Monday, February 18, 2013

नारदमुनींना हवी पेन्शन


समुद्राच्या मध्यभागी भगवान विष्णु शेषशय्येवर आरामात पहुडले होते.यांच्या चार हातांमध्ये शंख, चक्र, गदा आणि कमळ होते.त्याचवेळी तिन्ही लोकी संचार करणारे आदय पत्रकार नारदमुनी यांचे आगमन झाले.नारदमुनींनी धोतर, गळ्यात माळ असा नेहमीचा पेहराव केलेला होता आणि त्यांच्या डाव्या हातात वीणा होती.भगवान विष्णु यांना पाहताच नारदमुनींनी नतमस्तक होत हात जोडून प्रणाम केला आणि म्ह्णाले ‘’ नारायण !नारायण ! ‘’.
भगवान विष्णुंनी प्रसन्न मुद्रेने नारदांकडे पाहिले आणि ते म्हणाले ‘’ वत्सा, नारदा.तुला पाहून खूप छान वाटले.मला सांग पृथ्वीतलावर तुझी पत्रकारिता कशी सुरु आहे?’’
नारदमुनी म्ह्णाले ‘’ नारायण !नारायण !, भगवन, त्यासंदर्भात बोलण्यासाठीच मी आज आपणाकडे आलो आहे.काहीही करुन मला पेन्शन मंजूर करा, आता पत्रकारितेच्या व्यवसायातून निवृत्ती घेण्याचा विचार मी करतो आहे.’’.
नारदाचे बोलणे ऐकून भगवान विष्णुंना खूप आश्चर्य वाटले.ते म्ह्णाले’’ नारदा, काय झाले, असा विचार तुझ्या मनात आला तरी कसा?’’
नारदमुनी म्ह्णाले ‘’भगवन, तरुण पत्रकारांकडून सुरु असलेल्या स्पर्धेत टिकाव लागेल असे मला वाटत नाही.’’
भगवान विष्णु म्ह्णाले ‘’नारदा, तुझ्यासारख्या वरिष्ठ पत्रकाराने नवख्या पत्रकारांची धास्ती घेण्याची काय आवश्यकता आहे?.’’
नारदमुनी म्ह्णाले ‘’भगवन,पृथ्वीतलावर आता पत्रकारिता शिल्लकच राहिलेली नाही.आता पत्रकारितेच्या नावाखाली जे काही केले जाते ,ती आहे जादू आणि दुर्देवाने मी जादू कधीच शिकलो नाही.पृथ्वीतलावर आता चित्रवाणी नावाचे नवे माध्यम आले आहे ,ते माझ्या काळात नव्ह्ते.ते खरेच जादुई माध्यम आहे. यात लोकांना माहिती देण्याचे काम करावे लागत नाही तर, सनसनाटी निर्माण करुन जनभावना चेतविणे व जनमत तयार करण्याचे काम करावे लागते.भ्रष्टाचार विरोधी आंदोलन, दिल्लीतील बलात्कार प्रकरण, भारतीय सैनिकांचे शीर कापले जाण्याचे प्रकरण ही यासंदर्भातली काही उदाहरणे आहेत.’’
बहुतांश वृत्तवाहिन्या वाढीव टीआर्पीसाठी आतुरलेल्या आहेत.लोकांच्या भावनांना भडकावून, विविध मुद्दयांसाठी रस्त्यावर येण्यास त्यांना उद्युक्त करण्यात त्यांना धन्यता वाटते आहे.यासाठी अर्धसत्य सांगणे, खोटया गोष्टी पसरविणे,सनसनाटी निर्माण करणे, उथळपणे विषयांची मांडणी करणे असे प्रकार सर्रास केले जात आहेत.चर्चा करण्यासाठी आणि मते घडविण्यासाठी अशा तज्ञांना निमंत्रित केले जाते, जे अगदी टोकाची मते व्यक्त करतात. निवेदकही सरळ व वस्तुनिष्ठ बातमी देण्याऐवजी फिरवून बातमी देतात. ज्यांना मते व्यक्त करण्यास निंमंत्रित केले आहे ते आपणास हवे तसे मत मांडत नाहीत असे वाटल्यास मध्येच हस्तक्षेप करतात, अनेकदा त्यांना बोलूच देत नाहीत.
