Monday, September 24, 2012

छोटया पडदयावरचा सर्वात मोठा सूत्रसंचालक


तो आला, त्याने पाहिले आणि त्याने जिंकले ’ या शब्दात अमिताभ बच्चन यांच्या छोटया पडदयावरील  आगमनाचे वर्णन करता येईल. मोठा पडदा तर अमिताभ यांनी 1973 मध्ये जंजीर सिनेमापासून काबीज केला होता आणि तेव्हापासून तब्बल चाळीस वर्षे झाली तरी मोठ्या पडदयावरील अमिताभची जादू ओसरलेली नाही. सुपरस्टार हा शब्दही त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यात कमी पडू लागला, तेव्हा ‘ बिग बी ’ हे अनोखे नामाभिधान त्यांना लाभले.

 इ.स. 2000 साली बिग सिनर्जी या प्रॉडक्शन कंपनीतर्फे स्टार टीव्हीवर प्रथमच ‘कौन बनेगा करोडपती’ ( केबीसी) या गेम शो व्दारे अमिताभ यांचे छोटया पडदयावर आगमन झाले आणि छोटा पडदा मोठा झाल्यासारखे वाटू लागले. अमिताभ यांच्या सूत्रसंचालनाने टीव्हीवरील सूत्रसंचालनाला हिमालयाची उंची मिळवून दिली.खरे तर केबीसी काही फार वेगळा, असामान्य शो नाही. इंग्लंडमधील ‘ हू विल बिकेम अ मिलिनिअर ’ या गेम शो चे अनुकरण करुन हा कार्यक्रम सुरु झाला. पण या सर्वसामान्य कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना अमिताभ यांनी किमया केली. त्यामुळेच 7 सप्टेंबर 2012 पासून सुरु झालेल्या सहाव्या सीझनमध्येही केबीसीची लोकप्रियता अत्युच्च पातळीवर आहे. अमिताभ  सूत्रसंचालक नसते तर काही दिवस कसाबसा चालून हा गेम शो इतर गेम शो प्रमाणे वर्षभरातच बंद पडला असता. सूत्रसंचालक अमिताभ हीच या गेम शो ची खरी ताकद आहे. 2007 मध्ये सुपरस्टार शाहरुख यांना सूत्रसंचालक बनवून केबीसी चा चौथा सीझन पार पडला. पण त्यानंतर तीन वर्षे निर्माता शांत होता, यातच सारे आले. 2010 मध्ये पुन्हा अमिताभ यांना घेऊन स्टार ऐवजी सोनी टीव्हीवर केबीसीचा पाचवा सीझन सुरु झाला, तेव्हा पुन्हा या गेम शो ला पूर्वीची झळाळी प्राप्त झाली. 2012 मधील केबीसीच्या सहाव्या सीझनसाठी निर्मात्यांना अमिताभ यांच्या जागी दुसर्‍या सूत्रसंचालकाला घेण्याचा विचारही मनात आणता आला नाही.

सूत्रसंचालक म्हणून अमिताभ यांनी छोटया पडदयाला खूप काही दिले आहे.त्यांच्या भाषेची शुध्दता हे पहिले वैशिष्टय आहे.ते जेव्हा हिंदी बोलतात तेव्हा शुध्द हिंदी बोलतात , प्रसंगी काही इंग्रजी वाक्ये बोलतात तेव्हा शुध्द इंग्रजी बोलतात. ते कधीही भाषेची सरमिसळ करीत नाहीत. एक तपापूर्वी म्ह्णजे 2000 साली केबीसीची सुरुवात झाली तेव्हापासून  आर.डी. तेलंग अमिताभ यांच्यासाठी संवाद लिहितात, तेलंग केबीसीच्या प्रारंभीच्या काळातील आठवण सांगतात की ‘‘केबीसीची सुरुवात झाली त्या काळात, टेलिव्हीजनवरचा प्रत्येक सूत्रसंचालक हिंग्लिश भाषा वापरत असे,त्याच्या संवादाची सुरुवात  Hey guys’, Hi friends  अशी व्हायची. पण अमिताभ यांनी जाणीवपूर्वक शुध्द हिंदी भाषेचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आणि आता बारा वर्षानंतरही लोक त्यांबी शुध्द हिंदी ऐकायला आतुरलेले असतात. त्यांच्या संवादाची सुरुवात नमस्कार, आदाब, सत श्री अकाल या शब्दांनी होते.

