Saturday, July 21, 2012

दुर्योधन, दुःशासन आणि शकुनीमामा



मानवतेला काळीमा फासणारी एक घटना आसामची राजधानी गोहाती येथे अशातच घडली आणि संपूर्ण देशभर त्याबाबत संतापाची प्रतिक्रिया उमटली. आधुनिक दुर्योधन, दुःशासन आणि शकुनीमामा यांच्यमुळे घडलेल्या घटनेमुळे आजचे पत्रकार व आजची पत्रकारिता याबाबत नव्याने चर्चेला प्रारंभ झाला आहे.
ही घटना आहे 9 जुलै 2012 रोजी रात्री नऊच्या सुमारासची.गोहातीच्या गजबजलेल्या रस्त्यावरील एका पबमध्ये एक 17 वर्षाची मुलगी आपल्या मित्राच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गेली होती.चार मुली व दोन मुले असे एकंदर सहाजण एकत्र जमले होते.त्यांच्यात काही कारणावरुन भांडण झाले आणि पबच्या व्यवस्थापनाने त्यांना पबबाहेर काढले. हे सारे घडत असताना एक व्यक्ती मोबाईलव्दारे शूटींग करु लागला, त्याला या तरुणीने आक्षेप घेतला असता त्या व्यक्तीने आपण पत्रकार असल्याचे सांगितले. त्यानंतर जे घडले ते अतर्क्य आणि माणुसकीला काळीमा फासणारे होते. त्या पत्रकाराने काही लोकांना बोलावून त्या मुलीला येथून हलू देऊ नका असे सांगितले आणि आपल्या टेलिव्हिजन चॅनलला फोन करुन मोठा टीव्ही कॅमेरा मागवला. जवळपास वीस जणांच्या जमावाने त्या मुलीला घेरले आणि या आधुनिक दुर्योधन, दुःशासनांचा हैदोस सुरु झाला.त्या मुलीची धिंड , छेड काढण्यात आली आणि भररस्त्यावर तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न झाला. गौरव ज्योती निऑग नावाचा तो पत्रकार हे सारे चित्रित करण्यात मग्न होता. ती मुलगी असहाय्यपणे जीव तोडून ओरडत होती , मदतीसाठी टाहो फोडत होती पण बेफाम जमावाच्या भीतीने तिचे सहकारी पळून गेले आणि हे सर्व पाहणार्‍या नागरिकांपैकीही कोणी त्या मुलीच्या मदतीला जाण्याचे धैर्य दाखविले नाही.अखेर मुकुल कालिता नावाच्या जेष्ठ पत्रकाराने हा प्रकार पाहिला ,तेव्हा त्यांनी पोलिसांना बोलावून त्या मुलीची सुटका केली. हा सारा जमाव एका असहाय्य मुलीशी इतक्या अमानुष व अनैतिकपणे कसा वागला? चॅनलसाठी चित्रीकरण होत आहे हे ठाऊक असूनही त्यांना लाजलज्जा वाटलीच नाही, उलट त्यांचा उन्माद आणखी वाढला. सारा जमावही एका असहाय्य मुलीशी इतक्या अमानुष व अनैतिकपणे कसा वागला, चित्रीकरण होत हे हे ठाऊक असूनही त्यांना लाजलज्जा वाटलीच नाही उलट त्यांचा उन्माद आणखी वाढला.
हा सारा घटनाक्रम चक्रावून टाकणारा आहे. गौरव नावाचा हा पत्रकार न्यूज लाईव नावाच्या ज्या चॅनलसाठी काम करतो त्याची मालकी आसामचे आरोग्य व शिक्षणमंत्री हिंमत विश्वसर्मा यांच्या पत्नी रिंकी भुयन यांच्याकडे आहे.गौरवने केलेले चित्रीकरण न्यूज लाईव चॅनलवर दाखविण्यात आले. याप्रकरणी सर्वत्र संताप व्यक्त  झाल्यावर हे प्रकरण दडपण्याचे प्रयत्न झाले. गौरव हा पत्रकार आहे , जे घडेल ते दाखविणे हे त्याचे पत्रकारितेचे आदय कर्तव्य होते, त्याने काही चुकीचे केले नाही असे सांगून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला. पण यासंदर्भात संपूर्ण देशभरात निर्माण झालेल्या संतापाची दखल आसामचे मुख्यमंत्री, भारताचे पंतप्रधान यांच्यासह राष्ट्रीय महिला आयोगालाही घ्यावी लागली, त्यानंतर चौकशीची सूत्रे फिरु लागली.आता राष्ट्रीय महिला आयोगाची चौकशी, नॅशनल ब्रॉडकास्टर्स असोसिएशनची चौकशी, पोलिसांची चौकशी अशा अनेक स्तरावर चौकशी सुरु आहेत.महाभारतातील द्रोपदी वस्त्रहरणाच्या प्रसंगी दुर्योधन, दुःशासनाने जे केली त्यांनाही लाजविल असा प्रकार या आधुनिक दुर्योधन , दुःशासनांना केला आहे त्यांना जबर शिक्षा व्हायलाच हवी. यातील काही आरोपींना पोलिसांनी अटक केली असली तरी मुख्य आरोपी अमरज्योती कालिता मोकाटच आहे.

