Saturday, April 5, 2025

ट्रम्प टॅरीफची दादागिरी


 जगाच्या इतिहासात 2 एप्रिल 2025 हा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शुल्क (टॅरिफ) बॉम्बने जगाला आर्थिक युध्दाच्या खाईत लोटले आहे. त्यामुळे भारतासह जगातील बहुतांश देशांना जागतिक मंदीला सामोरे जावे लागणार आहे . मात्र ट्रम्प यांची दादागिरीविरुध्द चीन , कॅनडासह अनेक देशांनी बंड पुकारले आहे, त्यामुळे हे अस्र उलटून अमेरिकेला देखील मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे .


अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 एप्रिल 2025 या दिवशी जगातील बहुतांश देशांवर आयात शुल्क लादून हा अमेरिकेचा आर्थिक स्वातंत्र्याचा दिवस आहे असे घोषित केले आहे. ते म्हणाले ‘’ आतापर्यंत जगातील अनेक देशांनी अमेरिकेला लुटले ,पण यापुढे हे चालणार नाही’’. आजवर जगात मुक्त व्यापाराची वकिली करणाऱ्या आणि त्यासाठी इतर देशांवर दबाव आणणाऱ्या अमेरिकेने आपले पाऊल मागे घेऊन आपल्या बाजारपेठेची दारे जगासाठी जवळपास बंद केली आहेत . यामुळे अमेरिकेतील उद्योजकता वाढेल असे ट्रम्प यांना वाटत असले तरी, त्याचा परिणाम जागतिक मंदी येण्यावर होणार आहे. त्याचबरोबर अमेरिकेवर देखील मौठे संकट येणार आहे .ट्रम्प यांच्या विरोधामध्ये जगात आणि अमेरिकेमध्ये येत्या काही काळात मोठा रोष निर्माण होईल अशी शक्यता आहे. 

जागतिक शेअरबाजार कोसळले


ट्रम्प यांच्या निर्णयामुळे भारत, चीन, जपान यासह जगातील सर्व देशांचे शेअर बाजार कोसळले आहेत. गुंतवणूकदाराचे लाखो कोटी रुपये बुडाले आहेत. त्याचबरोबर अमेरिकेच्या शेअर बाजारात देखील कोविड काळानंतरची सर्वात मोठी घसरण झालेली आहे.डाऊ जोन्स 2000 पेक्षा अधिक अंकांनी किंवा 5.5 टक्क्यांनी खाली आला, ज्यामुळे मागील सत्राच्या तुलनेत मोठा तोटा वाढला. एस ऍण्ड पी 500 अंक किंवा 5.7% खाली आला, नॅस्डॅकलाही मोठा फटका बसला. यांची कंपनी याची कंपनी टेस्ला यासह ऍपल,जेपी मॉर्गन ,मॉर्गन स्टेनली आणि गोल्डमॅन सॅक्स यासह सर्व मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.



 ट्रम्प हुकूमशहासारखे वागत आहेत


 अनेक लोकशाही देशांमध्ये लोकांना असे वाटत असते की, आपल्यापेक्षा इतरच लोक आपल्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेत आहेत. त्यामुळे आपल्या देशावर एखादा हुकूमशहा राज्यकर्ता असावा. त्याउलट हुकूमशाहीचे चटके सोसणाऱ्या देशांमधील लोकांना मात्र स्वतंत्र श्वास घेण्याची आस लागलेली असते .अमेरिकेतील लोकांना देखील आपल्या देशातील स्वातंत्र्याचा गैरफायदा फायदा बाहेरुन आलेले लोकच जास्त घेत आहेत असे वाटत होते. त्यामुळे अमेरिकन जनमत उजवीकडे झुकले आणि निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा अध्यक्ष झाले


दुसऱ्यांदा अध्यक्ष झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची धोरणे ही एखाद्या हुकूमशहाला शोभतील अशा प्रकारचीच आहेत. असे लोक प्रत्येक निर्णयात मनमानी करत असतात, ते तज्ञ लोकांना मूर्खांमध्ये काढतात. ट्रम्प नेमके हेच करत आहेत. अमेरिकेतील जनतेला ,अर्थ तज्ञांना तसेच जगातील इतर देशांना विश्वासात न घेता ट्रम्प यांनी हा शुल्क बॉम्ब जगावर टाकलेला आहे. त्याचे स्फोट सातत्याने होतच राहणार आणि त्यामध्ये जग जसे होरपळणार तसेच अमेरिका देखील होरपळणार आहे.

