अमेरिकेचा खरा चेहरा
उघड करणारा आणि या बलाढय महाशक्तीला हादरविणारा शोधपत्रकार ज्युलिअन असांज सध्या
मोठया अडचणीत सापडला आहे. ज्युलिअन असांज हा मूळचा ऑस्ट्रेलिअन नागरिक . वयाच्या
35 व्या वर्षी म्हणजे इ.स. 2006 मध्ये त्याने काही सहकार्यांच्या मदतीने विकिलिक्स
या ऑनलाईन वृत्तपत्राची सुरुवात करुन, इंटरनेटवरील शोधपत्रकारितेच्या क्षेत्रातील
कारकीर्दीला सुरुवात केली. अमेरिकेची अनेक
गुप्त कागदपत्रे व संदेश उघड करुन ज्युलिअन असांज यांनी अमेरिकेची झोप उडवली.
अमेरिकेची गुप्त खलबते कशी चालतात ते त्यांनी उघड केले. आंतरराष्ट्रीय राजकारणातील
अमेरिकेचा दुष्ट चेहरा त्यान्मुळे सर्वांना दिसला. विशेषतः अमेरिकेने अफगानिस्तान
आणि इराकमध्ये केलेल्या लष्करी हस्तक्षेपाच्या वेळी केलेल्या अतिरेकाची सविस्तर
माहिती विकिलिक्सने उघड केली. त्यामुळे अमेरिकेचा शांतता रक्षणाचा आव आणणारा
मुखवटा गळून पडला. अमेरिका जगातील इतर अनेक देशांना कशी कस्पटासमान वागणूक देते व
आपल्या स्वार्थासाठी प्रसंगी निरपराध नागरिकांचेही बळी घेण्यास कचरत नाही हे यातून
जगाला दिसले. ज्युलिअन असांज यांनी इतर अनेक देशांचीही अनेक गुपिते उघडकीस आणली
त्यामुळे अनेक देशांच्या प्रमुखांना असांज यांचा आवाज कायमचा बंद करण्याची इच्छा
आहे. अमेरिकेने तर असांज यांचा आवाज दडण्यासाठी जंग-जंग पछाडले, ज्या कंपन्यांच्या
तांत्रिक मदतीने विकिलिक्सची वेबसाईट उपलब्ध करुन दिली जाते त्या कंपन्यांवर दडपण
आणून त्या वेबसाईट बंद पाडण्याचे अनेक प्रयत्न झाले , पण प्रत्येकवेळी नव्या
ठिकाणाहून बातम्यांचे प्रसारण सुरु ठेऊन असांज यांनी विकिलिक्सला जिवंत ठेवले. या
सार्या प्रक्रियेत जगभरातून अनेक लोक विकिलिक्सला सहकार्य करण्यासाठी पुढे आले.
विकिलिक्स ही वेबसाईट साम्राज्यवादयांचे, भ्रष्टाचार्यांचे बुरखे फाडून सत्य
जगासमोर मांडणारी संस्था आहे हे जाणवल्याने विकिलिक्स आणि असांज यांना बातम्या
पुरविणारे व या कार्यात पाठिंबा देणारे लोक असंख्य आहेत. इंटरनेटच्या सामथ्र्याचा
पुरेपूर वापर करीत असांज व सहकार्यांनी वेगवेगळ्या देशातून विकिलिक्सचे प्रसारण
सुरुच ठेवले.
अमेरिकेची लष्करी
गुपिते विकिलिक्सला दिल्याच्या संशयावरुन अमेरिकेने ब्रॅडले मॅनिंग या सैनिकाला मे
2010 पासून तुरुंगात ठेवले आहे.दोन वर्षाहून अधिक काळ लोटला तरी त्याच्या चौकशीचे
काम पूर्ण करण्यात आलेले नाही. त्याचा तुरुंगात अतोनात छळ केला जात आहे ,तो थांबवा
व त्याच्यावरील आरोपाच्या सुनावणीच्या वेळी आमच्या प्रतिनिधीला उपस्थित राहू दया
या संयुक्त राष्ट्रसंघाच्या विनंतीलाही
अमेरिकेने जुमानले नाही. अम्नेस्टी इंटरनॅशनलसह अनेक संस्था व व्यक्तींनीही
याप्रकरणी अमेरिकेला विनंती केली पण, अमेरिकेने त्याकडे दुर्लक्ष केले.विकिलिक्सची
बँकांमधील खाती ठप्प करण्यात आली आहेत .या पार्श्वभूमीवर असांज यांच्याबाबत जे
घडते आहे त्याकडे पाहावे. कारण असांज यांच्याबाबतच्या घटना मे 2010 नंतर काही
कालावधीतच घडल्या आहेत.
