Saturday, December 7, 2019

व्यक्तिपूजा हूकूमशाहीकडे नेते


भारतीय समाजाचा, सामाजिक रचनेचा , भारतीयांच्या मानसिकतेचा संपूर्ण अभ्यास असणारी आणि त्यावर अचूक भाष्य करणारी एकमेव व्यक्ती म्हणजे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर होत. त्यांनी भारतासाठी अलोकिक कामगिरी केली आहे. 

आजच्या कोणत्याही राजकीय, सामाजिक, आर्थिक समस्येवरीलउत्तर त्यांच्या लेखनात सापडते. आजच्या काळातील राजकारणात पक्षनिष्ठेला दिली जाणारी तिलांजली, उबग आणणारा घोडेबाजार, विरोधकांची मुस्कटदाबी करणारी कपटनीती यावर त्यांनी अचूक आणि दिशादर्शक भाष्य केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केलेल्या विचारांचे प्रत्येक भारतीयाने मंथन प्रत्येक भारतीयाने करण्याची गरज आहे असे प्रकर्षाने वाटते.
भारतातील प्रत्येक स्त्री – पुरुषाला घटनेतील तरतुदीनुसार देण्यात आलेला मतदनाचा आधिकार ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मोठी देण आहे. अनेक प्रगत देशात मतदानाच्या अधिकारासाठी लोकांना व विशेषतः स्त्रियांना मोठा संघर्ष करावा लागला. मतदानाचा हा अधिकार किती महत्वपूर्ण आहे याविषयी डॉ आंबेडकर यांनी म्हटले आहे मत म्हणजे ईश्वराने दिलेल्या संजीवनी मंत्र आहे, त्याचा योग्य उपयोग केला तरच आपले संरक्षण होईल. स्वाभिमानी जीवनाचा तो एक तरणोपाय आहे, त्याची जोपासना करा. या दृष्टीने निवडणुकीचा विचार करा”. आजच्या काळात अधिक शिकलेले आणि श्रीमंत लोक मतदानासाठी बाहेरच पडत नाहीत. विशेष म्हणजे चांगले लोकप्रतिनिधी नाहीत असा गळा काढण्यात हेच लोक पुढे असतात.
निवडणुकीच्या काळात जे लोक प्रचार सभांचा धडाका लावून विमानाने फिरत सर्वत्र सभा घेतात त्यांच्याविषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भाष्य केले आहे. ते म्हणतात देशातील सरी जनता आपल्या मागे उभी आहे अशी फुशारकी व घमेंड मारणारे हे लोक विमानाने का उडतात? सारा देश घुसळून का काढतात?”. आजच्या काळात हे विधान अधिक मार्मिक आहे.
निवडून आल्यानंतर घोडेबाजारात विकले जाणाऱ्या लोकप्रतिनिधीनी विषयी आंबेडकर म्हणतात जो विकला जातो, लोभाला बळी पडतो, त्याचा काही उपयोग नाही”. लोककल्याण याच एकमेव भावनेने राजकारण केले गेले पाहिजे असे त्यांचे मत होते.
भारतीयांच्या मानसिकतेचा अभ्यास करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इशारा दिला होता की “राजकारणाच्या क्षेत्रात व्यक्ती पूजेला महत्त्व दिले जाऊ नये. इतर कोणत्याही देशाच्या राजकारणात दिसणार नाही इतक्या मोठया प्रमाणात भारतीय राजकारणात विभूतिपूजा दिसते. राजकारणात भक्ती किंवा व्यक्तीपूजा ही अधःपतन आणि अंतिमतः हुकूमशाहीकडे नेणारा हमखास मार्ग ठरतो”.
निकोप लोकशाहीत कोणत्याही पक्षाच्या हाती अनियंत्रित सत्ता असू नये असे स्पष्ट करताना डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात माझ्या मताप्रमाणे लोकशाहीच्या कामकाजासाठी फार महत्त्वाची बाब म्हणजे लोकशाहीच्या नावावर बहुमत वाल्यांनी अल्पमत वाल्यांवर जुलूम करता कामा नये. बहुमत वाले जरी सत्तेवर असले तरी अल्पमत वाल्यांना स्वतःबद्दल सुरक्षितता वाटली पाहिजे. अल्पमत वाल्यांची मुस्कटदाबी केली जाते किंवा त्यांना डावपेचाने मार दिला जातोय अशी अल्पमत वाल्यांची भावना होता कामा नये.
राजकारणही गाभीर्याने करण्याची गोष्ट आहे असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मानत. कोणाला राजकारणात यायचे असेल तर त्याने आधी भारतीय समाजाचा, अर्थकारणाचा अभ्यास केला पाहिजे. राजकारणी व्यक्तीने जनतेच्या पैशाचा कदापिही अपहार करु नये , तो पैसा लोककल्याणासाठीच वापरला गेला पाहिजे असे ते म्हणत. सरकारने राज्यकारभार कसा करावा याविषयी आंबेडकर म्हणतात कोणतेही सरकार जनहित किती पाहते याच्यावर त्याचे श्रेष्ठत्व अवलंबून असते. आपल्या देशात अनेक प्रश्न आहेत पण त्याहूनही महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे राज्यकारभार किती शुध्दतेने केला जातो. आपल्याकडील सगळ्यात महत्त्वाचा दोष कोणता असेल तर तो म्हणजे अशुद्ध व लाच बाजीने भरलेले राज्य शासन. राज्य शासन शुद्ध राखण्यासाठी काही बाहेरची मदत लागत नाही फक्त  ते शुद्ध राखण्याची इच्छा असली पाहिजे.
स्वातंत्र्य , समता आणि बंधुत्व या त्रिसूत्रीवर आधारित देशातील राजकीय, सामाजिक, आर्थिक व्यवस्था असावी. जातीधर्म विरहित सामाजिक विचार व्हावा, शुध्द हेतूने राजकारण केले जावे , राजकारणात घोडेबाजार होऊ नये, सक्षम विरोधी पक्ष असणे हे जिवंत लोकशाहीचे दयोतक आहे असे  असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मत होते. मात्र स्वातंत्र्यानंतर 72 वर्षे उलटून गेल्यावर आजही हे प्रत्यक्षात येवू शकलेले नाही. कोणताही पक्ष उमेदवार निवडताना त्याच्या मतदारसंघात त्याच्या जाती- धर्माचे किती मतदार आहेत , त्याची पैसा खर्च करण्याची ताकत किती आहे हे पाहूनच उमेदवारी देतो, निवडणुकीनंतर बहुमतासाठी होणारा घोडेबाजार ही नित्याचीच बाब झाली आहे. विरोधी पक्षांना संपविण्यासाठी सत्ताधारी पक्ष शासकीय यंत्रणा , न्यायसंस्थांना वेठीस धरीत आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्य मार्गाने राजकारण झाले  आणि लोकशाहीची जोपासना झाली तर आपला देश खरोखर बलशाली होईल .
 ( दिव्य मराठीत दिनांक 6 डिसेंबर 2019 रोजी प्रकाशित झालेला लेख )