या घटनेत गौरव ज्योती निऑग या पत्रकारानेशकुनीमाची भूमिका बजावली आहे. त्या मुलीच्या छेडखानीला एकप्रकारे मदत करण्याचे काम केले आहे.तसेच या प्रसंगाबाबत पोलिसांना कळविण्याऐवजी चित्रीकरण चॅनलवरुन लगेचच प्रसारित करण्याल प्राधान्य दिले. त्याउलट  मुकुल कालिता या ज्येष्ठ पत्रकाराने बातमीची घाई न करता , त्या मुलीला पोलिसांच्या मदतीने जमावाच्या तावडीतून सोडविण्याचे व मानवतेची मूल्ये जोपासण्याचे कार्य केले आहे.
यानिमित्ताने एका घटनेची आठवण झाली.1993 साली सुदानमध्ये मोठा दुष्काळ पडला होता.त्यावेळी दक्षिण आफ्रिकेतल्या केविन कार्टर या पत्रकाराने सुदानचा दौरा केला. सुदानमधील स्थिती भयंकर होती, अनेकजण भुकेमुळे मृत्यूमुखी पडत होते. केविनला एका ठिकाणी एक लहान्‍ मुलगी अन्न व पाणी न मिळाल्याने मरणासन्न स्थितीत पडलेली दिसली, त्या मुलीच्या शरीराचे लचके तोडण्यासाठी एक गिधाड घिरटया घालत होते. ते छायाचित्र केविनने टिपले.त्या छायाचित्राला जगभरात प्रतिष्ठेचा मानला जाणारा पुलित्झर पुरस्कार मिळाला.केविनचे काही दिवस आनंदात गेले, पण नंतर त्याला लोकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली की, त्या मुलीचे पुढे काय झाले? केविन म्हणाला मला ठाऊक नाही. त्यानंतर केविनवर जगभरातून टीकेचा भडिमार झाला . एका मरणासन्न मुलीला मदत करुन तिचा जीव केविन वाचवू शकला असता , पण त्याने माणूसधर्म पाळला नाही ही टीका झाली. त्यामुळे केविनला अपराधीपणाची जाणीव झाली व त्याने अखेर आत्महत्या केली.

प्रत्येक पत्रकार हा पत्रकार होण्याआधी माणूस असतो , त्यामुळे त्याने माणूसधर्म विसरता कामा नये हे केविन विसरला होता . तीच चूक गोहातीच्या गौरवनेही केली आहे.चोविस तास काहीतरी सनसनाटी दाखविण्याच्या चॅनल्सच्या स्पर्धेतून काही पत्रकार असे नीतीभ्रष्ट होताना दिसत आहेत , समाजाला पुढे नेण्याऐवजी अधोगतीकडे नेत आहेत.अशा प्रकारांबाबत कारवाई करणारी यंत्रणा जाणीवपर्वक निर्माण होऊ दिली जात नाही. गोहातीच्या तरुणीवर बेतलेला हा प्रसंगास माध्यमांच्या आततायीपणाचा कारणीभूत ठरला आहे यात शंका नाही. या माध्यमांच्या आततायीपणाला आवर घालणारी सक्षम यंत्रणा निर्माण झालीच नाही तर याहीपेक्षा भयंकर घटना घडत राह्तील.



****************************************************************************

Sunday, July 1, 2012

अनुभवायलाच हवा असा खराखुरा रियालिटी शो

 आजपर्यंत छोटया पडदयाने कौन बनेगा करोडपती पासून बिग बॉस पर्यंत मनोरंजन करणारे अनेक रियालिटी शो अनुभवले , पण ते सारे नावालाच रियालिटी शो होते .त्यातील सारे दिखाऊ, आभासी होते. त्यातून देशाच्या, समाजाच्या हिताचा विचार कधी मांडला गेलाच नाही. पण, ही परिस्थिती आता बदलली आहे, कारण भारतीय टेलिविजन इतिहासातला पहिलावहिला खराखुरा रियालिटी शो ‘ सत्यमेव जयते ’ अवतरला आहे. सरकारला आणि समाजाला बदलायला भाग पाडण्याची ताकत टेलिविजन माध्यमात आहे हे प्रथमच भारतीय टेलिविजन दर्शकांनी पाहिले, अनुभवले.

भारतातील छोटया पडदयाचा प्रेक्षक गंभीर विषय पाहायला तयार नाही, छोटा पडदा सामाजिक प्रश्न मांडण्यास उपयोगी नाही, छोट्या पडदयावर सकाळी  रियालिटी शो प्रसारित करणे म्ह्णजे पायावर दगड मारुन घेणे , एकच रियालिटी शो एकाच वेळी अनेक वाहिन्यांवर दाखविणे शक्य नाही, सामाजिक व गंभीर विषयावरील टेलिविजन कार्यक्रमाला प्रायोजक व जाहिराती मिळत नाहीत अशा भारतातील टेलिविजन प्रसारणाबाबतच्या आजवरच्या अनेक तथाकथित संकल्पना ‘सत्यमेव जयते’ ‘ने मोडित काढल्या आहेत. यातून एसएमएस व्दारे मिळणारी रक्कम सामाजिक प्रश्न सोडवियासाठी चांगले कार्य करणार्‍या एखादया संस्थेला दिले जाते हे देखील वेगळेपण आहे.

