Saturday, May 2, 2020

छायाचित्र पत्रकारिता (फोटो जर्नलिझम)


छायाचित्र पत्रकारिता (फोटो जर्नलिझम)  हा पत्रकारितेचा एक विशेष प्रकार आहे. छायाचित्राच्या मदतीने बातमी वाचकापर्यंत पोहोचविणे याला छायाचित्र पत्रकारिता म्हणतात . सामान्य पत्रकारितेमध्ये बातमी केवळ भाषा आणि शब्दांद्वारे संकलित केली आणि प्रकाशित केली जाते. मात्र छायाचित्रांच्या माध्यमातून आपल्या बातम्या किंवा बातम्यांची कथा वाचकांपर्यंत पोहोचविल्यास त्या अत्यंत प्रभावी ठरतात.छायाचित्राच्या माध्यमातून जो पत्रकारिता करतो त्याला छायाचित्र पत्रकार म्हणतात. प्रसिध्द छायाचित्र पत्रकार रघु राय यांच्या मते “एखादया प्रसंगाच्या पाठीमागे असणारे सत्य छायाचित्राच्या माध्यमातून जो प्रखरपणे पुढे आणतो तोच खरा छायाचित्र पत्रकार होय”.घटना सोपी करुन सांगणे हा संज्ञापनाचा मूळ हेतू असतो. शब्दांपेक्षा दृश्य माध्यमातून संज्ञापन अधिक प्रभावीपणे साधता येते. म्हणूनच वृत्तपत्रात बातम्यांबरोबर छायाचित्रांचा वापर केला जातो. छायाचित्रांप्रमाणेच व्यंगचित्र, नकाशा, आलेख, रेखाटन, कल्पनाचित्रे आदींचा वापर करुन संज्ञापन साधले जाते.
छायाचित्र पत्रकारितेसाठी पत्रकारितेची दृष्टी असलेला छायाचित्रकार आवश्यक असतो. कोणत्याही घटनेचा सर्वांत महत्त्वाचा, नेमका क्षण कॅमेऱ्याने टिपणे यातच त्याचे कौशल्य असते.वृत्तपत्रात छायाचित्र प्रसिद्ध करताना त्याच्या तांत्रिक गुणवत्तेपेक्षा त्यातील पत्रकारिता-मूल्यास अधिक महत्त्व दिले जाते. प्रसिद्धीसाठी निवड करताना छायाचित्र बातमीला पूरक आणि छापण्यायोग्य असावे, अशी अपेक्षा असते. त्याखेरीज ते बनावट, दिशाभूल करणारे, न्यायालयीन कारवाई ओढवून घेणारे, वाचकावर विपरीत परिणाम करणारे, हीन अभिरुचीचे असू नये, असे काही निकषही पत्रकारितेत मानले जातात.
एखादा छायाचित्र पत्रकार शब्दांऐवजी फोटोंच्या माध्यमातून आपली बातमी / दृष्टिकोन / कथा / माहिती देतो. म्हणूनच, छायाचित्र पत्रकार एक कुशल छायाचित्रकार असणे आवश्यक आहे, परंतु छायाचित्र पत्रकार केवळ छायाचित्रकार नसतो. फोटोंच्या माध्यमातून सांगायचं असलं म्हणून पत्रकाराची शोधक दृष्टी त्याच्याकडे असणंही महत्त्वाचं आहे.