Monday, June 3, 2019

समाज माध्यमांना विषवल्लीचा विळखा


मार्शल मॅकलुहान या माध्यम तज्ञाने आपल्या 'अंडरस्टँडिंग मिडिया' या ग्रंथात भाकित केले होते की, तंत्रज्ञानातील बदलांमुळे जग एक वैश्विक खेडे बनेल. तेच वास्तव आज आपण आजच्या काळात समाज माध्यमांच्या ( सोशल मिडिया ) व्दारे अनुभवतो आहोत. समाज माध्यमे ही प्रत्येक भारतीयाच्या जीवनातील एक अत्यावश्यक बाब बनली आहे. विशेषतः फेसबुक आणि व्हॉटसअपचा वापर प्रत्येकजण करीत आहे. व्हॉटसअपची मालकी फेसबुककडेच आहे. भारतात फेसबुकचे 25 कोटी वापरकर्ते आहेत आणि जवळपास तेवढेच व्हॉटसअपचेही वापरकर्ते आहेत. याशिवाय व्टिटर,यू ट्यूब,  इन्स्टाग्राम, लिंक्डइन, माय स्पेस, गुगल प्लस यासारखी समाज माध्यमेही लोकप्रिय आहेत. मोबाईलचा वापर तर वेड म्हणावे इतका वाढला आहे. भारतात 100 कोटीपेक्षा अधिक लोक मोबाईल वापरतात. शेतमजुरापासून ते उद्योगपतीपर्यंत प्रत्येकजण स्मार्टफोनचा आणि समाज माध्यमांचा वापर करतो आहे. प्रत्येकजण या स्मार्टफोनच्या माध्यमातून माहितीच्या महासागरात डुंबत असतो. 
माणसे आता प्रत्यक्ष एकमेकाशी फारसे बोलत नाहीत, ते स्मार्टफोनव्दारे समाज माध्यमांवर गुंगुन गेलेले असतात.अर्धा तास फेसबुक किंवा व्हॅाटसअप बंद पडले तर अनेकांच्या मनाची मोठी तगमग होते. या समाज माध्यमांमुळे भारतीय समाज बदलतो आहे, संस्कृती बदलते आहे.
 या समाज माध्यमांमुळे घडत असलेले सकारात्मक बदल खालीलप्रमाणे नोंदविता येतील.
·         तात्काळ संवाद – आपल्या आप्तांशी, मित्रांशी, सहका-यांशी तात्काळ संपर्क साधता येतो. कोणी अमेरिकेत असो की, भारतातल्या एखादया खेड्यात कोठेही तात्काळ संपर्क आणि संवाद होतो.
·         ज्ञानाची उपलब्धता – जगभरातील ज्ञानाचे आदान – प्रदान समाज माध्यमांमुळे शक्य झाले आहे. एखाद्या असाध्य आजारावर जगातील सर्वोत्तम डॉक्टरांचा सल्ला समाजमाध्यमांवरुन घेतल्याची आणि त्यानंतरच्या उपचाराने रुग्ण सुधारल्याची अनेक उदाहरणे आहेत.
·         मुक्त अभिव्यक्ती – समाज माध्यमे दडपलेल्या, पिचलेल्या लोकांचा आवाज सर्वांपर्यंत पोहोचविण्यास उपयुक्त साधन आहे. अनेक देशातील, राज्यातील जनतेचे खरे प्रश्न त्यामुळे उघडकीस येत आहेत. विकिलिक्स सारख्या नागरिक पत्रकारितेने बड्या देशांची कारस्थाने वेशीवर टांगण्याचे काम यातून केले आहे.
·          रोजगाराच्या संधी – समाज माध्यमांमुळे एक नवेच क्षेत्र रोजगारासाठी उपलब्ध झाले आहे. या माध्यमांसाठी लेखन, संपादन , व्यवस्थापन , विपणन करणा-यांची मोठी गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे रोजगारच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.
·         स्वस्त आणि गतीमान संवाद – समाज माध्यमांमुळे अगदी नगण्य खर्चात आणि गतीमान संवाद होतो. इतर माध्यमांच्या तुलनेत या माध्यमावर होणारा खर्च नगण्य आहे. यातून हव्या त्या लक्ष्यित गटाशी नेमकेपणाने , गतीने आणि अचूक संवाद साधता येतो.
·         व्यवसाय वाढ -  प्रत्येक उदयोगाला आणि इतर व्यावसायिक क्षेत्रांना आपला व्यवसाय वाढविण्यासाठी समाज माध्यमांची मदत होते.  ग्रामीण भागातूनही निर्यात करण्यास ही माध्यमे उपयुक्त ठरतात.
·         आवडीची जोपासना - समाज माध्यमांमुळे एखाद्या व्यक्तीला ज्या क्षेत्राची आवड त्या क्षेत्राशी निगडित राहता येते. समान विचार, आवडी- निवडी असलेले लोक एकत्र येतात, त्यांच्यात संवाद निर्माण होतो आहे, वाढतो. संगीत, नाट्य, शिक्षण, पार्यावरण इत्यादी क्षेत्रातले असे अनेक अभ्यासगट समाज माध्यमांव्दारे एकत्र काम करीत आहेत.
·         जगभरातील घटनांची माहिती- जगभरात घटना-या घटनांची माहिती, घटना घडताच जगभर पोहोचते आहे. जग वैश्विक खेडे बनले, त्याची प्रचीती यातून येते.
·          नवतंत्रज्ञानाचा प्रसार-  समाज माध्यमांमुळे नवतंत्रज्ञानाचा प्रसारही जगभरात तात्काळ होतो आहे. पूर्वी जे तंत्रज्ञान भारतात यायला दहापेक्षा अधिक वर्षे लागायची , ते आता काही महिन्यात भारतात येत आहे.
·         आपत्ती व्यवस्थापन – आपत्तीच्या काळात समाज माध्यमे लोकांना संकटातून सोडविण्यासाठी उपयोगी ठरतात. इराकमधून भारतीयांना सोडविण्यात, केदारनाथ अपत्तीतून लोकांची सुटका करण्यात हे दिसले.
·         जनमत घडविणे – समाज माध्यमे जनमत घडविण्याचे मोठे कार्य करतात. इजिप्तसह अनेक देशात समाज माध्यमांनी जनमत घडविण्यातही मोठी भूमिका बजावली . भारतातही अण्णा हजारे यांच्या 2014 मधील आंदोलनाच्या काळात समाज माध्यमांनी मोठी जागृती घडविली होती. लोकसभा निवणुकतही या माध्यमांची ताकद दिसून आली.
छोटया गावापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत समाजजीवन ढवळून टाकण्याचे काम समाज माध्यमांनी केले आहे. समाज माध्यमांव्दारे एकत्र आलेल्या जनतेने आपल्या देशातील हुकूमशाही राजवटी उलथवून लोकशाहीची पुर्नस्थापना करण्याचे काम अनेक देशात केले आहे. राजकीय प्रचारासाठी तर आता समाज माध्यमे हेच सर्वात महत्वाचे साधन बनले आहे. समाज माध्यमांच्याव्दारे लक्षावधी लोकांशी संपर्क साधने सहज शक्य होते आणि तेही जवळपास विनाशुल्क. कोणतेही तंत्रज्ञान वाईट, दुजाभाव करणारे नसते.  समाज माध्यमेही मूलतः चांगलीच आहेत, या माध्यमांची गुणवैशिष्टयेही खूप आहेत . मात्र या समाज माध्यमांचा गैरवापरच अधिक होत असल्याचे चित्र आहे.
 “सोशल मीडिया बन गया है एक नया संसार
जिसमें बढ़ता जा रहा है सूचना का भण्डार
सच और झूठ से नहीं रहा अब कोई वास्ता
सबकी अपनी मंज़िलें सबका अपना रास्ता”

अभय गौड यांच्या कवितेतील या ओळी खूप काही सांगून जातात. 
समाज माध्यमांचा जो गैरवापर होत आहे,  त्यामुळे समाजावर होणा-या वाईट परिणामांची चर्चा करणेही गरजेचे झाले आहे.
·         फेक न्यूज (खोटया बातम्या) – फेक न्यूज हे समाज माध्यमांसमोरील सध्याचे एक सर्वात मोठे आव्हान आहे. समाज माध्यमातून खोट्या बातम्या फार गतीने आणि सर्वत्र पोहोचतात. फेक न्यूजचा वापर समाजामध्ये गैरसमज निर्माण करण्यासाठी, परस्परांविषयी द्वेष निर्माण करण्यासाठी, राजकीय स्वार्थ साधण्यासाठी केला जातो. सर्वसामान्य माणसाला खरी बातमी कोणती आणि खोटी बातमी कोणती हे समजणे शक्य नसते. त्यामुळे बातमीची सत्य-असत्यता पारखण्याआधीच हिंसा, जाळपोळ असे प्रकार घडतात. गुगल आणि इतर काही संस्थांनी फेक न्यूज ओळखण्यासाठी काही चाचण्या विकसित केल्या आहेत. मात्र त्याची माहिती सर्वसामान्यांना नाही आणि या तंत्राद्वारे सर्वच फेक न्यूज ओळखल्या जातील असेही सांगता येत नाही. भारत सरकारने समाज माध्यमांवरील फेक न्यूज आणि अफवा रोखण्यासंदर्भात वेळोवेळी काही नियम, कायदे करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्यांचा फार परिणाम दिसून आलेला नाही. काही वेळा काही भागातील इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचाही उपाय योजला गेला. महाराष्ट्रात धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे जुलै 2018 मध्ये घडलेली घटना तर माणुसकीला काळीमा फासणारी आहे. मुले चोरणारी टोळी आली आहे या व्हॉटसअप वरून पसरलेल्या अफवेमुळे जमावाने तेथे पाच निरपराध तरुणांना ठार केले. हे पाच करून सोलापूर जिल्हयातील मंगळवेढा भागातील बहुरूपी समाजातील लोक होते. बीड जिल्हयातही अशाच प्रकारे रोजगाराच्या शोधात आलेल्या गरीब लोकांना जमावाने मारहाण केल्याचे प्रकार घडले. देशात मागील वर्षभरात अशा प्रकारात 33 निरपराध लोकांचा जीव गेला आहे.

·         ट्रोलिंग – समाज माध्यमांचा दुसरा गैरवापर ट्रोलिंगसाठी केला जातो. यात एखादया व्यक्तीला लक्ष्य करुन समाज माध्यमांवर त्याची बदनामी केली जाती, अश्लील, विखारी भाषेत टीका केली जाते. विशेषतः आपली परखड मते समाज माध्यमांव्दारे मांडणा-या युवती, महिलांना यात अधिक लक्ष्य केले जाते. ट्रोलिंगसाठी प्रामुख्याने व्टिटरचा वापर केला जातो. गुरमेहर कौरपासून पत्रकार बरखा दत्त यांच्यापर्यत हजारो महिलांना ट्रोलिंगचा त्रास सहन करावा लागला आहे. यात बदनामीपासून थेट बलात्काराची धमकी देण्यापर्यंत या ट्रोलर्सनी उच्छाद मांडला आहे. पुरुष विचारवंत, लेखक , पत्रकारांनाही खुनाच्या धमक्या दिल्या गेल्या आहेत. दहशत निर्माण करणा-या ट्रोलर्सला आळा घालू शकणारा प्रभावी कायदा अद्यापही झाला नाही. काही राजकीय पक्षंनी तर ट्रोल आर्मीच उभी केली आहे. त्यांच्या पक्षावर टीका करणा-यांवट ही ट्रोलधाड तुटून पडते. विरोधकांची यथेच्छ बदनामी करण्याची,देशद्रोही ठरविण्याची, त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्याची मोहीमच उघडली जाते. समाज माध्यमे म्हणजे मुक्त अभिव्यक्तीची व्यासपीठे असे म्हटले जाते, मात्र असे करु पाहणारांचा आवाज दडपण्याचे प्रकारच जास्त घडत आहेत.
·         युवापिढीला व्यसन - समाज माध्यमे ही तरुण पिढीसाठी एखाद्या व्यसनाप्रमाणे बनली आहेत. या समाज माध्यमांच्या आहारी गेलेल्या तरुण पिढीचे आरोग्य यामुळे धोक्यात आले आहे. देश उभारणीसाठी झटण्यापेक्षा समाजमाध्यमांवर पडिक असलेली तरुण पिढी पाहायला मिळते आहे.  नैराश्य, मानसिक आजार,वाढती गुन्हेगारी हे प्रकार तरुण पिढीत वाढत आहेत. गुड मॉर्निंग गुड नाईट यासारखे कोट्यवधी संदेश पाठवण्यात धन्यता मानणा-या भारतीयांमुळे जगभरातील इंटरनेट यंत्रणा ठप्प झाल्याची उदाहरणे आहेत.
·         अश्लीलतेचा प्रसार – समाज माध्यमांव्दारे किशोरवयीन व तरुण पीढीला अश्लील चित्रफिती, मजकूर सहज उपलब्ध होतो. या समाज माध्यमांव्दारे मुली, महिलांना धमकावण्याचे, ब्लॅकमेल करण्याचे प्रकार सर्रास घडतात. समाज माध्यमांवर त्यांची बदनामी करण्याची धमकी देऊन, बलात्कार केला गेल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत.
·         जातीय, धार्मिक विव्देष –  भारतीय समाज जसजसा अधिक शिक्षित, प्रगत होत आहे तसतशी जातीयता, धर्मांधता कमी होईल असे वाटत होते. भारतीय घटनेनेही यापुढचा भारतीय समाज जातीभेद, धर्मभेद न माननारा असावा अशी अपेक्षा केली आहे. मात्र वास्तव चित्र नेमके उलट आहे. राजकीय आणि आरक्षणाच्या लाभासाठी आपल्या जातीला, धर्माला अधिक कवटाळून समाज माध्यमांव्दारे जातीय, धार्मिक विव्देष पसरविण्याचे प्रकार सर्वत्र घडत आहेत.
·         प्रशिक्षणाचा अभाव- समाज माध्यमे म्हणजे तंत्रज्ञानाचा अदभूत अविष्कार आहे. मात्र ही संवेदनशील माध्यमे कोणत्याही प्रशिक्षणाविना प्रत्येकाच्या हातात आली आहेत. त्यामुळे या माध्यमांचा वापर कसा करावा याबाबतची समाज माध्यम साक्षरता भारतीय समाजाला ठाऊकच नाही. ही समाज माध्यम साक्षरता निर्माण करण्याचे आणि रुजविण्याचे मोठे आव्हान आपल्या देशासमोर आहे.
·         कायद्याच्या मर्यादा –फेसबुक, व्हॉटसअप, यु ट्यूब, व्टिटर, इन्स्टाग्राम, लिंक्डइन, माय स्पेस, गुगल प्लस यासारख्या समाज माध्यमांची मालकी-या बहुराष्ट्रीय कंपन्याकडे आहे. त्यांचे लक्ष मिळणा-या नफ्याकडे आहे. त्यामुळे सदस्यांची खाजगी माहिती विकण्याचेही प्रकार त्यांनी केले. महापुरुषांची , महिलांची बदनामी होत असल्याच्या तक्रारी आल्यावरही या कंपन्या कारवाई करत नाहीत. भारत सरकारने विनंती करुनही लवकर लक्ष देत नाहीत. यासंदर्भात आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभावी ठरतील असे कायदे नाहीत.
·         वाढते गुन्हे – फेसबुक, व्हॉटसपच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक केल्याचे गुन्हे वाढत आहेत. वृध्द, अज्ञानी लोकांना यात लक्ष केले जात आहे. पासवर्ड मिळवून नागरिकांचे पैसे लुबाडणा-यांची संख्याही मोठी आहे.
 या सर्व बाबी विचारात घेता समाज माध्यमांच्या गैरवापराला आणि फेक न्यूज ला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने प्रभावी कायदे करण्याची आणि ते कायदे प्रभावीपणे अमलात आणण्याची गरज प्रकर्षाने जाणवते. भारतातील नागरिकांना घटनेने अभिव्यक्ती स्वातंत्र्यांची अनमोल देणगी दिली आहे. हे स्वातंत्र्य अबाधित राहिलेच पाहिजे, मात्र या स्वातंत्र्याच्या आडून भारतीय जनतेमध्ये खोट्या बातम्या, गैरसमज पसरविणा-या, जाती-धर्मामध्ये तेढ निर्माण करणा-या विषवल्लीला  पायबंद घालण्याची नितांत गरज आहे.

