जगात अठरा कोटी लोक मराठी बोलतात . जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठीचा दहावा तर देशात तिसरा क्रमांक लागतो . त्यामुळे सर्वप्रथम मराठी भाषा कुठेतरी कमी आहे हा न्यूनगंड मराठी माणसाने सोडण्याची गरज आहे मला अभिमान वाटतो मी मराठी भाषिक आहे असे मराठी माणसाने म्हटले पाहिजे .
भाषा आणि साहित्य घडविण्यात प्रसार माध्यमांचा मोठा वाटा राहिलेला आहे . महाराष्ट्रतील पहिले मराठी वृत्तपत्र दर्पण बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले . ते वृत्तपत्र जरी मराठी आणि इंग्रजी भाषेत निघत होते तरी त्यात मराठी साहित्य लेखनाला वाव दिला जात होता . स्वतः बाळशास्त्री जांभेकर हे विद्वान गृहस्थ होते . त्यांचे अनेक ग्रंथ प्रकाशित झाले आहेत .

प्रारंभीच्या काळातील मराठी भाषा ही थोडी बाळबोध स्वरूपाची होती . दर्पण वर्तमानपत्रात मराठी भाषेत छापलेल्या मजकुरापेक्षा इंग्रजी मधे छापलेल्या मजकुराचा दर्जा अधिक चांगला असे . नंतरच्या काळात मराठी भाषा प्रगत होत गेली .जसजशी मराठी पत्रकारिता बहरत गेली तस - तसे मराठी साहित्य देखील विकसित होत गेले . त्यामुळे मराठी भाषेच्या विकासात पत्रकार आणि पत्रकारितेचे मोठे योगदान होते हे लक्षात येते . भाऊ महाजन यांच्या ‘प्रभाकर ‘ वर्तमानपत्रात छापून आलेली लोकहितवादी ची ‘शतपत्रे’ समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी होती . नंतरच्या काळात महात्मा फुले यांनी देखील जसे अखंड रचले तसेच ‘सत्सार ‘या पाक्षिकाचे अंक देखील काढले . मात्र महात्मा फुले यांचे विचार इतके क्रांतिकारी होते की ते छापण्याची हिंमत त्या काळातील मुद्रकांना दाखविली नाही . त्यामुळे सत्सारचे अधिक अंक निघू शकले नाही
महात्मा फुले यांच्या प्रेरणेने कृष्णराव भालेकर यांनी सुरू केलेल्या दीनबंधु वृत्तपत्रामधे कामगारांचे शेतकऱ्यांचे प्रश्न हिरीरिने मांडले जात असत . कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे आणि पहिल्या मराठी संपादिका तानुबाई बिर्जे यांनी नंतरच्या काळात दिनबंधु वृत्तपत्र चांगल्या रितीने चालविले . त्यात साहित्याला पण महत्वाचे स्थान दिले जात होते . तोच वारसा चालवत मुकुंदराव पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यातील तरवडी या छोट्या गावात चालवत तब्बल बावन्न वर्ष ‘ दीनमित्र ‘वृत्तपत्र चालविले . त्यात देखील शेतकऱ्यांचे प्रश्न आणि साहित्य यावर भर असे .
भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी इंग्रजी आणि मराठीत फार मोठ्या प्रमाणात साहित्य निर्मिती केली आहे . त्याचबरोबर त्यांनी मूकनायक ,बहिष्कृत भारत ,जनता आणि प्रबुद्ध भारत ही वर्तमानपत्रे चालविली . निबंधमालाकार विणुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, आणि गोपाळ गणेश आगरकर यांना’ केसरी’ वृतपत्राची त्रिमूर्ती म्हणून ओळखले जाते मात्र त्यांचे साहित्यातील योगदानही महत्वाचे आहे . ग.त्र्यं माडखोलकर, शि .म . परांजपे, भालाकार भोपटकर ,‘काँग्रेस’ वर्तमानपत्र चालवणारे साने गुरुजी थोर साहित्यिक होते .पत्रकार गोपाळ बाबा वलंगकर ,प्र . के . अत्रे , अनंत भालेराव,अरुण साधू , माधव गडकरी, श्रीपाद भालचंद्र जोशी, उत्तम कांबळे या पत्रकारांचेही साहित्यात मोठे योगदान आहे
ज्यांच्या नावे २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा होतो ते कुसुमाग्रज तथा वि . वा . शिरवाडकर हे देखिल काही काळ पत्रकार होते . महाराष्ट्रात आकाशवाणी आणि दूरदर्शन सुरू करण्यातही आणि त्यावर साहित्य विषयक उपक्रम राबविण्यातही मराठी साहित्यिकांचा मोठा वाटा होता .