 जगभरात गाजलेली काही छायाचित्रे

1)छायाचित्र कला हीसुद्धा विविध दृश्य आपल्या कॅमेऱ्यात पकडते आणि ती क्षणचित्रे छायाचित्रकार साकार करतो. छायाचित्रकला ही एक कला नव्हेच , असा एक युक्तिवाद पूर्वी केला जात असे. एखादे दृश्य निवडायचे, चौकटीत आणायचे आणि फोटो घ्यायचा, यात कला कुठे आहे? ते केवळ एक तंत्र आहे असेच म्हटले जात असे; परंतु जेव्हा आशय आणि दृष्टिकोन भरलेली छायाचित्रे छायाचित्रकार साकारू लागले तेव्हा जगाला यातील कलेचा साक्षात्कार होऊ लागला. याचे उत्तम उदाहरण प्रसिद्ध लेखक पत्रकार अनिल अवचट यांच्याफोटोग्राफीया लेखात वाचायला मिळते.
       महायुद्धातले अनेक फोटो पाहिले; पण एका फोटोने मन जसे चरचरले तसे दुसऱ्या कशाने नव्हते. मुख्य म्हणजे तो  फोटो  युद्धभूमीवरचा नव्हताच. युद्धकाळातलाही नव्हता. युद्धानंतर काही वर्षानी विशिष्ट बटालियनमधले लोक एकत्र आले, त्याचा एक ग्रुप फोटो होता. काहीजण खुर्चीत बसलेले, कोणी मागे उभे, असा तो टिपिकल ग्रुप फोटो.फोटोतल्या माणसांना कुणाला हात नाही, कुणाला पाय नाही, कुणाचा जबडा  फाटलेला, कुणाच्या गमावलेल्या डोळ्यावर कायमची काळी पट्टी चढलेली. माणसे जशी आपल्याला छत्र्या घेऊन फोटोला त्याकाळात बसायची, तसे इथे फक्त छत्र्याच्या जागी वेगवेगळ्या प्रकारच्या कुबड्या ठेवलेल्या. मागची इमारत छान चिरेबंदी, पुढे हिरवळ बाकी सगळे व्यवस्थित. फक्त हे असे आणि मुख्य म्हणजे फोटो काढताना ते हसत होते, युद्धाच्या परिणामाविषयी वेगळे भाष्य करण्याची गरजच नाही. तो फोटो युद्धावरच्या फोटोच्या संग्रहातला होता.तो फोटोग्राफरने परिस्थिती दाखवण्यासाठी, रूढ मार्गाने जाता अगदी वेगळ्या तऱ्हेने दाखवून आपली निवड केली होती.”
2) अफगाण –पाकिस्तान सीमेवर निर्वासितांच्या अनेक छावण्या होत्या. 1984 मध्ये छायाचित्र पत्रकार स्टीव्ह मॅककुरी यांना नॅशनल जिओग्राफिकने अफगाण-पाकिस्तान सीमेवरील निर्वासित छावण्यांचे फोटो काढण्यासाठी निमंत्रित केले. त्यांनी पेशावरच्या बाहेर छावण्या पाहिल्या .नासिर बागच्या छावणीत मॅककुरीला मुलींचा शाळा म्हणून उभारलेला तंबू सापडला ज्यामध्ये पंधरा मुली शिकत असत. त्यात हिरव्या डोळ्यांच्या एका मुलीला त्याने पाहिले.मॅककुरी यांनी ही आठवण सांगताना लिहिले आहे : “मी या तरूणीला शोधले. ती फक्त बारा वर्षांची होती. ती खूपच लाजाळू होती आणि मला वाटलं की मी इतर मुलांचे छायाचित्र प्रथम काढले तर ती सहमत होण्याची शक्यता जास्त आहे. मला वाटते की तिच्याविषयी मी जशी उत्सुक होती तशीच तिलाही होती, कारण तिचे कधीच छायाचित्र घेतले नव्हते आणि तिने कॅमेराही कधीच पाहिला नव्हता. काही क्षणांनंतर ती उठली आणि निघून जाऊ लागली. पण एका क्षणात तिने मागे वळून पाहिले तो क्षण मी टिपला - तिच्या डोळ्यातील प्रकाश, पार्श्वभूमी आणि अभिव्यक्ती. यामुळे छायाचित्र अजरामर झाले. ” विसाव्या शतकातील सर्वात गाजलेले छायाचित्र म्हणून ते ओळखले गेले.

हे छायाचित्र युद्धग्रस्त देशांमधील मुलांचे दुःख आणि सामान्य लोकांवर अशा संघर्षाचे वास्तविक परिणाम दर्शवते. नॅशनल जिओग्राफिकच्या जून 1985 च्या अंकाच्या मुखपृष्ठावर हे छायाचित्र प्रसिध्द झाले. नंतर अनेक वर्षानंतर त्या मुलीचे नाव शरबत गुल असल्याचे समजले.  
                                                                                                                                                
4)सीरियातील यादवीला कंटाळून सप्टेंबर 2015 मध्ये जीव मुठीत धरुन अब्दुल्ला कुर्दी याचे कुटुंब कॅनडाला जाण्यासाठी साध्या बोटीतून निघाले होते. मात्र हा एजियन समुद्रातच बोट उलटून त्याचा आयलान या मुलाचा मृत्यू झाला. अगदी तीन वर्षाच्या आयलान कुर्दी या मुलाचा लाल टी शर्ट व निळ्या चड्डी घातलेला मृतदेह वाहून किनाऱ्याला आला. निलोफर डेमीर यांनी काढलेले आयलानचे छायाचित्र  जगभरात अनेकांचे काळीज पिळवटणारे ठरले. या अपघातात अब्दुल्ला यांनी आयलानसह, गालेब या चार वर्षांच्या मुलासह पत्नीला गमावले आहे.








कोण होतास तू काय झालास तू ?

खींचो न कमान को न तलवार निकालो जब तोप मुक़ाबिल हो तो अख़बार निकालो भारतावर इंग्रजांची राजवट होती त्या काळात अकबर इलाहाबादी यांनी लिहिलेला हा...