Sunday, April 21, 2019

जागा राहा रात्र माध्यमांची आहे


माणूस आणि जीवसृष्टीतील इतर प्राणीमात्र एकच मोठा फरक आहे तो म्हणजे जिज्ञासा अथवा कुतुहल. माणूस फक्त आपला विचार करीत नाही तर इतरांचा, जीवसृष्टीचा व त्यापलिकडचाही विचार करतो. या मानवी जिज्ञासेतूनच माध्यमांचा जन्म झाला आहे. ‘माध्यम’ हा शब्द मुळात मिडियम’ या असिरिअन शब्दापासून तयार झालेला आहे. ‘माध्यम’ म्हणजे संवादाचे असे साधन आहे की ज्याव्दारे विचार, भावना , घडामोडी इतरांना कळविता येतात. जेव्हा मोठया जनसमुदयापर्यंत या बातम्या, संदेश पोहोचवायच्या असतात, तेव्हा एखाद्या यंत्राचा/तंत्राचा आधार घेतला जातो, तेव्हा याच माध्यमांना प्रसार माध्यमे ( मास मिडिया ) म्हटले जाते. या प्रसार माध्यमांना सर्वत्र ‘माध्यमे असेच संबोधले जाते, त्यामुळे या लेखात प्रसार माध्यमांचा उल्लेख माध्यमे असाच केला आहे.
माध्यमांचे प्रामुख्याने पाच प्रमुख प्रकार सांगता येतील .त्यात पारंपरिक माध्यमे ( लोकनाटय, गोंधळ, कीर्तन इत्यादी), मुद्रित माध्यमे ( वृत्तपत्रे, मासिके),दृकश्राव्य माध्यमे (रेडिओ, टेलिव्हीजन, चित्रपट इत्यादी), बाहय प्रसिध्दी माध्यमे ( होर्डिंग्ज, बॅनर इत्यादी), इंटरनेट माध्यमे ( समाज माध्यमे, ब्लॉग,वेब पोर्टल इत्यादी ) यांचा समावेश होतो.
माध्यमांची प्रमुख कार्ये माहिती देणे, ज्ञान देणे, रंजन करणे, सेवा देणे आणि प्रबोधन करणे ही आहेत. माध्यम शास्त्रानुसार बातमी ही पवित्र असते, त्यामुळे ती आहे तशी दयावी असे मानले जाते. जर मते व्यक्त करायची असतील तर ती बातमीत नव्हे तर लेख , अग्रलेखातून व्यक्त करावित असे मानले जात होते.
भारताचा विचार केला तर पारंपरिक माध्यमे ही समाजातूनच उदयाला आली. लोकजीवन , लोकसंस्कृतीचे प्रतिबिंब त्यातून दिसत होते.दळवळणाची फारशी साधने नसल्याने ही माध्यमे व त्यातील संदेश त्या-त्या प्रदेशापुरतेच सीमित राहिले. स्वातंत्र्यलढयाच्या काळात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, अमर शेख इत्यादींनी लोकजागृतीसाठी शाहिरीचा उपयोग करुन घेतला असे काही अपवाद वगळता, लोकमाध्यमांचा प्रभार सीमित राहिला व ही लोकमाध्यमे पुढे अस्तंगत होत गेली.
 मुद्रित माध्यमाच्या व्‍2कसाची सुरुवात 1454 मध्ये जर्मनीतील जोहान्स गटेनबर्ग यांनी हलत्या टंकाचा ( टाईप) शोध लावला तेथून झाली . जगात आणि भारतात मुद्रणाचा वापर प्रथम धर्मग्रंथ छापण्यास झाला, त्यामुळे छापलेले प्रत्येक अक्षर खरे व पवित्र असे मानले जाऊ लागले. त्यापाठोपाठ आलेल्या वृत्तपत्रातील बातम्या, मजकुरालाही समाजात मानाचे स्थान प्राप्त झाले. भारतात स्वातंत्र्यलढयाच्या काळात महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मौलाना आझाद, लाला लाजपत राय यांच्यासह सर्वच नेत्यांनी वृत्तपत्रे स्वातंत्र्य व सामाजिक लढयाचे साधन म्हणून उपयोगात आणली, त्यामुळे भारताच्या स्वातंत्र्य लढयास मोठे बळ मिळाले आणि देश स्वतंत्र झाला. माध्यमांची शक्ती किती असते याचा प्रत्यय सर्वांना आला. ती वृत्तपत्रे मतपत्रे होती, ती बहुतांशी समाजहितासाठी काय्‍॒ करीत होती. त्यामुळे त्यांचे बाहयस्वरुप ओबडधोबड आणि कृष्णधवल असले तरी त्यांचे अंतरंग हे सुंदर, पवित्र होते. आता गुळगुळीत कागदावर रंगीत छपाई होत आहेत. बाहयस्वरुपात सुंदर भासणा-या बहुतांशी वृतपत्र, मासिकांचे अंतरंग मात्र कुरुप आहे.
1913 मध्ये सिनेमा हे नवे माध्यम भारतात उपलब्ध झाले. दादासाहेब फाळके, बाबुराव पेंटर, व्ही.शांताराम, विष्णुपंत दामले, सत्यजित रे, मृणाल सेन, श्याम बेनेगल, गोविंद निहलानी यांच्यासह अनेक दिग्दर्शकांनी चांगल्या चित्रपटांची न्‍2र्मिती केली. मात्र भारतीय समाजमन मसाला चित्रपटांच्या दुनियेतच रममाण झाले. त्यामुळे गोलमालसारख्या भंपक चित्रपटाचे पाच – पाच भाग निघतात आणि प्रत्येक भाग 100 कोटीपेक्षा अधिक कमाई करतो.सिनेमाला केवळ रंजनाचे साधन मानले गेल्याने या माध्यमाचे अंतरंग मारधाड, हिंसाचार, बलात्कार, प्रेमदृश्ये यातच धन्यता माननारे बनले आहे.
1927 नंतर नभोवाणीची ( रेडिओ ) सुरुवात झाली. या माध्यमाला प्रारंभी इंग्रजांनी आणि स्वातंत्र्यानंतर भारतीय सरकारने बंधनात ठेवले. 1990 नंतर खाजगी एफ.एम.ला परवानगी देण्यात आली मात्र, फक्तगाणी वाजविण्यासाठीच. त्यामुळे या माध्यमाची शक्ती शासकीय प्रचार आणि रंजन यापलिकडे वापरलीच गेली नाही.
1959 नंतर चित्रवाणीचा ( टेलिव्हिजन) उदय झाला. या माध्यमालाही प्रारंभी सरकारी बंधनात ठेवले गेले, 1990 नंतर अचानक मुक्त करण्यात आले .आता 400 बातम्यांच्या आणि इतर 500 अशा एकंदर 900 पेक्षा अधिक चित्रवाहिन्या आहेत. बहुराष्ट्रीय कंपन्यांनी या क्षेत्रावर कब्जा केला आहे. जाहिरातींसाठी वाटेल त्या तडजोडी केल्याने यातील बहुतांश वाहिन्या पाश्चिमात्य संस्कृती लादण्यातच धन्यता मानत आहेत.
1990 नंतर इंटरनेट व त्यानंतर समाज माध्यमांचा ( सोशल मिडिया ) उदय झाला. प्रत्येक भारतीय माणूस फेसबुक, व्हॉटसअप, व्टिटर, यू टयूब किंवा इतर कोणत्या तरी समाज माध्यमाचा भरपूर वापर करतो आहे.या माध्यमातून कोनलाही लिहिता  येते, मते, चित्रे, व्हिडिओ पाठविता येतात. या माध्यमाच्या अमर्याद शक्तीचा समाजहितासाठी सकारात्मक वापर करण्याऐवजी, व्देष, जातीयता, हिंसक विचार पसरविण्यासाठी या माध्यमाचा वापर अधिक होतो आहे. या माध्यमांचे मालक हे परदेशात असल्याने यातील मजकुरावर प्रतिबंध घालता येईल असे सशक्त कायदेच उपलब्ध नाहीत.
मोबाईलच्या माध्यमातून नवे डिजिटल माध्यम आता अवतरत आहे. उद्याचे भविष्य हे मोबाइलभोवतीच फिरणारे असणार आहे. सिनेमापेक्षा टीव्हीचा पडदा छोटा म्हणून त्याला घोटा पडदा म्हटले जायचे, त्याहीपेक्षा छोटया मोबाईलच्या पडदयावर आता जग सामावले जात आहे. वेब सिरिजने पुढच्या काळाची चुणुक दाखवायला सुरुवात केली आहे. यापुढच्या काळातील माध्यमांचे अंतरंग हे अधिक संकुचित , अधिक भयावह असेल अशीच शक्यता आहे.
बडया भांडवलदारांच्या आणि जाहिरातदारांच्या कचाटयात माध्यमे जाऊ नयेत अशी महात्मा गांधी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची इच्छा होती. पहिल्या आणि दुस-या वृत्तपत्र आयोगांनीही यासाठी अनेक सुधारणा सुचविल्या व त्यानुसार सरकारनेही काही कायदे केले. मात्र या कायद्यांना बडया माध्यम समूहांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाने सरकारने केलेले कायदे रद्द ठरविले. त्यामुळे भारतातील माध्यमांतील गळेकापू स्पर्धेला मोकळे रान मिळाले. बडे उद्योजक अथवा राजकारणी हेच माध्यम सम्राट बनले. छोटी वृत्तपत्रे, वाहिन्यांना गिळंकृत करीत, आठ - दहा माध्यम सम्राटांनी आपल्या साम्राज्याचा प्रचंड विस्तार केला. या माध्यम सम्राटांच्या हाती 70 टक्के माध्यमे आहेत आणि 90 टक्के जनतेचा कब्जा त्यांनी मिळविला आहे. या माध्यम सम्राटांनी माध्यमांच्या मूळ उद्देशांना आणि नैतिकतेला तिलांजली दिली आहे. त्यामुळे आजच्या माध्यमांचे अंतरंग खूपच वेगळे आहे. जनहिताचा विचार करुन माध्यमे समाजप्रहरी म्हणून  कार्य करतील या भाबडया आशावादाला आता अर्थ राहिलेला नाही.  माध्यमांमधून दिल्या जाणा-या बातम्यांची विश्वासार्हता केव्हाच हरवलेली आहे. त्याउलट माध्यमांव्दारे दिल्या जाणा-या खोटया बातम्या ओळखणे हेच मोठे आव्हान बनले आहे. ही माध्यमे आता जनतेसाठी नव्हे तर बडया राजकारण्यांसाठी, जाहिरातदारांसाठी काम करीत आहेत. पैशांसाठी मिंधे होऊन फेक न्यूज आणि पेड न्यूज देणा-या या माध्यमांकडे आता समाज बदलण्याची शक्ती राहिलेली नाही . त्यामुळे जनतेला रंजनाच्या मोहपाशात गुंग ठेवण्याचे काम ही माध्यमे करीत आहेत. अशा या विपरित परिस्थितीत अजूनही आशेचा एक किरण आहे, तो म्हणजे जनहितासाठी निष्ठापूर्वक कार्य करणारे मोजके पत्रकार. माध्यमांनी संधी दिली नाही तरी ब्लॉगव्दारे, समाज माध्यमांव्दारे सत्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. अशा वेळी सर्वसामान्य माणसाला मात्र सांगावेसे वाटते की जागा राहा रात्र माध्यमांची आहे, त्यांच्यावर विसंबू नकोस;खरे काय ते तूच पारखून घे.