असांज यांच्या
शोधपत्रकारितेचा गौरव अनेकांनी केला आहे. पण अमेरिका आणि त्यांच्या अंकित असणार्या
देशातील सत्ताधार्यांच्या डोळ्यात ते सलत आहेत. असांज यांना कसे आणि कुठे अडकविता
येईल याचा हे सारे शोध घेत होते. अखेरीस 2010 मध्ये असांज स्वीडनमध्ये एका
कार्यक्रमाच्या निमित्ताने गेले असताना तेधे घडलेल्या एका घटनेमुळे असांज यांच्या
विरोधात कारवाई करायला कारण मिळाले आहे. ऑगस्ट 2010 मध्ये दोन स्वीडनमधील दोन
महिलांनी असांज यांच्याविरोधात पोलिसात तक्रार केली, त्यानुसार असांज यांनी यातील
एका महिलेवर बलात्कार केल्याचा तर एका महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. पोलिसात
तक्रार दाखल झाल्यावर एका अधिकार्याने या तक्रारीत फारसे तथ्य नाही असा
निर्वाळा देऊन असांज यांच्यावर कारवाईची
गरज नसल्याचे सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी दुसर्या अधिकार्याने ही केस
पुन्हा तपासासाठी हाती घेतली व असांज यांच्यावरचे आरोपपत्र ठेवावे असा निर्णय
घेतला. दरम्यानच्या काळात असांज इंग्लंडमध्ये आले होते.त्यामुळे स्वीडनने असांज
यांच्याविरुध्द आंतरराष्ट्रीय वॉरंट काढले. असांज यांना चोकशीसाठी आमच्या ताब्यात
दयावे अशी मागणी स्वीडनने इंग्लंडकडे केली. असांज इंग्लंडमधील पोलिसांपुढे हजर झाले व त्यांनी
तेथील न्यायालयात अपील केले. आपण निर्दोष असून मला या प्रकरणात गोवण्यात येत आहे,
मला स्वीडनला नेल्यावर अमेरिकेच्या हवाली करण्यात येईल व ठार मारले जाईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
आपणास स्वीडनच्या हवाली करु नये , जी काही चौकशी करायची असेल ती स्वीडन पोलिसांनी
इंग्लंडमध्ये येऊन करावी अशी विनंती असांज यांनी न्यायालयाकडे केली. मात्र
प्रारंभी जिल्हा न्यायालयाने , नंतर उच्च तसेच सर्वोच्च न्यालयाने असांज यांची
विनंती फेटाळत असांज यांना स्वीडन पोलिसांच्या हवाली करावे असा आदेश दिला. हा सारा
घटनाक्रम लक्षात घेता असांज म्हणतात त्याप्रमाणे अमेरिकेच्या सांगण्यावरुन हे सारे
घडत असावे ही शंका नाकारता येत नाही. कारण इंग्लंड, स्वीडन हे आंतरराष्ट्रीय
राजकारणात अमेरिकाधार्जिने देश म्ह्णून ओळखले जातात.
सारे उपाय
खुंटल्यावर असांज यांनी नवी युक्ती लढविली आणि 19 जून 2012 रोजी लंडन शहरात
असलेल्या इक्वेडोर देशाच्या वकिलातीत आश्रय घेतला. मागील दोन महिन्यांपासून असांज
या वकिलातीच्या एका खोलीत आहेत. वकिलातींबाबत आंतरराष्ट्रीय नियम असे आहेत की
कोणत्याही देशाच्या पोलिसांना अथवा लष्कराला त्या वकिलातीत प्रवेश करता येत नाही.
रशियाला हव्या असणार्या एका व्यक्तीने अमेरिकेच्या वकिलातीत तब्बल पंधरा वर्षे
मुक्काम ठोकला होता व रशियाला काहीच करता आले नव्ह्ते .
इक्वेडोर हा लॅटिन
अमेरिकन देश आहे. या देशाच्या अध्यक्षांनी असांज यांना राजकीय आश्रय देणार
असल्याचे जाहीर करुन खळबळ उडवून दिली आहे.अमेरिका, इंग्लंडसह अनेक देशात असांज
यांचे समर्थक असांज यांना इक्वेडोरमध्ये जाऊ दयावे अशी मागणी करीत निदशंने करीत
आहेत. त्यामुळे इंग्लंडची तगमग होत आहे. आम्ही लंडनमधील इक्वेडोरच्या वकिलातीत घुसून
असांज यांना अटक करु असे इंग्लंडने जाहीर केल्याने तणाव वाढला आहे. इक्वेडोरने
इंग्लंडच्या या भूमिकेबद्दल आश्चर्य व्यक्त करुन आंतरराष्ट्रीय कायदयाचे उल्लंघन
करु नका असा सल्ला इंग्लंडला दिला आहे. अनेक लॅटिन अमेरिकन देशांनी इक्वेडोरच्या
यांच्या भूमिकेला पाठिंबा दिल्याने इंग्लंडलाही अशी कारवाई करता येणार नाही.
आपल्या पत्रकारितेने
जग हादरविणारे असांज संकटात आहेत, पण ते हिंमत हरलेले नाहीत.19 ऑगस्ट 2012 रोजी
लंडनमधील इक्वेडोरच्या वकिलातीच्या दरवाजामध्ये उभे राहून त्यांनी भाषण केले.
त्यात ते म्ह्णाले “व्यक्ती व माध्यम
स्वातंत्र्यावर बंधने घालण्याचे प्रकार जगभर वाढत आहेत.मला पकडण्यास पोलिसांनी
वकिलातीच्या इमारतीला वेढा घातला , पण अनेक नागरिक इमारतीबाहेर मला पाठिंबा
देण्यास उभे असल्याने त्यांच्या माध्यमातून जगाला हे दिसले , त्यामुळे अजून तरी
मला अटक झालेली नाही.”
असांज इक्वेडोरमध्ये पोहोचू शकतील का? की
इंग्लंडचे पोलिस त्यांना अटक करुन स्वीडनच्या हवाली करतील हे लवकरच स्पष्ट होईल.
पण वातावरण खूप तापले आहे हे नक्की. एका बाजूला उघडपणे इंग्लंड, स्वीडन , अमेरिका
व ऑस्ट्रेलिया तर दुसर्या बाजूला इक्वेडोर व इतर लॅटीन अमेरिकन देश असा हा संघर्ष
आहे.
आपल्या नीडर पत्रकारितेने
जगाला हादरविणार्या असांज यांचे भवितव्य अधांतरी आहे . पुढे काय घडते ते
पाहण्याची सार्या जगाला उत्सुकता आहे. असांज यांच्यासारख्या पत्रकाराचा यात बळी
जाऊ नये असे प्रत्येक सुबुध्द नागरिकाला वाटेल हे मात्र नक्की.
No comments:
Post a Comment