Wednesday, April 17, 2019

माध्यम स्वातंत्र्याचे खंदे पुरस्कर्ते : डॉ. बाबासाहेब आंबेडकर



भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घटनाकार , थोर समाज सुधारक म्हणून आपण जाणतो. मात्र पत्रकारितेच्या क्षेत्रातील त्यांची कामगिरीही अलौकिक स्वरुपाची आहे. मूकनायक , बहिष्कृत भारत, जनता आणि प्रबुध्द भारत ही चार वृत्तपत्रे त्यांनी चालविली. त्यातील बहुतांश लेखन त्यांनी स्वतः केले आहे, याशिवाय समता आणि इतर वृत्तपत्रांमधूनही त्यांनी सातत्याने लेखन केले. त्यांनी त्यावेळी पत्रकारितेतून मांडलेले विचार आजही तितकेच प्रेरक आणि मार्गदर्शक आहेत.
1919 ते 1956 या जवळपास 37 वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पत्रकारिता केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारितेची उद्दिष्टये धार्मिक, शैक्षणिक, आर्थिक सुधारणा ,सामाजिक प्रबोधन,सामाजिक न्याय, समाज परिवर्तन आणि राजकीय स्वातंत्र्य ही होती.
 ‘‘गुलामाला गुलामगिरीची जाणीव करुन द्या , मगच तो आपल्या हक्कांसाठी संघर्ष करेल ‘ असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत असत. आपल्या लेखणीव्दारे त्यांनी दलित समाजाला जागे केले, ‘शिका , संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा विचार दिला. या विचाराने पेटून उठलेल्या दलित समाजाने बाबासाहेबांनी दाखविलेल्या मार्गाने पुढे जाऊन, इथल्या बुरसट समाज व्यवस्थेने हिरावून घेतलेले मानवी हक्क परत मिळविले . डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  लेखणीच्या सामर्थ्यामुळे भारतात ही सामाजिक क्रांती घडली.
मात्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य एवढ्या चौकटित मावणारे नाही. त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून भारतीय जनतेला शेती, शिक्षण, अर्थकारण, समाजकरण, राजकारण, सिंचन, कामगार चळवळ, परराष्ठ्र व्यवहार, संरक्षण , उदयोग यासह सर्वच विषयांवर विपुल लेखन केले आहे.  ते विचार आजही तेवढेच उपयुक्त आहेत.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे वृत्तपत्र स्वातंत्र्याचे प्रखर पुरस्कर्ते होते. ‘अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पत्रकारितेसारखे दुसरे साधन नाही ‘असे ते म्हणत असत. याच भूमिकेतून त्यांनी 31 जानेवारी 1920 रोजी ‘ मूकनायक ‘ हे वृत्तपत्र सुरु केले. पत्रकारितेच्या क्षेत्रातील त्यांचे हे पहिले पाऊल होते. परिवर्तनाची बीजे पेरण्याचे काम या वृत्तपत्राने चोख बजावले. 20 जुलै 1924 रोजी त्यांनी ‘बहिष्कृत हितकारिणी सभेची ‘ स्थापना करुन आपल्या सामाजिक क्षेत्रातील कार्याला प्रारंभ केला. त्यामुळे त्यानंतर 3 एप्रिल 1927 रोजी सुरु केलेले ‘बहिष्कृत भारत’ वृत्तपत्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक चळवळीचे मुखपत्र बनले. सामाजिक लोकशाही म्हणजे स्वातंत्र्य , समता , सामाजिक न्याय व बंधुता ही जीवनाची मूलभूत तत्वे मान्य करणारी पध्दती आहे.या तत्वांना अलग करता येणार नाही.भारत हे खरेखुरे राष्ट्र व्हायचे असेल तर जातीभेद गाडावा लागेल असे डॉ, बाबासाहेब आंबेडकर म्हणत.               
