भारतीय समाजाचा, सामाजिक रचनेचा , भारतीयांच्या मानसिकतेचा
संपूर्ण अभ्यास असणारी आणि त्यावर अचूक भाष्य करणारी एकमेव व्यक्ती म्हणजे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर होत. त्यांनी भारतासाठी अलोकिक
कामगिरी केली आहे.
आजच्या कोणत्याही राजकीय, सामाजिक, आर्थिक समस्येवरीलउत्तर त्यांच्या
लेखनात सापडते. आजच्या काळातील राजकारणात पक्षनिष्ठेला दिली जाणारी तिलांजली, उबग आणणारा
घोडेबाजार, विरोधकांची मुस्कटदाबी करणारी कपटनीती यावर त्यांनी अचूक आणि दिशादर्शक
भाष्य केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केलेल्या विचारांचे प्रत्येक भारतीयाने
मंथन प्रत्येक भारतीयाने करण्याची गरज आहे असे प्रकर्षाने वाटते.
भारतातील प्रत्येक स्त्री – पुरुषाला घटनेतील
तरतुदीनुसार देण्यात आलेला मतदनाचा आधिकार ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मोठी देण
आहे. अनेक प्रगत देशात मतदानाच्या अधिकारासाठी लोकांना व विशेषतः स्त्रियांना मोठा
संघर्ष करावा लागला. मतदानाचा हा अधिकार किती महत्वपूर्ण आहे
याविषयी डॉ आंबेडकर यांनी म्हटले आहे “
मत म्हणजे ईश्वराने दिलेल्या ‘संजीवनी
मंत्र’ आहे, त्याचा योग्य उपयोग केला तरच आपले
संरक्षण होईल. स्वाभिमानी जीवनाचा तो एक तरणोपाय
आहे, त्याची जोपासना करा.
या दृष्टीने निवडणुकीचा विचार करा”. आजच्या काळात अधिक शिकलेले आणि
श्रीमंत लोक मतदानासाठी बाहेरच पडत नाहीत. विशेष म्हणजे चांगले लोकप्रतिनिधी नाहीत
असा गळा काढण्यात हेच लोक पुढे असतात.
निवडणुकीच्या काळात जे लोक प्रचार सभांचा धडाका
लावून विमानाने फिरत सर्वत्र सभा घेतात त्यांच्याविषयी डॉ.
बाबासाहेब आंबेडकरांनी भाष्य केले
आहे. ते म्हणतात “देशातील सारी जनता आपल्या मागे उभी आहे अशी फुशारकी व घमेंड
मारणारे हे लोक विमानाने का उडतात?
सारा देश घुसळून का काढतात?”. आजच्या काळात हे विधान
अधिक मार्मिक आहे.
निवडून आल्यानंतर घोडेबाजारात विकले जाणाऱ्या
लोकप्रतिनिधीनी विषयी आंबेडकर म्हणतात “जो विकला जातो,
लोभाला बळी पडतो, त्याचा
काही उपयोग नाही”. लोककल्याण याच एकमेव भावनेने राजकारण
केले गेले पाहिजे असे त्यांचे मत होते.
भारतीयांच्या मानसिकतेचा अभ्यास करुन डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांनी इशारा दिला होता की “राजकारणाच्या
क्षेत्रात व्यक्ती पूजेला महत्त्व दिले जाऊ नये.
इतर
कोणत्याही देशाच्या राजकारणात दिसणार नाही इतक्या मोठया
प्रमाणात भारतीय राजकारणात विभूतिपूजा दिसते.
राजकारणात भक्ती किंवा व्यक्तीपूजा ही अधःपतन आणि अंतिमतः हुकूमशाहीकडे नेणारा
हमखास मार्ग ठरतो”.
निकोप लोकशाहीत कोणत्याही पक्षाच्या हाती
अनियंत्रित सत्ता असू नये असे स्पष्ट करताना
डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात “माझ्या मताप्रमाणे लोकशाहीच्या
कामकाजासाठी फार महत्त्वाची बाब म्हणजे लोकशाहीच्या नावावर बहुमत वाल्यांनी अल्पमत
वाल्यांवर जुलूम करता कामा नये. बहुमत
वाले जरी सत्तेवर असले तरी अल्पमत वाल्यांना स्वतःबद्दल सुरक्षितता वाटली पाहिजे. अल्पमत वाल्यांची मुस्कटदाबी केली
जाते किंवा त्यांना डावपेचाने मार दिला जातोय अशी अल्पमत वाल्यांची भावना होता
कामा नये”.
राजकारणही गाभीर्याने करण्याची गोष्ट आहे
असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मानत. कोणाला राजकारणात यायचे असेल तर त्याने आधी भारतीय समाजाचा, अर्थकारणाचा
अभ्यास केला पाहिजे. राजकारणी व्यक्तीने जनतेच्या पैशाचा कदापिही अपहार करु नये , तो
पैसा लोककल्याणासाठीच वापरला गेला पाहिजे असे ते म्हणत. सरकारने राज्यकारभार कसा करावा
याविषयी आंबेडकर म्हणतात “कोणतेही
सरकार जनहित किती पाहते
याच्यावर त्याचे श्रेष्ठत्व अवलंबून असते.
आपल्या देशात अनेक प्रश्न आहेत पण त्याहूनही महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे
राज्यकारभार किती शुध्दतेने केला जातो.
आपल्याकडील सगळ्यात महत्त्वाचा दोष कोणता असेल तर तो म्हणजे अशुद्ध व लाच बाजीने भरलेले
राज्य शासन. राज्य शासन शुद्ध राखण्यासाठी
काही बाहेरची मदत लागत नाही फक्त ते शुद्ध
राखण्याची इच्छा असली पाहिजे”.
स्वातंत्र्य , समता
आणि बंधुत्व या त्रिसूत्रीवर आधारित देशातील राजकीय, सामाजिक, आर्थिक व्यवस्था असावी.
जातीधर्म विरहित सामाजिक विचार व्हावा, शुध्द हेतूने राजकारण केले जावे , राजकारणात
घोडेबाजार होऊ नये, सक्षम विरोधी पक्ष असणे हे जिवंत लोकशाहीचे दयोतक आहे असे असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मत होते. मात्र
स्वातंत्र्यानंतर 72 वर्षे उलटून गेल्यावर आजही हे प्रत्यक्षात येवू शकलेले नाही. कोणताही
पक्ष उमेदवार निवडताना त्याच्या मतदारसंघात त्याच्या जाती- धर्माचे किती मतदार आहेत
, त्याची पैसा खर्च करण्याची ताकत किती आहे हे पाहूनच उमेदवारी देतो, निवडणुकीनंतर
बहुमतासाठी होणारा घोडेबाजार ही नित्याचीच बाब झाली आहे. विरोधी पक्षांना संपविण्यासाठी
सत्ताधारी पक्ष शासकीय यंत्रणा , न्यायसंस्थांना वेठीस धरीत आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर
यांनी सांगितलेल्य मार्गाने राजकारण झाले आणि
लोकशाहीची जोपासना झाली तर आपला देश खरोखर बलशाली होईल .
( दिव्य मराठीत दिनांक 6 डिसेंबर 2019 रोजी प्रकाशित झालेला लेख )
( दिव्य मराठीत दिनांक 6 डिसेंबर 2019 रोजी प्रकाशित झालेला लेख )