवहारांवर प्रकाश टाकण्यात आला आहे, त्याबाबत डॉक्टरांना बदनाम करण्याचे हे षडयंत्र आहे , आमिर खान यांनी माफी मागावी अशी मागणी करीत इंडियन मेडिकल असोसिएशन या डॉक्टरांच्या संघटनेने टीकेची झोड उठविली, पण समाजमन आमिर खान यांच्या बाजूने राहिले.

'सत्यमेव जयते’ च्या पाचव्या भागात प्रेमविवाह करणार्‍या विविध जातीधर्माच्या मुलामुलींना किती छळाला व प्रसंगी मरणाला सामोरे जावे लागते हा विषय काही व्यक्तींच्या अनुभवांच्या आधारे हृदयस्पर्शीरित्या मांडण्यात यश आले आहे. सहाव्या भागात अपंगत्वावर मात करुन यशस्वी जीवन जगणार्‍या काहींचे अनुभव मांडले आहेत, अपंगांना समजून घेण्यात व सोयी देण्यात समाज व सरकार कसे अपयशी ठरले आहे ते यातून पाहायला मिळाले. सातव्या भागात घरगुती हिंसाचारात महिलांना मारहाण करणे हा हक्क आहे असे मानणार्‍या पुरुषी प्रवृत्तीवर आसूड ओढण्यात आले आहेत.आठव्या भागात रासायनिक खते व कीटकनाशकांच्या वापरामुळे मानवी जीवन व शेतीवर होत सलेल्या दुष्परिणामांची चर्चा करण्यात आली आहे.

'सत्यमेव जयते’ चा प्रत्येक भाग एखादया सामाजिक प्रश्नाचे विविध पैलू आपणासमोर उलगडण्याचे काम करतो.आमिर खान वैयक्तिक लाभासाठी हा कार्यक्रम करीत आहे, यात कुठली डोंबलाची समाजसेवा असे म्ह्णून आगपाखड करणार्‍यांची कमी नाही. पण ‘सत्यमेव जयते’ ने नवा इतिहास रचला आहे चांगले काम करणार्‍या समाजसेवी संस्थांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून तीन कोटी रुपयांपेक्षा अधिक देणगी मिळाली आहे..चित्रवाणी माध्यमाचा वापर विकास संदेश देण्यासाठी करण्याच्या दृष्टीने हे निर्विवादपणे पुढे टाकले गेलेले हे पाऊल आहे.याचे अनुकरण करुन यापुढच्या काळात अधिक प्रगल्भ व सामाजिक संदेश देणारे कार्यक्रम सादर होतील अशी आशा बाळगण्यास हरकत नाही.-
                                              ( दि. 1 जुलै 2012 च्या दै. संचारच्या इंद्रधनु पुरवणीतील माझा प्रकाशित लेख )

Friday, June 15, 2012

शतक चैत्रयुगाचे


भारतीय चित्रपट सृष्टीने नुकतीच शंभरी पार करुन दुसर्‍या शतकात पदार्पण केले. दादासाहेब फाळके या मराठी माणसाने  3 मे 1913 रोजी राजा हरिश्चंद्र हा चित्रपट प्रदर्शित करुन भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली.मराठी माणसांनी भारतात चित्रपटांची सुरुवात केली आणि यानंतरची चार दशके मराठी माणसेच चित्रपटसृष्टीला विकसित करण्यात आघाडीवर होती. आरंभीचा काळ दादासाहेब फाळके यांनी गाजविला आणि नंतरच्या काळात प्रभात कंपनीच्या माध्यमातून व्ही. शांताराम, विष्णुपंत दामले, फत्तेलाल आदींनी निर्माण केलेल्या चित्रपटांनी तो काळ गाजविला होता. त्या काळात माणूस, कुंकू, शेजारी यासारखे श्रेष्ठ चित्रपट मराठीत निर्माण झाले ते त्याचवेळी हिंदी भाषेतही तयार झाले. म्ह्णजे मराठी चित्रपटसृष्टी भारतीय चित्रपटसृष्टीची जननी होती आणि हिंदी चित्रपट त्याकडे मार्गदर्शक म्ह्णून पाहात होते.
काही दिवसांपूर्वी नाशिक येथे दादासाहेब फाळके स्मारकात मराठी चित्रपट शतसांवत्सरिक सोहळा आयोजित करण्यात आला होता, यानिमित्ताने मराठी माणसांचा व मराठी चित्रपटांचा हा गौरवशाली इतिहास आठवला.खरेतर हा समारंभ भारतीय चित्रपटांचा शतसांवत्सरिक सोहळा म्ह्णून साजरा व्हायला हवा होता व भारतातील चित्रपट क्षेत्रातील सर्व दिग्गज मंडळी येथे यायला हवी होती. असो, या मराठी चित्रपट शतसांवत्सरिक सोहळयाचे आयोजन फेडरेशनॉफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया ( महाराष्ट्र चॅप्टर )  आणि नाशिक महानगरपालिका यांच्या सांयुक्त वित्य्माने करण्यात आले होते. सुलोचनादीदी या ज्येष्ठ अभिनेत्री याप्रसंगी प्रमुख अतिथी होत्या.
                                            