‘सत्यमेव जयते’ या टेलिविजन मालिकेची सुरुवात 6 मे 2012 पासून झाली . आजपर्यंत या मालिकेचे आठ भाग प्रसारित झाले आहेत. स्टार समूहाच्या स्टार प्लस  व इतर सात वाहिन्यांसह दूरदर्शनवरुनही सकाळी 11 वाजता या कार्यक्रमाचे प्रसारण केले जाते. मुख्य म्ह्णजे केवळ हिंदीच नव्हे, तर तमिळ ,तेलुगु, मल्याळम, बंगाली  या प्रादेशिक भाषांमध्ये हा कार्यक्रम प्रसारित होतो. मराठी भाषेत स्टार प्रवाह वाहिनीवर सबटायटल्स दिसतात. सामाजिक व गंभीर विषय यात दाखविले जातात हे ठाऊक असूनही ,या कार्यक्रमाला प्रायोजकही चांगले मिळाले अशून जाहिरातीही मोठया प्रमाणात मिळाल्या आहेत. सर्वात विशेष म्ह्णजे सकाळच्या वेळी प्रसारण होत असतानाही दर्शकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. प्रत्येक भाग किमान 80 लाख दर्शक पाहतात अशी टॅम या दर्शक पाहणी करणार्‍या संस्थेची आकडेवारी आहे. या कार्यक्रमाने केंद्र आणि राज्य सरकारांना जनहिताचे काही निर्णय तातडीने घेण्यास भाग पाडले आहे, दर्शकांनाही अंतर्मुख होऊन विचार करण्यास प्रवृत्त करण्यात हा कार्यक्रम यशस्वी ठरला आहे.

'सत्यमेव जयते’ हा आमिर खानचा कार्यक्रम म्ह्णूनच ओळखला जातो, तो आहेच कारण आमिर खान यांनी या कार्यक्रमाला एका उंचीवर नेण्याचे काम केले आहे.अभिनेता व निर्माता म्ह्णून त्याने यात केलेल्या कार्याचे कोतुक व्हायला हवे व ते सर्वांकडून होतच आहे. पण आमीर खानपेक्षाही अधिक मेहनत दिग्दर्शक  सत्यजित भटकळ , छायाचित्रकार बाबा आजमी, क्रियेटीव टीममधील  इतर सहकारी स्वाती चक्रवर्ती,मोनिका शेरगिल, लॅन्सी फर्नांडिस, शुभज्योती गुहा, सूरेश भाटिया आदिंचे आहे.या कार्यकमाचे टायटल सॉंग, प्रत्येक कार्यक्रमाच्या शेवटी सादर होणारी अर्थपूर्ण गाणी या देखील या कार्यक्रमाच्या यशातील महत्वाच्या बाबी आहेत, हे दुर्लक्षून चालणार नाही. त्यामुळे केवळ आमिर खानचा शो म्ह्णून ‘सत्यमेव जयते’ वर स्तुतीसुमनांचा वर्षाव करणे  किंवा त्यावर टीका करणे चुकीचे ठरेल. या कार्यक्रमाछ्या निर्मितीत ज्यांनी काही ना काही योगदान दिले त्या सर्वांच्या कामगिरीला सॅल्युट करायलाच हवा.कारण तेवढेच महत्वाचे आहे. या कार्यक्रमाने भारतीय टेलिविजन इतिहासात नवे पर्व सुरु केले आहे. ज्या उद्देशाने भारतात चित्रवाणीची सुरुवात झाली , तो विकास संदेश जनतेत पोहोचविण्याचे काम भारतीय टेलिविजनकडून व त्यातही व्यावसायिक टेलिविजन वाहिनीकडून प्रथमच होत आहे.

'सत्यमेव जयते’ च्या प्रत्येक भागाच्या शेवटी सादर केली जाणारी गीते त्या भागातील विषयाला अनुसरुन आणि मनाला भावणारी आहेत. ‘नन्ही सी  चिडिया अंगना मे फिर से जा रे’ हे पहिल्या भागातील गीत जन्माला येणार्‍या मुलीचे स्वागत करण्याचा संसेश देते. दुसर्‍या भागातील ‘बिखरे टुकडे तुकडे सारे जुड रहे है धीरे धीरे हौले हौले ‘ हे गीत बाल वयात यौनशौषण झालेल्याना जीवनात आशेला अजून जागा आहे असा धीर देते. ‘पतवार बनुंगी, लहरो से लडूंगी,मुझे क्या बेचेगा रुपय्या’ हे तिसर्‍या भागातील गीत लग्नाच्या बाजारात माझा सौदा मांडू देणार नाही हा संदेश देते. ‘एक मासूम सी नाव है जिंदगी,तुफां मे डोल रही है जिंदगी’ या गीतातून डॉक्टरांच्या हाती रुग्णांचे जीवन कसे अवलंबून आहे हे चवथ्या भागात सुरेखपणे मांडले आहे. ‘घर याद आता है मुझे ‘ हे पाचव्या भागातील गीत प्रेमविवाहामुळे घरच्यांपासंन दुरावलेल्या मुलमुलींचे दुःख व्यक्त करते. ‘ऐसे ना देख ऐसे ना झांक ए दुनिया’ हे गीत अपंगत्वावर विजय मिळविणार्‍या व्यक्तींच्या आत्मविश्वासाची प्रचिती देते. तर सतव्या भागातील ‘घुट- घुट के कबतक जिउंगी सखी,अब ना मै गुमसुम रहूंगी सखी.सहने से बेहतर कहूंगी सखी’ हे गीत यापुढे नवर्‍याची मारहाण सहन करणार नाही ही स्त्रीच्या स्वत्वाची जाणीव दर्शविते. राम संपत यांचे संगीत कथाबीजाला साजेसे हे. त्यांना स्वाती चक्रवर्ती, सुरेश भाटिया , मुन्ना धीमन, स्वानंद किरकिरे , प्रसून जोशी आदींच्या सकस गीतलेखनाची तसेच –शदाब फरिदी , सोना महापात्रा यांची गायनसाथ लाभली आहे.

