Friday, February 6, 2015

आर.के.लक्ष्मणः सामान्यांना बोलते करणारा असामान्य माणूस



 आर.के.लक्ष्मण यांच्याविषयी विचार करताना स्वानंद किरकिरेंच्या गाण्यातील हेच शब्द पुन्हा पुन्हा आठवत राहतात. आर. के. लक्ष्मण हा खरेच अ॑फाट माणूस होता, त्यांनी भारतात नवा इतिहास रचला. नाजूक कुंचल्याच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला नायक बनविण्याची किमया त्यांनी करुन दाखविली. एखादया कसलेल्या गुप्तहेराप्रमाणे हा सामान्य माणूस हवा तिथे डोकावत असे. पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, मोरारजी देसाई, व्ही.पी.सिंह, अटलबिहारी बाजपेयी, लालकृष्ण अडवाणी ,बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांच्यासह अनेक राजकारण्यांच्या घरात, विविध मंत्रालयात, प्रसंगी परदेशातही हा सामान्य माणूस मुशाफिरी करीत असे. समाजातील, राजकारणातील व्यंगावर नेमके भाष्य करीत असे.
भारतात व्यंगचित्रे आणि व्यंगचित्रकाराला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे ऐतिहासिक कार्य आर.के.लक्ष्मण यांनी केले. यापेक्षाही थक्क कारायला लावणारी बाब म्ह्णजे, सर्वश्रेष्ठ वृत्तपत्रापेक्षा व्यंगचित्र प्रभावी असू शकते, हे त्यांनी सिध्द करुन दाखविले. तब्बल पाच दशके टाईम्स ऑफ इंडियात त्यांची व्यंगचित्रे प्रसिध्द होत असत. तेव्हा लोक बातम्या वाचण्याआधी, आज आर.कें.नी कोणते व्यंगचित्र रेखाटले आहे ते पाहण्यासाठी धडपडत असत. टाईम्स ऑफ इंडियाने आपल्या वृत्तपत्राचा खप वाढविण्यासाठी आर.कें.च्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन नवी दिल्ली येथे भरविले होते , यापेक्षा एखादया व्यंगचित्रकाराचा मोठा सन्मान असू शकत नाही.
आर.के.लक्ष्मण यांचे पूर्ण नाव होते रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण . 23 आक्टोबर 1921 रोजी म्हैसूर येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील शाळेचे संचालक होते. मोठे बंधू आर.के. नारायण मोठे लेखक होते.आर.के.लक्ष्मण शाळेत शिकत असताना त्यांच्या घरी अनेक वृत्तपत्रे येत असत. त्यात छापून येणा-या व्यंगचित्रांपैकी, इंग्लंडमधील प्रख्यात व्यंगचित्रकार डेव्हीड लो यांच्या व्यंगचित्रांनी त्यांना विशेष प्रभावित केले. याच कालखंडात त्यांनी व्यंगचित्रे रेखाटायला सुरुवात केली.
आर.के.लक्ष्मण यांना मुंबईच्या जे.जे.स्कूल ऑफ आर्टसमध्ये महाविदयालयीन शिक्षण घेण्याची इच्छा होती. पण, त्यांची चित्रे तिथल्या प्राचार्यांना प्रभावशाली वाटली नाहीत, त्यामुळे त्यांनी प्रवेश नाकारला. त्यामुळे आर.कें.ना महाविदयालयीन शिक्षण म्हैसूर येथून पूर्ण करावे लागले. त्याविषयी आपल्या शैलीत भाष्य करताना आर.के.लक्ष्मण यांनी लिहिले आहे की, ‘’ बरे झाले मला जे.जे.स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश मिळाला नही. मी तिथे शिकलो असतो तर व्यंगचित्रकार झालोच नसतो. फार फार तर एखादया जाहिरात संस्थेत डासांची अगरबत्ती अथवा महिलांच्या सौंदर्य प्रसाधनांसाठी रेखाटने करीत बसलो असतो.’’