मात्र अलिकडच्या काळात प्रसार माध्यमे साहित्य आणि साहित्य उपक्रमांपासून दूर जाताना दिसत आहेत . वृत्तपत्रांच्या आवृत्या निघतात मात्र पुरवण्या एकाच ठिकाणी मुख्यालयात तयार होतात .त्यात केवळ काहीच साहित्यिकांना योगदान देण्याची संधी असते , तीही ठराविक व शहरी साहित्यिकांना ही संधी मिळते . अनेक वृत्तपत्रांनी साहित्याला प्राधान्य देणाऱ्या साप्ताहिक पुरवण्या बंद केल्या आहेत किंवा त्या ऐवजी वृतपत्रांच्या नियमित पानात साहित्याला थोडी जागा देणे सुरू केले आहे . काही वृत्तपत्रांच्या मालकांनी तर साहित्य विषयक उपक्रमांच्या म्हणजेच पुस्तक प्रकाशन, साहित्य दिंडी, काव्यसंग्रह या सारख्या घटनांच्या बातम्याच छापायच्या नाहीत अशा लेखी सूचना पत्रकारांना दिल्या आहेत .वृत्तपत्रे सॉफ्टवेअर्सच्या माध्यमातून लोकांना काय आवडते ते ठरवतात आणि तसा मजकूर वाढवतात साहित्यविषयक लेखन तेवढ्या प्रमाणात वाचले जात नाही असा निष्कर्ष सॉफ्टवेअरद्वार येतो
.या पूर्वी साहित्यासाठी वृतपत्रांच्या चार -चार पानी पुरवण्या काढल्या जात होत्या . मात्र आता साहित्याला दुर्लक्षिले जात आहे . ग्रामीण भागातील साहित्यिकांची तर कोठे दखलच घेतली जात नाही .
सर्वात चिंतेची बाब म्हणजे अलीकडे आलेल्या मरठी चित्रपट,यु ट्युब चॅनल, एफ़ . एम . रेडीओ आणि रिल्स यांनी तर मराठी भाषेचे धिंडवडे काढायला सुरुवात केली आहे . हिंदी, मराठी आणि इंग्रजी मिश्रीत भाषा ऐकायला मिळते . अनेक चित्रपटांची नावे देखील मराठीत नसतात . व्हेंटिलेटर, फँड्री , लाईक आणि सबस्क्राईब, टीडीएम, बटरफ्लाय, टेरीटरी ,सर्किट अशी काही नावे उदाहरणादाखल सांगता येतील . मराठी वृत्तपत्रातील मराठी स्थिती ही यापेक्षा वेगळी नाही . एक काळ असा होता की पालक मुलांना मराठी भाषा सुधारण्यासाठी आणि त्याकरण सुधारण्यासाठी मराठी वर्तमानपत्रे वाचण्याचा सल्ला देत असत . मात्र आताच्या काळात पालकांनी मुलांच्या असा सल्ला दिला तर मुलांची भाषा सुधारण्या ऐवजी बिघडत जाईल अशी स्थिती आहे नव्याने पत्रकारित येणाऱ्यांची भाषा तपासलीच जात नाही . मराठी भाषेत आघाडीची वृत्तपत्रे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वृतपत्रांमधील भाषाही बिघडली आहे .