अमेरिका प्रथम (अमेरिका फर्स्ट) अशाप्रकारची घोषणा ट्रम्प यांनी केली आहे. जागतिक आरोग्य संघटना यासह अनेक जागतिक हिताच्या योजनांमधून अमेरिकेने आपले अंग काढून घेतलेले आहे. एकेकाळी हाच अमेरिका गरीब आणि विकसनशील देशांना आपल्या अंकित करण्यासाठी आणि आपला माल त्या देशांमध्ये खपवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती देत होता. आता मात्र थेट व्यापाऱ्याची भूमिका घेऊन अमेरिकेने सर्वांना ठेंगा दाखवलेला आहे.
 इतर देशांबरोबरचे आहेत शुल्क वाढविल्यामुळे अमेरिकेला दरवर्षी 600 अब्ज डॉलरचा फायदा होऊ शकतो असा ट्रम्प प्रशासनाचा दावा आहे मात्र अमेरिकेतील आणि जगभरातील अर्थतज्ञ याबाबत शंका व्यक्त करत आहे. या धोरणांमुळे अमेरिकेतील उद्योजकांमध्येही शंकेचे वातावरण निर्माण होऊ शकते असे त्यांचे मत आहे. 


मंदीची शक्यता वाढली


अमेरिकेसह जगभरातील अर्थतज्ज्ञांनी ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे जागतिक मंदी येण्याची शक्यता वर्तवली आहे.जागतिक मंदीची शक्यता 40 टक्के होती ती ट्रम्प यांच्या निर्णयामुळे आणखी 20 टक्क्यांनी वाढली आहे त्यामुळे मंदी जगभर मंदी येण्याची शक्यता 60 टक्क्यांनी वाढली आहे असे अर्थतज्ञ सांगत आहेत.जगातील 184 देशांवर ट्रम्प यांनी वेगवेगळ्या प्रकारचे शुल्क लावले आहे. सर्वात जास्त शुल्क कंबोडिया, चीन इत्यादी देशांवर लादण्यात आलेले आहे . पाकिस्तानवर 29 टक्के तर बांगलादेशावर 37 टक्के शुल्क लादण्यात आलेले आहे. आयात शुल्क लादण्याचा संदर्भात अमेरिकेने आपल्या इस्राायल सारख्या मित्र देशांना देखील सोडलेले नाही. सर्वांवर कमी - अधिक प्रमाणात लादलेले आहे. प्रत्येक देशाला वेगळे शुल्क लावण्यामागे ट्रम्प यांनी नेमके कोणते धोरण अवलंबिले? त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा करून तर हे शुल्क लादले नसेल ना? अशा संभ्रमात जगातील अर्थतज्ञ आहेत. 
अनेक देश संतापले
अमेरिकेने एकतर्फी लादलेल्या शुल्कामुळे जगभरातील अनेक देश संतापले आहेत.अमेरिकेने विविध देशांच्या प्रतिनिधींशी चर्चा करायला हवी होती, त्यातून काही मार्ग निघाला असता असे विविध देशांतील राजनीतिज्ञांचे म्हणणे आहे. आम्हीदेखील यापुढे अमेरिकेचे दादागिरी खपवून घेणार नाही अशी घोषणा करत चीनने तर थेट अमेरिकेविरुद्ध आर्थिक युद्धाची सुरुवात केली आहे. चीनने अमेरिकेवर 34% परस्पर शुल्क लादण्याचा निर्णय घेतला आहे. चीनने जागतिक व्यापार संघटनेकडे अमेरिकेविरुद्ध खटला दाखल केला व शुल्काचा निर्णय जागतिक व्यापार स्थिरतेसाठी हानीकारक म्हणून निषेध केला. चीनच्या या भूमिकेमुळे ट्रम्प यांचा संताप वाढला आहे. 
कॅनडांने देखील अमेरिकेच्या धोरणांविरुद्ध लढण्याची तयारी केली आहे. ब्रिक्स मधील चीन आणि ब्राझील या देशांनी यापुढे परस्पर व्यवहार डॉलरमध्ये न करता स्थानिक चलनामध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. युरोपियन युनियन (ईयू) ने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परदेशी आयातीवर 10% ते 50% पर्यंतचे शुल्क लादल्याच्या प्रतिसादात, 1 एप्रिलपासून बोर्बन व्हिस्की, जीन्स आणि हार्ले-डेव्हिडसन मोटरसायकल यासारख्या अमेरिकन वस्तूंवरील शुल्कासह 26 अब्ज युरोच्या प्रतिकारक उपायांची घोषणा केली.अनी विशेषतः अमेरिकन सेवांना लक्ष्य करून प्रति-शुल्क लादण्याची तयारी करताना वाटाघाटी करण्याच्या गरजेवर दिला.

