Saturday, November 11, 2023

अशीही पत्रकार - परिषद

पत्रकार परिषद हा एक मजेशीर प्रकार असतो. पत्रकार परिषद आयोजित करणारी व्यक्ती पत्रकारांना निमंत्रण देऊन बोलावते, पत्रकारांचे आगत-स्वागत करते . कधी-कधी काही भेटवस्तू देऊन पत्रकारांना खूष करण्याचा प्रयत्न करते . पण हे सारे असले तरी पत्रकार खाल्ल्या मीठाला जागायचे नाही हा पत्रकारिता धर्म असतो. पत्रकार परिषदेच्या आयोजकाला आडवे -तिडवे प्रश्न विचारून भंडावून सोडण्याचा पत्रकारिता धर्म पत्रकार निभावत असतात. पत्रकार परिषदेत संपल्यावर आयोजकाची कशी जिरवली याची चर्चा करीत पत्रकार आपल्या कार्यालयाकडे जात असतात. आमच्या पत्रकार मित्रांनी एका नवशिक्या पत्रकाराला एक प्रश्न विचारण्यास पढवून ठेवले होते . संपूर्ण पत्रकार परिषद संपल्यावर आभार प्रदर्शन सुरु होण्याआधी आयोजकाला तो विचारायचा की "तुम्ही हे सारे सांगितले पण याचा उपयोग काय?" रामायण सांगून झाल्यावर रामाची सीता कोण असे विचारावे अशा या प्रश्नाने आयोजक गोंधळून जायचा . पण कधी-कधी पत्रकारांनी भारी पडणारी काही माणसे भेटतात. औरंगाबादला मी पत्रकारितेत असताना त्या काळातले निवडणूक आयुक्त टी.एन.शेषन,पंतप्रधान चंद्रशेखर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री शरद पवार, मनोहर जोशी यांच्यासह अनेक मान्यवरांच्या पत्रकार परिषदेला उपस्थित राहण्याची संधी मला लाभली. एकदा निवडणूक टी.एन.शेषन यांची पत्रकार परिषद होती . स्वतःला खूप विद्वान समजणाऱ्या इंग्रजी वृत्तवाहिनीच्या एका पत्रकाराने नेहमीच्या शैलीत प्रश्न विचारला. आपण विचारलेल्या प्रश्नावर शेषन बोलू शकणार नाहीत असे वाटून तो पत्रकार छद्मीपणाने हसू लागला . ते पाहून निवडणूक आयुक्त शेषन म्हणाले "तुम खुदको बहोत होशियार समझते हो । सवाल पूछने के बजाय भाषण दे रहे हो । और ये बत्तीसी किसे दिखा रहे हो , अपना मुँह बंद करो ।" शेषन यांनी असे फटकारल्यावर त्याा पत्रकाराचा चेहरा पडला आणि नंतर पत्रकार परिषद संपेपर्यंत त्याने मान वर उचलूनही पाहिले नाही . दुसरी पत्रकार परिषद शिवसेनाप्रमुख बा .ळासाहेब ठाकरे यांची आठवते . डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार होण्याआधीच्या काळातील हा प्रसंग आहे. विद्यापीठाचा नामविस्तार करावा असा निर्णय त्यावेळचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी घेतला होता त्यामुळे संपूर्ण मराठवाड्यात वातावरण तापलेले होते. नामविस्तार विरोधकांतर्फे औरंगाबादला सरस्वती भुवन महाविद्यालयाजवळील मैदानात मोठ्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत बोलण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे येणार होते . लोक मोठ्या संख्येने सभेसाठी आले होते,परिस्थिती स्फोटक बनली होती . या सभेसाठी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मुंबईहून कारने निघाले होते . मात्र परिस्थिती स्फोटक असल्याने पोलिसांनी अहमदनगर येथून विनंती करून त्यांना परत पाठविले. त्यावर औरंगाबादच्या एका हिंदी दैनिकाने शेपूट खाली केलेल्या एका वाघाचे व्यंगचित्र छापून ' ठाकरे दुम दबाके भाग गये'असे खोचक वाक्य त्याखाली लिहिले. या घटनेनंतर काही दिवसांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे पुन्हा औरंगाबाद येथे आले .एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेला सर्व वृत्तपत्रांच्या पत्रकारांना आमंत्रण देण्यात आले होते .सर्व पत्रकार आले आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे खुर्चीवर विराजमान झाले .पत्रकार परिषदेला सुरुवात होणार होती .तेवढ्यात शिवसेनाप्रमुखांना आठवले की एका हिंदी वृत्तपत्राने व्यंगचित्र छापून त्यांची खिल्ली उडवली आहे .तेव्हा त्यांनी पत्रकारांना विचारले की त्या वृत्तपत्राचे प्रतिनिधी या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत काय .मी होय असे उत्तर दिले .त्यावर शिवसेनाप्रमुख म्हणाले त्या पत्रकारांनी येथून चालते व्हावे मगच ,पत्रकार परिषद होईल .आम्ही या गोष्टीला विरोध केला आणि सांगितले की तुमच्या पक्षाच्या निमंत्रणानुसार सर्व पत्रकार या ठिकाणी हजर झालेले आहेत ,आता ऐनवेळी एखाद्या पत्रकाराला पत्रकार परिषदेतून हाकलून देणे हा एकंदरीत सर्वच पत्रकारांचा अपमान आहे असे आम्ही मानतो . त्यामुळे कोणालाही या पत्रकार परिषदेतून बाहेर जाणे सांगू नये .शिवसेनाप्रमुखांनी हे मान्य केले आणि पत्रकार परिषदेला सुरुवात करायची असे ठरले .मात्र त्यादरम्यान पुन्हा शिवसेनाप्रमुखांना शंका आली आणि ते म्हणाले उद्या तुम्ही असे छापाल की शिवसेनाप्रमुखांनी माघार घेतली तर ते चालणार नाही .आम्ही त्यावर सांगितले की उद्या कोण काय छापेल याची खात्री कोणी देऊ शकणार नाही .उत्तर ऐकताच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी "मला पत्रकार परिषदेची काही गरज नाही तुम्ही निघा" असे सांगितले .त्यामुळे ती पत्रकार परिषद सोडून आम्ही त्या पंचतारांकित हॉटेलच्या बाहेर पडू लागलो . हा सारा प्रकार पाहत असलेल्या शिवसैनिकांना याचा खूप संताप आला त्यामुळे त्यांनी फक्त पुढचा विचार न करता बाहेर येणाऱ्या प्रत्येक पत्रकाराला चोप देण्यास सुरुवात केली .त्यामुळे पत्रकारांमध्ये भेटीच्या वातावरण पसरले आणि वाटेल त्या दिशेने पत्रकार पडू लागले .हॉटेल बाहेरील झाडावर चढून बसले तर कोणी हॉटेलमधील खोल्यांमध्ये लपून बसण्याचा प्रयत्न केला तर काहींनी बाहेर रस्त्यावर पळून जाण्याचा प्रयत्न केला . त्यात कहर म्हणजे त्या पंचतारांकित हॉटेलमध्ये शिवसेनेची कर्मचारी युनियन होती .त्यामुळे हॉटेल कर्मचाऱ्यांनीही शिवसैनिकांना साथ दिली . काही पत्रकारांना खूप मार बसला झाडावर चढलेल्या पत्रकारांना पकडून शिवसैनिकांनी हॉटेलमध्ये खुर्चीला बांधून ठेवले. नंतर शिवसेना किंवा शिवसेनाप्रमुखांबद्दल काहीही वावगे लिहिणार नाही हे कबूल केल्यावर त्यांची सुटका झाली .आम्ही तीन -चार पत्रकार मात्र सहीसलामत बाहेर पडलो . अशा काही पत्रकार परिषदा सदैव लक्षात राहतीत अशा आहेत . (पूर्वप्रसिद्धी -एबी मराठी दिवाळी अंक )

No comments:

Post a Comment

अशीही पत्रकार - परिषद

पत्रकार परिषद हा एक मजेशीर प्रकार असतो. पत्रकार परिषद आयोजित करणारी व्यक्ती पत्रकारांना निमंत्रण देऊन बोलावते, पत्रकारांचे आगत-स्वागत करते ....