'सत्यमेव जयते’ च्या 6 मे 2012 रोजी प्रसारित झालेल्या पहिल्या भागात ‘स्त्री भ्रूण हत्या’ हा विषय हाताळण्यात आला.त्यानंतर राजस्थान सरकारने याबाबतचे सर्व खटले जलदगती न्यायालयात चालवू असे जाहीर केले.राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र यासह विविध राज्यात सोनोग्राफी केंद्रांव्रा धाडी टाकण्यात आल्या, अनेक दोषी डॉक्टरांचे परवाने रद्द करण्यात आले. दुसर्‍या भागात बाल यौन शोषण हा विषय हाताळण्यात आला. याच्या परिणामी केंद्र सरकारला याबाबत संसदेत मंजुरीसाठी थांबलेले बिल तात्काळ मंजूर करावे लागले.

'सत्यमेव जयते’ च्या तिसर्‍या भागात लग्न संस्था व हुंडा याबाबत काही महिलांचे अनुभव मांड्ण्यात आले आहेत.चवथ्या भागात रुग्णसेवेच्या क्षेत्रात होत असलेल्या गैरव्यवहारांवर प्रकाश टाकण्यात आला आहे, त्याबाबत डॉक्टरांना बदनाम करण्याचे हे षडयंत्र आहे , आमिर खान यांनी माफी मागावी अशी मागणी करीत इंडियन मेडिकल असोसिएशन या डॉक्टरांच्या संघटनेने टीकेची झोड उठविली, पण समाजमन आमिर खान यांच्या बाजूने राहिले.

'सत्यमेव जयते’ च्या पाचव्या भागात प्रेमविवाह करणार्‍या विविध जातीधर्माच्या मुलामुलींना किती छळाला व प्रसंगी मरणाला सामोरे जावे लागते हा विषय काही व्यक्तींच्या अनुभवांच्या आधारे हृदयस्पर्शीरित्या मांडण्यात यश आले आहे. सहाव्या भागात अपंगत्वावर मात करुन यशस्वी जीवन जगणार्‍या काहींचे अनुभव मांडले आहेत, अपंगांना समजून घेण्यात व सोयी देण्यात समाज व सरकार कसे अपयशी ठरले आहे ते यातून पाहायला मिळाले. सातव्या भागात घरगुती हिंसाचारात महिलांना मारहाण करणे हा हक्क आहे असे मानणार्‍या पुरुषी प्रवृत्तीवर आसूड ओढण्यात आले आहेत.आठव्या भागात रासायनिक खते व कीटकनाशकांच्या वापरामुळे मानवी जीवन व शेतीवर होत सलेल्या दुष्परिणामांची चर्चा करण्यात आली आहे.

'सत्यमेव जयते’ चा प्रत्येक भाग एखादया सामाजिक प्रश्नाचे विविध पैलू आपणासमोर उलगडण्याचे काम करतो.आमिर खान वैयक्तिक लाभासाठी हा कार्यक्रम करीत आहे, यात कुठली डोंबलाची समाजसेवा असे म्ह्णून आगपाखड करणार्‍यांची कमी नाही. पण ‘सत्यमेव जयते’ ने नवा इतिहास रचला आहे चांगले काम करणार्‍या समाजसेवी संस्थांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून तीन कोटी रुपयांपेक्षा अधिक देणगी मिळाली आहे..चित्रवाणी माध्यमाचा वापर विकास संदेश देण्यासाठी करण्याच्या दृष्टीने हे निर्विवादपणे पुढे टाकले गेलेले हे पाऊल आहे.याचे अनुकरण करुन यापुढच्या काळात अधिक प्रगल्भ व सामाजिक संदेश देणारे कार्यक्रम सादर होतील अशी आशा बाळगण्यास हरकत नाही.-
                                              ( दि. 1 जुलै 2012 च्या दै. संचारच्या इंद्रधनु पुरवणीतील माझा प्रकाशित लेख )

Wednesday, June 27, 2012

कॅम्पस फिल्म सोसायटी

सोलापूर विद्यापीठात 15 ऑक्टोबर 2010 रोजी" कॅम्पस फिल्म सोसायटी " ची स्थापना करण्यात आली आहे.कुलगुरु डॉ. बाबासाहेब बंडगर यांच्या हस्ते  कॅम्पस फिल्म सोसायटीचे उदघाटन करण्यात आले.

Friday, June 15, 2012

शतक चैत्रयुगाचे


भारतीय चित्रपट सृष्टीने नुकतीच शंभरी पार करुन दुसर्‍या शतकात पदार्पण केले. दादासाहेब फाळके या मराठी माणसाने  3 मे 1913 रोजी राजा हरिश्चंद्र हा चित्रपट प्रदर्शित करुन भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली.मराठी माणसांनी भारतात चित्रपटांची सुरुवात केली आणि यानंतरची चार दशके मराठी माणसेच चित्रपटसृष्टीला विकसित करण्यात आघाडीवर होती. आरंभीचा काळ दादासाहेब फाळके यांनी गाजविला आणि नंतरच्या काळात प्रभात कंपनीच्या माध्यमातून व्ही. शांताराम, विष्णुपंत दामले, फत्तेलाल आदींनी निर्माण केलेल्या चित्रपटांनी तो काळ गाजविला होता. त्या काळात माणूस, कुंकू, शेजारी यासारखे श्रेष्ठ चित्रपट मराठीत निर्माण झाले ते त्याचवेळी हिंदी भाषेतही तयार झाले. म्ह्णजे मराठी चित्रपटसृष्टी भारतीय चित्रपटसृष्टीची जननी होती आणि हिंदी चित्रपट त्याकडे मार्गदर्शक म्ह्णून पाहात होते.
काही दिवसांपूर्वी नाशिक येथे दादासाहेब फाळके स्मारकात मराठी चित्रपट शतसांवत्सरिक सोहळा आयोजित करण्यात आला होता, यानिमित्ताने मराठी माणसांचा व मराठी चित्रपटांचा हा गौरवशाली इतिहास आठवला.खरेतर हा समारंभ भारतीय चित्रपटांचा शतसांवत्सरिक सोहळा म्ह्णून साजरा व्हायला हवा होता व भारतातील चित्रपट क्षेत्रातील सर्व दिग्गज मंडळी येथे यायला हवी होती. असो, या मराठी चित्रपट शतसांवत्सरिक सोहळयाचे आयोजन फेडरेशनॉफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया ( महाराष्ट्र चॅप्टर )  आणि नाशिक महानगरपालिका यांच्या सांयुक्त वित्य्माने करण्यात आले होते. सुलोचनादीदी या ज्येष्ठ अभिनेत्री याप्रसंगी प्रमुख अतिथी होत्या.
                                            
