Sunday, July 1, 2012

अनुभवायलाच हवा असा खराखुरा रियालिटी शो

 आजपर्यंत छोटया पडदयाने कौन बनेगा करोडपती पासून बिग बॉस पर्यंत मनोरंजन करणारे अनेक रियालिटी शो अनुभवले , पण ते सारे नावालाच रियालिटी शो होते .त्यातील सारे दिखाऊ, आभासी होते. त्यातून देशाच्या, समाजाच्या हिताचा विचार कधी मांडला गेलाच नाही. पण, ही परिस्थिती आता बदलली आहे, कारण भारतीय टेलिविजन इतिहासातला पहिलावहिला खराखुरा रियालिटी शो ‘ सत्यमेव जयते ’ अवतरला आहे. सरकारला आणि समाजाला बदलायला भाग पाडण्याची ताकत टेलिविजन माध्यमात आहे हे प्रथमच भारतीय टेलिविजन दर्शकांनी पाहिले, अनुभवले.

भारतातील छोटया पडदयाचा प्रेक्षक गंभीर विषय पाहायला तयार नाही, छोटा पडदा सामाजिक प्रश्न मांडण्यास उपयोगी नाही, छोट्या पडदयावर सकाळी  रियालिटी शो प्रसारित करणे म्ह्णजे पायावर दगड मारुन घेणे , एकच रियालिटी शो एकाच वेळी अनेक वाहिन्यांवर दाखविणे शक्य नाही, सामाजिक व गंभीर विषयावरील टेलिविजन कार्यक्रमाला प्रायोजक व जाहिराती मिळत नाहीत अशा भारतातील टेलिविजन प्रसारणाबाबतच्या आजवरच्या अनेक तथाकथित संकल्पना ‘सत्यमेव जयते’ ‘ने मोडित काढल्या आहेत. यातून एसएमएस व्दारे मिळणारी रक्कम सामाजिक प्रश्न सोडवियासाठी चांगले कार्य करणार्‍या एखादया संस्थेला दिले जाते हे देखील वेगळेपण आहे.

‘सत्यमेव जयते’ या टेलिविजन मालिकेची सुरुवात 6 मे 2012 पासून झाली . आजपर्यंत या मालिकेचे आठ भाग प्रसारित झाले आहेत. स्टार समूहाच्या स्टार प्लस  व इतर सात वाहिन्यांसह दूरदर्शनवरुनही सकाळी 11 वाजता या कार्यक्रमाचे प्रसारण केले जाते. मुख्य म्ह्णजे केवळ हिंदीच नव्हे, तर तमिळ ,तेलुगु, मल्याळम, बंगाली  या प्रादेशिक भाषांमध्ये हा कार्यक्रम प्रसारित होतो. मराठी भाषेत स्टार प्रवाह वाहिनीवर सबटायटल्स दिसतात. सामाजिक व गंभीर विषय यात दाखविले जातात हे ठाऊक असूनही ,या कार्यक्रमाला प्रायोजकही चांगले मिळाले अशून जाहिरातीही मोठया प्रमाणात मिळाल्या आहेत. सर्वात विशेष म्ह्णजे सकाळच्या वेळी प्रसारण होत असतानाही दर्शकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. प्रत्येक भाग किमान 80 लाख दर्शक पाहतात अशी टॅम या दर्शक पाहणी करणार्‍या संस्थेची आकडेवारी आहे. या कार्यक्रमाने केंद्र आणि राज्य सरकारांना जनहिताचे काही निर्णय तातडीने घेण्यास भाग पाडले आहे, दर्शकांनाही अंतर्मुख होऊन विचार करण्यास प्रवृत्त करण्यात हा कार्यक्रम यशस्वी ठरला आहे.