दक्षिणेकडील आजुबाजूच्या राज्यांकडे आपण पाहिले तर आपल्याला दिसते की तमिळ, तेलुगु, कन्नड इत्यादि भाषांचा विकास करण्यासाठी तेथील राज्यसरकारे प्रामाणिक प्रयत्न करत आहेत . त्या राज्यातील लोकही आपल्या भाषेचा अभिमान बाळगतात .आपल्या भाषेचे विद्यापीठ स्थापन करणे, राज्यात स्थानिक भाषेच्या वापरात प्रोत्साहन देणे यासाठी त्या -त्या ठिकाणची राज्यसरकारे मनापासून प्रयत्न करीत आहेत . स्थनिक भाषेच्या विकासासाठी त्या -त्या राज्यातील सरकारे मोठा निधी उपलब्ध करून देत आहेत . त्यामुळे ‘गूगल, फेसबुक, ट्विटर यासारखी जगप्रसिद्ध प्रसार माध्यमे मराठी आची तमिळ, तेलुगू, कन्न भाषांमधून सेवा उपलब्ध करून देतात . डबिंग करून भारतीय भाषात प्रसारित केल्या जाणाऱ्या इंग्रजी चित्रपटांबाबत हेच चित्र दिसते .
महाराष्ट्रात मात्र मराठी भाषेला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिलेला असला तरी त्यासाठी चा निधी मिळवून तो मराठी भाषेच्या विकासासाठी उपयोगात आणणे मोठे आव्हान आहे .200 वर्षांच्या मागणीनंतर आता अमरावती जिल्ह्यात रिध्दापूर येथे मराठी विद्यापीठ स्थापन झाले आहे , मात्र कुलगुरुंची नेमणूक करण्याव्यातिरिक्त तेथे कोणत्याही सुविधा नाहीत . विद्यापीठाचे प्रारूपही मराठी साहित्यिकांनी सुचविलेले नाही यासाठी मराठी वृतपत्रे आणि पत्रकार हिरिरीने मराठी भाषा विकासाचा आग्रह धरताना दिसत नाहीत .
मराठी भाषेच्या आणि साहित्याच्या परवडीला मराठी माणूस, प्रसारमाध्यमे आणि सरकार तेवढेच कारणीभूत आहे मराठी शाळा लाखोच्या संख्येने बंद पडून इंग्रजी माध्यमांच्या शाळा नेतेमंडळी गावोगावी सुरू करीत आहेत मंचावरून मराठीच्या नावे गळा काढणारेच आपल्या मुला-मुलींनी इंग्रजीत शिक्षण देत आहेत दैनंदिन जीवनात मराठी ऐवजी हिंदी किंवा इंग्रजीत बोलणे सुधारणेचे लक्षण मानले जात आहे .
खरी मराठी जपणारे लोक , साहित्यिक ग्रामीण भागात राहतात त्यांच्या लेखनाला प्राधान्य देण्याची गरज आहे . .मराठी भाषा , मराठी पत्रकारिता , मराठी साहित्य वाढायचे असेल तर आपण आधी मराठीवर मनापासून प्रेम केले पाहिजे . मराठी वृत्तपत्रांनी, नभोवाणी आणि चित्रवाणी केंद्रांनी मराठी साहित्याला आणि साहित्यविषयक उपक्रमांना प्राधान्याने प्रसिध्दी दिली पाहिजे मराठी वृतपत्रे , मराठी पुस्तके आपण विकत घेतली पाहिजेत .शासनालाही मराठी भाषेचा विकास करायला भाग पाडले पाहिजे . राज्यातील प्रसार माध्यमांनी एकी करून मराठी भाषा आणि मराठी साहित्याचा विकासाचा मुद्दा उचलून धरला तरच मराठी भाषेच्या आणि साहित्याच्या विकासाचा प्रश्न मार्गी लागू शकेल .
(मराठवाडा साहित्य संमेलन 2025 च्या विशेषांकात प्रसिद्ध झालेला लेख )
--------------------------+-----------------------;;;