मार्शल मॅकलुहान या माध्यम तज्ञाने आपल्या 'अंडरस्टँडिंग मिडिया' या ग्रंथात भाकित
केले होते की, तंत्रज्ञानातील बदलांमुळे जग एक वैश्विक खेडे बनेल. तेच वास्तव आज आपण
आजच्या काळात समाज माध्यमांच्या ( सोशल मिडिया ) व्दारे अनुभवतो आहोत. समाज माध्यमे
ही प्रत्येक भारतीयाच्या जीवनातील एक अत्यावश्यक बाब बनली आहे. विशेषतः
फेसबुक आणि व्हॉटसअपचा वापर प्रत्येकजण करीत आहे. व्हॉटसअपची मालकी फेसबुककडेच
आहे. भारतात फेसबुकचे 25 कोटी वापरकर्ते आहेत आणि जवळपास तेवढेच व्हॉटसअपचेही वापरकर्ते
आहेत. याशिवाय व्टिटर,यू ट्यूब, इन्स्टाग्राम,
लिंक्डइन, माय स्पेस, गुगल प्लस यासारखी समाज माध्यमेही लोकप्रिय आहेत. मोबाईलचा वापर
तर वेड म्हणावे इतका वाढला आहे. भारतात 100 कोटीपेक्षा अधिक लोक मोबाईल वापरतात. शेतमजुरापासून
ते उद्योगपतीपर्यंत प्रत्येकजण स्मार्टफोनचा आणि समाज माध्यमांचा वापर करतो आहे. प्रत्येकजण
या स्मार्टफोनच्या माध्यमातून माहितीच्या महासागरात डुंबत असतो.
माणसे आता प्रत्यक्ष
एकमेकाशी फारसे बोलत नाहीत, ते स्मार्टफोनव्दारे समाज माध्यमांवर गुंगुन गेलेले असतात.अर्धा
तास फेसबुक किंवा व्हॅाटसअप बंद पडले तर अनेकांच्या मनाची मोठी तगमग होते. या समाज
माध्यमांमुळे भारतीय समाज बदलतो आहे, संस्कृती बदलते आहे.
या समाज माध्यमांमुळे घडत असलेले सकारात्मक
बदल खालीलप्रमाणे नोंदविता येतील.
·
तात्काळ संवाद
– आपल्या आप्तांशी, मित्रांशी, सहका-यांशी तात्काळ संपर्क साधता येतो. कोणी अमेरिकेत
असो की, भारतातल्या एखादया खेड्यात कोठेही तात्काळ संपर्क आणि संवाद होतो.
·
ज्ञानाची उपलब्धता
– जगभरातील ज्ञानाचे आदान – प्रदान समाज माध्यमांमुळे शक्य झाले आहे. एखाद्या असाध्य
आजारावर जगातील सर्वोत्तम डॉक्टरांचा सल्ला समाजमाध्यमांवरुन घेतल्याची आणि त्यानंतरच्या
उपचाराने रुग्ण सुधारल्याची अनेक उदाहरणे आहेत.
·
मुक्त अभिव्यक्ती
– समाज माध्यमे दडपलेल्या, पिचलेल्या लोकांचा आवाज सर्वांपर्यंत पोहोचविण्यास उपयुक्त
साधन आहे. अनेक देशातील, राज्यातील जनतेचे खरे प्रश्न त्यामुळे उघडकीस येत आहेत. विकिलिक्स
सारख्या नागरिक पत्रकारितेने बड्या देशांची कारस्थाने वेशीवर टांगण्याचे काम यातून
केले आहे.
·
रोजगाराच्या संधी – समाज माध्यमांमुळे एक नवेच क्षेत्र
रोजगारासाठी उपलब्ध झाले आहे. या माध्यमांसाठी लेखन, संपादन , व्यवस्थापन , विपणन करणा-यांची
मोठी गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे रोजगारच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.
·
स्वस्त आणि गतीमान
संवाद – समाज माध्यमांमुळे अगदी नगण्य खर्चात आणि गतीमान संवाद होतो. इतर माध्यमांच्या
तुलनेत या माध्यमावर होणारा खर्च नगण्य आहे. यातून हव्या त्या लक्ष्यित गटाशी नेमकेपणाने
, गतीने आणि अचूक संवाद साधता येतो.