(मुंबई येथून प्रकाशित झालेल्या चैत्र पालवी माध्यम विशेष अंकात माध्यमांचे अंतरंग हा  लेख प्रसिध्द झाला आहे.)

Wednesday, April 17, 2019

माध्यम स्वातंत्र्याचे खंदे पुरस्कर्ते : डॉ. बाबासाहेब आंबेडकर



भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घटनाकार , थोर समाज सुधारक म्हणून आपण जाणतो. मात्र पत्रकारितेच्या क्षेत्रातील त्यांची कामगिरीही अलौकिक स्वरुपाची आहे. मूकनायक , बहिष्कृत भारत, जनता आणि प्रबुध्द भारत ही चार वृत्तपत्रे त्यांनी चालविली. त्यातील बहुतांश लेखन त्यांनी स्वतः केले आहे, याशिवाय समता आणि इतर वृत्तपत्रांमधूनही त्यांनी सातत्याने लेखन केले. त्यांनी त्यावेळी पत्रकारितेतून मांडलेले विचार आजही तितकेच प्रेरक आणि मार्गदर्शक आहेत.
1919 ते 1956 या जवळपास 37 वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पत्रकारिता केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारितेची उद्दिष्टये धार्मिक, शैक्षणिक, आर्थिक सुधारणा ,सामाजिक प्रबोधन,सामाजिक न्याय, समाज परिवर्तन आणि राजकीय स्वातंत्र्य ही होती.
 ‘‘गुलामाला गुलामगिरीची जाणीव करुन द्या , मगच तो आपल्या हक्कांसाठी संघर्ष करेल ‘ असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत असत. आपल्या लेखणीव्दारे त्यांनी दलित समाजाला जागे केले, ‘शिका , संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा विचार दिला. या विचाराने पेटून उठलेल्या दलित समाजाने बाबासाहेबांनी दाखविलेल्या मार्गाने पुढे जाऊन, इथल्या बुरसट समाज व्यवस्थेने हिरावून घेतलेले मानवी हक्क परत मिळविले . डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  लेखणीच्या सामर्थ्यामुळे भारतात ही सामाजिक क्रांती घडली.
मात्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य एवढ्या चौकटित मावणारे नाही. त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून भारतीय जनतेला शेती, शिक्षण, अर्थकारण, समाजकरण, राजकारण, सिंचन, कामगार चळवळ, परराष्ठ्र व्यवहार, संरक्षण , उदयोग यासह सर्वच विषयांवर विपुल लेखन केले आहे.  ते विचार आजही तेवढेच उपयुक्त आहेत.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे वृत्तपत्र स्वातंत्र्याचे प्रखर पुरस्कर्ते होते. ‘अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पत्रकारितेसारखे दुसरे साधन नाही ‘असे ते म्हणत असत. याच भूमिकेतून त्यांनी 31 जानेवारी 1920 रोजी ‘ मूकनायक ‘ हे वृत्तपत्र सुरु केले. पत्रकारितेच्या क्षेत्रातील त्यांचे हे पहिले पाऊल होते. परिवर्तनाची बीजे पेरण्याचे काम या वृत्तपत्राने चोख बजावले. 20 जुलै 1924 रोजी त्यांनी ‘बहिष्कृत हितकारिणी सभेची ‘ स्थापना करुन आपल्या सामाजिक क्षेत्रातील कार्याला प्रारंभ केला. त्यामुळे त्यानंतर 3 एप्रिल 1927 रोजी सुरु केलेले ‘बहिष्कृत भारत’ वृत्तपत्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक चळवळीचे मुखपत्र बनले. सामाजिक लोकशाही म्हणजे स्वातंत्र्य , समता , सामाजिक न्याय व बंधुता ही जीवनाची मूलभूत तत्वे मान्य करणारी पध्दती आहे.या तत्वांना अलग करता येणार नाही.भारत हे खरेखुरे राष्ट्र व्हायचे असेल तर जातीभेद गाडावा लागेल असे डॉ, बाबासाहेब आंबेडकर म्हणत.               
वेळोवेळी निर्माण होणा-या  प्रश्नांसंबंधी जनतेला योग्य माग्‍॒दर्शन करण्याची जबाबदारी वृत्तपत्रांची आहे असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणत असत. भारतातील वृत्तपत्रे कशी असावित याबाबत त्यांनी एक आदर्श कल्पना मांडली होती. ‘जनता’ या वृत्तपत्राच्या 9 मार्च 1940 च्या अंकात त्यांनी यासंदर्भात लिहिले आहे की , ‘’वृत्तपत्रांना पूर्ण स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मोठा निधी देऊन कायद्यान्वये एक समिती गठित करावी. या समितीचे विश्वस्त सरकारने दोन्ही कायदे मंडळांच्या मताने नेमावे. वृत्तपत्रांचे संपादकही याच पध्दतीने नेमावे. समितीचे विश्वस्त आणि संपादक यांना उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीएवढे मत स्वातंत्र्य दिले पाहिजे. त्यावर सरकारी नियंत्रण असता कामा नये’’.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी वृत्तपत्रांच्या संदर्भात जी संकल्पना 1940 साली मांडली होती, तशीच शिफारस दुस-या वृत्तपत्र आयोगाने 1980 च्या कालखंडात केली होती, मात्र ती संकल्पना प्रत्यक्षात येऊ शकली नाही. वृत्तपत्रांना सरकारच्या, जाहिरातदारांच्या दबावाशिवाय काम करता यावे अशी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची अपेक्षा होती. शुध्द सार्वजनिक जीवनासाठी भारताच्या नव्या घटनेत वृत्तपत्र स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी आम्ही अशी कायदेशीर समिती नेमण्याची योजना घडवून आणू आणि ख-या लोकशाहीचे रक्षण करु अशी आपणास उमेद असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. यावरुन डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांची माध्यम स्वातंत्र्याविषयीची मते किती उदात्त आणि सुस्पष्ट होती हे लक्षात येते. निकोप लोकशाहीसाठी वृत्तपत्र स्वातंत्र्य आवश्यकच आहे ही त्यांची धारणा होती. वृतपत्रांच्या स्वातत्र्याचे थोर पुरस्कर्ते असलेले पत्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या राज्यघटनेतील कलम 19 (1)( अ) मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याची तरतूद करुन आपणास माध्यम स्वातंत्र्याची अनमोल देणगी दिली आहे. वृत्तपत्र स्वातंत्र्यासाठी त्यांनी प्रसंगी इंग्रज सरकारशी संघर्षही केला आहे.
 आज निवडणुकीच्या धामधुमीत अनेक वृत्तपत्रे,  चित्रवाहिन्या आणि त्यांचे आपले जनप्रबोधनाचे मूळ कार्य सोडून कोणत्या तरी राजकीय पक्षाची हुजुरेगिरी करताना दिसतात. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना नेमकी हीच भीती वाटत होती. त्यामुळे जाहिरातींचा विचार न करता वृत्तपत्रे आर्थिकदृष्टया स्वावलंबी बनावित अशी योजना त्यांना हवी होती.
 सार्वजनिक क्षेत्रात कार्य करणा-या कार्यकर्त्यावर एखादया वृत्तपत्राने बदनामीकारक लेखन केले, तर त्या कार्यकर्त्याचे म्हणणेही छापून येण्याचा कॅनडा देशातील अधिकारासारखा अधिकार भारतात असावा अशीही  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची अपेक्षा होती. वृत्तपत्रांची भूमिका जनहिताची असायला हवी आणि कोनत्याही परिस्थितीतीत वृत्तपत्रांनी आणि संपादकांनी नीतीमत्ता सोडू नये याबाबत त्यांची मते ठाम होती. भारतातील वृत्तपत्रांचा  व्यक्तीपूजा हा स्वभावधर्म आहे, यापासून वृत्तपत्रांनी दूर रहायला हवे असेही त्यांचे स्पष्ट मत होते.
परिवर्तनाचे चक्र अर्धेच फिरल्याने भारताला राजकीय स्वातंत्र्य मिळाले , मात्र जाती, धर्माचे बंध अधिक घट्ट होत गेले. अशा काळात माध्यमांवर समाजाला योग्य दिशा दाखविण्याची जबाबदारी आहे मात्र माध्यमेच कोणाची तरी गुलामगिरी करीत आहेत, ते समाजाला कशी आणि कोणती दिशा दाखविणार?
( दैनिक दिव्य मराठी मध्ये 14 एप्रिल 2019 रोजी प्रसिध्द झालेला लेख )