                           चित्रांकुर हा तुम्ही रुजविला, महापुरुष तुम्ही
                           
                            या शतकाच्या चैत्रयुगाचे , उदगाते तुम्ही
दादासाहेब फाळकेंच्या अनमोल योगदानाबद्द्ल गीतकार सुधीर मोघे यानी लिहिलेल्या या कवितेने सोहळ्याची सुरुवात झाली. मराठी चित्रपटाच्या क्षेत्रात महत्वपूर्ण कामगिरी केलेल्या दिग्दर्शका/म्चा यावेळी सुलोचनादीदी व नाशिकचे महापौर यतीन वाघ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात अमोल पालेकर, सचिन पिळगावकर, महेश कोठारे, परेश मोकाशी, रामदास फुटाणे, किरण शांताराम, विजय कोंडके, संदीप सावंत, राजू फिरके या मान्यवरांचा समावेश होता.उमेश कुलकर्णी यांच्या वतीने सुधीर मोघे यांनी तर राजीव पाटील यांच्या वतीने त्यांच्या मातोश्री श्रीमती आशा पाटील यांनी सन्मान स्वीकारला.सुलोचनादीदी यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.
या सोहळ्यात अगदी मोजकीच मनोगते व्यक्त झाली.त्यात सचिन पिळगावकर म्ह्णालेचित्रपटांसाठी यशाचे दार केवळ एकाच बाजूने उघडते, ते म्ह्णजे प्रेक्षकाच्या बाजूने. प्रेक्षकच चित्रपट यशस्वी की अयशस्वी ते ठरवू शकतात. प्रत्येक कलावंतासाठी यश महत्वाचे असते. ते यश संयम , शक्ती, बुध्दी आणि नशीब यावर अवलंबून असते. मराठी चित्रपटांची संख्या सध्या वाढते आहे, मात्र यशस्वी ठरणार्‍या चित्रपटांची संख्या वाढावी. कवी व दिग्दर्शक रामदास फुटाणे यांनीही मत मांडले की अलिकडच्या काळात मराठी चित्रपटांचा दर्जा सुधारला आहे, त्यामुळे मराठी चित्रपटांचा झेंडा फडकतो आहे.मराठी माणसांनी चित्रपटगृहात जाऊन मराठी चित्रपट पाहावा.. फिल्म सोसायटी चळावळीने सिनेमा कसा पाहावा ते शिकविण्याचे कार्य केले आहे. ही चळवळ गावोगावी पोहोचून मराठी चित्रपटांचे जतन व्हावे

फिल्म फेडरेशन सोसायटीच्या वतीने सुधीर नांदगावकर म्ह्णाले की, महाराष्ट्रात सध्या 50 फिल्म्‍ सोसायटी कार्यरत आहेत. यामार्फत चांगला सिनेमा रुजविण्याचे कार्य केले जात आहे. फेडरेशन्चे अध्यक्ष किरण शांताराम यांची सांगितले की सिनेमाच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्रात वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे व मे 2013 मध्ये मुंबईत दिमाखदार सांगता सोहळा होईल. सतीश जकातदार , वीरेंद्र चित्राव हे फेडरेशन्चे पदाधिकारीही यावेळी उपस्थित होते.

याप्रसंगी जया दडकर लिखित दादासाहेब फाळके काळ आणि कर्तत्वया मौज प्रकाशन्‍ संस्थेतर्फे प्रकाशित  ग्रंथाचे विमोचन करण्यात आले. तसेच तारांगण प्रकाशन संस्थेव्दारा प्रकाशित व मंदार जोशी लिखित  शंभर नंबरी सोनं या सर्वोत्कृष्ट शंमर मराठी चित्रपटांची माहिती देणार्‍या महत्वपूर्ण ग्रंथाचे विमोचन करण्यात आले.अभिनेत्री स्मिता तळवलकर यांनी या सोहळ्याचे सूत्रसंचालन केले
.( दैनिक संचारमध्ये प्रकाशित झालेला माझा लेख , दै. संचारच्या सौजन्याने)






