Sunday, May 15, 2011

श्रमिक पत्रकारांना सुगीचे दिवस

                       मराठी पत्रसृष्टीत सध्या मोठी खळबळ उडाली आहे.भास्कर वृत्तपत्र समूहाच्या दिव्य मराठी वृत्तपत्राने मराठवाड्यावर स्वारी केली आहे.पुण्यनगरीत बेनेट आणि कोलमन कंपनीच्या महाराष्ट्र टाईम्सने धमाल उडविली आहे.या दोन बलाढ्य  वृत्तपत्र समूहांच्या   हालचालींमुळे बाकीची वृत्तपत्रेही खडबडून जागी झाली आहेत.कोणी लेआउट बदलले, कोणी इतरत्र गेलेल्या पत्रकारांच्या जागी नवी माणसे घेतली, कोणी वितरणाच्या नव्या योजना अमलात आणल्या तर कोणी वाचक मेळावे व लेखक मेळावे घेण्याचा सपाटा सुरु केला.नव्याने आगमन करणार्‍या वृत्तपत्रांनी वर्गणीदार मिळविण्यासाठी अफलातून फंडे अवलंबिले आहेत.यात वाचकांचे मात्र चांगभले होत आहे. वर्तमानपत्रासाठी लागणार्‍या खर्चापेक्षा त्याच्या रद्दीची किंमत अधिक मिळत असेल तर मराठी वृत्तपत्र वाचकांची संख्या झपाट्याने वाढणार हे शेंबडे पोरही सांगू शकेल.
                     आज कोण-कोण कोणत्या वृत्तपत्रात गेले आणि कोणाला किती लाखाचे पॅकेज मिळाले हा चविष्ट चर्चेचा विषय बनला आहे.मराठी वृत्तपत्रांच्या क्षेत्रात श्रमिक पत्रकारांसाठी कधी नव्हे ते सुगीचे दिवस आले आहेत.पत्रकार खरे तर  समाजातील सर्व प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करतात, पण पत्रकारांच्या प्रश्नांना कोणी वाली नसते.बर्‍याच वृत्तपत्रात अगदी कमी पगारावर पत्रकारांना राबवून घेतले जाते.या स्पर्धेच्या निमित्ताने निदान काही पत्रकारांना तुलनेने चांगले पॅकेज मिळाले याचा आनंद आहे.
                     पत्रकारितेच्या क्षेत्रात कामाचे तास निश्चित नसतात, अधिक तास कामाचा मोबदलाही मिळत नाही.तरीही पत्रकारितेची धुंदी अशी असते की, पत्रकार काम करतच राहतो.सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री दोन-तीन वाजेपर्यंत राबणारे अनेक पत्रकार आहेत.वैयक्तिक आयुष्य नावाचा प्रकारच यात शिल्लक उरत नाही,हवी तेव्हा रजाही मिळत नाही. अगदी घरातल्या कोणाचे लग्न असले तरी सांगितले जाते, तुझे लग्न नाही ना? तुझ्यावाचून तिथे काही अडणार नाही, मग कशाला हवी तीन दिवसांची रजा?पत्रकारांच्या कामाच्या तुलनेत पगार कमीच होते.आताही काहींचीच स्थिती सुधारली आहे, अजून खूप पत्रकारांची स्थिती तशीच कायम आहे.पण हेही दिवस जातील अशी आशा वाटू लागली आहे.
                     महाराष्ट्रात लवकरच आणखी काही मराठी वृत्तपत्रे सुरु होणार आहेत. यामुळे दोन चांगल्या गोष्टी घडतील अशी अपेक्षा आहे.एक म्हणजे पत्रकारांना अधिक व चांगल्या संधी मिळतील आणि दुसरे म्हणजे मराठी वृत्तपत्रांची गुणवत्ता सुधारेल.सध्या एकदोन अपवाद वगळता मराठी वृत्तपत्रे अशी निघतात की ती पाच मिनिटेही सलगपणे वाचावी वाटत नाहीत. स्थानिक भाषेचा सुगंध त्यातून दरवळत नाही. साहित्यापासून तर वृत्तपत्रे फटकूनच असतात. महाराष्ट्रात नाव असलेल्या दोन-तीन लेखकांच्या सदरांचा रतीब घातला की पुरवणी झाली दर्जेदार असाच त्यांचा समज आहे.मराठी वाचकाला नवे काही वाचायला मिळेल अशी अपेक्षा बाळगायलाही काही हरकत नाही. त्यामुळे नवे आक्रमण असले तरी त्याचे स्वागतच करायला हवे, नाही का?

                   
                      

1 comment:

  1. खरं आहे सर तुमचं म्हणणं. सुगीचे दिवस आले श्रमिक पत्रकारांना पण तेवढीच दयनीय स्थिति पत्रकारितेत भवितव्य करू इच्छिणार्याी, नुकतच पत्रकारिता प्रशिक्षण पूर्ण करणार्यात मुलांची इहली आहे. दिव्य मराठी आताच सुरू झाला. जळगावला सुरू होण्याच्या मार्गावर आहे आणि अकोल्याचा बेत चालू आहे पण यात नवीन मुलांना नौकरी मिळण्याचं प्रमाण बघाल तर एक टक्का ही नाही. हे सगळं यासाठी सांगतोय कारण मी सध्या त्याच वेळेतून जात आहो. एक तर संपादकांशी भेटण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. जर एखादे भेटलेच तर आम्ही सांगू याशिवाय दुसरं उत्तर मिळत नाही किव्वा फार फार तर एखादी बातमी लिहायला लावतात. आम्ही वाट पाहत बसतो फोन ची, मेल ची. पण येत नाही. कधी चुकून एखाद्या वृत्तपत्रात जागा निघाल्याच तर किमान पाच वर्षाचा अनुभव आवश्यक म्हणजे नवीन मुलांना येथेही संधी नाही. खरं तर अजून खूप लिहायचं होतं. पण नंतर लिहिल.
    पराग अ मगर
    मू. पो. पवनार, त. जि. वर्धा.
    Email- paragmagar8@gmail.com
    Mo- 8275553566

    ReplyDelete

कोण होतास तू काय झालास तू ?

खींचो न कमान को न तलवार निकालो जब तोप मुक़ाबिल हो तो अख़बार निकालो भारतावर इंग्रजांची राजवट होती त्या काळात अकबर इलाहाबादी यांनी लिहिलेला हा...