Tuesday, April 16, 2019

अवलिया पत्रकार बी.जी.वर्गीस

‘In a shrinking world with information literally at our fingertips, the media needs to play a vital role as a trusted gatekeeper’ आजच्या या धकाधकीच्या काळात माध्यमांची भूमिका महत्वाची आहे असे सांगून, माध्यमांनी जनतेचे रक्षक म्हणून कामगिरी केली पाहिजे हे आग्रहपूर्वक सांगणारा एक भला माणूस मागच्या आठवडयात काळाच्या पडदयाआड गेला. दोनच दिवसावर आलेल्या पत्रकार दिनाच्या निमित्ताने या माणसाचे मोठेपण आठवणे आणि त्यांचा संदेश मनात जागा ठेवणे गरजेचे आहे.
स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडत भारतात ज्या प्रकारच्या पत्रकारितेची गरज होती ती ओळखून ज्या पत्रकारांनी लेखन्‍ केले त्यात सर्वप्रथम नाव घ्यावे लागेल ते पत्रकार बी.जी.वर्गीस यांचे. निवृत्ती हा शब्दच ज्याच्या शब्दकोशात नव्हता त्या या अवलिया पत्रकाराची लेखणी अखेरच्या श्वासापर्यंत 30 डिसेंबर 2014 पर्यंत जनतेच्या प्रबोधनासाठी आणि विकासासाठी कार्यरत होती. वयाची 88 गाठली तरी या पत्रकाराच्या लेखनाची धार कायम होती.
बी.जी. वर्गीस यांचे पूर्ण नाब बूबली जॉर्ज वर्गीस . ते मूळचे केरळचे पण त्यांचे बालपण परदेशात व्यतीत झाले शालेय शिक्षणासाठी ते जेव्हा डेहराडूनच्या डून स्कूलमध्ये दाखल झाले , तेव्हापासूनच त्यांच्यातील पत्रकारितेची झलक दिसू लागली. डून स्कूल वीकली चे ते संपादक होते.केम्ब्रिज विदयापीठातून अर्थशास्त्राचे सिक्षण घेतल्यावर त्यांनी टाईम्स ऑफ इंडियाचे पत्रकार म्ह्णून कार्यास सुरुवात केली. 1966 ते 1969 या काळात ते पंतप्रधान इंदिरा गांधींचे माहिती सल्लागार होते. 1969 ते 75 या काळात ते हिदुस्तान टाईम्सचे संपादक होते.विकास विषयक प्रश्नांबाबत अभ्यासपूर्वक लेखन , मानवी हक्कांचा लढा, पर्यावरण संवर्धन, भारत- पाकिस्तान संबंध , आंतरराष्ट्रीय संबंध हे त्यांचे आवडीचे विषय होते. त्यांच्या पत्रकारितेतील कार्याबद्द्ल ,1975 साली रेमन मॅगेसेसे पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले. यावरुन त्यांच्या पत्रकारितेतील योगदानाचे मोल लक्षात येऊ शकेल.
हिंदुस्तान टाईम्समध्ये असताना 1969 साली त्यांनी पत्रकारितेतील एक नवा प्रयोग केला. हरियानातील चटेरा एक छोटे गाव दत्तक घेऊन तेथील प्रश्नाबाबत वृत्तपत्रात सातत्यपूर्ण लेखन सुरु केले . या गावात पत्रकारांचे पथक पाठवून या लेखाचा ओघ वाहता ठेवला, त्यातून प्रशासनाला जागे केले. विकासाच्या प्रक्रीयेत माध्यमे योगदान देऊ शकतात, विकसनशील देशातील माध्यमांनी सामान्य माणसाशी नाळ जोडून , शहरांकडेच लक्ष केंद्रित न करता , ग्रामीण भागात जाऊन जनतेचे खरे प्रश्न मांडायला हवेत हा संदेश दिला. त्यांनी आधी केले आणि मग सांगितले. विकास पत्रकारिता हा शब्दही भारतात रुजला नव्ह्ता , त्या काळात विकास पत्रकारितेचे प्रयोग करणारा हा पत्रकार होता.
विकास पत्रकारितेबद्दल त्यांचे म्ह्णणे होते की, ‘ सरकारी योजना सांगणे, आणि त्याचे ढोल वाजविणे ही विकास पत्रकारिता नाही. तर जनतेचे खरे प्रश्न मांडून त्याबाबत सरकार काय करीत आहे व सरकारने काय करायला हवे हे सांगणे म्ह्णजे विकास पत्रकारिता.’
1977 मध्ये वर्गीस यांनी केरळमधून लोकसभेची निवडणूक लढविली . जवळ फारसे पैसे नव्ह्तेच, लोकवर्गणीतून निवडणूक लढविली. ते पराभूत झाले , पण त्यांचे मोठेपण यात होते की, लोकवर्गणीतील उरलेली रक्कम त्यांनी समप्रमाणात ज्याची त्याला परत केली.
आणीबाणीच्या विरोधात लेखन केल्यामुळे , त्यांना हिंदुस्तान टाईम्स संपादक पदावरुन दूर करण्यात आले. मात्र त्यांची लेखणी कधी कोणाची बटिक झाली नाही. 1982 ते 86 या काळात ते इंडियन एक्सप्रेसचे संपादक होते. त्यांनी हिमालयातील पर्यावरणाचे प्रश्न मांडणारे ‘वॉटर्स आफ होप’ , पाणी प्रश्न , पत्रकारिता या विषयावर मह्त्वपूर्ण ग्रंथ लिहिले. फर्स्ट ड्रफ्टः मेकिंग ऑफ मॉडर्न इंडिया हा त्यांचा ग्रंथही लक्षवेधी ठरला. त्यांना अनेक पुरस्कारही लाभले. त्यात आसामचा शंकरदेव पुरस्कार,मानवी हक्काच्या लढ्यासाठीचा उपेंद्रनाथ ब्रम्हा पुरस्कार यासह अनेक पुरस्कार लाभले.
पाण्यासाठी, विकासासाठी सर्व देशांनी एकत्र काम करावी यासाठी त्यांची लेखणी झिजत राहिली. जेव्हा मलाला आणि कैलाश सत्यार्थी यांना नोबेल पुरस्कार जाहीर झाला तेव्हा त्यांनी लिहिले ‘’ भारत आणि पाकिस्तान आपसात वैराच्या भूमिकेतून वागत आहेत.अशा काळात पाकिस्तानातील एका मुस्लिम व्यक्तीला आणि भारतातील एका हिंदू व्यक्तीला शांततेचा नोबेल पुरस्कार लाभतो आहे. यातील संदेश हाच आहे की, बालकांच्या भल्यासाठी, पुढच्या पिढ्यांच्या भविष्यासाठी दोन्ही देशात शांतता नांदणे आवश्यक आहे. ‘
नव्या काळातील पत्रकारांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन 2001 साली ‘ द हूट’ नावाचे वेबपोर्टल सुरु केले. पत्रकारितेतील मूल्ये कोणती आहेत, ती कशी जपावित याचे धडे यातून पत्रकारांना दिले जातात. मूल्याधिष्ठित पत्रकारितेसाठी आयुष्य वेचणारा हा आगळावेगळा पत्रकार कायम स्मरणात राहील.