'सत्यमेव जयते’ हा आमिर खानचा कार्यक्रम म्ह्णूनच ओळखला जातो, तो आहेच कारण आमिर खान यांनी या कार्यक्रमाला एका उंचीवर नेण्याचे काम केले आहे.अभिनेता व निर्माता म्ह्णून त्याने यात केलेल्या कार्याचे कोतुक व्हायला हवे व ते सर्वांकडून होतच आहे. पण आमीर खानपेक्षाही अधिक मेहनत दिग्दर्शक  सत्यजित भटकळ , छायाचित्रकार बाबा आजमी, क्रियेटीव टीममधील  इतर सहकारी स्वाती चक्रवर्ती,मोनिका शेरगिल, लॅन्सी फर्नांडिस, शुभज्योती गुहा, सूरेश भाटिया आदिंचे आहे.या कार्यकमाचे टायटल सॉंग, प्रत्येक कार्यक्रमाच्या शेवटी सादर होणारी अर्थपूर्ण गाणी या देखील या कार्यक्रमाच्या यशातील महत्वाच्या बाबी आहेत, हे दुर्लक्षून चालणार नाही. त्यामुळे केवळ आमिर खानचा शो म्ह्णून ‘सत्यमेव जयते’ वर स्तुतीसुमनांचा वर्षाव करणे  किंवा त्यावर टीका करणे चुकीचे ठरेल. या कार्यक्रमाछ्या निर्मितीत ज्यांनी काही ना काही योगदान दिले त्या सर्वांच्या कामगिरीला सॅल्युट करायलाच हवा.कारण तेवढेच महत्वाचे आहे. या कार्यक्रमाने भारतीय टेलिविजन इतिहासात नवे पर्व सुरु केले आहे. ज्या उद्देशाने भारतात चित्रवाणीची सुरुवात झाली , तो विकास संदेश जनतेत पोहोचविण्याचे काम भारतीय टेलिविजनकडून व त्यातही व्यावसायिक टेलिविजन वाहिनीकडून प्रथमच होत आहे.

'सत्यमेव जयते’ च्या प्रत्येक भागाच्या शेवटी सादर केली जाणारी गीते त्या भागातील विषयाला अनुसरुन आणि मनाला भावणारी आहेत. ‘नन्ही सी  चिडिया अंगना मे फिर से जा रे’ हे पहिल्या भागातील गीत जन्माला येणार्‍या मुलीचे स्वागत करण्याचा संसेश देते. दुसर्‍या भागातील ‘बिखरे टुकडे तुकडे सारे जुड रहे है धीरे धीरे हौले हौले ‘ हे गीत बाल वयात यौनशौषण झालेल्याना जीवनात आशेला अजून जागा आहे असा धीर देते. ‘पतवार बनुंगी, लहरो से लडूंगी,मुझे क्या बेचेगा रुपय्या’ हे तिसर्‍या भागातील गीत लग्नाच्या बाजारात माझा सौदा मांडू देणार नाही हा संदेश देते. ‘एक मासूम सी नाव है जिंदगी,तुफां मे डोल रही है जिंदगी’ या गीतातून डॉक्टरांच्या हाती रुग्णांचे जीवन कसे अवलंबून आहे हे चवथ्या भागात सुरेखपणे मांडले आहे. ‘घर याद आता है मुझे ‘ हे पाचव्या भागातील गीत प्रेमविवाहामुळे घरच्यांपासंन दुरावलेल्या मुलमुलींचे दुःख व्यक्त करते. ‘ऐसे ना देख ऐसे ना झांक ए दुनिया’ हे गीत अपंगत्वावर विजय मिळविणार्‍या व्यक्तींच्या आत्मविश्वासाची प्रचिती देते. तर सतव्या भागातील ‘घुट- घुट के कबतक जिउंगी सखी,अब ना मै गुमसुम रहूंगी सखी.सहने से बेहतर कहूंगी सखी’ हे गीत यापुढे नवर्‍याची मारहाण सहन करणार नाही ही स्त्रीच्या स्वत्वाची जाणीव दर्शविते. राम संपत यांचे संगीत कथाबीजाला साजेसे हे. त्यांना स्वाती चक्रवर्ती, सुरेश भाटिया , मुन्ना धीमन, स्वानंद किरकिरे , प्रसून जोशी आदींच्या सकस गीतलेखनाची तसेच –शदाब फरिदी , सोना महापात्रा यांची गायनसाथ लाभली आहे.

