Friday, June 15, 2012

शतक चैत्रयुगाचे


भारतीय चित्रपट सृष्टीने नुकतीच शंभरी पार करुन दुसर्‍या शतकात पदार्पण केले. दादासाहेब फाळके या मराठी माणसाने  3 मे 1913 रोजी राजा हरिश्चंद्र हा चित्रपट प्रदर्शित करुन भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली.मराठी माणसांनी भारतात चित्रपटांची सुरुवात केली आणि यानंतरची चार दशके मराठी माणसेच चित्रपटसृष्टीला विकसित करण्यात आघाडीवर होती. आरंभीचा काळ दादासाहेब फाळके यांनी गाजविला आणि नंतरच्या काळात प्रभात कंपनीच्या माध्यमातून व्ही. शांताराम, विष्णुपंत दामले, फत्तेलाल आदींनी निर्माण केलेल्या चित्रपटांनी तो काळ गाजविला होता. त्या काळात माणूस, कुंकू, शेजारी यासारखे श्रेष्ठ चित्रपट मराठीत निर्माण झाले ते त्याचवेळी हिंदी भाषेतही तयार झाले. म्ह्णजे मराठी चित्रपटसृष्टी भारतीय चित्रपटसृष्टीची जननी होती आणि हिंदी चित्रपट त्याकडे मार्गदर्शक म्ह्णून पाहात होते.
काही दिवसांपूर्वी नाशिक येथे दादासाहेब फाळके स्मारकात मराठी चित्रपट शतसांवत्सरिक सोहळा आयोजित करण्यात आला होता, यानिमित्ताने मराठी माणसांचा व मराठी चित्रपटांचा हा गौरवशाली इतिहास आठवला.खरेतर हा समारंभ भारतीय चित्रपटांचा शतसांवत्सरिक सोहळा म्ह्णून साजरा व्हायला हवा होता व भारतातील चित्रपट क्षेत्रातील सर्व दिग्गज मंडळी येथे यायला हवी होती. असो, या मराठी चित्रपट शतसांवत्सरिक सोहळयाचे आयोजन फेडरेशनॉफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया ( महाराष्ट्र चॅप्टर )  आणि नाशिक महानगरपालिका यांच्या सांयुक्त वित्य्माने करण्यात आले होते. सुलोचनादीदी या ज्येष्ठ अभिनेत्री याप्रसंगी प्रमुख अतिथी होत्या.
                                            
                           चित्रांकुर हा तुम्ही रुजविला, महापुरुष तुम्ही
                           
                            या शतकाच्या चैत्रयुगाचे , उदगाते तुम्ही
दादासाहेब फाळकेंच्या अनमोल योगदानाबद्द्ल गीतकार सुधीर मोघे यानी लिहिलेल्या या कवितेने सोहळ्याची सुरुवात झाली. मराठी चित्रपटाच्या क्षेत्रात महत्वपूर्ण कामगिरी केलेल्या दिग्दर्शका/म्चा यावेळी सुलोचनादीदी व नाशिकचे महापौर यतीन वाघ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात अमोल पालेकर, सचिन पिळगावकर, महेश कोठारे, परेश मोकाशी, रामदास फुटाणे, किरण शांताराम, विजय कोंडके, संदीप सावंत, राजू फिरके या मान्यवरांचा समावेश होता.उमेश कुलकर्णी यांच्या वतीने सुधीर मोघे यांनी तर राजीव पाटील यांच्या वतीने त्यांच्या मातोश्री श्रीमती आशा पाटील यांनी सन्मान स्वीकारला.सुलोचनादीदी यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.
या सोहळ्यात अगदी मोजकीच मनोगते व्यक्त झाली.त्यात सचिन पिळगावकर म्ह्णालेचित्रपटांसाठी यशाचे दार केवळ एकाच बाजूने उघडते, ते म्ह्णजे प्रेक्षकाच्या बाजूने. प्रेक्षकच चित्रपट यशस्वी की अयशस्वी ते ठरवू शकतात. प्रत्येक कलावंतासाठी यश महत्वाचे असते. ते यश संयम , शक्ती, बुध्दी आणि नशीब यावर अवलंबून असते. मराठी चित्रपटांची संख्या सध्या वाढते आहे, मात्र यशस्वी ठरणार्‍या चित्रपटांची संख्या वाढावी. कवी व दिग्दर्शक रामदास फुटाणे यांनीही मत मांडले की अलिकडच्या काळात मराठी चित्रपटांचा दर्जा सुधारला आहे, त्यामुळे मराठी चित्रपटांचा झेंडा फडकतो आहे.मराठी माणसांनी चित्रपटगृहात जाऊन मराठी चित्रपट पाहावा.. फिल्म सोसायटी चळावळीने सिनेमा कसा पाहावा ते शिकविण्याचे कार्य केले आहे. ही चळवळ गावोगावी पोहोचून मराठी चित्रपटांचे जतन व्हावे

फिल्म फेडरेशन सोसायटीच्या वतीने सुधीर नांदगावकर म्ह्णाले की, महाराष्ट्रात सध्या 50 फिल्म्‍ सोसायटी कार्यरत आहेत. यामार्फत चांगला सिनेमा रुजविण्याचे कार्य केले जात आहे. फेडरेशन्चे अध्यक्ष किरण शांताराम यांची सांगितले की सिनेमाच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्रात वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे व मे 2013 मध्ये मुंबईत दिमाखदार सांगता सोहळा होईल. सतीश जकातदार , वीरेंद्र चित्राव हे फेडरेशन्चे पदाधिकारीही यावेळी उपस्थित होते.

याप्रसंगी जया दडकर लिखित दादासाहेब फाळके काळ आणि कर्तत्वया मौज प्रकाशन्‍ संस्थेतर्फे प्रकाशित  ग्रंथाचे विमोचन करण्यात आले. तसेच तारांगण प्रकाशन संस्थेव्दारा प्रकाशित व मंदार जोशी लिखित  शंभर नंबरी सोनं या सर्वोत्कृष्ट शंमर मराठी चित्रपटांची माहिती देणार्‍या महत्वपूर्ण ग्रंथाचे विमोचन करण्यात आले.अभिनेत्री स्मिता तळवलकर यांनी या सोहळ्याचे सूत्रसंचालन केले
.( दैनिक संचारमध्ये प्रकाशित झालेला माझा लेख , दै. संचारच्या सौजन्याने)






1 comment:

शंभर वर्षानंतरही रुपयाची समस्या कायम

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दूरदर्शी अर्थशास्त्रज्ञ होते. 1923 साली म्हणजेच शंभर वर्षापूर्वी त्यांनी त्यांच्या डॉक्टरेट प्रबंधात भारतातील ...