                           चित्रांकुर हा तुम्ही रुजविला, महापुरुष तुम्ही
                           
                            या शतकाच्या चैत्रयुगाचे , उदगाते तुम्ही
दादासाहेब फाळकेंच्या अनमोल योगदानाबद्द्ल गीतकार सुधीर मोघे यानी लिहिलेल्या या कवितेने सोहळ्याची सुरुवात झाली. मराठी चित्रपटाच्या क्षेत्रात महत्वपूर्ण कामगिरी केलेल्या दिग्दर्शका/म्चा यावेळी सुलोचनादीदी व नाशिकचे महापौर यतीन वाघ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात अमोल पालेकर, सचिन पिळगावकर, महेश कोठारे, परेश मोकाशी, रामदास फुटाणे, किरण शांताराम, विजय कोंडके, संदीप सावंत, राजू फिरके या मान्यवरांचा समावेश होता.उमेश कुलकर्णी यांच्या वतीने सुधीर मोघे यांनी तर राजीव पाटील यांच्या वतीने त्यांच्या मातोश्री श्रीमती आशा पाटील यांनी सन्मान स्वीकारला.सुलोचनादीदी यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.
या सोहळ्यात अगदी मोजकीच मनोगते व्यक्त झाली.त्यात सचिन पिळगावकर म्ह्णालेचित्रपटांसाठी यशाचे दार केवळ एकाच बाजूने उघडते, ते म्ह्णजे प्रेक्षकाच्या बाजूने. प्रेक्षकच चित्रपट यशस्वी की अयशस्वी ते ठरवू शकतात. प्रत्येक कलावंतासाठी यश महत्वाचे असते. ते यश संयम , शक्ती, बुध्दी आणि नशीब यावर अवलंबून असते. मराठी चित्रपटांची संख्या सध्या वाढते आहे, मात्र यशस्वी ठरणार्‍या चित्रपटांची संख्या वाढावी. कवी व दिग्दर्शक रामदास फुटाणे यांनीही मत मांडले की अलिकडच्या काळात मराठी चित्रपटांचा दर्जा सुधारला आहे, त्यामुळे मराठी चित्रपटांचा झेंडा फडकतो आहे.मराठी माणसांनी चित्रपटगृहात जाऊन मराठी चित्रपट पाहावा.. फिल्म सोसायटी चळावळीने सिनेमा कसा पाहावा ते शिकविण्याचे कार्य केले आहे. ही चळवळ गावोगावी पोहोचून मराठी चित्रपटांचे जतन व्हावे

फिल्म फेडरेशन सोसायटीच्या वतीने सुधीर नांदगावकर म्ह्णाले की, महाराष्ट्रात सध्या 50 फिल्म्‍ सोसायटी कार्यरत आहेत. यामार्फत चांगला सिनेमा रुजविण्याचे कार्य केले जात आहे. फेडरेशन्चे अध्यक्ष किरण शांताराम यांची सांगितले की सिनेमाच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्रात वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे व मे 2013 मध्ये मुंबईत दिमाखदार सांगता सोहळा होईल. सतीश जकातदार , वीरेंद्र चित्राव हे फेडरेशन्चे पदाधिकारीही यावेळी उपस्थित होते.

याप्रसंगी जया दडकर लिखित दादासाहेब फाळके काळ आणि कर्तत्वया मौज प्रकाशन्‍ संस्थेतर्फे प्रकाशित  ग्रंथाचे विमोचन करण्यात आले. तसेच तारांगण प्रकाशन संस्थेव्दारा प्रकाशित व मंदार जोशी लिखित  शंभर नंबरी सोनं या सर्वोत्कृष्ट शंमर मराठी चित्रपटांची माहिती देणार्‍या महत्वपूर्ण ग्रंथाचे विमोचन करण्यात आले.अभिनेत्री स्मिता तळवलकर यांनी या सोहळ्याचे सूत्रसंचालन केले
.( दैनिक संचारमध्ये प्रकाशित झालेला माझा लेख , दै. संचारच्या सौजन्याने)