'सत्यमेव जयते’ च्या 6 मे 2012 रोजी प्रसारित झालेल्या पहिल्या भागात ‘स्त्री भ्रूण हत्या’ हा विषय हाताळण्यात आला.त्यानंतर राजस्थान सरकारने याबाबतचे सर्व खटले जलदगती न्यायालयात चालवू असे जाहीर केले.राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र यासह विविध राज्यात सोनोग्राफी केंद्रांव्रा धाडी टाकण्यात आल्या, अनेक दोषी डॉक्टरांचे परवाने रद्द करण्यात आले. दुसर्‍या भागात बाल यौन शोषण हा विषय हाताळण्यात आला. याच्या परिणामी केंद्र सरकारला याबाबत संसदेत मंजुरीसाठी थांबलेले बिल तात्काळ मंजूर करावे लागले.

'सत्यमेव जयते’ च्या तिसर्‍या भागात लग्न संस्था व हुंडा याबाबत काही महिलांचे अनुभव मांड्ण्यात आले आहेत.चवथ्या भागात रुग्णसेवेच्या क्षेत्रात होत असलेल्या गैरव्यवहारांवर प्रकाश टाकण्यात आला आहे, त्याबाबत डॉक्टरांना बदनाम करण्याचे हे षडयंत्र आहे , आमिर खान यांनी माफी मागावी अशी मागणी करीत इंडियन मेडिकल असोसिएशन या डॉक्टरांच्या संघटनेने टीकेची झोड उठविली, पण समाजमन आमिर खान यांच्या बाजूने राहिले.

'सत्यमेव जयते’ च्या पाचव्या भागात प्रेमविवाह करणार्‍या विविध जातीधर्माच्या मुलामुलींना किती छळाला व प्रसंगी मरणाला सामोरे जावे लागते हा विषय काही व्यक्तींच्या अनुभवांच्या आधारे हृदयस्पर्शीरित्या मांडण्यात यश आले आहे. सहाव्या भागात अपंगत्वावर मात करुन यशस्वी जीवन जगणार्‍या काहींचे अनुभव मांडले आहेत, अपंगांना समजून घेण्यात व सोयी देण्यात समाज व सरकार कसे अपयशी ठरले आहे ते यातून पाहायला मिळाले. सातव्या भागात घरगुती हिंसाचारात महिलांना मारहाण करणे हा हक्क आहे असे मानणार्‍या पुरुषी प्रवृत्तीवर आसूड ओढण्यात आले आहेत.आठव्या भागात रासायनिक खते व कीटकनाशकांच्या वापरामुळे मानवी जीवन व शेतीवर होत सलेल्या दुष्परिणामांची चर्चा करण्यात आली आहे.

'सत्यमेव जयते’ चा प्रत्येक भाग एखादया सामाजिक प्रश्नाचे विविध पैलू आपणासमोर उलगडण्याचे काम करतो.आमिर खान वैयक्तिक लाभासाठी हा कार्यक्रम करीत आहे, यात कुठली डोंबलाची समाजसेवा असे म्ह्णून आगपाखड करणार्‍यांची कमी नाही. पण ‘सत्यमेव जयते’ ने नवा इतिहास रचला आहे चांगले काम करणार्‍या समाजसेवी संस्थांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून तीन कोटी रुपयांपेक्षा अधिक देणगी मिळाली आहे..चित्रवाणी माध्यमाचा वापर विकास संदेश देण्यासाठी करण्याच्या दृष्टीने हे निर्विवादपणे पुढे टाकले गेलेले हे पाऊल आहे.याचे अनुकरण करुन यापुढच्या काळात अधिक प्रगल्भ व सामाजिक संदेश देणारे कार्यक्रम सादर होतील अशी आशा बाळगण्यास हरकत नाही.-
                                              ( दि. 1 जुलै 2012 च्या दै. संचारच्या इंद्रधनु पुरवणीतील माझा प्रकाशित लेख )

No comments:

Post a Comment

महाराष्ट्रातील तरुण पिढीचे भवितव्य कंत्राटदारांच्या कचाटयात

  एक आदमी रोटी बेलता है एक आदमी रोटी खाता है एक तीसरा आदमी भी है जो न रोटी बेलता है, न रोटी खाता है वह सिर्फ़ रोटी से खेलता है मैं पूछता हूँ...