Wednesday, April 18, 2012

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची तेजस्वी पत्रकारिता


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची तेजस्वी पत्रकारिता

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रामुख्याने घटनेचे शिल्पकार आणि दलित समाजाचे उध्दारक म्ह्णून आपण सारे ओळखतो. पण एक तेजस्वी आणि महान पत्रकार अशी त्यांची ओळख सहसा कोणाला नाही. 1920 पासून पत्रकारितेचे व्रत अंगीकारलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता तसेच प्रबुध्द भारत ही चार वृत्तपत्रे सुरु केली, अनेक अडचणींचा सामना करीत ही वृत्तपत्रे हिरीरिने चालविली. समता आणि इतर वृत्तपत्रात सातत्याने लेखन केले, असे असूनही वृत्तपत्रांचा इतिहास लिहिणार्‍यांनी त्यांच्या या कार्याची हवी तेवढी दखल घेतली नाही. डॉ. गंगाधर पानतावणे, वसंत मून  आणि इतर काही अभ्यासकांनी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारितेबाबत स्वतंत्रपणे ग्रंथलेखन केले तेव्हा महाराष्ट्राला त्यांच्या पत्रकारितेची थोरवी लक्षात आली.
हजारो वर्षे आपले प्राक्तन समजून सवर्णांचा अन्याय निमूटपणे सहन करणार्‍या दीनदलित समाजाला जागे करण्यासाठी 'मूकनायक' हे वृत्तपत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर 31 जानेवारी 1920 रोजी सुरु केले. तेव्हा डॉ. आंबेडकर इंग्लंडमधून उच्चशिक्षण आर्थिक अडचणींमुळे अर्धवट सोडून नुकतेच परतले होते. या वृत्तपत्राच्या पहिल्या अंकात भूमिका विषद करताना त्यांनी म्ह्टले होते "आमच्या बहिष्कृत लोकांवर होत असलेल्या व पुढे होणार्‍या अन्यायावर चर्चा होण्यास तसेच त्यांच्या भावी उन्नतीच्या मार्गांची चर्चा होण्यास वर्तमानपत्रासारखी भूमी नाही.पण अशा वर्तमानपत्राची उणीव असल्याने ती भरुन काढण्यासाठी या पत्राचा जन्म आहे". डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हे वृत्तपत्र तीन वर्षे अखंडपणे चालविले  दलित समाजाला जागे करण्यास व आपल्या हक्कांची जाणीव करुन देऊन संघर्षासाठी सिध्द करण्यास प्रारंभ केला .पण त्याचवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना उच्चशिक्षण पूर्ण करण्यास पुन्हा इंग्लंडला जावे लागले. त्यांच्या अनुपस्थितीत अनुयायांना मूकनायक चालविण्याचे आव्हान पेलले नाही त्यामुळे 8 एप्रिल 1923 ला ते वृत्तपत्र बंद पडले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 3 एप्रिल 1927  रोजी 'बहिष्कृत भारत' हे वृत्तपत्र सुरु केले. या वर्तमानपत्रासाठी त्यांनी आपले रक्त आटवले, इंग्रजांनी देऊ केलेली मोठ्या पगाराची नोकरी नाकारली.अनेकदा हे वृत्तपत्र बंद पड्ले , पण पुन्हा हिरीरिने सुरु केले. मात्र अगदीच नाईलाज झाल्याने 15 नोव्हेंबर 1928 ला हे वृत्तपत्र बंद करावे लागले.वसंत मून यांनी आपल्या ग्रंथात लिहिले आहे "बहिष्कृत भारत वृत्तपत्राने अस्पृश्य समाजात मोठी क्रांती घडवून आणली आहे. हे पत्र म्ह्णजे धार्मिक किल्ल्याच्या जातीभेदररुपी तटास भगदाड पाडणारी मशीनगणच आहे". या विधानावरुन त्या काळात बहिष्कृत भारत ची कामगिरी किती महत्वाची होती हे जाणवते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 24 नोव्हेंबर 1930 रोजी 'जनता' हे पाक्षिक सुरु केले, ते पुढे साप्ताहिक झाले व 1956 पर्यंत सुरु राह्रिले. अस्पृश्य समाजाचे प्रश्न इतर समाजालाही कळावेत यासाटी त्यांनी 'जनता' ची सुरुवात केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसह 14 ऑक्टोबर 1956 रोजी बौध्द धम्माची  दीक्षा घेतल्यानंतर 'जनता' साप्ताहिकाचे नामांतर 'प्रबुध्द भारत' असे करण्यात आले. 6 डिसेंबर 1956 रोजी बाबासाहेबांचे महानिर्वाण झाल्यावरही अनुयायांनी ते अनेक वर्षे चालविले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आणि त्यांच्या वृत्तपत्रांव्रर त्या काळात अनेक सवर्ण नेत्यांनी व त्यांच्या वृत्तपत्रांनी जहरी टीका केली. पण आंबेडक्ररांनी सतत विचारांनीच त्या टीकेला उत्तर दिले, यात त्यांचे मोठेपण जाणवते.लको अनुयायी असतानाही त्यांनी कधी मारा,झोडाची भाषा केली नाही. सतत 36 वर्ष भारताच्या उन्नतीसाठी आपल्या तेजस्वी लेखणीने माग्रदर्शन करणार्‍या या महान पत्रकाराने जातीपाती तोडण्यापासून देशाच्या आंतरराष्ट्रीय राजकारणापर्यंत सर्व विषयांवर नेमके लेखन केले आहे. त्यांची पत्रकारिता म्ह्णजे भारताच्या इतिहासाचा उलगडा करुन भविष्यातील बलशाली भारताचे चित्र रेखाटणारी पत्रकारिता आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या वृत्तपत्रांची शीर्षके निवडतानाही अतिशय समर्पक निवड केली होती.अनेक वर्षे ही वृत्तपत्रे चालविणे सर्वच संदर्भाने अतिशय कठीण होते.ज्या समाजापर्यंत शिक्षण फारसे पोहोचलेच नव्हते व ज्यांचे सातत्याने आर्थिक व सामाजिक शोषण झाले अशा दीनदलित समाजातील लोक मोठया प्रमाणात वृत्तपत्राचे वर्गणीदार होतील अशी अपेक्षा करणे शक्य्‍ा नव्हते, हे ठाऊक असूनही बाबासाहेब आपल्या ध्येयापासून तसूभरही ढळले नाहीत.  
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भाषा प्रवाही व धारदार होती. 'बहिष्कृत भारत' च्या एका अग्रलेखात भारतीय समाजाच्या टिकून राहण्याची कारणमीमांसा करताना त्यांनी लिहिले आहे "जेव्हा जेते लोक शहाणे झाले व जीत लोकांना मारुन टाकण्यापेक्षा शेतकी वगैरे कामाकडे त्यांचा उपयोग करुन घेता येईल असे त्यांना दिसून आले तेव्हा जीत लोकांचा संहार करण्याची पध्दती नाहीशी होऊन त्यांना गुलाम करण्याची पध्दत अमलात आली". यात पुढे त्यांनी लिहिले आहे की, "आम्ही जगलो याचे कारण आम्ही शास्त्राप्रमाणे वागलो हे नसून शत्रूंनी ठार मारले नाही हेच होय.शास्त्राप्रमाणे वाघून जर काही झाले असेल तर ते हेच की,इतर राष्ट्रांपेक्षा आम्ही अधिक हतबल झालो व कोणाविरुध्द दोन हात करुन जय संपादन करण्याइतकी कुवत आमच्याजवळ राहिली नाही".
 
 शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश आपल्या अनुयायांना देणार्‍या बाबासाहेब आंबेडकरांनी कितीही अडचणी आल्या तरी आपली लेखणी कुठे गहाण ठेवली नाही आणि जाहिरातींच्या मलिदयाची अपेक्षा बाळगली नाही. स्वतंत्र प्रज्ञेने त्यांची लेखणी सतत धारदार तलवारीच्या पात्यासारखी झळाळत राहिली. त्यांच्या पत्रकारितेचा विचार एका चौकटीत करण्याचे प्रकार थांबायला हवेत.त्यांची पत्रकारिता बलशाली भारताचे चित्र रेखाटणारी परिपूर्ण पत्रकारिता आहे.हृी पत्रकारिता यापुढ्च्या काळातही योग्य दिशा दाखविण्याचे कार्य करीत राहणार आहे, याची खात्री आहे.
(दैनिक दिव्य मराठीने सोलापूर आवृत्तीत 14 एप्रिल 2012 रोजी प्रकाशित केलेला माझा लेख येथे देत आहे.)












































































                                   


Saturday, July 16, 2011

रेडिओ माध्यमाला सापत्न वागणूक का?

                                     भारतात माध्यमांना स्वातंत्र्य दिले आहे असे नेहमीच अभिमानाने सांगितले जाते.पण हे स्वातंत्र्य रेडिओच्या वाट्याला कधी आलेच नाही.एकाच घरातील सावत्र मुलाला मिळते तशी वागणूक सातत्याने रेडिओच्या वाट्याला आली आहे.भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळाचा विचार केला तरी हेच जाणवते की, 1947 ते 1996 दरम्यान रेडिओचे स्वरुप 'आकाशवाणी 'ऐवजी 'सरकारवाणी' असेच राहिले.रेडिओ आणि दूरदर्शनला स्वायत्तता देण्याच्या उद्देशाने 1997 साली प्रसारभारतीची स्थापना झाली. पण प्रसारभारतीचे स्वरुप असे ठेवले आहे की सरकारी हस्तक्षेप कायमच राहील. .त्यामुळे सरकारला हवे ते वृत्त प्रसारित करणारे माध्यम ही आकाशवाणीची प्रतिमा बदलू शकली नाही.प्रसारभारतीच्या स्थापनेनंतरच्या काळात आकाशवाणीवरची बंधने  कमी झाली नाहीत.उलटपक्षी प्रसारभारती स्थापन झाल्यावर आकाशवाणीची उपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र दिसते.आकाशवाणी केंद्रांची अवस्था कुपोषित बालकांसारखी झाली आहे.आकाशवाणीत मागच्या वीस वर्षात नवीन नोकरभरती झाली नाही.दूरदर्शनच्या तुलनेत आकाशवाणीला विकासासाठी उपलब्ध होणारा निधी नगण्य आहे.
                                    एकंदरीतच प्रसारभारतीच्या स्थापनेनंतरच्या जमाखर्चाचा तपशील विचारात घेतला तर जाणवते की, प्रसारभारतीचा तोटा सातत्याने वाढतच गेला आहे.लोकसभेतील प्रश्नोत्तरात यासंबंधीचा तपशील देण्यात आला आहे. त्यात स्पष्ट केले आहे की, 2006-07 मध्ये प्रसारभारतीच्या जमाखर्चात 971.72 कोटी रुपयांची तफावत होती ती दरवर्षी वाढत जात 2009-10 मध्ये 1979.00 कोटी रुपये झाली आहे. या वर्षातली जमा केवळ 1119.00 कोटी रुपये असून खर्च 3098.00 कोटी रुपये झालेला आहे.( संदर्भःhttp://164.100.47.132/LssNew/psearch/QResult15.aspx?qref=83283 )सामाजिक, शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये कपात करुन उत्पन्नात वाढ करी शकणार्‍या प्रायोजित कार्यक्रमांवर आणि जाहिरातींवर भर द्या अशा स्पष्ट सूचना आकाशवाणी व दूरदर्शनला देण्यात आलेल्या आहेत, असे असूनही जमाखर्चातील तफावत वाढतेच आहे.या एकंदर प्रकारात सामाजिक, शैक्षणिक प्रसारणाचा टेंभा मिरवण्याचा हक्कही गमावला गेला आणि आर्थिक संकटाचेही पातक प्रसारभारतीच्या नशिबी आले आहे. या वास्तवामुळे नजिकच्या काळात आकाशवाणीची सध्याची दुरावस्था दूर होईल अशी कोणतीही चिन्हे दिसत नाहीत.