·
व्यवसाय वाढ -
प्रत्येक उदयोगाला आणि इतर व्यावसायिक क्षेत्रांना
आपला व्यवसाय वाढविण्यासाठी समाज माध्यमांची मदत होते. ग्रामीण भागातूनही निर्यात करण्यास ही माध्यमे उपयुक्त
ठरतात.
·
आवडीची जोपासना
- समाज माध्यमांमुळे एखाद्या व्यक्तीला ज्या क्षेत्राची आवड त्या क्षेत्राशी निगडित
राहता येते. समान विचार, आवडी- निवडी असलेले लोक एकत्र येतात, त्यांच्यात संवाद निर्माण
होतो आहे, वाढतो. संगीत, नाट्य, शिक्षण, पार्यावरण इत्यादी क्षेत्रातले असे अनेक अभ्यासगट
समाज माध्यमांव्दारे एकत्र काम करीत आहेत.
·
जगभरातील घटनांची
माहिती- जगभरात घटना-या घटनांची माहिती, घटना घडताच जगभर पोहोचते आहे. जग वैश्विक खेडे
बनले, त्याची प्रचीती यातून येते.
·
नवतंत्रज्ञानाचा प्रसार- समाज माध्यमांमुळे नवतंत्रज्ञानाचा प्रसारही जगभरात
तात्काळ होतो आहे. पूर्वी जे तंत्रज्ञान भारतात यायला दहापेक्षा अधिक वर्षे लागायची
, ते आता काही महिन्यात भारतात येत आहे.
·
आपत्ती व्यवस्थापन
– आपत्तीच्या काळात समाज माध्यमे लोकांना संकटातून सोडविण्यासाठी उपयोगी ठरतात. इराकमधून
भारतीयांना सोडविण्यात, केदारनाथ अपत्तीतून लोकांची सुटका करण्यात हे दिसले.
·
जनमत घडविणे –
समाज माध्यमे जनमत घडविण्याचे मोठे कार्य करतात. इजिप्तसह अनेक देशात समाज माध्यमांनी
जनमत घडविण्यातही मोठी भूमिका बजावली . भारतातही अण्णा हजारे यांच्या 2014 मधील आंदोलनाच्या
काळात समाज माध्यमांनी मोठी जागृती घडविली होती. लोकसभा निवणुकतही या माध्यमांची ताकद
दिसून आली.
छोटया गावापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत समाजजीवन ढवळून टाकण्याचे काम समाज
माध्यमांनी केले आहे. समाज माध्यमांव्दारे एकत्र आलेल्या जनतेने आपल्या देशातील हुकूमशाही
राजवटी उलथवून लोकशाहीची पुर्नस्थापना करण्याचे काम अनेक देशात केले आहे. राजकीय प्रचारासाठी
तर आता समाज माध्यमे हेच सर्वात महत्वाचे साधन बनले आहे. समाज माध्यमांच्याव्दारे लक्षावधी
लोकांशी संपर्क साधने सहज शक्य होते आणि तेही जवळपास विनाशुल्क. कोणतेही तंत्रज्ञान
वाईट, दुजाभाव करणारे नसते. समाज माध्यमेही
मूलतः चांगलीच आहेत, या माध्यमांची गुणवैशिष्टयेही खूप आहेत . मात्र या समाज माध्यमांचा
गैरवापरच अधिक होत असल्याचे चित्र आहे.
“सोशल मीडिया
बन गया है एक नया संसार
जिसमें
बढ़ता जा रहा है सूचना का भण्डार
सच
और झूठ से नहीं रहा अब कोई वास्ता
सबकी
अपनी मंज़िलें सबका अपना रास्ता”
अभय गौड यांच्या कवितेतील
या ओळी खूप काही सांगून जातात.
समाज माध्यमांचा जो गैरवापर होत आहे, त्यामुळे समाजावर होणा-या वाईट परिणामांची चर्चा करणेही गरजेचे झाले आहे.
समाज माध्यमांचा जो गैरवापर होत आहे, त्यामुळे समाजावर होणा-या वाईट परिणामांची चर्चा करणेही गरजेचे झाले आहे.