Wednesday, April 18, 2012

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची तेजस्वी पत्रकारिता


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची तेजस्वी पत्रकारिता

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रामुख्याने घटनेचे शिल्पकार आणि दलित समाजाचे उध्दारक म्ह्णून आपण सारे ओळखतो. पण एक तेजस्वी आणि महान पत्रकार अशी त्यांची ओळख सहसा कोणाला नाही. 1920 पासून पत्रकारितेचे व्रत अंगीकारलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता तसेच प्रबुध्द भारत ही चार वृत्तपत्रे सुरु केली, अनेक अडचणींचा सामना करीत ही वृत्तपत्रे हिरीरिने चालविली. समता आणि इतर वृत्तपत्रात सातत्याने लेखन केले, असे असूनही वृत्तपत्रांचा इतिहास लिहिणार्‍यांनी त्यांच्या या कार्याची हवी तेवढी दखल घेतली नाही. डॉ. गंगाधर पानतावणे, वसंत मून  आणि इतर काही अभ्यासकांनी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारितेबाबत स्वतंत्रपणे ग्रंथलेखन केले तेव्हा महाराष्ट्राला त्यांच्या पत्रकारितेची थोरवी लक्षात आली.
हजारो वर्षे आपले प्राक्तन समजून सवर्णांचा अन्याय निमूटपणे सहन करणार्‍या दीनदलित समाजाला जागे करण्यासाठी 'मूकनायक' हे वृत्तपत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर 31 जानेवारी 1920 रोजी सुरु केले. तेव्हा डॉ. आंबेडकर इंग्लंडमधून उच्चशिक्षण आर्थिक अडचणींमुळे अर्धवट सोडून नुकतेच परतले होते. या वृत्तपत्राच्या पहिल्या अंकात भूमिका विषद करताना त्यांनी म्ह्टले होते "आमच्या बहिष्कृत लोकांवर होत असलेल्या व पुढे होणार्‍या अन्यायावर चर्चा होण्यास तसेच त्यांच्या भावी उन्नतीच्या मार्गांची चर्चा होण्यास वर्तमानपत्रासारखी भूमी नाही.पण अशा वर्तमानपत्राची उणीव असल्याने ती भरुन काढण्यासाठी या पत्राचा जन्म आहे". डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हे वृत्तपत्र तीन वर्षे अखंडपणे चालविले  दलित समाजाला जागे करण्यास व आपल्या हक्कांची जाणीव करुन देऊन संघर्षासाठी सिध्द करण्यास प्रारंभ केला .पण त्याचवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना उच्चशिक्षण पूर्ण करण्यास पुन्हा इंग्लंडला जावे लागले. त्यांच्या अनुपस्थितीत अनुयायांना मूकनायक चालविण्याचे आव्हान पेलले नाही त्यामुळे 8 एप्रिल 1923 ला ते वृत्तपत्र बंद पडले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 3 एप्रिल 1927  रोजी 'बहिष्कृत भारत' हे वृत्तपत्र सुरु केले. या वर्तमानपत्रासाठी त्यांनी आपले रक्त आटवले, इंग्रजांनी देऊ केलेली मोठ्या पगाराची नोकरी नाकारली.अनेकदा हे वृत्तपत्र बंद पड्ले , पण पुन्हा हिरीरिने सुरु केले. मात्र अगदीच नाईलाज झाल्याने 15 नोव्हेंबर 1928 ला हे वृत्तपत्र बंद करावे लागले.वसंत मून यांनी आपल्या ग्रंथात लिहिले आहे "बहिष्कृत भारत वृत्तपत्राने अस्पृश्य समाजात मोठी क्रांती घडवून आणली आहे. हे पत्र म्ह्णजे धार्मिक किल्ल्याच्या जातीभेदररुपी तटास भगदाड पाडणारी मशीनगणच आहे". या विधानावरुन त्या काळात बहिष्कृत भारत ची कामगिरी किती महत्वाची होती हे जाणवते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 24 नोव्हेंबर 1930 रोजी 'जनता' हे पाक्षिक सुरु केले, ते पुढे साप्ताहिक झाले व 1956 पर्यंत सुरु राह्रिले. अस्पृश्य समाजाचे प्रश्न इतर समाजालाही कळावेत यासाटी त्यांनी 'जनता' ची सुरुवात केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसह 14 ऑक्टोबर 1956 रोजी बौध्द धम्माची  दीक्षा घेतल्यानंतर 'जनता' साप्ताहिकाचे नामांतर 'प्रबुध्द भारत' असे करण्यात आले. 6 डिसेंबर 1956 रोजी बाबासाहेबांचे महानिर्वाण झाल्यावरही अनुयायांनी ते अनेक वर्षे चालविले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आणि त्यांच्या वृत्तपत्रांव्रर त्या काळात अनेक सवर्ण नेत्यांनी व त्यांच्या वृत्तपत्रांनी जहरी टीका केली. पण आंबेडक्ररांनी सतत विचारांनीच त्या टीकेला उत्तर दिले, यात त्यांचे मोठेपण जाणवते.लको अनुयायी असतानाही त्यांनी कधी मारा,झोडाची भाषा केली नाही. सतत 36 वर्ष भारताच्या उन्नतीसाठी आपल्या तेजस्वी लेखणीने माग्रदर्शन करणार्‍या या महान पत्रकाराने जातीपाती तोडण्यापासून देशाच्या आंतरराष्ट्रीय राजकारणापर्यंत सर्व विषयांवर नेमके लेखन केले आहे. त्यांची पत्रकारिता म्ह्णजे भारताच्या इतिहासाचा उलगडा करुन भविष्यातील बलशाली भारताचे चित्र रेखाटणारी पत्रकारिता आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या वृत्तपत्रांची शीर्षके निवडतानाही अतिशय समर्पक निवड केली होती.अनेक वर्षे ही वृत्तपत्रे चालविणे सर्वच संदर्भाने अतिशय कठीण होते.ज्या समाजापर्यंत शिक्षण फारसे पोहोचलेच नव्हते व ज्यांचे सातत्याने आर्थिक व सामाजिक शोषण झाले अशा दीनदलित समाजातील लोक मोठया प्रमाणात वृत्तपत्राचे वर्गणीदार होतील अशी अपेक्षा करणे शक्य्‍ा नव्हते, हे ठाऊक असूनही बाबासाहेब आपल्या ध्येयापासून तसूभरही ढळले नाहीत.  
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भाषा प्रवाही व धारदार होती. 'बहिष्कृत भारत' च्या एका अग्रलेखात भारतीय समाजाच्या टिकून राहण्याची कारणमीमांसा करताना त्यांनी लिहिले आहे "जेव्हा जेते लोक शहाणे झाले व जीत लोकांना मारुन टाकण्यापेक्षा शेतकी वगैरे कामाकडे त्यांचा उपयोग करुन घेता येईल असे त्यांना दिसून आले तेव्हा जीत लोकांचा संहार करण्याची पध्दती नाहीशी होऊन त्यांना गुलाम करण्याची पध्दत अमलात आली". यात पुढे त्यांनी लिहिले आहे की, "आम्ही जगलो याचे कारण आम्ही शास्त्राप्रमाणे वागलो हे नसून शत्रूंनी ठार मारले नाही हेच होय.शास्त्राप्रमाणे वाघून जर काही झाले असेल तर ते हेच की,इतर राष्ट्रांपेक्षा आम्ही अधिक हतबल झालो व कोणाविरुध्द दोन हात करुन जय संपादन करण्याइतकी कुवत आमच्याजवळ राहिली नाही".
 
 शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश आपल्या अनुयायांना देणार्‍या बाबासाहेब आंबेडकरांनी कितीही अडचणी आल्या तरी आपली लेखणी कुठे गहाण ठेवली नाही आणि जाहिरातींच्या मलिदयाची अपेक्षा बाळगली नाही. स्वतंत्र प्रज्ञेने त्यांची लेखणी सतत धारदार तलवारीच्या पात्यासारखी झळाळत राहिली. त्यांच्या पत्रकारितेचा विचार एका चौकटीत करण्याचे प्रकार थांबायला हवेत.त्यांची पत्रकारिता बलशाली भारताचे चित्र रेखाटणारी परिपूर्ण पत्रकारिता आहे.हृी पत्रकारिता यापुढ्च्या काळातही योग्य दिशा दाखविण्याचे कार्य करीत राहणार आहे, याची खात्री आहे.
(दैनिक दिव्य मराठीने सोलापूर आवृत्तीत 14 एप्रिल 2012 रोजी प्रकाशित केलेला माझा लेख येथे देत आहे.)
                                   


महाराष्ट्रातील तरुण पिढीचे भवितव्य कंत्राटदारांच्या कचाटयात

  एक आदमी रोटी बेलता है एक आदमी रोटी खाता है एक तीसरा आदमी भी है जो न रोटी बेलता है, न रोटी खाता है वह सिर्फ़ रोटी से खेलता है मैं पूछता हूँ...