                                व्हा माध्यमकार 
               सध्याचे युग हे माहितीयुग म्हणून ओळखले जाते. आल्विन टॉफलर या विचारवंताने म्हटल्याप्रमाणे कृषी , औदयोगिक या दोन युगानंतर आलेल्या 'माहिती युगात' ज्ञान हीच खरी संपत्ती बनली आहे. त्यामुळे माहितीचे ज्ञानात रूपातंर करणारी माध्यमे व त्यातील  पत्रकार हे माहिती युगातील अत्यंत महत्त्वाचे घटक बनले आहेत.
               मागील तीन दशकात माध्यमांच्या क्षेत्राचा अफाट विस्तार झाला व त्यानुसार या क्षेत्रात मोठे बदल झाले आहेत.
भारतात झपाटयाने विकसित होत असलेल्या क्षेत्रात माध्यम आणि रंजन क्षेत्राचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. वार्षिक 13.9 टक्के विकासदराने या क्षेत्राची वाढ होत असल्याने माध्यम व रंजन उदयोग क्षेत्रातील उलाढाल 2019 सालापर्यंत 2000 अब्ज रुपयापर्यंत जाईल असे अपेक्षित आहे. यावरुन या क्षेत्रातील वाढीचा धडाका आपल्या लक्षात येऊ शकेल.परिणामी माध्यम शिक्षणाच्या क्षेत्रातही मोठे बदल घडले आहेत.
पूर्वी छापून हाती येणार्‍या वृत्तपत्रे व नियतकालिकांपुरतीच पत्रकारांची कामगिरी असायची. भारतात आजच्या घडीला 70 हजार वृत्तपत्रे आणि 800 टेलिव्हिजन चॅनल्स आहेत. याशिवाय रेडिओ, सिनेमा, वेबपोर्टल, ऑनलाईन वृत्तपत्रे,मोबाईल न्यूज, इव्ह्न्ट मॅनेजमेंट,सोशल मिडिया,  जाहिरात, जनसंपर्क इत्यादी क्षेत्रेही विस्तारत आहेतच. त्याचबरोबर माध्यम संशोधन क्षेत्र, बाहय प्रसिध्दी, माध्यमे,प्रकाशन क्षेत्र, माहितीपट व चित्रपट क्षेत्र, जनसंपर्क क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, भारत सरकार व विविध राज्य सरकारांच्या माहिती व जनसंपर्क यंत्रणा, कॉर्पोरेट क्षेत्र, शासकीय कार्यालये यात पत्रकारितेचे शिक्षण घेतलेल्या विदयार्थ्यांना रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत.
पूर्वी केवळ हस्ताक्षर चांगले असले तरी पत्रकार होण्यासाठी पुरेसे असायचे. आता मात्र पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण असणे, किमान दोन भाषांवर चांगले प्रभुत्व असणे, संगणक हाताळण्याचे चांगले ज्ञान असणे या तीन बाबी पत्रकारितेच्या क्षेत्रातील नोकरीसाठी अत्यावश्यक आहेत. पत्रकारितेच्या क्षेत्रात नोकरीच्या संधी मोठया प्रमाणात उपलब्ध होत आहेत. त्यामुळे पत्रकारितेचे शिक्षण देणारी महाविदयालयेही वाढत आहेत. एकटया मुंबई शहरात पत्रकारितेचे शिक्षण देणारी 80 पेक्षा अधिक महाविदयालये आहेत. इतर शहरातील महाविदयालयांची संख्याही वाढली आहे. माध्यम क्षेत्रात नोकरीच्या संधी वाढल्याने अभ्याससक्रमांची संख्यादेखील वाढते आहे.  
वृत्तपत्रांच्या खपाच्या बाबतीत भारत जगातील दुस-या क्रमांकाचा देश आहे. भारतात दररोज वृत्तपत्राचे 12 कोटीपेक्षा अधिक अंक दररोज विक्री होतात , अशी आकडेवारी आहे. आपल्या महाराष्ट्रातही नव-नवी वृत्तपत्रे येत आहेत, पूर्वीपासून सुरु असलेल्या वृत्तपत्राच्या आवृत्ती वाढत आहेत.त्यामुळे वृत्तपत्र क्षेत्रात मोठया प्रमाणात करिअर संधी आहेत. या क्षेत्रात बातमीदार, उपसंपादक, विशेष प्रतिनिधी, ब्युरो चिफ यासारखी पदे उपलब्ध असतात.स्वतःचे वृत्तपत्र सुरु करणे हे देखील शक्य आहे. प्रत्येक वृत्तपत्राच्या ऑनलाईन आवृत्ती निघू लागल्या आहेत, त्यातही कंटेट एडिटर  होता येते. वृत्तपत्रात इवन्ट मॅनेजमेंट हा स्वतंत्र विभाग सुरु झालेले आहेत , त्यातही इवन्ट मॅनेजर व इतर पदावर काम करण्याची संधी मिळू शकते. छायाचित्र पत्रकार हे पदही उपलब्ध असते. मॅगजिन जर्नालिजमचे क्षेत्रही नव्याने भरारी घेत आहे. या क्षेत्रातही उपसंपादक व इतर पदावर काम करता येते. प्रकाशन व्यवसाय क्षेत्रातही उपसंपादक, संपादक, लेखक, चरित्र लेखक म्हणून कार्य करता येते.
रेडिओच्या क्षेत्रात एफ.एम.च्या विस्ताराचा तिसरा टप्पा सुरु आहे.त्यामुळे एक लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या प्रत्येक शहरात एफ.एम.रेडिओचे केंद्र असणार आहे. त्यामुळे या क्षेत्रातील नोकरीच्या संधी मोठया प्रमाणात वाढल्या आहेत. रेडिओ जॉकी, निवेदक , वृत्त निवेदक, वृत्त संपादक, डयुटी आफिसर,कार्यक्रम अधिकारी, केद्र संचालक यासारख्या पदांवर काम करण्याची संधी प्राप्त होऊ शकते.
टेलिविजन क्षेत्रातही नोकरीच्या भरपूर संधी आहेत. यात स्ट्रींजर,अँकर, कंटेंट एडिटर, जिल्हा प्रतिनिधी यासह विविध पदावर नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. चित्रपट क्षेत्रात चित्रपट समीक्षक , पटकथा लेखक, चित्रपट प्रसिध्दी अधिकारी, चित्रपट दिग्दर्शक , लघुपट व माहितीपट तयार करणे यासारखी कामे करण्याची संधी मिळू शकते.
जनसंपर्क क्षेत्रात शासकीय, सहकार,शिक्षण, बँकिंग, कार्पोरेट क्षेत्र यासह सर्वच क्षेत्रात जनसंपर्क अधिकारी,  जिल्हा माहिती अधिकारी, माहिती आधिकारी,जनसंपर्क सल्लागार यासारख्या पदांवर कार्य करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. केंद्र शासनाच्या प्रसार यंत्रणेत प्रवेश करण्यासाठी इंडियन इन्फॉर्मेशन सर्विसेस ( आय.आय. एस. ) ही स्पर्धा परीक्षा आहे. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यास प्रेस इफॉर्मेशन ब्युरो, रेजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर्स, क्षेत्रीय प्रचार कार्यालय यासह विविध कार्यालयात महत्वाच्या पदांवर कार्य करता येते.
जाहिरात क्षेत्रात जाहिरात लेखक,जाहिरात प्रतिनिधी, जाहिरात व्यवस्थापक, जाहिरात सल्लागार, माध्यम खरेदी व्यवस्थापक,इत्यादी पदांवर कार्य करण्याची संधी लाभू शकते. स्वतःची जाहिरात संस्था सुरु करणेही सहज शक्य आहे. रेडिओसाठी ,टेलिविजनसाठी, इंटरनेटसाठी, होर्डिंग सारख्या बाय्ह प्रसिध्दी माध्यमासाठीही जाहिराती तयार करण्याची संधी मिळू शकते.
इंटरनेटच्या गतीत व तंत्रज्ञानात झालेल्या क्रांतीकारक प्रगतीमुळे वेब मीडियाचे महत्व वाढत आहे. त्यात स्मार्टफोन युजर्सची संख्या झपाटयाने वाढत असल्याने वेब मीडियामध्ये करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. आज जवळपास सर्वच राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील दैनिके वेब पोर्टल आणि अॅपव्दारे वाचकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहेत. त्यामुळे कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यत ही माध्यमे पोहोचत आहेत. त्यातूनच वेब पोर्टल आणि न्यूज अॅपमध्ये करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. न्यूज अॅप, न्यूज साईट, युट्यूब चॅनेल, सोशल मीडिया, डिजीटल मार्केटींग, ऑनलाईन डव्हरटायजिं, गुगल अडव्हरटाईजिं, युट्यूब अॅडव्हरटायजिं, बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कंटेट एडिटर म्ह्णून अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. सोशल मिडिया मार्केटिंगसाठी कंटेंट एडिटर हवे असतात. त्यामध्ये फेसबूक पेज, ट्विटर अकाऊँट, सोशल इमेज बिल्डींग करण्यासाठी माध्यम क्षेत्रातील पदवीधरांना प्राधान्याने संधी दिली जाते. अॅप क्षेत्रात सध्या, डेली हंट, न्यूज हंट, वे टू ऑनलाईन यांसारखे बहुभाषिक अॅप आहेत. यामध्ये कंटेंट इडिटर म्ह्णून संधी उपलब्ध आहेत. तर शॉर्टन्यूज अॅप क्षेत्रात रिलायन्ससारखा ग्रुपही उतरत असल्याने नोकरीच्या सधी वाढणार आहेत.   
माध्यमाचे शिक्षण व संशोधन क्षेत्रातही नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. बॅचलर ऑफ जर्नालिझम, बॅचलर ऑफ मिडिया मॅनेजमेंट, एम.ए.मास कम्युनिकेशन यासारखे अभ्यासक्रम प्रत्येक शहरात उपलब्ध आहेत. माध्यमाच्या क्षेत्रात चांगले करिअर करु इच्च्छिणा-यांनी एम.ए.  मास कम्युनिकेशन हा अभ्यासक्रम पूर्ण करणे हितावह ठरते.       
आजच्या काळात वृत्तपत्राचा वाचक, रेडिओचा श्रोता, टीव्हीचा दर्शक बदललेला आहे. त्यामुळे त्यांच्या अपेक्षांची व गरजांची पूर्तता करणारी पत्रकारिता करणे अवघड बनले आहे. आता बातमी देताना अत्यंत कमी वेळात, सखोल , अचूक , इतरांपेक्षा वेगळी बातमी दयावी लागते. त्यासाठी त्या क्षमतेचे पत्रकार निर्माण होणे गरजेचे असते.नेमके प्रश्न विचारता येने, शोधक दृष्टी असणे, तर्क लढविता येणे व विश्लेषण करता येणे आवश्यक असते. आता विशेषीकरणाचे युग आहे, त्यामुळे पर्यावरण, शेती, उदयोग,उर्जा, शिक्षण, राजकारण, सहकार, गुन्हेगारी वृत्त, न्यायालयीन वृत्त, आंतरराष्ट्रीय राजकारण, वित्त, संरक्षण अशा कोणत्यातरी एका विषयाच सखोल अभ्यास असणार्‍या पत्रकाराला सर्वत्र मागणी असते. पी. साईनाथ केवळ भारतातच नव्हे तर जगभरात महत्व दिले जाते कारण ग्रामीण भारताशी संबंधित समस्यांचा पूर्ण अभ्यास त्यांनी केला आहे. देशाच्या कृषी धोरणात बदल घडविण्याचे सामर्थ्य त्यांच्या लेखणीत आहे, हे आपण पाहिले आहे. पत्रकारितेत करीअर करु इच्छिणार्‍या प्रत्येकाने कुठल्या तरी एका विषयाबाबत सखोल ज्ञान मिळविणे किती उपयुक्त ठरु शकते
पत्रकारितेचे क्षेत्र हे आव्हानात्मक आणि तेजोवलय लाभलेले आहे. उच्चपदस्थ राजकारणी,  समाजकारणी,  अधिकारी, चित्रपट कलावंत, साहित्यिक, शास्त्रज्ञ इत्यादींच्या सतत संपर्कात राहण्याची संधी पत्रकारांना मिळते. त्यामुळे नवे काही करू इच्छिणार्‍यांसाठी पत्रकारिता हे खुणावणारे क्षेत्र आहे. 
-    डॉ.रवींद्र चिंचोलकर
-    विभाग प्रमुख , पत्रकारिता विभाग, सोलापूर विदयापीठ