 अमिताभ ज्या ताकदीने शब्दफेक करतात त्या ताकदीने इतर कोणालाही शब्दफेक करता आलेली नाही हे दुसरे वैशिष्टय. तेलंग याबाबत म्ह्णतात की ‘’अमिताभ यांच्यासाठी किरकोळ शब्द संवादात लिहिणे शक्यच नाही, त्यांच्यासाठी वजनदार शब्द योजावे लागतात.त्यामुळे हे संवाद लिहिणे आव्हानात्मक असते.अमिताभ यांच्या तोंडून  ‘ यूं गया और यूं आया ’ हे साधे वाक्य देखील ऐकताना मह्त्वाचे वाटायला लागते.’’

 सहभागी व्यक्तींशी अमिताभ ज्या अदबीने, आत्मीयतेने वागतात ते तिसरे वैशिष्टय. या गेम शो मध्ये हरुनही सहभागी स्पर्धकाला अभिमान वाटतो की,अमिताभ यांची भेट तर झाली. एकाने तर बोलूनही दाखविले ‘ आपसे मुलाकात यही सौ करोड के बराबर है. ’दुसरा स्पर्धक म्ह्णतो ‘आज मेरे भगवान से मेरी मुलाकात हो गई ’.यात बरीच अतिशयोक्ती असेलही पण भावना मात्र खरी आहे. अन्नू मलिक , फराह खान, सुनिधी चौहान,हिमेश रेशमिया त्यांचा सहभाग असलेल्या टेलिविजन शोमध्ये ज्या पध्दतीने स्पर्धकांचा अपमान करतात,त्यांची खिल्ली उडवतात, घाणेरडे शब्द वापरतात, सेटवर आपसात भांडणे करतात ते पाहिल्यावर तर अमिताभ यांचे वेगळेपण व मोठेपण अधिकच भावते. अमिताभ यांना त्यांच्या चाहत्यांनी तर देवत्वच बहाल केले आहे.केबीसीमध्ये ज्या स्पर्धकांना सहभागाची संधी मिळते ते स्वर्गप्राप्ती केल्याच्या आनंदात असतात. यातील अनेकजण अमिताभ यांना आनंदातिरेकाने मिठी मारतात. त्यावेळी त्या महिलेच्या पतीच्या, मुलीच्या पित्याच्या डोळ्यातही आनंदाश्रू तरळतात. आपली पत्नी,मुलगी एका सिनेमा नटाला मिठी मारते आहे अशी क्षुद्र भावना कोणाच्याही अगदी प्रेक्षकाच्याही मनाला स्पर्श करीत नाही, हे अमिताभ या व्यक्तीमत्वाविषयी प्रत्येकाच्या मनात असलेल्या आदराचे प्रतिबिंब आहे. सिनेमासारख्या बदनाम क्षेत्रात एवढी वर्षे राहूनही अमिताभ यांचे मोठेपण सातत्याने वाढतच गेले आहे.वयाची 69 वर्षे झाली तरी अमिताभ यांचा करिष्मा कायम आहे.केबीसीपेक्षा अमिताभ यांची उंची कितीतरी पट अधिक आहे, त्या उंचीनेच केबीसीला लोकप्रियता मिळवून दिली व टेलिव्हीजन शोमध्ये सतत सर्वाधिक टीआरपी मिळवून दिला आहे. अमिताभ यांच्याइतका कसदार , बहारदार, सभ्य, नम्र आणि तितकाच लोकपिय सूत्रसंचालक आजवर छोट्या पडदयाला लाभलेला नाही.म्ह्णून म्ह्णावेसे वाटते ‘ झाले बहू , होतील बहू, पण यासम हाच.’ छोटया पडदयावरच्या या सर्वात मोठया सूत्रसंचालकाला मानाचा मुजरा.

No comments:

Post a Comment

शंभर वर्षानंतरही रुपयाची समस्या कायम

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दूरदर्शी अर्थशास्त्रज्ञ होते. 1923 साली म्हणजेच शंभर वर्षापूर्वी त्यांनी त्यांच्या डॉक्टरेट प्रबंधात भारतातील ...