                              एका बाजूला सरकारी रेडिओची अशी बिकट परिस्थिती आहे तर दुसर्‍या बाजूला खाजगी एफ.एम.वाहिन्यांची स्थितीही समाधानकारक नाही.भारतात सर्वप्रथम इ.स.2000 मध्ये खाजगी एफ.एम.साठी फ्रिक्वेन्सींचा लिलाव करण्यात आला.या पहिल्या टप्प्यात भारतातील 12 शहरात एकंदर 22 एफ.एम.वाहिन्या सुरु झाल्या.मात्र केवळ मनोरंजनासाठी प्रसारण करण्याची परवानगी देण्यात आली.चित्रवाणी या दृकश्राव्य्‍ा माध्यमाला सर्वच बाबतीत खुली परवानगी दिलेली असल्याने खाजगी टीव्ही चॅनॅल्स वाटेल तसा धुमाकूळ घालू लागली , पण रेडिओ या केवळ श्राव्य्‍ा असलेल्या माध्यमावर मात्र कडक बंधने लादण्यात आली.सरकार रेडिओला अशी सावत्रपणाची वागणूक का देते ते अजूनही उलगडलेले नाही.
                                       2001 नंतर  एफ.एम.रेडिओच्या दुसर्‍या विस्ताराच्या टप्प्यात आणखी 74 शहरात प्रसारण सुरु झाले,त्यामुळे  भारतातील एकंदर 86 शहरात ही सेवा उपलब्ध झाली.विस्ताराच्या या दुसर्‍या टप्प्यातही प्रसारण धोरण तेच कायम राहिल्याने बातमीविरहित आशयाचे बंधन कायम राहिले.परिणामी एफ.एम. प्रसारणात 70 टक्के आशय सिनेमाची गाणी हाच असतो.
                        एफ.एम.रेडिओचा विस्ताराचा तिसरा टप्पा अपेक्षेपेक्षा खूप उशीरा जुलै 2011 नंतर साकारतो आहे. यात भारतातील 227 नवीन शहरात एफ.एम. रेडिओचे प्रसारण सुरु होणार आहे. एक लाखावर लोकसंख्या असलेल्या जवळपास प्रत्येक शहरात एफ.एम.ची सेवा उपलब्ध होईल.त्यामुळे एकंदर 294 शहरात 839 एफ.एम.वाहिन्या उपलब्ध होतील.
                               या तिसर्‍या टप्प्यात प्रसारणाबाबत पूर्वीच्या तुलनेत काही सवलतीही दिल्या आहेत, नवीन धोरणानुसार एफ.एम.रेडिओ वाहिन्या शहरातील सांस्कृतिक, क्रीडाविषयक, हवामान, परीक्षा निकाल, रोजगारविषयक, पाणी व वीजपुरवठा, आपत्तीविषयक माहिती देऊ शकतील.या माहितील वृत्तविरहित माहिती ठरविण्यात आले असून , अशी माहिती श्रोत्यांना देता येईल असे सरकारचे जाहीर केले आहे.एफ.एम.मधील विदेशी भांडवल गुंतवणुकीची मर्यादा 20 टक्क्यांवरुन वाढवून 26 टक्के करण्यात आली आहे.सध्या केवळ 'क 'आणि ' ड 'वर्ग शहरातील एफ.एम.रेडिओ वाहिन्यांना दिली जाणारी नेटवर्किंगची सवलत संबंधित एफ.एम.कंपन्यांना आता आपल्या देशभरातील सर्व केंद्रासाठी मिळणार आहे हे त्यातल्या त्यात दिलासादायक निर्णय आहेत. पण या सवलती  जुजबी आहेत.असे तुकड्या - तुकड्याने स्वातंत्र्य बहाल करण्यात कोणती मुत्सद्देगिरी आहे? या नवीन धोरणानुसार एफ.एम.केद्रांना बातम्या प्रसारित करता येणार आहेत, पण आकाशवाणीवर प्रसारित होणार्‍या .एफ.एम.केंद्रांना स्वतःच्या बातम्या तयार करता येणार नाहीत. मुळात आजच्या काळात शहरांमध्ये आकाशवाणीच्या बातम्या फारशा ऐकल्या जात नसताना एफ.एम.केन्द्रांना ही नको असलेली भीक सरकार का देत आहे? वृत्तपत्रे, टीव्ही, इंटरनेट, मोबाईल याद्वारे सारे काही छापले अथवा प्रसारित केले जात असताना रेडिओला अशा बंधनांमध्ये जखडून ठेवणे हा कोणता न्याय?. रेडिओच लोकांना बिघडवू शकतो असे सरकारला वाटते काय?                                                                                
                                                 सर्व माध्यमांना सारखेच स्वातंत्र्य, विदेशी गुंतवणुकीचे सारखेच नियम , सर्व माध्यमांसाठी एकच मिडिया कौन्सिल या बाबींकडे लक्ष पुरविण्याऐवजी सरकार तात्पुरती मलमपट्टी करण्याचे धोरण आणखी किती दिवस अवलंबिणार?


ट्रम्प टॅरीफची दादागिरी

 जगाच्या इतिहासात 2 एप्रिल 2025 हा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शुल्क (टॅरिफ) बॉम्बने जगाला आर्थिक यु...