·
फेक न्यूज (खोटया बातम्या) – फेक न्यूज
हे समाज माध्यमांसमोरील सध्याचे एक सर्वात मोठे आव्हान आहे. समाज माध्यमातून खोट्या
बातम्या फार गतीने आणि सर्वत्र पोहोचतात. फेक न्यूजचा वापर समाजामध्ये गैरसमज निर्माण
करण्यासाठी, परस्परांविषयी द्वेष निर्माण करण्यासाठी, राजकीय स्वार्थ साधण्यासाठी केला
जातो. सर्वसामान्य माणसाला खरी बातमी कोणती आणि खोटी बातमी कोणती हे समजणे शक्य नसते.
त्यामुळे बातमीची सत्य-असत्यता पारखण्याआधीच हिंसा, जाळपोळ असे प्रकार घडतात. गुगल
आणि इतर काही संस्थांनी फेक न्यूज ओळखण्यासाठी काही चाचण्या विकसित केल्या आहेत. मात्र
त्याची माहिती सर्वसामान्यांना नाही आणि या तंत्राद्वारे सर्वच फेक न्यूज ओळखल्या जातील
असेही सांगता येत नाही. भारत सरकारने समाज माध्यमांवरील फेक न्यूज आणि अफवा रोखण्यासंदर्भात
वेळोवेळी काही नियम, कायदे करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्यांचा फार परिणाम दिसून
आलेला नाही. काही वेळा काही भागातील इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचाही उपाय योजला गेला.
महाराष्ट्रात धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे जुलै 2018 मध्ये घडलेली घटना तर माणुसकीला
काळीमा फासणारी आहे. मुले चोरणारी टोळी आली आहे या व्हॉटसअप वरून पसरलेल्या अफवेमुळे
जमावाने तेथे पाच निरपराध तरुणांना ठार केले. हे पाच करून सोलापूर जिल्हयातील मंगळवेढा
भागातील बहुरूपी समाजातील लोक होते. बीड जिल्हयातही अशाच प्रकारे रोजगाराच्या शोधात
आलेल्या गरीब लोकांना जमावाने मारहाण केल्याचे प्रकार घडले. देशात मागील वर्षभरात अशा
प्रकारात 33 निरपराध लोकांचा जीव गेला आहे.
·
ट्रोलिंग – समाज माध्यमांचा दुसरा गैरवापर
ट्रोलिंगसाठी केला जातो. यात एखादया व्यक्तीला लक्ष्य करुन समाज माध्यमांवर त्याची
बदनामी केली जाती, अश्लील, विखारी भाषेत टीका केली जाते. विशेषतः आपली परखड मते समाज
माध्यमांव्दारे मांडणा-या युवती, महिलांना यात अधिक लक्ष्य केले जाते. ट्रोलिंगसाठी प्रामुख्याने
व्टिटरचा वापर केला जातो. गुरमेहर कौरपासून
पत्रकार बरखा दत्त यांच्यापर्यत हजारो महिलांना ट्रोलिंगचा त्रास सहन करावा लागला आहे.
यात बदनामीपासून थेट बलात्काराची धमकी देण्यापर्यंत या ट्रोलर्सनी उच्छाद मांडला आहे.
पुरुष विचारवंत, लेखक , पत्रकारांनाही खुनाच्या धमक्या दिल्या गेल्या आहेत. दहशत निर्माण
करणा-या ट्रोलर्सला आळा घालू शकणारा प्रभावी कायदा अद्यापही झाला नाही. काही राजकीय
पक्षंनी तर ट्रोल आर्मीच उभी केली आहे. त्यांच्या पक्षावर टीका करणा-यांवट ही ट्रोलधाड
तुटून पडते. विरोधकांची यथेच्छ बदनामी करण्याची,देशद्रोही ठरविण्याची, त्यांना जीवे
मारण्याची धमकी देण्याची मोहीमच उघडली जाते. समाज माध्यमे म्हणजे मुक्त अभिव्यक्तीची
व्यासपीठे असे म्हटले जाते, मात्र असे करु पाहणारांचा आवाज दडपण्याचे प्रकारच जास्त
घडत आहेत.
·
युवापिढीला व्यसन - समाज माध्यमे ही
तरुण पिढीसाठी एखाद्या व्यसनाप्रमाणे बनली आहेत. या समाज माध्यमांच्या आहारी गेलेल्या
तरुण पिढीचे आरोग्य यामुळे धोक्यात आले आहे. देश उभारणीसाठी झटण्यापेक्षा समाजमाध्यमांवर
पडिक असलेली तरुण पिढी पाहायला मिळते आहे. नैराश्य, मानसिक आजार,वाढती गुन्हेगारी हे प्रकार
तरुण पिढीत वाढत आहेत. गुड मॉर्निंग गुड नाईट यासारखे कोट्यवधी संदेश पाठवण्यात धन्यता
मानणा-या भारतीयांमुळे जगभरातील इंटरनेट यंत्रणा ठप्प झाल्याची उदाहरणे आहेत.