 व्हिएतनाम, थायलंड आणि कंबोडियासारख्या देशांनी नोकऱ्या गमावणे आणि विस्कळीत व्यापार यासह लक्षणीय आर्थिक परिणामांबाबत चिंता व्यक्त केली आहे. एकंदरीत, ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक व्यापार संबंधांची गुंतागुंत वाढण्याची शक्यता अधिक वर्तवली जात आहे. अनेक देश अमेरिकेच्या निर्णयामुळे नाराज असून ते देखील अमेरिकेवर परस्पर शुल्क लादण्याच्या विचारांमध्ये आहेत .
 शीतयुध्दापूर्वी होती तेवढी भक्कम स्थिती आता अमेरिकेची राहिलेली नाही. जगातील इतर देशही आता बलशाली होत आहेत. त्यामुळे जगभरात सतत अमेरिकेची दादागिरी चालेल अशी परिस्थिती आता नाही. जगभरातील हा रोष जर वाढत गेला तर त्याचा परिणाम अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुध्द जगात आणि खुद्द अमेरिकेत देखील रोष वाढण्यात होऊ शकतो.

भारतावर होणारा परिणाम


ट्रम्प यांच्या धोरणाबद्दल भारताने सावध भूमिका घेतलेली आहे. भारतावर 26 टक्के शुल्क लादण्यात येत आहे असे जाहीर करण्यात आलेले आहे. या शुल्कामुळे भारतीय बाजारातील आर्थिक चिंता वाढल्या आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारताच्या आर्थिक विकासाचा दर अपेक्षेपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे. आयात शुल्क लावण्याची बातमी पसरल्यानंतर शेअरबारात मोठी घसरण झाली . गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले. मागील महिन्यातच शेअर बाजार खूप खालचा स्तरावर गेला होता. त्यातून थोडी सुधारणा होऊ लागली होती तोच ही बातमी येऊन धडकली. त्यामुळे पुन्हा शेअर बाजार खूप मोठ्या प्रमाणात घसरला आहे. त्यातून सावरायला किती दिवस लागतील ते सांगता येत नाही. डॉलरच्या तुलनेत रुपयाही 85.69 च्या जवळपास घसरला. 

निर्यातदारांना सर्वात जास्त फटका बसणार आहे. निर्यातीवर अवलंबून असलेल्या क्षेत्रांमध्ये विशेषतः लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये. उत्पादन आणि नोकरकपात होऊ शकते, निर्यातीत घट झाल्याने . अमेरिकेसोबत भारताची व्यापार तूट वाढू शकते. निर्यात कमी होणे म्हणजे डॉलरची आवक कमी होणे, त्यामुळे कदाचित भारतीय रुपया अधिक कमकुवत होऊ शकतो. माहिती तंत्रज्ञान,कापड उद्योग, वाहन उद्योग, कृषी क्षेत्र, बँकिंग,औषध निर्माण, आरोग्य इत्यादी क्षेत्रावरही ट्रम्प यांच्या धोरणाचा विपरीत परिणाम होणार आहे. आयफोनसारखी अमेरिकन उत्पादने महागणार आहेत.
काही अर्थतज्ज्ञांच्या मते उत्तम यांचे धोरण ही भारताला संधी आहे. भारताने आपल्या देशातील उद्योगांची कार्यक्षमता आणि गुणवत्ता वाढवून अधिक आत्मनिर्भर व्हायला हवे. तसेच या पुढच्या काळामध्ये अमेरिकेशी वाटाघाटी करून शुल्कामध्ये कपात करणे, तसेच काही क्षेत्रांवर शुल्कात पूर्ण सवलत मिळवणे शक्य आहे. त्यातून अमेरिका - भारत यातील संबंध अधिक सुधारतील आणि भारताची निर्यात वाढू शकेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
(समाप्त )


ट्रम्प टॅरीफची दादागिरी

 जगाच्या इतिहासात 2 एप्रिल 2025 हा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शुल्क (टॅरिफ) बॉम्बने जगाला आर्थिक यु...