काही महिन्यापूर्वी बहुतांश वाहिन्यांनी  अण्णा हजारे हे जणू काही नवे मसीहा आहेत अशी हवा निर्माण करुन ते देशाचे तारणहार ठरतील असा प्रचार केला. (अण्णा हजारे यांच्या विधानांचा बारकाईने अभ्यास केल्यास जाणवते की त्यांच्याकडे शास्त्रीय कल्पना नाहीत ).हमेलीन शहरातला तो बासरीवाला जादूगार जसा बासरीच्या सुरावटीची जादू पसरवून मुलांना मोहीत करतो तसे हे सारे घडले.ज्या भ्रष्टाचाराच्या मुद्दयावरुन हे घडले तो मुद्दा आणि ज्यांच्यामुळे लोक जमा झाले ते अण्णा हजारे आता कुठे आहेत?एकाएकी देशातला भ्रष्टाचार 0.1 टक्केंपेक्षा कमी झाला की  काय? नाही, तसे मुळीच नाही ,तर आता हा मुद्दा वाहिन्यांना टीआरपी वाढविण्यास उपयोगी ठरत नाही, त्यामुळे वाहिन्या आता याकडे लक्ष देत नाहीत.
त्यानंतर दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या प्रकरणावरुन या वाहिन्यांनी दोन महिने तरुण पिढीची माथी भडकविली आणि त्यांना रस्त्यावर व जंतरमंतरवर आंदोलन करायला भाग पाडले. बलात्कार प्रकरण हाच जगातला एकमेव प्रश्न आहे,दारिद्रय, भूक, बेरोजगारी, कुपोषण, महागाई, आरोग्याची हेळसांड, शेतकर्‍यांच्या आत्महत्या यासारख्या प्रश्नांना  आता काही महत्वच नाही अशा पध्दतीने हे लोक वागत होते.
बलात्कार प्रकरणाची धग जरा कमी होताच या वाहिन्यांना भारतीय जवानांचे शीर पाकिस्तानी सैनिकांनी कलम केल्याचे कथित प्रकरण हाती मिळाले.पाकिस्तानच्या भारतातील उच्चायुक्तांनी याप्रकरणी वस्तुनिष्ठ चौकशी करा अशी विनंती केली. त्याकडे दुर्लक्ष करुन वाहिन्यांनी युध्दज्वर वाढवायला सुरुवात केली.वातावरण तापवण्यात आल्याने लोकांची माथी भडकली. पाकिस्तानी हॉकी खेळाडूंना मारहाण करणे व मायदेशी परत पाठविणे हे प्रकार यातून घडले.वृध्द व्यक्तींसाठी व्हिसा देण्याबाबत करार करण्यासाठी होणारी चर्चाही यात लांबणीवर पडली.
भगवान विष्णु म्ह्णाले ‘’नारदा,हे सारे इलेक्टॉनिक वाहिन्यांबद्दल सांगितलेस, मुद्रित माध्यमांची म्ह्णजे वृत्तपत्रांची काय स्थिती आहे?’’.
नारदमुनी म्ह्णाले’’ नारायण ! नारायण !, वृत्तपत्रांबद्दल काय सांगावे? आताची वृत्तपत्रे म्ह्णजे नुसत्या जाहिराती.बहुतांश मोठया वृत्तपत्रात बातम्या तिसर्‍या पानावर सुरु होतात.पहिल्या दोन पानात जाहिरातीच असतात.ब्रेकिंग न्यूजच्या नावाखाली टीव्ही वाहिन्या जो गाजावाजा करतात, त्यामुळे मुद्रित माध्यमे नेहमी मागेच राहतात.पेड न्यूजच्या संदर्भात तर इलेक्ट्रॉनिक आणि मुद्रित माध्यमे सारखीच, याला झाकावा नि याला काढावा, त्यापेक्षा यासंदर्भात काही न बोललेले चांगले.’’
शेवटी अगदी काकुळतीला येऊन नारदमुनी म्ह्णाले’’ भगवन, काहीही करा, पण मला या थोर भारतीय पत्रकारांच्या सानिध्यातून  बाहेर काढा , अन्यथा मला वेड लागेल.मला ताबडतोब पेन्शन मंजूर करा.’’.
भगवान विष्णु ‘’तथास्तु.’’ म्ह्णाले व अंतर्धान पावले.
नारदमुनी आता हिमालयातल्या एका गुहेत ध्यानधारणेत मग्न आहेत आणि निर्वाणाकडे डोळे लावून बसले आहेत.
मूळ इंग्रजी लेख - मार्कंडेय काटजू, अध्यक्ष, प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया,नवी दिल्ली.
मराठी अनुवादः रवींद्र चिंचोलकर, सोलापूर

No comments:

Post a Comment

महाराष्ट्रातील तरुण पिढीचे भवितव्य कंत्राटदारांच्या कचाटयात

  एक आदमी रोटी बेलता है एक आदमी रोटी खाता है एक तीसरा आदमी भी है जो न रोटी बेलता है, न रोटी खाता है वह सिर्फ़ रोटी से खेलता है मैं पूछता हूँ...