·
अश्लीलतेचा प्रसार – समाज माध्यमांव्दारे
किशोरवयीन व तरुण पीढीला अश्लील चित्रफिती, मजकूर सहज उपलब्ध होतो. या समाज माध्यमांव्दारे
मुली, महिलांना धमकावण्याचे, ब्लॅकमेल करण्याचे प्रकार सर्रास घडतात. समाज माध्यमांवर
त्यांची बदनामी करण्याची धमकी देऊन, बलात्कार केला गेल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले
आहेत.
·
जातीय, धार्मिक विव्देष – भारतीय समाज जसजसा अधिक शिक्षित, प्रगत होत आहे
तसतशी जातीयता, धर्मांधता कमी होईल असे वाटत होते. भारतीय घटनेनेही यापुढचा भारतीय
समाज जातीभेद, धर्मभेद न माननारा असावा अशी अपेक्षा केली आहे. मात्र वास्तव चित्र नेमके
उलट आहे. राजकीय आणि आरक्षणाच्या लाभासाठी आपल्या जातीला, धर्माला अधिक कवटाळून समाज
माध्यमांव्दारे जातीय, धार्मिक विव्देष पसरविण्याचे प्रकार सर्वत्र घडत आहेत.
·
प्रशिक्षणाचा अभाव- समाज माध्यमे म्हणजे
तंत्रज्ञानाचा अदभूत अविष्कार आहे. मात्र ही संवेदनशील माध्यमे कोणत्याही प्रशिक्षणाविना
प्रत्येकाच्या हातात आली आहेत. त्यामुळे या माध्यमांचा वापर कसा करावा याबाबतची समाज
माध्यम साक्षरता भारतीय समाजाला ठाऊकच नाही. ही समाज माध्यम साक्षरता निर्माण करण्याचे
आणि रुजविण्याचे मोठे आव्हान आपल्या देशासमोर आहे.
·
कायद्याच्या मर्यादा –फेसबुक, व्हॉटसअप,
यु ट्यूब, व्टिटर, इन्स्टाग्राम, लिंक्डइन, माय स्पेस, गुगल प्लस यासारख्या समाज माध्यमांची
मालकी-या बहुराष्ट्रीय कंपन्याकडे आहे. त्यांचे लक्ष मिळणा-या नफ्याकडे आहे. त्यामुळे
सदस्यांची खाजगी माहिती विकण्याचेही प्रकार त्यांनी केले. महापुरुषांची , महिलांची
बदनामी होत असल्याच्या तक्रारी आल्यावरही या कंपन्या कारवाई करत नाहीत. भारत सरकारने
विनंती करुनही लवकर लक्ष देत नाहीत. यासंदर्भात आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभावी ठरतील
असे कायदे नाहीत.
·
वाढते गुन्हे – फेसबुक, व्हॉटसपच्या
माध्यमातून आर्थिक फसवणूक केल्याचे गुन्हे वाढत आहेत. वृध्द, अज्ञानी लोकांना यात लक्ष
केले जात आहे. पासवर्ड मिळवून नागरिकांचे पैसे लुबाडणा-यांची संख्याही मोठी आहे.
या सर्व बाबी विचारात घेता समाज माध्यमांच्या गैरवापराला
आणि फेक न्यूज ला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने प्रभावी कायदे करण्याची आणि ते कायदे
प्रभावीपणे अमलात आणण्याची गरज प्रकर्षाने जाणवते. भारतातील नागरिकांना घटनेने अभिव्यक्ती
स्वातंत्र्यांची अनमोल देणगी दिली आहे. हे स्वातंत्र्य अबाधित राहिलेच पाहिजे, मात्र
या स्वातंत्र्याच्या आडून भारतीय जनतेमध्ये खोट्या बातम्या, गैरसमज पसरविणा-या, जाती-धर्मामध्ये
तेढ निर्माण करणा-या विषवल्लीला पायबंद घालण्याची
नितांत गरज आहे.
No comments:
Post a Comment