वेळोवेळी निर्माण होणा-या  प्रश्नांसंबंधी जनतेला योग्य माग्‍॒दर्शन करण्याची जबाबदारी वृत्तपत्रांची आहे असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणत असत. भारतातील वृत्तपत्रे कशी असावित याबाबत त्यांनी एक आदर्श कल्पना मांडली होती. ‘जनता’ या वृत्तपत्राच्या 9 मार्च 1940 च्या अंकात त्यांनी यासंदर्भात लिहिले आहे की , ‘’वृत्तपत्रांना पूर्ण स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मोठा निधी देऊन कायद्यान्वये एक समिती गठित करावी. या समितीचे विश्वस्त सरकारने दोन्ही कायदे मंडळांच्या मताने नेमावे. वृत्तपत्रांचे संपादकही याच पध्दतीने नेमावे. समितीचे विश्वस्त आणि संपादक यांना उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीएवढे मत स्वातंत्र्य दिले पाहिजे. त्यावर सरकारी नियंत्रण असता कामा नये’’.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी वृत्तपत्रांच्या संदर्भात जी संकल्पना 1940 साली मांडली होती, तशीच शिफारस दुस-या वृत्तपत्र आयोगाने 1980 च्या कालखंडात केली होती, मात्र ती संकल्पना प्रत्यक्षात येऊ शकली नाही. वृत्तपत्रांना सरकारच्या, जाहिरातदारांच्या दबावाशिवाय काम करता यावे अशी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची अपेक्षा होती. शुध्द सार्वजनिक जीवनासाठी भारताच्या नव्या घटनेत वृत्तपत्र स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी आम्ही अशी कायदेशीर समिती नेमण्याची योजना घडवून आणू आणि ख-या लोकशाहीचे रक्षण करु अशी आपणास उमेद असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. यावरुन डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांची माध्यम स्वातंत्र्याविषयीची मते किती उदात्त आणि सुस्पष्ट होती हे लक्षात येते. निकोप लोकशाहीसाठी वृत्तपत्र स्वातंत्र्य आवश्यकच आहे ही त्यांची धारणा होती. वृतपत्रांच्या स्वातत्र्याचे थोर पुरस्कर्ते असलेले पत्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या राज्यघटनेतील कलम 19 (1)( अ) मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याची तरतूद करुन आपणास माध्यम स्वातंत्र्याची अनमोल देणगी दिली आहे. वृत्तपत्र स्वातंत्र्यासाठी त्यांनी प्रसंगी इंग्रज सरकारशी संघर्षही केला आहे.
 आज निवडणुकीच्या धामधुमीत अनेक वृत्तपत्रे,  चित्रवाहिन्या आणि त्यांचे आपले जनप्रबोधनाचे मूळ कार्य सोडून कोणत्या तरी राजकीय पक्षाची हुजुरेगिरी करताना दिसतात. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना नेमकी हीच भीती वाटत होती. त्यामुळे जाहिरातींचा विचार न करता वृत्तपत्रे आर्थिकदृष्टया स्वावलंबी बनावित अशी योजना त्यांना हवी होती.
 सार्वजनिक क्षेत्रात कार्य करणा-या कार्यकर्त्यावर एखादया वृत्तपत्राने बदनामीकारक लेखन केले, तर त्या कार्यकर्त्याचे म्हणणेही छापून येण्याचा कॅनडा देशातील अधिकारासारखा अधिकार भारतात असावा अशीही  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची अपेक्षा होती. वृत्तपत्रांची भूमिका जनहिताची असायला हवी आणि कोनत्याही परिस्थितीतीत वृत्तपत्रांनी आणि संपादकांनी नीतीमत्ता सोडू नये याबाबत त्यांची मते ठाम होती. भारतातील वृत्तपत्रांचा  व्यक्तीपूजा हा स्वभावधर्म आहे, यापासून वृत्तपत्रांनी दूर रहायला हवे असेही त्यांचे स्पष्ट मत होते.
परिवर्तनाचे चक्र अर्धेच फिरल्याने भारताला राजकीय स्वातंत्र्य मिळाले , मात्र जाती, धर्माचे बंध अधिक घट्ट होत गेले. अशा काळात माध्यमांवर समाजाला योग्य दिशा दाखविण्याची जबाबदारी आहे मात्र माध्यमेच कोणाची तरी गुलामगिरी करीत आहेत, ते समाजाला कशी आणि कोणती दिशा दाखविणार?
( दैनिक दिव्य मराठी मध्ये 14 एप्रिल 2019 रोजी प्रसिध्द झालेला लेख )

1 comment:

  1. सुंदर मांडणी। अभिनंदन।।

    ReplyDelete

अशीही पत्रकार - परिषद

पत्रकार परिषद हा एक मजेशीर प्रकार असतो. पत्रकार परिषद आयोजित करणारी व्यक्ती पत्रकारांना निमंत्रण देऊन बोलावते, पत्रकारांचे आगत-स्वागत करते ....