                                        ( मोबाईल क्रमांक 9860091855 )
( लोकराज्य फेब्रुवारी 2017 च्या अंकात प्रसिध्द झालेला लेख)

Thursday, June 21, 2018

जागतिकीकरणाच्या तडाख्यात प्रसार माध्यमे

प्रसार माध्यमे आणि समाज यांचे नाते खूप जवळचे आहे. प्रसार माध्यमांचा समाजावर मोठा प्रभाव पडतो. त्यामुळे प्रसारमाध्यमांना वगळून देशाचा, विकासाचा विचार केला जाऊ शकत नाही.
स्वातंत्र्यपूर्व काळात भारतातील प्रसार माध्यमांनी विशेषतः वृत्तपत्रांनी स्वातंत्र्यलढा आणि सामाजिक सुधारणेच्या संदर्भात ऐतिहासिक कामगिरी केली. महात्मा गांधी, बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मौलाना अबुल कलाम आझाद, मुकुंदराव पाटील यांच्यासह अनेक प्रतिभावंत पत्रकारांनी भारतीय पत्रकारितेच्या क्षेत्रात आदर्श कामगिरी केली. पत्रकारिता कशी करावी याचा वस्तुपाठच त्यांनी घालून दिला.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पत्रकारितेचा नवा अध्याय सुरु झाला. मतपत्रांच्या भूमिकेतून बाहेर येऊन वृत्तपत्रे समाजाचे पहारेकरी या भूमिकेतून कार्य करु लागली. नभोवाणी व चित्रवाणी मात्र सरकारच्या नियंत्रणात होती. वृत्तपत्रांनी जोमदार कामगिरी करुन माध्यमांची उणीव भासू दिली नाही. पत्रकारिता विकसित होत गेली. महाराष्ट्रात ना.भि.परुळेकर, गोविंद तळवलकर, माधव गडकरी, अनंत भालेराव, रंगा वैदय, बाबा दळवी यांच्यासह अनेक दिग्गज संपादकांच्या कर्तृत्वाने मराठी वृत्तपत्रसृष्टी समृध्द होत गेली.
भारतीय प्रसार माध्यमांच्या संदर्भात दोन बाबी हानीकारक ठरल्या. त्यातील पहिली बाब म्हणजे आणीबाणी. भारतात 1975 ते 1977 या कालखंडात आणीबाणी लागू करण्यात आली होती. या कालखंडात माध्यम स्वातंत्र्याचा गळा घोटण्यात आला. अनेक पत्रकार, संपादकांना तुरुंगवासात टाकण्यात आले. वृत्तसंस्था आणि प्रसार माध्यमांशी निगडित सर्व संस्था सरकारने ताब्यात घेतल्या. भारतीय प्रसारमाध्यमांच्या इतिहासातील या काळया कालखंडात पत्रकारांनी आणि संपादकांनी प्रखर लढा दिला. आणीबाणी संपुष्टात आल्यानंतर माध्यम स्वातंत्र्याचे नवे पर्व पुन्हा सुरु झाले. नभोवाणी व चित्रवाणीला स्वायत्तता देण्याच्या दृष्टीनेही काही प्रयत्न झाले. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे इंटरनेटचे युग अवतरले. त्यामुळे समाजाला,या देशाला पुढे नेणारी पत्रकारिता पुन्हा बहरेल ही आशा पल्लवित झाली
मात्र 1990 च्या दशकात भारताने जागतिकीकरणाच्या धोरणाचा स्वीकार केल्याने प्रसारमाध्यमाच्या क्षेत्राला दुसरा मोठा धक्का बसला. या धक्क्यामुळे प्रसार माध्यमांच्या मूळ भूमिकेलाच सुरुंग लागला आहे.
आपल्या देशाची बाजारपेठ जागतिक स्पर्धेसाठी खुली होणे हा जागतिकीकरणाचा सरळ, साधा अर्थ आहे.प्रदीप गायकवाड यांनी म्हटले आहे की जागतिकीकरणामुळे संपन्न उत्पादक  देशांमधून सेवा आणि उत्पादने यांचा मुक्त, सुसाट प्रवेश होतो’’[1 ] भारतातील प्रसारमाध्यमांचे क्षेत्रही संपन्न देशातील बहुराष्ट्रीय कंपन्यांनी काबीज केले आहे.
ऍडमिरल विष्णू भागवत यांनी जागतिकीकरणामुळे नेमके काय घडले हे स्पष्ट करताना म्हटले आहे की, जागतिकीकरणाचा सर्वाधिक लाभ हा उत्तर आणि दक्षिण युरोपमधील आधीच संपन्न असलेल्या राष्ट्रांना झाला आहे. तर अविकसित आणि विकसनशील अशा देशांना या जागतिकीकरणाचा सर्वाधिक फटका बसला आहे. [2 ]
जागतिकीकरणामुळे भारतातील प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रात कोणती स्थित्यंतरे घडली याचा मागोवा घेतला तर जमा-खर्चाच्या बाजू खालीलप्रमाणे जाणवतात.
जमेच्या बाजू –
तंत्रज्ञानातील जागतिक स्तरावर झालेल्या प्रगतीचे खालील लाभ भारतीय प्रसारमाध्यमांना व नागरिकांना मिळाले.
·         वृत्तपत्रे - वृत्तपत्रात अत्याधुनिक मुद्रणयंत्रे आली,फॅसिमाईल तंत्रज्ञानामुळे वृत्तपत्राची पानेच्या पाने एका शहरातून दुस-या शहरात क्षणात पाठविणे शक्य झाले. नवीन सॉफ्टवेअरमुळे मांडणी आणि सजावटीत क्रांतीकारक बदल झाले. मुद्रणासाठी चांगल्या दर्जाचा कागद मुबलक प्रमाणात उपलब्ध झाला. वार्तांकन करण्यासाठी आधुनिक साधने उपलब्ध झाल्याने घटनास्थळाहून थेट कार्यालयात बातमी पाठविणे शक्य झाले. ग्रामीण भागातील वार्ताहरांनाही नवतंत्रज्ञानाचा लाभ झाला. इ वृत्तपत्रे तसेच ऑनलाईन आवृत्ती इंटनेटव्दारे उपलब्ध झाल्याने, जगभरातील वाचकाची सोय झाली.
·         नभोवाणी – नभोवाणीच्या क्षेत्रात एफ.एम.तंत्रज्ञानामुळे प्रसारणाचा दर्जा सुधारला. श्रोत्यांसाठी अनेक पर्याय उपलब्ध झाले.इंटरनेटमुळे जगभरातील नभोवाणी केंद्रांचे कार्यक्रम ऐकता येणे शक्य झाले. मोबाईलमध्ये नभोवाणीचे कार्यक्रम ऐकता येत असल्याने आपल्या आवडीनुसार हव्या त्या ठिकाणी, हवे ते कार्यक्रम ऐकणे शक्य झाले आहे.
·         चित्रवाणी – भारतात सध्या 800 पेक्षा अधिक टेलिव्हीजन चॅनल उपलब्ध आहेत.दर्शकाला हव्या त्या वेळी, हवे ते कार्यक्रम उपलब्ध झाले आहेत. जगभरातील बहुराष्ट्रीय कंपन्यांनी या क्षेत्रात शिरकाव केल्याने वैविध्यपूर्ण कार्यक्रम दर्शकासाठी उपलब्ध आहेत.
·         इंटरनेट – इंटरनेटमुळे तर सारे जग एक वैश्विक खेडे बनले आहे. देशांच्या सीमा ओलांडून संदेशांची क्षणार्धात देवाण - घेवाण होत आहे. फेसबुक, व्टिटर, वॉटस अप यासह उपलब्ध झालेल्या समाजमाध्यमांमुळे जगभरातील ज्ञानाची कवाडे खुली झाली आहेत. माध्यमे सर्वसामान्यांच्या हाती आल्याने प्रत्येकाला अभिव्यक्त होण्याची संधी उपलब्ध झाली आहे. ब्लॉग, इ-मेल यासह कितीतरी सुविधा इंटनेटमुळे उपलब्ध झाल्या आहेत.
·         स्मार्टफोन – सर्वांच्या हाती आलेला स्मार्ट फोन हा तर एकविसाव्या शतकातील सर्वात क्रांतीकारक बदल मानावा लागेल.यात घडयाळ, कॅलक्युलेटर, टीव्ही, रेडिओ, इंटरनेट, समाजमाध्यमे, फोटो कॅमेरा,व्हीडिओ कॅमेरा यासह शेकडो सुविधा आहेत.
वजा बाजू –
जागतिकीकरणामुळे भारतातील प्रसारमाध्यमावर जे विपरित परिणाम झाले ते खालीलप्रमाणे.
·        वृत्तपत्रे – वृत्तपत्र क्षेत्रात स्पर्धा वाढून उत्पादन खर्च आवाक्याबाहेर गेला आहे, त्यामुळे लहान व मध्यम वृत्तपत्रे नामशेष होत आहेता. वृत्तपत्राच्या क्षेत्रात बडया कार्पोरेट उदयोगांची एकाधिकारशाही वाढते आहे. एकाच साच्यात तयार झाल्यासारख्या रंगीत – चकचकीत वृत्तपत्रांनी त्या-त्या प्रदेशातील भाषा वैशिष्टये पुसली आहेत. वृत्तपत्रातील संपादकाचे महत्व् कमी झाले आहे. सामाजिक बांधिलकी, नीतीमूल्ये यापासून वृत्तपत्रे दूर जात आहेत. सांस्कृतिक क्षेत्रातही वृत्तपत्रे ‘पेज थ्री’ संस्कृतीच्या आहारी गेलेली दिसत आहेत. डॉ.चंद्रकांत केळकर यांनी म्हटले आहे की ‘‘सांस्कृतिक क्षेत्रात जगभरच्या समाजातील सांस्कृतिक वैविध्य अधिकाधिक पुसट करुन बाजारपेठेमार्फत त्यामध्ये एकजिनसीपणा कसा आणता येईल;यासाठी वेगवेगळ्या सांस्कृतिक माध्यमातून प्रयत्न होत आहेत. [3 ] वृत्तपत्रे लोकांच्या ख-या प्रश्नांकडे दुर्लक्ष करुन राजकारणी आणि कार्पोरेट क्षेत्राला हव्या असलेल्या बातम्यांकडेच लक्ष देत आहेत. मुख्य म्हणजे आपले सेवेचे व्रत झुगारुन वृत्तपत्रे नफ्याच्या मागे लागली आहेत. त्यामुळे वृत्तपत्रांची विश्वासार्हता हरवत चालली असून ,वृत्तपत्रातून खरी बातमी मिळेलच याबाबतची खात्री आता राहिलेली नाही.