व्यंगचित्रे काढण्याचे अथवा चित्रकलेचे कुठलेही औपचारिक शिक्षण आर.के.लक्ष्मण यांनी घेतलेले नव्हते. व्यंगचित्र कला ही त्यांना उपजतच लाभलेली देणगी होती.काही वर्षे म्हैसूर येथील वृत्तपत्रात व्यंगचित्रे रेखाटण्याचे काम केल्यावर, ते मुंबईला फ्री प्रेस जर्नलमध्ये राजकीय व्यंगचित्रकार म्ह्णून रुजू झाले. तिथे बाळासाहेब ठाकरे त्यांचे सहकारी होते.पुढे टाईम्स ऑफ इंडियामध्ये त्यांचे आगमन झाले, 1957 साली ‘ यू सेड इट’ या दररोजच्या व्यंगचित्र मालिकेव्दारे ‘ कॉमन मॅन ‘ अवतरला. त्यानंतरची पाच दशके आर.के. लक्ष्मण यांच्या ‘कॉमन मॅन’ ने गाजविली. या कालखंडात आर.के.लक्ष्मण यांना  इंग्लंडच्या वृत्तपत्राकडूनही नोकरीची चांगली संधी देऊ करण्यात आली होती. त्यासाठी मोठा पगार, इंग्लंडमध्ये स्थाईक होण्याची सुविधा अशी आमिषेही दाखविण्यात आली. पण इंग्लडमध्ये जाण्यापेक्षा भारतातील बहुढंगी वास्तव मांडणे त्यांना अधिक मह्त्वाचे वाटले.
व्यंगचित्रातून एकाच वाक्यात ते अचूक आणि सडेतोड भाष्य करीत असत. व्यंगचित्राविषयी बोलताना ते म्ह्णत ‘ पूर्वी पंडित नेहरु, इंदिरा गांधी , मोरारजी देसाई यासह जे राजकारणी होते त्यांचे काहीन काही वेगळेपण होते.त्यामुळे त्यांची व्यंगचित्रे काढण्यात मजा होती. पण अलिकडच्या काळात लालूप्रसाद यादव आणि जयललिता हे दोन अपवाद वगळता सर्वांचे चेहरे सारखेच वाटतात.’
आणीबाणीच्या कालखंडात होणा-या अतिरेकाबाबत इंदिरा गांधीवर त्यांनी व्यंगचित्र रेखाटले, ते  त्यावेळी खूप गाजले होते. त्या काळात त्यांच्यावर मोठा दबाव टाकण्यात आला. अशा वेळी तडजोड स्वीकारुन काम करण्यास त्यांनी नकार दिला. ‘मी व्यंगचित्रकार आहे. मला अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य असलेच पाहिजे’ ही त्यांची भूमिका होती. त्या कालखंडात काही काळ ते मॉरीशस येथे वास्तव्यास गेले होते, निवडणुकीनंतरच ते परतले.
आर.के.लक्ष्मण यांना 94 वर्षाचे आयुष्य लाभले. या कालखंडात त्यांना अनेकदा आर्थिक ओढातान सहन करावी लागली. पण पैशाचा , प्रसिध्दीचा हव्यास त्यांनी कधीच धरला नाही. त्यांना रेमन मॅगेसेसे पुरस्कार, पद्मभूषण, पद्मविभूषण यासह अनेक मोठे पुरस्कार लाभले. एक प्रतिभासंपन्न जीवन ते जगले. आर.के.लक्ष्मण यांनी अजरामर केलेल्या ‘कॉमन मॅन ‘चा पुतळा पुणे आणि मुंबई येथे उभारण्यात आला आहे. हे पुतळे उभे आहेत , पण त्यांना नायकत्व मिळवून देणारा निर्माताच हरवला आहे. त्याला साद घालून म्ह्णावेसे वाटते ...........
 ‘’ हे लक्ष्मणा,       
  तुझ्या कुंचल्याच्या लक्ष्मणरेषांनी                                               सामान्यांच्या संवेदनांना बोलते केलेस                                         त्यांच्या व्यथा - वेदनांना शब्द दिलेस                                         बघ, ही माणसे पुन्हा मूक झालीत                                               पुन्हा एखादा लक्ष्मण जन्मावा                                                  या वाटेकडे आस लावून बसलीत. ’’

( साप्ताहिक प्रजापत्र मध्ये प्रकाशित )

****************************************************************************

No comments:

Post a Comment

काळया इंग्रजांकडून लोकशाहीचा गळा घोटला जातोय

भारत हा जगातला एक मोठा लोकशाही देश आहे’ असे सुभाषित आपण नेहमी ऐकत असतो. मात्र खरोखर या देशामध्ये लोकशाहीला सुखाने नांदू दिले जाते का ? असा प...