·         नभोवाणी – नभोवाणी क्षेत्रावर भारत सरकारने अजूनही काही बंधने लादली आहेत. एफ.एम. चॅनलना फक्त गाणी वाजविण्याची परवानगी आहे. बातम्या व इतर वैचारिक कार्यक्रमाची परवानगी नाही. लोकांचे फक्त रंजन करा एवढाच जागतिकीकरणाचा लाभ सरकारने नभोवाणीच्या पदरी पडू दिला आहे.
·         चित्रवाणी – चित्रवाणीवर मात्र कुठली बंधने नाहीत. त्यामुळे या क्षेत्रात परदेशी बहुराष्ट्रीय कंपन्यांनी धुमाकूळ घातला आहे. भारतात 800 पेक्षा अधिक टीव्ही चॅनल दिवसभरातील 24 तास माहिती – रंजनाचा मारा करीत आहेत. स्पर्धा आणि अवाढव्य उत्पादन खर्च यामुळे बहुतांश चॅनल कार्पोरेटसच्या हाती आहेत. येथेही एकाधिकारशाही आहेच, त्यामुळे चॅनल मालकांच्या मर्जीनुसार कार्यक्रम, बातम्या प्रसारित करण्याची बंधने आहेत. परदेशातील कार्यक्रमांचे अनुकरण करुन भारतीय प्रेक्षकाला पाश्चात्य संस्कृतीचे धडे दिले जात आहेत. डॉ.भालचंद्र नेमाडे यांनी नेमक्या शब्दात हे वास्तव मांडताना म्हटले आहे,‘‘आपल्याच जवळच्या गोष्टीबद्दल आपले संवेदन नष्ट होणे, पण जास्तीतजास्त दूर जे काही चालले आहे त्याचे संवेदन वाढविणे हे लोंढामाध्यमांव्दारे जागतिकीकरणाच्या या हेतूशून्य गदारोळात होत चालले आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनिक  माध्यमाचा जो घोटाळा आहे, त्याने कारण नसताना जग तुमच्या जवळ आणून ठेवले, पण शेजारी तेवढा जवळ आणलेला नाही आणि त्यामुळे तुमच्या गावात काय चाललेय हे कळायची गरज तुम्हाला वाटत नाही. [4 ] जागतिकीकरणामुळे माणूस संवेदनाशून्य बनत चालला आहे, आभासी जगात ढकलला जात आहे; हाच चित्रवाहिन्यांमुळे निर्माण झालेला सर्वात मोठा धोका आहे. डॉ. अनंत तेलतुंबडे म्हणतात जागतिकीकरणाचा सांस्कृतिक प्रहारसुध्दा सामाजिक न्यायाच्या संदर्भात चिंताजनक आहे. शक्तीशाली प्रसारमाध्यमातून त्याच्या थिल्लर भोगवादी संस्कृतिच्या फैलावामुळे गरिबांच्या प्रश्नांचे अधिकाधिक सीमांतीकरण होत आहे [5 ]
 चित्रवाहिन्या नेमके काय दाखवितात याचा सखोल अभ्यास केला तर हे    वास्तव नजरेस पडते.लोकांच्या ख-या प्रश्नापासून चित्रवाहिन्या दूर असल्याचेच चित्र आपणास दिसते.
·        इंटरनेट – इंटरनेटमुळे जग जवळ आले हे खरे आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक माणसाला अभिव्यक्त होण्याची संधी मिळाली हे देखील सत्य आहे. मात्र नवमाध्यमाच्या साक्षेपी वापराच कुठलेच ज्ञान, प्रशिक्षण न मिळता ही समाजमाध्यमे लोकांच्या हाती आली आहेत. या माध्यमाचा गैरवापर करुन जातीधर्मातील भांडणे, व्देष वाढविण्याचे कार्य समाजकंटक करीत आहेत. या जागतिक माध्यमावर सरकारचे नियंत्रण राहू शकत नाही, कायदेही अपुरे पडतात. त्याचा फायदा घेऊन समाजकंटक, अतिरेकी या माध्यमाचा गैरवापर करीत आहेत. काही महिन्यापूर्वी नाशिक जिल्हयात एक आठवडा इंटरनेटवर बंदी घालावी लागली होती. हे यासंदर्भातील दुष्परिणामाचे ताजे उदाहरण आहे. किशोरवयीन व तरुण पिढीला गुंगवून वाममार्गाला लावण्यासाठी या माध्यमाचा वापर करुन घेतला जातो आहे.
·        स्मार्ट फोन – स्मार्ट फोन हे खरे तर ज्ञान सपादनाचे एक महत्वपूर्ण साधन आहे. मात्र या साधनाचा सवंग रंजनासाठीच सर्वाधिक वापर होतो. युवापिढी वॉटस अप आणि चॅटिंगच्या आहारी जाताना दिसत आहे. कार्पोरेट क्षेत्रातील लोक आकर्षक जाहिरातीचा मारा करुन ही गुंगी उतरुच नये असा प्रयत्न करीत आहेत. रंगनाथ पठारे यांनी हे वास्तव अधोरेखित करताना म्हटले आहे संगणक क्रांती आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे, प्रसारमाध्यमे यांनी बडयांची ताकत अवाढव्यपणे वाढविली आहे.या सगळयांवर बव्हंशी मोठया सत्तांचा ताबा आहे. आपण, काय, कसे, किती बघायचे, वाचायचे वा शोधायचे याचा विचार करण्याची आवश्यकताच संपेल अशी भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे. संभ्रमावस्था , कुंठितावस्था अशा शब्दांचे अर्थच बदलत चालले आहेत. सामान्य माणसाने काहीही विचार करायचा नाही, ती जबाबदारी पार पाडणारे वेगळे लोक आहेत.ते देतील ते घ्यायचे, त्यांनी निर्माण केलेल्या भ्रामक वास्तवात खेळायचे, हे भ्रामक वास्तव स्वतःवर लादून तुकडे तुकडे व्हायचे. त्याला इलाज नाही”. [6 ]
आपण स्मार्टफोनच्या माध्यमातून जे जे संज्ञापन करतो , ते आपल्या मते खाजगी असते. पण या संज्ञापनावर अनेक जागतिक यंत्रांची नजर असते.’बिग ब्रदर इज वॉचिंग यू’ याचा प्रत्यय पदोपदी येतो.त्यामुळे या संज्ञापनात आपण सावधगिरी बाळगणे गरजेचे असते. जगभरातले लुटारु इंटरनेटच्या महाजालातून आपणाला अडकविण्यासाठी, आपली आर्थिक, वैचारिक, सांस्कृतिक लूट करण्यासाठी टपून बसलेले आहेत. त्यांच्या आहारी जायचे का ? याचा निर्णय आपणाला घ्यावा लागणार आहे.
जागतिकीकरणामुळे माणसाला गुंगी आणली आहे. माणसाची विचार करण्याची शक्तीच या व्यवस्थेने हिरावून घेतली आहे. जागतिकीकरणामुळे प्रसार माध्यमांचा झगमगाट वाढला, खप वाढला, वाचक आणि दर्शकांची संख्या वाढली. मात्र, माणसाला विचारशून्य, संवेदनाशून्य बनविणारी व्यवस्था यातून फोफावली . हा धोका ओळखून पर्यायी लोकमाध्यमे निर्माण करण्याचा मार्ग आपल्या हाती आहे. विधायक विचार करणा-या समाजगटांनी यासाठी एकत्र येऊन कृती करण्याची गरज निर्माण झाली आहे.
संदर्भः
1)    ऐडमिरल भागवत विष्णू, ‘जागतिकीकरण नवी गुलामगिरी’ ग्रंथातील प्रदीप गायकवाड यांची प्रस्तावना, समता प्रकाशन, नागपूर, तृतीय आवृत्ती, जानेवारी 2006, पृष्ठ क्रमांक 4
2)    ऐडमिरल भागवत विष्णू, ‘जागतिकीकरण नवी गुलामगिरी’ ग्रंथाची प्रस्तावना, समता प्रकाशन, नागपूर, तृतीय आवृत्ती, जानेवारी 2006, पृष्ठ क्रमांक 18
3)    डॉ.केळकर चंद्रकांत, ‘दुसरे जग शक्य आहेः पर्यायी लोकवादी व्यवस्था’, सायन पब्लिकेशन्स, पुणे, पहिली आवृत्ती, 2010, पृष्ठ क्रमांक 23
4)    डॉ. नेमाडे भालचंद्र, ‘साहित्य, संस्कृती आणि जागतिकीकरण’ लोकवाड्ग्मय गृह प्रकाशन, मुंबई , आठवी आवृत्ती, 2015, पृष्ठ क्रमांक 10
5)    डॉ. तेलतुंबडे अनंत, ‘सामाजिक न्याय आणि जागतिकीकरण’,लोकवाड्ग्मयगृह प्रकाशन,मुंबई, दुसरी आवृत्ती, 2010, पृष्ठ क्रमांक 28
6)    पठारे रंगनाथ, ‘जागतिकीकरण आणि देशीवाद’,लोकवाड्ग्मयगृह प्रकाशन,मुंबई, चौथी आवृत्ती, 2006, पृष्ठ क्रमांक 9
 ( बदलते विश्व आणि साहित्यापुढील आव्हाने या ग्रंथात प्रकाशित झालेला लेख )
******************************************************************************

ट्रम्प टॅरीफची दादागिरी

 जगाच्या इतिहासात 2 एप्रिल 2025 हा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शुल्क (टॅरिफ) बॉम्बने जगाला आर्थिक यु...